प्रामाणिक असणे याचा काय अर्थ होतो?
प्रामाणिक असणे म्हणजे सत्य असणे आणि कसलीही दगलबाजी न करणे. प्रामाणिकपणा तुमच्या बाबतीत अपेक्षितो की तुम्ही इतरांसोबत दळणवळण करताना सरळ, सन्माननीय असावे; फसविणारे वा ठकबाजी करणारे नसावे. प्रामाणिक माणूस सचोटीचा माणूस असतो. तो विश्वासपात्र असल्यामुळे आपल्या सोबत्याला कधीही फसविणार नाही. आम्हाला देखील इतरांनी असेच वागवावे असे वाटत नाही का? तसे आहे तर मग प्रामाणिकपणा कालबाह्य आहे म्हणता येईल का?
वरील व्याख्यांचे परिक्षण केल्यावर ख्रिश्चनांना हे लगेच कळते की, खरे उपासक आहोत असा दावा करणाऱ्यांनी प्रामाणिक का असलेच पाहिजे. (योहान ४:२४) तो, “यहोवा, सत्यस्वरुप देवा”ची भक्ती करतो. (स्तोत्रसंहिता ३१:५; तीतास १:२) देवाचे प्रतिनिधित्व केवळ “सत्यप्रिय” माणसेच करू शकतात.—निर्गम १८:२१.
प्रामाणिकपणा आमच्या जीवनाच्या विविध भागांवर परिणाम करतो. यामुळेच प्रेषित पौलाने जे म्हटले ते समजण्याजोगे आहे की, “सर्व गोष्टीत प्रामाणिक वागणूक ठेवण्याची आमची इच्छा आहे.” यात बोलणे, नोकरीवरील व्यवहार, घरगुती प्रकरणे, व्यापारी दळणवळण आणि सरकार आम्हाला ज्या कायदेशीर गोष्टी करायला सांगते त्या येतात.—इब्रीयांस १३:१८.
आम्ही बोलतो त्या गोष्टी
लोक पुष्कळ बाबतीत असत्य गोष्टी बोलतात आणि हे अजाणपण समजून स्विकाहार्य समजले जाते. कामाच्या तासांच्या बाबतीत खोटा अहवाल देणे, दारावर असलेल्या कोणास ‘घरी नाहीत’ असे खोटेपणाने मुलांना सांगावयास लावणे, विमा प्रतिनिधीस बिनचूक माहिती न देणे, आणि कामावरुन रजा मिळावी याकरता आजारी आहोत हे खोटपणाने सांगणे अशा काही यात गोष्टी येतात.
कधी कधी आम्हाला सांगायला लागणाऱ्या गोष्टी लिहून द्याव्या लागतात. पण येथे काहींचे असे म्हणणे आहे की, आपण तोंडाने कधीही लबाडी करीत नाही पण करासाठी आपले उत्पन्न कळविणे वा आंतरराष्ट्रीय हद्दीवर आपल्यापाशी असणाऱ्या सामानाची यादी जकात अधिकाऱ्याला देणे वेगळे आहे. पण ही फसवणूक सर्व करदात्याला भारी पडते. याला खरे शेजारप्रेम म्हणावे का? याशिवाय, ख्रिश्चनांना, “कैसराचे कैसराला” देण्याचे बंधन नाही का?—लूक २०:२५; १०:२७; तसेच रोमकर १३:१, २, ७, ८ पहा.
आम्ही बोलतो त्या सर्व गोष्टीत “लबाडीचा बाप” याचे नव्हे तर, “सत्यस्वरुप देवा”चे अनुकरण केले पाहिजे. (स्तोत्रसंहिता ३१:५; योहान ८:४४) बनवाबनवी व फसवणूक करण्यासाठी तत्वहीन माणसे दुहेरी बोलणे करण्याचा प्रयत्न ठेवतात. पण आमच्या शेजाऱ्यासोबत खोटे बोलणे हे त्याच्यावर प्रेम दाखविणे नाही. तसे पाहता लबाडांना कोणतेही खरे भवितव्य नाही.—इफिसकर ४:२५; प्रकटीकरण २१:२७; २२:१५.
