वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ५/८ पृ. १२-१७
  • सायबेरियात बंदिवान!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सायबेरियात बंदिवान!
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बंदिवान केले
  • बंदिवासातील काम
  • आमचे आध्यात्मिक जीवन
  • परिस्थितींमध्ये बदल झाल्यावर टिकून राहणे
  • माझी आध्यात्मिक वाढ
  • कार्याची प्रगती
  • प्रचंड विस्ताराचा आनंद मानणे
  • चाळीस वर्षांपेक्षाही जास्त काळ कम्युनिस्ट पक्षाच्या बंदीत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • प्रबोधन व प्रेरणा देणारा व्हिडिओ!
    आमची राज्य सेवा—२००३
  • परीक्षेत टिकून राहिल्याने आशीर्वादच मिळतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ५/८ पृ. १२-१७

सायबेरियात बंदिवान!

वसिली कल्यिन यांच्याद्वारे कथित

बॉम्बस्फोटांच्या कोलाहालात कोणी माणूस शांतपणे बायबल वाचत बसलेला तुम्ही पाहिलात तर तो इतका निवांत कसा आहे हे तुम्ही त्याला विचारणार नाही का? ५६ वर्षांआधी माझ्या वडिलांनी असेच एक दृश्‍य पाहिले.

तो जुलै १९४२ चा समय होता; त्यावेळी दुसरे महायुद्ध पराकोटीला पोहंचले होते. जर्मन सैन्य युक्रेन येथील व्हिलशॅनित्सा गावातून—ते माझ्या वडिलांचे गाव होते—जात असताना माझे वडील एका घरात थांबले; तेथे वृद्ध लोक राहत होते. सगळीकडे बॉम्बस्फोटांचा धुमधडाका चालला होता, पण हे गृहस्थ चूलीशेजारी बसून मका गरम करत चक्क बायबल वाचत होते.

पाच वर्षांनंतर माझा जन्म, इव्हानो-फ्रान्कॉव्हस्क या रमणीय पश्‍चिम युक्रेनियन शहरानजीक झाला; त्यावेळी तो सोव्हियत युनियनचा एक भाग होता. नंतर, यहोवाचा साक्षीदार असलेल्या त्या माणसासोबतच्या अविस्मरणीय भेटीबद्दल आणि युद्ध चालू होते त्या काळातल्या भयंकर गोष्टींबद्दलही माझ्या वडिलांनी मला सांगितले. या सगळ्यामुळे लोक कंटाळून आणि गोंधळून गेले होते आणि पुष्कळजण अशा पेचात पडले होते की, ‘इतका अन्याय का होतोय? हजारो निष्पाप लोकांचा मृत्यू का म्हणून होत आहे? देव याला अनुमती का देत आहे? का, कशाला?’

असे सर्व प्रश्‍न विचारत माझे वडील त्या वृद्ध गृहस्थासोबत मनमोकळेपणाने पुष्कळ वेळ चर्चा करत बसले. बायबलमधून एका मागोमाग एक वचने काढून त्या गृहस्थाने वडिलांना कित्येक वर्षांपासून सतावणाऱ्‍या त्या प्रश्‍नांची उत्तरे दाखवली. आपल्या नियुक्‍त वेळी सर्व युद्धांचा समूळ नाश करण्याचे देवाने उद्देशिले आहे आणि पृथ्वी एका रमणीय परादीसमध्ये बदलणार आहे असे त्याने सांगितले.—स्तोत्र ४६:९; यशया २:४; प्रकटीकरण २१:३, ४.

