तरुण लोक विचारता त . . .
लठ्ठ होण्याची मला इतकी का भीती?
“एकदा वाटतं खावं, तर दुसऱ्याच क्षणी वाटतं, ‘नको बाई, लठ्ठ झाले तर?’ काय करावं सूचत नाही.”—जेमी.
कुठल्या गोष्टीची तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते? ‘लठ्ठ होण्याची’ असे अनेक मुली लगेच उत्तर देतील यात शंका नाही. खरे तर, एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले, की हल्लीच्या तरुणींना लठ्ठ होण्याची जितकी भीती वाटते तितकी त्यांना अणू युद्धाची, कर्करोग होण्याची किंवा आईवडिलांच्या मृत्यूचीही वाटत नाही!
चकित करणारी एक गोष्ट म्हणजे, काही मुली अगदी कोवळ्या वयापासूनच आपल्या वजनाची नको तितकी चिंता करू लागतात. डॉ. कॅथरिन स्टायनर-अडेर यांच्या मते किशोरवयात पदार्पण करण्यापूर्वीच अनेक मुली एकमेकींजवळ ‘लठ्ठपणाविषयी काळजी व्यक्त करू लागतात;’ आपल्या शरीरयष्टीसंबंधी नाखुशी व्यक्त करू लागतात. पण, फक्त काळजी व्यक्त करण्यावरच त्या थांबत नाहीत. २,३७९ मुलींच्या एका सर्वेक्षणातून निदर्शनास आल्यानुसार, चक्क ४० टक्के मुली आपले वजन घटवण्यासाठी आटापिटा करीत होत्या. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या फक्त नऊदहा वर्षांच्या होत्या!
काही काळातच मग यांपैकी बऱ्याच तरुणी फॅड डायटच्या फंदात पडतात. काहींची तर अवस्था बिचाऱ्या २० वर्षांच्या जेनासारखी होण्याची भीती असते. पाच फूट चार इंच उंची असलेल्या या तरुणीचे वजन केवळ ४० किलो आहे! पण याबद्दल ती काय म्हणते ते पाहा: “मला खावंसंच वाटत नाही. वजन कमी करण्यासाठी चक्क तीन वर्षं आतोनात प्रयत्न केल्यानंतर आता मी परत जर खाऊ लागले तर एकाच महिन्यात पुन्हा माझं वजन वाढेल, याचीच मला सगळ्यात जास्त भीती आहे.”
तुम्हालाही कदाचित जेनाविषयी सहानुभूती वाटत असेल. मोहक दिसण्यासाठी तुम्हालाही कदाचित सडपातळ व्हावेसे वाटले असेल. आणि खरे पाहता, आपल्या स्वरूपाविषयी चिंता करण्यात काहीच गैर नाही. पण, जेनाच्याबाबतीत पाहू जाता सडपातळ होण्याची तिची इच्छा शेवटी तिच्या जीवावर बेतली. ती कशी?
आमरण उपोषण
आज जेनाला ॲनोरेक्सिआ नर्व्होसा (क्षुधानाश) हा भयंकर आहारसंबंधित विकार जडला आहे. सुरवातीला उल्लेखिलेल्या जेमीला देखील हाच रोग आहे. काही काळापर्यंत, या मुलींनी जणू आमरण उपोषणच सुरू केले होते, आणि हेच इतर अनेक मुलींच्या बाबतीतही सत्य आहे. अंदाजानुसार, १०० पैकी एक मुलगी आज ॲनोरेक्सिआला बळी पडली आहे. त्याचा अर्थ, कोट्यवधी स्त्रिया या रोगाच्या बळी असून त्यांच्यापैकी काही तुमच्या परिचयाच्या देखील असतील!a
ॲनोरेक्सिआ नावाचा हा रोग आपल्या नकळत होऊ शकतो. उदाहरणार्थ, काही किलो घटविण्यासाठी एखादी तरुणी कदाचित डायटिंग सुरू करेल आणि वरवरून तिला हे अगदी अनापायकारक वाटेल. पण, तिला जितके वजन घटवायचे होते तितके घटल्यानंतरही तिचे समाधान होत नाही. आरशात पाहून तिरस्काराने ती म्हणेल: “शी! मी अजूनही लठ्ठच आहे!” म्हणून मग ती आणखीन काही किलो कमी करण्याचा विचार करेल; मग आणखीन काही, आणि आणखीन काही, असे करत करत ती स्वतःला एक सवयच लावून घेते. आणि अशाप्रकारे ॲनोरेक्सिआची सुरवात होते.