कामावर
प्राप्त होणाऱ्या पगारासाठी ठरवून दिलेल्या कामाच्या तासाप्रमाणे काम देणे हे व्यवहार्य आणि शास्त्रवचनीय गरज आहे. (कलस्सैकर ३:२२-२४) परंतु कंपनीच्या वेळेची बरबादी करणारे चोरही आहेत, जे दुपारची सुटी अधिक घेतात, कामाला उशीरा येतात व लवकर घरी जातात, तसेच कामावर आल्यानंतर बराच वेळ केशभूषा करण्यात घालवितात. याखेरीज कंपनीचा फोन स्वतःच्या कामासाठी वापरुन बऱ्याच लांब गप्पा करीत असतात, आणि कंपनीच्या वेळेतच स्वतःचा जोडधंदाही चालवितात आणि झोपही घेतात. त्यांचा असा चोरपटपणा प्रत्येकासाठी महाग पडतो.
कामावरील चोरीचा आणखी एक प्रकार हा की, कामावरील साहित्य आणि साधने स्वतःच्या व्यक्तीगत वापरास्तव घेणे. काही म्हणतात की, आमचे मालक तर कंजूष आहेत त्यामुळे आम्हास मिळणाऱ्या पगाराची असे करणे ही भरपाई आहे! पण वस्तुतः मालकाच्या वा धन्याच्या माहिती व परवानगीशिवाय काही वस्तु घेणे हे चोरीसारखे आहे.
या सर्व परिस्थितीत खरा ख्रिस्ती ही प्रेरित सूचना पाळीलः “चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये तर गरजवंताला द्यावयास आपल्यापाशी काही असावे म्हणून . . . आपल्या हातांनी . . . उद्योग करीत राहावे.”—इफिसकर ४:२८; प्रे. कृत्ये २०:३५.
पण समजा, तुमच्या मालकांनी तुम्हाला काही अप्रामाणिक वा बेकायदेशीर कृत्य करायला सांगितले आणि ते केले नाही तर तुम्हाला कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली तर काय? काही उदाहरणे ही आहेतः ग्राहकाला वाहनाचे काही भाग बदलून बसविल्याचा आकार लावणे पण प्रत्यक्षात ते भाग बसवलेच नसतात; खोक्यात कमी प्रतीचा माल भरणे व ग्राहकाला अधिक भावाने त्याचा आकार लावणे; मालाची मूळ किंमत तीच वा कमी असताना त्याजवर नव्याने “कमी झालेली किंमत” लिहीणे; अशा गोष्टींना कर्मचारी नव्हे तर मालक जबाबदार आहे असे पुष्कळजण गृहीत धरतील. अशा प्रकारची स्थिती सामोरी आली तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांनी काय केले? डॅरील जे——लिहितातः
“मी एका किराणा दुकानात मालाच्या देखरेखीचे काम पाहात होतो तेव्हा व्यवस्थापकांनी येऊन मला म्हटले की, मालाची किंमत न वाढवता नफा वाढवावा. तो कसा? त्याकरता हा प्रस्ताव सुचविला गेलाः काही मालाचे वजन जादा असल्याचे दाखवून माल पाठविणाऱ्याला ‘डमी’ क्रेडिट नोट पाठविणे. ही सर्वसाधारण प्रथा होती, पण ती फसवणूकीची होती.”
तेव्हा डॅरील यांनी हा बनावटपणा व फसवणूक करण्याचे नाकारले. (नीतीसूत्रे २०:२३) काही आठवड्यातच त्यांना कामावरुन कमी करण्यात आले. आता बेकार झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर जी अडचण उद्भवणार होती ते पाहता त्यांनी हा मूर्खपणा आचरला होता का? प्रामाणिकपणा दाखविण्याची जी शेखी होती त्याच्याविषयी त्यांना आता खंत वाटायला लागली का? नाही. कारण जे घडले ते एका सह-साक्षीदाराला कळाले तेव्हा त्यांनी त्यांच्या कामाची दुसरीकडे सोय करून दिली. डॅरील म्हणतातः “तीन चार आठवड्यातच मला प्रामाणिक स्वरुपाच्या उदरनिर्वाहामुळे माझ्या कुटुंबाचे संगोपन पुन्हा सुरु करता आले. यहोवाला सचोटी दाखविल्यामुळे मला हा आशीर्वाद मिळाला म्हणून धन्यता वाटते.”