वडील घाईघाईने घरी परतले आणि म्हणाले: “अरे, माहीतेय का, यहोवाच्या साक्षीदारांसोबत फक्‍त एकदाच चर्चा करून माझे डोळे उघडलेत! मला सत्य मिळालंय!” वडिलांनी सांगितले की, ते कॅथलिक चर्चला नियमितपणे जात होते तरीपण त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे पाळकांना कधीच देता आली नाहीत. म्हणून वडील बायबलचा अभ्यास करू लागले आणि आईपण त्यांना सामील झाली. मग, ते आपल्या तीन मुलांनाही—त्यावेळी फक्‍त २ वर्षांच्या माझ्या बहिणीला आणि ७ आणि ११ वर्षांच्या माझ्या भावांनाही हे सर्व शिकवू लागले. त्यानंतर, काही काळातच बॉम्बस्फोटामुळे आमचे घर असे उद्‌ध्वस्त झाले की राहायला फक्‍त एकच खोली उरली.

माझ्या आईचे कुटुंब फार मोठे होते—तिला सहा बहिणी आणि एक भाऊ होता. त्या परिसरात तिचे वडील फार श्रीमंत होते आणि म्हणून त्यांना आपला अधिकार आणि स्थान जास्त प्रिय होते. म्हणून, सुरवातीला या नव्या विश्‍वासामुळे आमच्या कुटुंबाला नातेवाईकांकडून विरोध होऊ लागला. परंतु, काही काळानंतर असे घडले की, विरोध करणाऱ्‍या बऱ्‍याच नातेवाईकांनी उपासनेत मूर्तींचा उपयोग करण्यासारखे अशास्त्रवचनीय धार्मिक चालीरिती सोडून दिल्या आणि खऱ्‍या उपासनेत माझ्या आईवडिलांना सामील झाले.

पाळक अगदी उघडपणे लोकांना साक्षीदारांविरुद्ध चेतवायचे. त्यामुळे, तिथले रहिवाशी आमच्या खिडक्या फोडायचे आणि माझ्या आईवडिलांना धमक्या द्यायचे. पण तरीही, माझ्या पालकांनी बायबलचा अभ्यास सुरूच ठेवला. म्हणून, १९४७ साली माझा जन्म झाला तेव्हा माझे कुटुंब आत्म्याने आणि खरेपणाने यहोवाची उपासना करत होते.—योहान ४:२४.

बंदिवान केले

एप्रिल ८, १९५१ रोजी सकाळच्या वेळी काय घडले त्याच्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत, त्यावेळी मी फक्‍त चार वर्षांचा होतो तरीही. लष्करातले लोक कुत्री घेऊन आमच्या घरात घुसले. हद्दपार करण्याचा आदेश दाखवून ते घरात शोधाशोध करू लागले. मशिनगन बाळगणारे सैनिक आणि कुत्री आमच्या दारात उभे होते, लष्करी गणवेषातली माणसे घरामध्ये टेबलापाशी बसली होती; आम्हाला घर सोडून जायला फक्‍त दोन तास दिले होते म्हणून आम्ही घाईघाईने निघण्याची तयारी करत होतो. काय घडत आहे हे मला कळत नव्हते; मी मात्र जोरजोराने रडत होतो.

माझ्या आईवडिलांना एक कागद देण्यात आला आणि त्यावर लिहिले होते की यापुढे आम्ही यहोवाचे साक्षीदार नाही आणि त्यांच्याशी आम्ही कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. त्यांनी सह्‍या केल्या तर त्यांना त्यांच्यात घरात आणि मायदेशात राहू दिले जाणार होते. पण वडिलांनी ठामपणे सांगितले: “मला पूर्ण विश्‍वास आहे की, तुम्ही आम्हाला कुठेही नेलं तरी आमचा देव, यहोवा आमच्यासोबत असेल.”

“तुमच्या कुटुंबाचा, पोरा-बाळांचा विचार करा,” असे तो अधिकारी विनवून म्हणाला. “तुम्हाला काही सुटी घालवायला नेत नाहीये. तुम्हाला उत्तरेच्या टोकाला नेलं जात आहे. दिवस अन्‌ रात्र बर्फ पडत असतो तिथं आणि रस्त्यांवर पोलर बेअर फिरत असतात.”