अर्थात, डायटिंग करणाऱ्या सगळ्याच मुलींना ॲनोरेक्सिआ होतो असे नाही. आपल्या वजनाची चिंता करण्यासाठी काहींकडे खरिच काही सबळ कारणे असतात आणि थोडेफार भोजन कमी करणे त्यांच्यासाठी चांगलेच असू शकते. पण, अनेक मुलींना आपल्या शरीरयष्टीविषयी एक विकृत दृष्टिकोन असतो. एफडीए कन्स्यूमर यानुसार असा विकृत दृष्टिकोन बाळगणे म्हणजे स्वतःला एखाद्या अम्युसमेंट पार्कमधल्या आरशात पाहण्यासारखे आहे. “या आरशात आपण स्वतःला आहोत त्यापेक्षा जास्तच लठ्ठ दिसतो,” असे सदर नियतकालिक म्हणते.
त्यामुळे ॲनोरेक्सिआ-पीडित तरुणी अगदी काटकुळी असली तरीही वजन वाढण्याची तिला भयंकर भीती असते. वजन वाढू नये म्हणून ती अगदी न चुकता व्यायाम करते आणि ‘पुन्हा वजन वाढले का’ हे पाहण्यासाठी दिवसांतून दहा वेळा आपले वजन करून पाहते. तिचे खाणेही अगदी नावालाच असते किंवा तेही नाही. हेथर नावाची तरुणी म्हणते: “मी शाळेत जायचे तेव्हा आईनं स्वतः बनवून दिलेला डबा मी दररोज टाकून द्यायचे. काहीही न खाण्याची मला इतकी सवय होऊन गेली होती की काही खावंसं वाटलं तरी मला ते जात नव्हतं. माझी भूकच मरून गेली होती.”
सुरवाती सुरवातीला, आपले वजन घटते आहे हे पाहून अनेक ॲनोरेक्सिआ-पीडित मुलींना हेथरप्रमाणेच मनस्वी आनंद होतो. पण, योग्य आहार घेतला नाही तर पुढे भलीमोठी किंमत मोजावी लागते. ॲनोरेक्सिआ-पीडित मुलीला सतत गुंगी आणि सुस्ती येते. तिच्या अभ्यासावर विपरित परिणाम पडू लागतो. तिची पाळी बंद होण्याची शक्यता असते.b आणि काही काळानंतर तिच्या हृदयाच्या ठोक्यांची गती तसेच रक्तदाबही काळजी करण्याइतका कमी होऊ शकतो. पण, एवढे सगळे होऊनही पुढील धोक्याचा तिला काहीएक पत्ता नसतो. तिला एक आणि केवळ एकच धोका दिसत असतो आणि तो म्हणजे मर-मर घटविलेले वजन परत वाढण्याचा धोका; मग ते केवळ एक किलो का असेना.
पण, ॲनोरेक्सिआ हा आहारसंबंधित एकमेव, प्रचलित विकार नाही. त्याच्याव्यतिरिक्त बुलीमिया नर्व्होसा (अत्याधिक भूक लागणे) हा देखील एक रोग आहे आणि जितक्या मुलींना ॲनोरेक्सिआ जडतो त्याच्या तिप्पट मुलींना बुलीमिया जडतो. शेवटी, कम्पल्सिव ओवरईटिंग (सक्तीने अति खाणे) हा आहारसंबंधित तिसरा विकार असून तो बराचसा बुलीमियासारखाच असतो. या दोन रोगांचा आपण बारकाईने अभ्यास करू या.
चोरटा रोग
“कालपरवाच, माझ्या एका मैत्रिणीनं मला सांगितलं, की ती चोरून अन्न खायची आणि त्यानंतर मग मुद्दामहून उलटी काढून खाल्लेलं सगळं ओकून टाकायची. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून ती हेच करत आली आहे,” असे एका नियतकालिकेतील सल्ला सदरास लिहिणाऱ्या तरुणीने आहारसंबंधित बुलीमिया विकाराच्या लक्षणांचे वर्णन केले.
बुलीमिया-पीडित व्यक्ती थोड्याच वेळात भरमसाट अन्न फस्त करते. मग खाल्लेले सगळे ओकून टाकते आणि बरेचदा हे स्वयंप्रवर्तित ओकारीमुळे होते.c अशा प्रकारे पोट रिकामे करण्याची पद्धत आपल्याला तिरस्करणीय वाटेल हे मान्य. पण, समाज सेविका नॅन्सी जे. कॉलॉडनी लिहितात: “तुम्ही जितके अधिक खाता आणि मग ओकता तितकेच तुम्हाला हे सोपे वाटू लागते. सुरवातीला हे तिरस्करणीय आणि भीतीदायकही वाटेल पण, काही काळातच तुम्हाला त्याची सवय होईल.”