उलटपक्षी, तुम्ही प्रामाणिकपणे वागता म्हणून तुम्हाला नोकरी मिळू शकते. कॅनडातील टोरन्टो येथे एका मोठ्या दुकानादारास प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विमा कंपनीच्या एका प्रतिनिधीने हा सल्ला दिला की, त्याच्या दुकानात कामगाराकरवी ज्या वारंवार चोऱ्या घडतात त्यासाठी त्याने यहोवाच्या साक्षीदारांना कामावर ठेऊन बघावे. प्रतिनिधी म्हणालाः “मी दुसऱ्या शहरात माझे विम्याविषयीचे प्रशिक्षण घेत होतो तेव्हा या शहरातील विमा ग्राहकांची मोठमोठी दुकाने होती व त्यांच्या संघटनांनी, दुकानात रात्रीच्या वेळी माल भरण्यासाठी केवळ साक्षीदारांनाच कामावर ठेवले होते. दुसरे कामगार होते तेव्हा त्यांना यांच्याकडून वाईट अनुभव आला पण जेव्हा त्यांनी साक्षीदार कर्मचाऱ्यांना दुकानाची किल्ली सुपुर्द केली आणि दुकाने बंद झाल्यावर हे मालभरणीचे काम दिले तेव्हा एकही जिन्नस हरवली नाही हे आढळले.
प्रामाणिक असण्याचे इतर काही मार्ग
दुसऱ्याकडून पैसे उसने घेताना, घेणाऱ्याठायी सहसा नम्रभाव व आदर दिसत असतो व त्यावेळी तो ते पैसे परत करील अशी हमी देत असतो आणि केलेल्या मदतीविषयी आभार देखील मानत असतो. पण जेव्हा ते कर्ज परत फेडण्याची वेळ येते तेव्हा मात्र कर्जदार उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरु करतो. साधारणपणे रागीट स्वरुपाची बाचाबाची, पैसे परत मिळण्यासाठी ही केवढी कटकट लावली आहे आणि तुम्हाला दया वगैरे काही माहीतच नाही असे म्हटले जाते. यावेळी पैसे घेणाऱ्याच्या नजरेत पैसे देणारा मोठा राक्षस भासू लागतो! तरीपण, पवित्र शास्त्र म्हणते की, ‘कर्जाची फेड न करणारा दुष्ट होय.’ (स्तोत्रसंहिता ३७:२१; रोमकर १३:८) ही गोष्ट, जेव्हा पैसे उसने घेणारा काही रक्कम परत देण्याचा सद्भाव दाखवीत नाही आणि ज्याच्याकडून पैसे घेतले आहेत त्याच्याशी कसलेही दळणवळण राखीत नाही तेव्हा अधिकांशाने खरी ठरते.
कौटुंबिक वर्तुळात प्रामाणिकपणाला पुष्कळ बाबतीत आव्हान मिळतेः घरच्या मस्तकाने आपणास मिळणारी अर्थप्राप्ती आणि इतर आर्थिक गोष्टींच्या बाबतीत आपल्या बायकोला प्रामाणिक राहावयास हवे; तर बायकोने तिला घरखर्चासाठी देण्यात येणारा निधि कसा वापरते याविषयी पतीला प्रामाणिक राहिले पाहिजे. दोघांनीही सचोटी राखणाऱ्या व्यक्ती असण्यास हवे, ज्यात आपसातील लैंगिक आचाराविषयीच्या सीमाही त्यांनी ओळखण्यास हव्या. मुलांनी आपले मित्र, करमणुकीचे प्रकार याविषयी आपल्या आईवडिलांना प्रामाणिक राहिले पाहिजे आणि त्यांच्या इच्छेच्या अनुरुप वागणूक ठेवली पाहिजे.—इफिसकर ५:३३; ६:१-३.