त्यावेळी “सायबेरिया” हा शब्द म्हणजे एक भयानक आणि रहस्यमय ठिकाण आहे अशी सर्वांची समजूत होती. तरीपण, अज्ञात प्रदेशाच्या भीतीपेक्षा यहोवावरचा विश्‍वास आणि त्याच्यावरची गाढ प्रीती वरचढ ठरली. आमचे सगळे सामान एका गाडीत चढवण्यात आले आणि मग आम्हाला शहरात नेऊन इतर २० ते ३० कुटुंबांसोबत एका मालगाडीत बसवण्यात आले. अशातऱ्‍हेने दाट तायगाकडे अर्थात सायबेरियाच्या अरण्याकडे आमचा प्रवास सुरू झाला.

आमच्या प्रवासात, बंदिवानांना नेणाऱ्‍या दुसऱ्‍या रेलगाड्याही आम्हाला स्टेशनांवर दिसल्या, आणि गाडीच्या डब्यांवर “यहोवाचे साक्षीदार” असे फलक लावलेले आम्ही पाहिले. ही एक अनोखी साक्ष होती कारण यामुळे पुष्कळांना कळाले की हजारो साक्षीदारांना आणि त्यांच्या कुटुंबांना उत्तर आणि पूर्वेच्या टोकातल्या विविध भागांमध्ये पाठवले जात होते.

एप्रिल १९५१ साली यहोवाच्या साक्षीदारांना गोळा करून बंदिवासात पाठवण्यात आले या गोष्टीचा लेखी पुरावा आहे. इतिहासकार वॉल्टर कोलॉर्झ यांनी सोव्हियत युनियनमधील धर्म (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लिहिले: “रशियामधील ‘साक्षीदारांचा’ हा अंत नव्हता तर उलट त्यांच्या मतांतर करण्याच्या कार्यामध्ये ही एका नवीन अध्यायाची सुरवात होती. प्रवासात स्टेशनांवर ते थांबायचे तेव्हाही आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांना सांगायचा प्रयत्न करायचे. त्यांना हद्दपार करून उलट सोव्हियत सरकार त्यांचा विश्‍वास पसरवण्यात जणू हातभारच लावला. जगाशी संपर्क नसलेल्या गावांतून काढून या साक्षीदारांना मोठ्या जगात आणले गेले; ते जरी छळ छावण्यांचे आणि मजुरी छावण्यांचे कष्टप्रद जग होते तरीही.”

माझ्या कुटुंबाला निदान सोबत अन्‍न—पीठ, मका आणि चवळीच्या बिया—घेऊन जायला अनुमती मिळाली होती. माझ्या आजोबांना तर डुक्कर कापायलाही परवानगी देण्यात आली; त्यामुळे मग आमच्या आणि बाकीच्या साक्षीदारांच्या जेवणाची सोय झाली. प्रवासात, डब्यांतून उत्साहाने गाणी गाण्याचा आवाज ऐकू येत होता. यहोवाने आम्हाला तग धरून राहण्याची शक्‍ती दिली.—नीतिसूत्रे १८:१०.

रशियाहून निघाल्यावर आम्ही जवळजवळ तीन आठवडे प्रवास करत होतो आणि सरतेशेवटी आम्ही सायबेरियाच्या थंडगार, एकाकी दूर देशात येऊन पोहंचलो. आम्हाला अरकुत्स्क जिल्ह्याच्या चन्स्क भागातील टॉरेयॉ स्टेशनावर आणण्यात आले. तेथून मग आम्हाला अरण्यात आत वसलेल्या एका लहानशा गावात नेले; आमच्या दस्तऐवजांवर हे ठिकाण आमचे “कायमचे निवासस्थान” होते असे लिहिले होते. १५ कुटुंबांचे सामानसुमान एका घसरगाडीवर आरामात मावले आणि ट्रॅक्टरच्या साह्‍याने ती घसरगाडी उन्हाळ्याच्या मातीतून ओढून नेण्यात आली. सुमारे २० कुटुंबांना बराकींमध्ये राहायला देण्यात आले; ही लांबसडक घरे होती आणि मध्ये कोणतीही भिंत वगैरे नव्हती. अधिकाऱ्‍यांनी आधीच तिथल्या रहिवाशांना सांगून ठेवले होते की, यहोवाचे साक्षीदार फार त्रासदायक लोक आहेत. म्हणून सुरवातीला, लोकांना आमची भीती वाटत होती आणि ते आमच्यापासून दूरच राहायचे.