ॲनोरेक्सिआ आणि बुलीमिया या रोगांना “एकाच नाण्याच्या दोन बाजू” म्हटले गेले आहे. या रोगांची लक्षणे अगदी विभिन्न असली तरीही हे रोग खाण्यासंबंधीच्या भीतीमुळे निर्माण होतात. d पण, ॲनोरेक्सिआच्या विपरीत बुलीमिया हा रोग लोकांपासून गुप्त ठेवणे कठीण नसते; कारण, सतत पोटपूजा केल्यामुळे व्यक्तीचे वजन वाढत राहते, तर सतत ओकल्यामुळे वाढलेले वजन घटते. त्यामुळे, बुलीमिया-पीडित व्यक्ती सहसा फार लठ्ठही नसते किंवा फार हाडकुळीही नसते. शिवाय, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील चारचौघांसारख्याच वाटतात. लिन्झी नावाची एक स्त्री म्हणते: “तब्बल नऊ वर्षांपर्यंत मी अधाशासारखं खायचे आणि दिवसातून चक्क चारपाच वेळा ओकायचे देखील. . . . मला बुलीमिया रोग जडलाय हे कुणालाही माहीत नव्हतं; कारण वरवरून मी अगदी कार्यक्षम आणि आनंदी वाटत होते शिवाय, माझं वजनही सर्वसाधारणच होतं.”
पण, कम्पल्सिव ओवरईटिंग रोग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे नाही. बुलीमिया-पीडित व्यक्तीप्रमाणेच ही व्यक्ती देखील एकाच वेळी भरमसाट अन्न खाते. द न्यू टीनएज बुक म्हणते: “हा रोग असलेली व्यक्ती अधाशासारखं खाते खरं पण खाल्लेलं ओकत नाही त्यामुळे तिचं वजन थोडेफार काय, बरंच वाढू शकतं.”
आरोग्याला धोकेदायक
रोगाचे हे तिन्ही प्रकार आपल्या आरोग्यासाठी धोकेदायक आहेत. ॲनोरेक्सिआमुळे कमालीचे कुपोषण होऊ शकते आणि अनेकदा—काहींच्या मते १५ टक्के प्रकरणात—ते प्राणघातक ठरू शकते. व्यक्ती ओकारी करो अगर न करो, अधाशासारखे खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकेदायक असते. लठ्ठपणामुळे कालांतराने हृदयरोग, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग असे प्राणघातक रोग जडू शकतात. स्वयंप्रवर्तित ओकारीमुळे अन्ननलिका फाटू शकते तर रेचक आणि मूत्रवर्धक औषधांचा दुरुपयोग केल्याने आणि खासकरून अतिरेक प्रमाणात त्यांचे सेवन केल्याने प्रसंगी हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
पण, यांशिवाय आहारसंबंधित विकारांची आणखीन एक बाजू विचारात घेण्यास हवी. आणि ती म्हणजे, ॲनोरेक्सिआ, बुलीमिया आणि कम्पल्सिव ओवरईटिंगचे बळी सहसा आनंदी नसतात. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो; ते चिंताग्रस्त आणि निराश होतात. त्यांना साह्याची गरज आहे यात शंकाच नाही. पण ज्यांना आहारसंबंधित विकार झाला आहे त्यांना लठ्ठ होण्याच्या भीतीपासून मुक्त कसे केले जाऊ शकते? या प्रश्नाचे उत्तर या लेखमालेतील पुढील लेखात दिले जाईल.
[तळटीपा]
a ॲनोरेक्सिआ हा रोग पुरुषांना देखील होतो. पण, जास्त करून मुलींनाच हा रोग होत असल्यामुळे आपण ॲनोरेक्सिआ-पीडित व्यक्तीचा उल्लेख स्त्रीलिंगी रूपात करू या.
b वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता एखाद्या स्त्रीचे वजन नेहमीच्या वजनापेक्षा कमीतकमी १५ टक्क्यांनी घटते आणि तिला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पाळी आलेली नसते तेव्हा तिला ॲनोरेक्सिआ रोग असल्याचे निदान लावले जाते.
c सौम्य सारक किंवा मूत्रवर्धक औषधे घेऊनसुद्धा पोट स्वच्छ केले जाऊ शकते.
d या अनेक रोग्यांना ॲनोरेक्सिआ आणि बुलीमिया रोग आलटूनपालटून होतो.
[२२ पानांवरील चित्र]
आपल्या वजनाची नको तितकी चिंता करणाऱ्या मुलींना खरे तर चिंता करण्याची मुळीच गरज नाही