वर जे काही सांगण्यात आले त्याकरवी हे स्पष्ट दिसते की खऱ्या ख्रिश्चनांनी “अनीतीपासून दूर राहावे” हे अगत्याचे आहे. याचा अर्थ हा की, अप्रामाणिकता, खोटेपणा, फसवाफसवी, आणि नैतिक भ्रष्टता याजशी संबंधित असणारी वाईट कृत्ये आणि दुराचारी फळे यापासून स्वतःला वेगळे ठेवावे.—२ तीमथ्य २:१९; रोमकर २:२१-२४.
प्रतिफळ व फायदे
इतरांसोबतचा सोज्वळपणा आणि सरळपणा तसेच खरे दळणवळण प्रामाणिकता वाढीस लावते. यामुळे भाव व आत्मविश्वास वाढीस लागतो आणि आपसातील मनोदय व संबंध सुदृढ बनतो. प्रामाणिकपणामुळे आत्मविश्वासाचे जगणे वाढू लागते आणि इतरांविषयी संशय, भीती याजकरवी निर्माण केली जाणारी काळजी व समर्थन यापासून मुक्तपणा लाभतो.—पडताळा यशया ३५:८-१०.
आपल्याला ‘जीवंत देवाची पवित्र सेवा’ योग्य मनोदयाने सादर करायची आहे तर त्यासाठी शुद्ध विवेकभाव असण्यास हवा व तो प्रामाणिकपणामुळे उद्भवतो. (इब्रीयांस ९:१४; १ तीमथ्य १:१९) ते मनःशांती आणि रात्रीची सुखद झोपही देते. तुम्हाला दुसऱ्यांपुढे उभे राहण्यात कसलीही कुचंबणा वाटत नाही. प्रामाणिकपणा हा, वाईट कर्मे आचरली जात असता त्यात पकडले जाऊ की काय ह्या सतावणाऱ्या भीतीपासून मुक्तता देतो. अशाप्रकारे आपल्याला दिमाख व सन्मान राखता येतो. तर मग, प्रामाणिकपणा हा कालबाह्य आणि अव्यावहारिक आहे असे कसे म्हणतो येईल?
अशाप्रकारे आम्ही प्रामाणिक व्यक्ती राहिलो तर आम्हाला व इतरांना पुष्कळ प्रतिफळ आणि फायदे मिळू शकतात. तरीपण आपण प्रामाणिक राहावयास हवे ते, प्रामाणिक राहाणे हे उत्तम ब्रीद आहे आणि तसे राहण्याची आपल्याला आज्ञा आहे म्हणून नव्हे तर आमची, आमचा पिता यहोवा यावर प्रीति आहे म्हणून असले पाहिजे. त्याच्याशी आपले मोलवान नातेसंबंध राखले जावे आणि त्याची कृपापसंती आपल्याला मिळावी अशी आपली इच्छा असली पाहिजे. शिवाय प्रामाणिक राहण्यामुळे आपल्याला शेजारप्रेमही व्यक्त करता येईल. तद्वत, साधेपणात सांगायचे झाले तर खरे ख्रिस्ती असणे म्हणजे प्रामाणिक असणे होय.—मत्तय २२:३६-३९.
स्तोत्रकर्ता म्हणतोः “हे यहोवा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकपणे चालतो व नीतीने वागतो, आपल्या अंतःकरणापासून सत्य बोलतो . . . आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही . . . तो.” (स्तोत्रसंहिता १५:१-३) यहोवाचे उपासक या नात्याने आपण प्रामाणिक जीवन जगत राहिलो तर या अभक्त व्यवस्थेचा देव नाश करील आणि जेव्हा “देवाचा मंडप मनुष्याजवळ राहील” तेव्हा आम्ही चिरकालिक आशीर्वादांचा आनंद उपभोगणाऱ्यांच्या “वस्ती”स असू. त्यावेळी आम्ही प्रत्यक्षात कालबाह्य होणार नाही.!—प्रकटीकरण २१:१-५.