बंदिवासातील काम

यहोवाचे साक्षीदार झाडे तोडण्याची कामे करत, तेही अतिशय खडतर परिस्थितींमध्ये. सगळे काम हातानेच केले जायचे—ओंडके कापणे, त्यांचे लहान-लहान तुकडे करणे, घोडागाड्यांमधून नेऊन नंतर रेलगाड्यांमध्ये भरणे वगैरे. त्यात तिथे इतके मच्छर होते की विचारू नका; माझ्या वडिलांना त्याचा फार त्रास झाला. त्यांचे सबंध शरीर सुजले होते; यातही टिकून राहता यावे म्हणून त्यांनी यहोवाला फार कळकळून प्रार्थना केली. पण, इतक्या अडीअडचणींचा सामना करूनही बहुतेक यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास डगमगला नाही.

लवकरच आम्हाला अरकुत्स्कच्या शहरात नेले आणि तेथे एक छावणी होती जी आधी तुरुंग छावणी होती; तिथे आमचे कुटुंब राहिले आणि आमच्या कुटुंबाने वीटभट्टीत काम केले. भट्टीतल्या गरम गरम विटा थेट हाताने काढल्या जात आणि नेहमी कामाचा भार वाढवला जाई म्हणून लहान मुलांनाही आपल्या आईवडिलांना मदत करावी लागत होती. आम्हाला प्राचीन ईजिप्तमधल्या इस्राएलांच्या मजुरीचीच आठवण झाली.—निर्गम ५:९-१६.

साक्षीदार कष्टी आणि इमानदार असून आधी सांगितल्याप्रमाणे “लोकांचे शत्रू” नव्हते हे तिथल्या लोकांना कळू लागले. एकाही साक्षीदाराने कधी अधिकाऱ्‍यांचा अपमान केला नाही किंवा अधिकार असलेल्यांच्या निर्णयांचा विरोध केला नाही हे लोकांच्या लक्षात येऊ लागले. त्यांचा विश्‍वासही अनेकांना आवडू लागला.

आमचे आध्यात्मिक जीवन

साक्षीदारांची वारंवार तपासणी करण्यात आली होती—बंदिवासात पाठवण्याआधी, प्रवासामध्ये आणि बंदिवास केलेल्या ठिकाणी—तरीही पुष्कळांनी टेहळणी बुरूज नियतकालिके आणि बायबलसुद्धा लपवून आणले होते. नंतर, हाताने आणि इतर मार्गांनी त्यांच्या प्रती काढण्यात आल्या. बराकींमध्ये ख्रिस्ती सभा नियमितपणे भरवल्या जात होत्या. बराकींच्या अधिकाऱ्‍याला कोणी समूह गाणी गात असलेला दिसला की तो गाणी थांबवण्याचा आदेश द्यायचा. आम्ही सगळे थांबवायचोही. पण तो दुसऱ्‍या बराकीत गेला की आम्ही पुन्हा गायला सुरू करायचो. आम्हाला रोखणे अशक्य होते.

आमचे प्रचार कार्यही कधीच थांबले नाही. साक्षीदार भेटतील त्यांच्याशी आणि जातील तेथे प्रचार करायचे. माझे मोठे भाऊ आणि आईवडील इतरांना बायबलमधील सत्यांबद्दल कसे सांगायचे त्याविषयी ते मला सांगायचे. त्यामुळे बायबल सत्य प्रामाणिक लोकांच्या अंतःकरणांवर विजय मिळवू लागले. अशाप्रकारे, १९५० च्या दशकाच्या सुरवातीला अरकुत्स्कमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात यहोवाच्या राज्याविषयी लोकांना सांगितले जाऊ लागले.

सुरवातीला साक्षीदारांना राजकीय शत्रू मानले जायचे पण नंतर कायदेशीरपणे हे मान्य करण्यात आले की आमची संघटना एक धार्मिक संघटना होती. तरीपण, अधिकाऱ्‍यांनी आमच्या कार्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. पकडले जाऊ नये म्हणून आम्ही फक्‍त दोन किंवा तीन कुटुंबांच्या लहान-लहान गटात एकत्र होऊन बायबलचा अभ्यास करू लागलो. १९५२ सालाच्या फेब्रुवारी महिन्यात एकदा पहाटेच कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर, दहा साक्षीदारांना पकडण्यात आले आणि आम्हा बाकीच्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. आमच्या कुटुंबाला इस्क्रा गावी पाठवले; तेथे शंभर लोकांची वस्ती होती आणि अरकुत्स्क शहरापासून हे गाव ३० किलोमीटर दूर होते.

परिस्थितींमध्ये बदल झाल्यावर टिकून राहणे

त्या गावातल्या संस्थापनाने आम्हाला इतका पाहुणचार दाखवला की आम्हाला आश्‍चर्य वाटले. तिथले लोक फार साधेसुधे आणि मैत्रिपूर्ण होते—पुष्कळजण तर आमची मदत करायला घराबाहेर आले. आमचे हे तिसरे कुटुंब होते ज्याला त्या एकाच सुमारे १७ चौरस मीटरच्या लहान खोलीत ठेवण्यात आले होते. प्रकाशासाठी आमच्याकडे फक्‍त रॉकेलचे कंदिल होते.

दुसऱ्‍या दिवशी सकाळी निवडणूक होती. माझ्या आईवडिलांनी सांगितले की त्यांनी आधीच देवाच्या राज्याला मतदान दिले होते; पण लोकांना ते काही कळाले नाही. म्हणून माझ्या कुटुंबातल्या मोठ्या लोकांना एक दिवस तुरुंगात काढावा लागला. नंतर, पुष्कळांनी त्यांना त्यांच्या विश्‍वासाबद्दल विचारणा केली आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला देवाचे राज्य हेच मानवजातीची एकमेव आशा आहे हे सांगायला चांगली संधी मिळाली.

इस्क्रा गावात आम्ही चार वर्षे राहिलो तेव्हा जवळपास कोणीही साक्षीदार नव्हते म्हणून आम्ही कोणाशीच सहवास राखू शकत नव्हतो. गाव सोडून जायला अधिकाऱ्‍याकडून खास परवानगी लागायची आणि तो क्वचितच परवानगी द्यायचा; कारण आम्हाला येथे पाठवण्याचा मुख्य उद्देश आम्हाला इतर लोकांपासून दूर ठेवणे हाच होता. तरीही, नवीन आध्यात्मिक माहिती मिळाली की ती सांगायला साक्षीदार नेहमी संपर्क राखण्याचा प्रयत्न करायचे.

एकोणीसशे त्रेपन्‍न साली, स्टॅलिनचा मृत्यू झाल्यावर सर्व आरोपित साक्षीदारांची शिक्षा २५ वर्षांऐवजी १० वर्षे करण्यात आली. शिवाय, सायबेरियात राहणाऱ्‍यांना इकडे तिकडे फिरायला खास परवानगीची गरज नव्हती. पण, अधिकारी पुन्हा तपासणी करू लागले आणि ज्या साक्षीदारांकडे बायबल किंवा बायबल साहित्य होते त्यांना अटक करू लागले. साक्षीदारांसाठी खास छावण्या तयार करण्यात आल्या आणि सुमारे ४०० बांधव आणि २०० बहिणींना अरकुत्स्कजवळच्या या भागात ठेवण्यात आले.