[५ पानावरील चौकट]
तुम्हाला प्रामाणिकपणाचे आव्हान स्विकारता येईल का?
ज्या जगात आम्ही राहात आहोत तेथे योग्य तेच करण्याच्या आमच्या सद्भावनेस आणि निश्चयास आव्हान प्रस्तुत होत असते. जग आम्हाला, दुसऱ्याची पर्वा न करता स्वतःला पुढे सारण्याचा मोह घालीत असते.
तर मग, प्रामाणिकपणा राखणे हे उत्तम ब्रीद आहे हे अजूनही तुम्हाला प्रांजळपणे वाटते का? तुमचे सत्वपरिक्षण पणाला लावण्यात येते तेव्हा तुमचा मनोदय तुम्हाला प्रामाणिक राखू शकेल एवढा बळकट आहे का? समजा जर असे घडले तर तुम्ही काय करालः
◻ तुम्ही बरेच महिने बेकार राहिलात आणि अचानक तुम्हाला पैशाची मोठी रक्कम सापडते जी तुमची सर्व उधारी मिटवून तुम्हाला बाकी रक्कम पुढच्या निर्वाहासाठी देऊ शकेल?
◻ तुम्ही मोठ्या परिक्षेला बसला आहात आणि चांगले गुण मिळवावयाचे आहे व त्याकरवी तुमचे पुढचे भवितव्य चांगले करायचे आहे तर काही तरी फसवणूकीच्या प्रकाराचा अवलंब करावयाचा आहे?
◻ शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला ख्याति मिळवावयाची आहे तर तुम्ही केलेल्या संशोधनातील मसुद्यात काहीतरी “बदल” करावयाचा आहे की ज्यामुळे तुमचे लिखाण प्रसिद्ध करता येईल?
◻ तुम्ही परदेशात सुटी घालविली व तेथे भारी किंमतीची वस्तु घेतली पण आता सरहद्दीवर, ती वस्तु आपणाकडे आहे असे सांगावे तर त्याकरता कर म्हणून भरमसाट किंमत भरावी लागणार आहे?
[६ पानावरील चौकट]
प्रामाणिकपणा कालबाह्य झालेला नाही
आज लोक सहमानवाची खरीच काळजी करीत आहेत का? होय, प्रामाणिकतेची वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली कृत्ये जरी अपवाद म्हणून वाटत असली तरीही ती मानण्याजोगी आहेत.
अमेरिकेत इंडियानाच्या फोर्ट वेन येथील पोलिसांनी एक भारी किंमतीचा टीव्ही संच कुलुप न लावलेल्या एका मोटारीत ठेवून चोरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करुन पाहिला. काय घडते ते पाहण्यासाठी त्यांनी कित्येक आठवडे पाळत ठेवली. “आम्हाला हे दिसले की, लोक त्या मोटारीजवळ येत, आत डोकावून तो टीव्ही संच बघत आणि मोटारीच्या आतील दाराची कडी घालून ते बाहेरुन बंद करुन निघून जात.” अशारितीने त्यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला.
पवित्र शास्त्र शिक्षणाच्या उत्तम परिणामामुळे हरवलेली रक्कम परत केल्याची जी उदाहरणे घडली त्याविषयी कॅनडातील वर्तमानपत्रातील ठळक मथळे याप्रमाणे दिसलेः
“उत्तम शोमरोन्यांनी स्त्रीचे संकट दूर केले”—द विन्डसर स्टार
“प्रामाणिक गृहस्थ ४२१ डॉलर्स [६,३१५ रुपये] परत करतो”—द स्पेक्टेटर
“हरवलेले ९८३ डॉलर्स [१४,७४५ रुपये] परत मिळाल्यामुळे दुकानदाराचा आत्मविश्वास वाढला”—द टोरन्टो स्टार
वरील प्रकरणातील हरवलेली रक्कम परत करणारे यहोवाचे साक्षीदार होते. पहिल्या घटनेत दोघे युवक साक्षीदार घरोघरच्या उपाध्यपणात कार्य करीत असताना त्यांना पैशाचे पाकीट आढळले. ते एका स्त्रीचे होते, ते त्यांनी तिला परत केले. त्या स्त्रीने म्हटलेः “मला वाटते की अशी मुले लाखात आढळतील. . . . आणि त्यांच्या या कृतीने मानवावरचा विश्वास अजून कायम राहतो.” ही स्त्री दुसऱ्या गावाची होती व त्यामुळे सापडलेले पैसे आपल्याला घ्यावेत हे त्या युवकांना साहजिक वाटले असते, पण ते म्हणतातः “तसे काही नाही. आम्ही चांगले ते करावे अशीच आमची इच्छा होती.”
दुसऱ्या प्रकरणात देखील एक प्रवासी होता. वर्तमानपत्राने कळवलेः “मोह [पैसे ज्याला सापडले] त्याच्या मनात जम बसवू शकला नाही.” ज्याला ते पैसे मिळाले त्याने म्हटले की तो यहोवाचा साक्षीदार आहे आणि “आम्ही प्रामाणिकपणाला खूप मानतो.”
तिसऱ्या प्रकरणात, पैसे गमाविलेल्या व्यक्तीने म्हटले की, “त्याचा मानवावरील विश्वास उडाला होता.” जिला रक्कम असणारी पिशवी मिळाली होती त्या स्त्रीच्या पतीने वार्ताहराला कळविले की, पवित्र शास्त्राकरवी स्वतःला मार्गदर्शित होऊ देणे ही ती गुरुकिल्ली आहे व “यामुळेच माझ्या बायकोला ते पैसे परत करणे साहजिक वाटले.”
आणखी एका प्रकरणात दोघे साक्षीदार घरोघरचे कार्य करीत असताना त्यांना पगाराचे पाकीट सापडले. ते घेऊन दोघेही स्थानिक पोलीस चौकीत गेले पण कामावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांना कळाले की, पैसे हरवल्याची तक्रार त्यांच्याकडे आली नव्हती. तेव्हा साक्षीदारांनी म्हटले की, हे पाकीट आढळल्याचे त्यांनी स्थानिक रेडिओ स्टेशनवरुन कळवावे. पोलिस अगदी गोंधळात पडले. ते म्हणालेः “पैसे परत करण्याचा तुमचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय, तुम्ही कुठल्या धर्माचे आहात?” साक्षीदारांनी उत्तर दिल्यावर अधिकारी म्हणालेः “मला ते वाटलेच, कारण केवळ तुम्ही लोकच इतका प्रामाणिकपणा दाखवू शकता.”
घरोघरच्या भेटीचे कार्य करताना डब्ल्यु. के—— या यहोवाच्या साक्षीदाराला घरमालकाने एक असाधारण विनंती केली. हा घरमालक व त्याची बायको खूप आजारी होते पण यांना त्या दिवशी बँकेचा व्यवहार करावयाचा होता. तेव्हा घरमालकाने विचारले की हे साक्षीदार ते काम करतील का. साक्षीदाराने संमती दाखविल्यावर त्याला ३०,००० रुपयांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी दिली गेली. बँकेतून परतल्यावर साक्षीदाराने न राहून घरमालकाला विचारलेः “तुम्ही तर मला ओळखीत नाही, तर मग तुम्हाला मजविषयी इतका भरवसा का वाटला?” घरमालकाने म्हटलेः “आम्हाला व इतर सर्व लोकांना माहीत आहे की, केवळ यहोवाचे साक्षीदार भरवसापात्र लोक आहेत.”
यहोवाच्या साक्षीदारांच्या व्यतिरिक्त जगभरात सर्व देशात प्रामाणिक लोक आहेत. तरीसुद्धा ते क्वचितच लोकांच्या नजरेत येतात. तद्वत, पवित्र शास्त्राने प्रामाणिक असण्याचे जे शिक्षण आम्हाला दिले आहे व त्याकरवी जे लाभदायक व व्यावहारिक परिणाम निर्मिले जातात त्याविषयी आम्ही किती धन्य आहोत बरे!