सोव्हियत युनियनमध्ये आमचा छळ होत असल्याची बातमी जगातल्या यहोवाच्या साक्षीदारांना मिळाली. म्हणून, १९५६ च्या मध्यात आणि १९५७ च्या फेब्रुवारी महिन्यादरम्यान जगभरातल्या सर्व भागांमध्ये भरवलेल्या १९९ प्रांतीय अधिवेशनांमध्ये आमच्यासाठी एक विनंतीपत्र प्रस्तुत करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित असलेल्या एकूण ४,६२,९३६ लोकांनी, त्यावेळी सोव्हियतचे मुख्य प्रधान निकलाय ए. बल्गनिन यांना उद्देशून लिहिलेल्या विनंतीपत्राला मान्यता दिली. त्या विनंतीपत्रात, खास करून आम्हाला स्वतंत्र केले जावे आणि “गरजेनुसार रशियन, युक्रेनियन आणि इतर अशा भाषांमध्ये टेहळणी बुरूज नियतकालिक त्याचप्रमाणे जगभरात यहोवाचे साक्षीदार वापरत असलेली इतर बायबल प्रकाशनेही प्राप्त करण्याची आणि प्रकाशित करण्याची मान्यता मिळावी” अशी मागणी केली होती.

दरम्यान, आमच्या कुटुंबाला अरकुत्स्कपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या खुद्याकोवा या दूरच्या गावात पाठवण्यात आले होते. आम्ही तेथे सात वर्षे राहिलो. १९६० साली, माझा थोरला भाऊ फ्योदर अरकुत्स्कला राहायला गेला आणि त्यानंतरच्या वर्षी माझ्या थोरल्या भावाचे लग्न झाले आणि माझी बहीण दुसरीकडे राहायला गेली. मग १९६२ साली, फ्योदरला प्रचार करत असल्यामुळे अटक करून तुरुंगात टाकण्यात आले.

माझी आध्यात्मिक वाढ

आमच्या खुद्याकोवा गावापासून बायबल अभ्यासासाठी इतरांसोबत जमा व्हायला पायी किंवा सायकलने २० किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. त्यामुळे साक्षीदारांच्या आणखी जवळ राहावे म्हणून आम्ही अरकुत्स्कला जाऊन राहण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्ही ज्या भागात राहत होतो तिथला प्रमुख याला बिलकुल सहमत नव्हता आणि आमचे जाणे रोखण्याचा त्याने सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, काही काळानंतर हा मनुष्य आमच्याशी चांगला वागू लागला आणि आम्ही अरकुत्स्कपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पिव्होव्हारेखा गावात स्थलांतर करू शकलो. तेथे यहोवाच्या साक्षीदारांची एक मंडळी होती आणि माझे एक नवीनच जीवन तेथे सुरू झाले. पिव्होव्हारेखामध्ये मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची गटे संघटित होती आणि आध्यात्मिक कार्यांची देखरेख करणारे बांधवही होते. मला त्याचा केवढा आनंद झाला!

आतापर्यंत मला बायबल सत्य फार आवडू लागले होते आणि मला बाप्तिस्मा घेण्याची खूप उत्कट इच्छा होती. ऑगस्ट १९६५ साली लहान ओल्खा नदीत माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा माझी ही इच्छा पूर्ण झाली; याच नदीत पुष्कळ नवीन साक्षीदारांचा त्या काळात बाप्तिस्मा झाला. ज्यांना काय घडत होते याची कल्पना नव्हती त्यांना असेच वाटत होते की, आम्ही सहलीला आलो होतो आणि नदीत पोहत होतो. त्यानंतर लवकरच मला ईश्‍वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकाची माझी पहिलीच नेमणूक मिळाली. नंतर, नोव्हेंबर १९६५ मध्ये फ्योदरला तुरुंगातून सुटका मिळाली तेव्हा आम्हाला अधिकच आनंद झाला.

कार्याची प्रगती

सन १९६५ मध्ये, सर्व बंदिवानांना एकत्र करून अशी घोषणा करण्यात आली की, आम्हाला हवे तिथे जाण्याचा हक्क आहे आणि ते ठिकाण आता आमचे “कायमचे निवासस्थान” राहिलेले नाही. तेव्हा आम्हाला केवढा आनंद झाला याची तुम्ही कल्पना करू शकता का? आमच्यातील पुष्कळांनी तेव्हा देशाच्या इतर भागांमध्ये जाण्याचा निश्‍चय केला तर बाकीजणांनी तेथेच राहण्याचे ठरवले जेथे यहोवाने त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीत आणि कार्यहालचालीत त्यांना आशीर्वादित केले होते आणि पाठिंबा दिला होता. यातील अनेकांना सायबेरियातच मुले, नातवंडे, पतवंडे झाली; काळांतराने सायबेरियाची भीती मनात राहिली नाही.

सन १९६७ मध्ये मला मरीया भेटली; तिच्या कुटुंबालाही युक्रेनमधून सायबेरियात बंदिवान म्हणून पाठवले होते. आम्ही दोघेही लहान असताना व्हिलशॅनित्साच्या युक्रेनियन गावात राहिलो होतो. १९६८ साली आमचा विवाह झाला आणि आम्हाला देवदयेने दोन मुले झाली; यारॉस्लाफ हा मुलगा आणि नंतर ऑक्सॉना ही मुलगी.

आध्यात्मिक सहवासासाठी मोठ्या समुहांमध्ये भेटण्यास आम्ही प्रेतसंस्काराच्या आणि विवाहाच्या प्रसंगांचा उपयोग करत राहिलो. या प्रसंगी आम्ही गैर-साक्षीदार नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना बायबल सत्यांबद्दल सांगण्याची संधीही घेत होतो. सहसा, या प्रसंगांना सुरक्षा अधिकारी उपस्थित राहायचे जेथे आम्ही उघडपणे पुनरुत्थानाच्या आशेबद्दल किंवा यहोवाने केलेल्या विवाहाच्या तरतूदीविषयी आणि त्याच्या नवीन जगातील भावी आशीर्वादांविषयी बायबलमधून प्रचार करायचो.

प्रेतसंस्काराच्या एके प्रसंगी माझे भाषण संपत आले होते तेव्हा एक कार आली, कारचे दार उघडून एक माणूस उतरला आणि त्याने मला कारमध्ये बसण्याचा आदेश दिला. मला भीती वाटली नाही. आम्ही काही गुन्हेगार नव्हतो फक्‍त देवावर विश्‍वास ठेवणारे लोक होतो. परंतु, माझ्या खिशात आमच्या मंडळीतल्या लोकांचे सेवा अहवाल होते. त्यासाठी माझी अटक झाली असती. म्हणून, त्यांच्यासोबत जाण्याआधी मी माझ्या बायकोला पैसे देऊ शकतो का असे मी त्यांना विचारले. त्यानंतर, त्यांच्याच समोर मी शांतपणे माझ्या पत्नीला माझ्या पैशांचे पाकीट आणि सोबत मंडळीचे अहवालही दिले.

सन १९७४ च्या सुरवातीला, मरीया आणि मी आमच्या घरात गुप्तपणे बायबल साहित्य तयार करू लागलो. आमचा लहान मुलगा असल्यामुळे त्याला माहीत पडू नये म्हणून आम्ही रात्री उशिरा हे काम करायचो. परंतु, उत्सुकतेपोटी त्याने एकदा झोपण्याचे नाटक केले आणि आम्ही काय काम करत होतो ते चोरून पाहिले. नंतर तो म्हणाला: “देवाची पुस्तकं कोण करतं ते माहीतेय मला.” आम्ही जरा घाबरलो पण या महत्त्वपूर्ण कार्यात आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे म्हणून आम्ही यहोवाला नेहमी प्रार्थना करायचो.

नंतर, यहोवाच्या साक्षीदारांप्रती हे अधिकारी अनुकूल बनले आणि म्हणून आम्ही उसॉलये-सिबरस्कये शहरातल्या मीर कला आणि मनोरंजन मंदिरात मोठी सभा भरवण्याचे ठरवले. आम्ही नगर अधिकाऱ्‍यांची खात्री पटवली की या सभा फक्‍त बायबल अभ्यास आणि ख्रिस्ती सहवासासाठी भरवल्या जात होत्या. जानेवारी १९९० मध्ये ७०० हून अधिक लोक उपस्थित राहिले; सभागृह खचाखच भरले होते आणि पुष्कळांचे लक्ष वेधले गेले.

सभेनंतर एका पत्रकाराने विचारले, “तुम्ही तुमच्या लहान मुलांना प्रशिक्षण कधी दिले?” या पहिल्याच जनसभेत ती चार तास शांतपणे लक्ष देऊन ऐकत बसली होती ते पाहून त्याला तसेच कार्यक्रमाला आलेल्या इतरांनाही आश्‍चर्य वाटले. लवकरच, एका स्थानिक वृत्तपत्रात यहोवाच्या साक्षीदारांविषयी एक सुंदर लेख छापून आला. त्यात म्हटले होते: “[यहोवाच्या साक्षीदारांकडून] खरेच शिकून घेण्यासारखे आहे.”

प्रचंड विस्ताराचा आनंद मानणे

सन १९९१ मध्ये, सोव्हियत युनियनमध्ये सात अधिवेशने भरवण्यात आली आणि त्यांना ७४,२५२ लोक उपस्थित होते. नंतर, सोव्हियत युनियनचा भाग असलेले प्रजासत्ताक स्वतंत्र झाले तेव्हा मला यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाकडून मॉस्कोला जाण्याची नेमणूक मिळाली. तेथे राज्य कार्यात मी जास्त सहभाग घेऊ शकतो का, असे मला विचारण्यात आले. एव्हाना, यारॉस्लाफचे लग्न झालेले होते आणि त्याला एक मुलगीही होता आणि ऑक्सॉना किशोरवयीन होती. म्हणून १९९३ मध्ये मरीया आणि मी मॉस्कोत पूर्ण-वेळेची सेवा करू लागलो. त्याच वर्षी, मला रशियातल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रादेशिक धार्मिक संघटनेच्या व्यवस्थापन केंद्राचे संयोजक म्हणून नेमण्यात आले.

आता मरीया आणि मी सेंट पीटर्सबर्गच्या बाहेर वसलेल्या नवीन शाखा सुविधात राहतो आणि तेथेच कामही करतो. रशियात झपाट्याने वाढणाऱ्‍या राज्य उद्‌घोषकांची काळजी घेण्यासाठी इतर विश्‍वासू बांधवांसोबत काम करायला मला मिळत आहे हा मी एक बहुमान समजतो. आधी सोव्हियत युनियनचा भाग असलेल्या प्रजासत्ताकांमध्ये आज २,६०,००० हून अधिक साक्षीदार आहेत आणि एकट्या रशियात १,००,००० हून जास्त आहेत!

आमचे आवडते घर बनलेल्या सायबेरियात अद्यापही विश्‍वासूपणे राज्य सेवा करत असलेल्या आमच्या प्रिय नातेवाईकांची आणि मित्रमैत्रिणींची मरीया आणि मला वेळोवेळी आठवण होते. आज तेथे मोठमोठाली अधिवेशने भरवली जातात आणि अरकुत्स्कमध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये सुमारे २,००० साक्षीदार कार्यरत आहेत. खरोखर, जगाच्या त्या भागातही यशया ६०:२२ मधील भविष्यवाणी पूर्ण होत आहे: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल.”

[१२ पानांवरील चित्र]

अरकुत्स्क येथे १९५९ मध्ये माझे वडील, आमचे कुटुंब आणि इतर बंदिवानांसोबत

[१५ पानांवरील चित्र]

इस्क्रा येथे बंदिवासातील मुले

[१७ पानांवरील चित्र]

आमचा विवाह झाला त्यावर्षी

[१७ पानांवरील चित्र]

आज मरीयासोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा