जगव्याप्त संकटप्रसंग
ब्राझीलमध्ये रस्त्यांवरच्या मुलांची भीषण कत्तल, नको असलेली मुले किती सहजगत्या बळी पडतात याचे आणखी एक उदाहरण आहे. त्या देशाच्या अहवालांनुसार, दरवर्षी कित्येक शेकडो मुलांचा खून केला जातो.
स्कॉटलंड येथील डनब्लेन आणि इंग्लंड येथील वुल्व्हरहॅम्पटन तसेच इतर अनेक ठिकाणी लहान मुलांवर अमानुष हल्ले करण्यात आले आहेत. अँगोला देशातल्या १२ वर्षांच्या मरियाच्या दुरावस्थेची कल्पना करा. ती एक अनाथ मुलगी होती; तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिला गर्भ राहिला. नंतर, तिला ३२० किलोमीटर जबरदस्तीने चालवत नेण्यात आले; त्यामुळे तिची अकाली प्रसूती झाली. ते बाळ फक्त दोन आठवडे जिवंत राहिले. शारीरिक दुर्बलता आणि कुपोषणामुळे एका आठवड्याने मरियाही मरण पावली.
सन १९९२ मध्ये, संयुक्त राष्ट्रे बाल निधीच्या (युनिसेफ) अहवालात असे म्हटले होते की, “‘लहान मुलांना युद्धाचे निशाण बनवण्याचा’ प्रकार २० व्या शतकात पहिल्यांदाच घडला आहे.” युनिसेफच्या १९९६ च्या अहवालानुसार, काहींच्या मते ‘शत्रूच्या भावी पिढ्यांचा, अर्थात शत्रूंच्या मुलांचाही नायनाट केला पाहिजे.’ एका राजनैतिक टीकाकाराने असे म्हटले: “मोठी उंदरे मारण्यासाठी लहान उंदरे मारलीच पाहिजेत.”
अलीकडील दहा वर्षांच्या काळात वीस लाख मुलांना हिंसात्मक मृत्यू आला आहे. आणखी चाळीस लाख मुले सुरुंगांमुळे अधू झाली, अंधळी बनली किंवा त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे; लढायांमुळे उघड्यावर पडलेल्या कोट्यवधी मुलांसोबत ही मुले कशीबशी जगत आहेत. म्हणूनच, एका वृत्ताचा ठळक मथळा असा होता: “मुलांवर होणाऱ्या लढाईच्या निर्दयतेचे भीषण दृश्य.”
मुलांवर होणारे हे अन्याय मानवजातीवरील अनिष्टकारक परिणाम असून फक्त काही अल्प देशांमध्येच नव्हे तर सबंध जगभरातील मुले संकटग्रस्त आहेत याचा हा निश्चित पुरावा आहे. त्याचप्रमाणे, अत्याचार केलेल्या अनेक मुलांचा विश्वासघातही करण्यात आला आहे.
भरवशाच्या व्यक्तींकडून विश्वासघात
एखाद्या लहान मुलाचा विश्वासघात करण्यात येतो तेव्हा त्याच्या मनावर फार वाईट परिणाम होऊ शकतो; विशेषतः पालक, मित्र किंवा शिक्षक विश्वासघात करतात तेव्हा. संयुक्त संस्थानांत, टीव्हीवरील टॉक शोच्या सुप्रसिद्ध संचालिका, ओपरे विन्फ्री यांनी “भीतीने दडपलेली: बालकांवरील अत्याचार उघडकीस आणणे आणि समाप्त करणे,” हा कार्यक्रम प्रस्तुत केल्यावर, प्रेक्षकांसाठी असलेल्या एका खास फोन सेवेवरून इतके फोन आले की त्यावरून पालक आपल्या मुलांवर किती अत्याचार करत आहेत याचे प्रमाण लक्षात येऊ शकते. “सर्वात धक्केदायक फोन अगदी लहान मुलांकडून येत होते; भीती वाटत असल्यामुळे आणि शारीरिक किंवा लैंगिक अत्याचारातून सुटका मिळवण्यासाठी ते फोन करत होते,” असे कार्यकारी निर्माता आर्नल्ड शेपीरो यांचे मत चिल्ड्रन टुडे या पत्रिकेत उद्धृत करण्यात आले.
या घटनेमुळे लहान मुलांवर अत्याचार करणारे सहसा, भीतीदायक दिसणारे अनोळखी लोक असतात हा भ्रम नाहीसा झाला. शेपीरो असा निष्कर्ष काढतात की, खरे तर, “सर्वात जास्त अत्याचार, पालक आणि इतर जवळचे नातेवाईकच करत असतात.” दुसरे संशोधन याला पुष्टी देते त्याचप्रमाणे असेही दर्शवते की, काहीवेळा कुटुंबाचे भरवशालायक मित्र नीट योजना करून पुढे बालकावर अत्याचार करण्यासाठी मुलाची आणि कुटुंबाचीही तयारी करतात. कौटुंबिक सदस्यांकडून लैंगिक अत्याचार हा तर सर्वात धक्केदायक विश्वासघात आहे.
बालसंभोगींकडून होणारा लैंगिक अत्याचार हा जगभरातल्या मुलांसाठी आणखी एक धोका आहे. गुन्हेगारी आणि फौजदारी न्यायालयातील पद्धती आणि वादविषय (इंग्रजी) त्याची अशी व्याख्या देते: “बालकामुकता म्हणजे अत्यंत लहान मुलांबद्दल वाटणारे लैंगिक आकर्षण. . . . त्यामध्ये लैंगिक जोरजबरदस्ती, असभ्य वागणूक आणि लहान मुलांच्या अश्लील चित्रांसंबंधीचे अपराध हे सर्व येते.”
बालसंभोगींच्या गटांचे किळसवाणे अहवाल सबंध जगभरातून मिळताहेत; हे लोक आपल्या वासनेपोटी लहान मुलांचे लैंगिक शोषण करतात. (पृष्ठ ७ वरील पेटी पाहा.) याला बळी पडणारी बालके मुलेही आहेत आणि मुलीही. दुष्ट हेतूचे पुरुष त्यांना भुलवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात आणि मग त्यांना धमकावले जाते किंवा त्यांनी “क्लब” सोडून जाऊ नये म्हणून त्यांचे लाड पुरवले जातात. अशी दुष्कृत्ये करणारे पुरुष सहसा समाजातल्या मान्यवर व्यक्तीच असतात आणि काहीवेळा तर पोलिसांना आणि न्यायमंडळाच्या लोकांनाही त्यांच्या या कारभारांची जाणीव असते; शिवाय त्यासाठी त्यांना संरक्षणही दिले जाते.
पाळकांकडून मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्यामुळेही लोक संतप्त झाले आहेत. जगभरातल्या बातम्यांवरून, पाळक लहान मुलांवर करत असलेल्या लैंगिक अत्याचाराची समस्या किती व्यापक आहे हे प्रकट होते; काहीवेळा तर देवाच्या नावाने हा अत्याचार केला जातो. उदाहरणार्थ, एका आरोपी अँग्लीकन पाळकाने ज्यावर अत्याचार केला त्या दहा वर्षांच्या मुलाला सांगितले की, “देव त्याच्याकरवी [पाळकाकरवी] बोलत होता आणि त्याने किंवा [त्या मुलाने] काहीही केले तर देव संतुष्ट होईल आणि म्हणून ते योग्य होते.”
ऑस्ट्रेलियामध्ये, युद्ध आणि परतफेड: लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे युद्ध (इंग्रजी) या पुस्तकाच्या समालोचनात पाळकांकडून आणि भरवशाच्या इतर व्यक्तींकडून लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयी सांगितले होते. त्यात म्हटले होते की, यामध्ये गोवलेल्या संघटनांना भेद्य बालकांचे संरक्षण करण्याची चिंता असण्याऐवजी स्वतःच्या प्रतिमेला जपण्याची आणि स्वतःचेच संरक्षण करण्याची जास्त चिंता लागून राहिली होती असे दिसत होते.
विनाशकारी परिणाम
सहसा मुले कोणावरही भरवसा ठेवतात तेव्हा पूर्णपणे ठेवतात. म्हणून विश्वासघात होतो तेव्हा त्या मुलाच्या कोवळ्या असंशयी मनावर त्याचा विनाशकारी परिणाम होतो. लहान मुलांवर अत्याचार आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष (इंग्रजी) हे प्रकाशन म्हणते: “आधी ज्या व्यक्ती किंवा जी ठिकाणे सुरक्षित किंवा आश्रयाची मानली जायची ती आता धोकेदायक आणि भीतीदायक वाटू लागली आहेत. लहान मुलाचे जग अधिकाधिक अनिश्चित आणि अनियंत्रित बनू लागले आहे.”
बहुतेक प्रकरणात हा अत्याचार कित्येक वर्षे चालत राहिल्यामुळे या मुलांच्या जीवनात पुढे सामाजिक आणि मानसिक समस्या निर्माण झाल्या असून प्रौढपणीही त्या तशाच राहिल्या आहेत. तो किंवा ती केवळ एक लहान मूल असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेण्यात आला आहे म्हणून मुलाचा हा विश्वासघात फार हानीकारक आहे. तथापि, ज्यांच्यावर अत्याचार केला जातो त्यांपैकी बहुतेक मुले कधीच आपले तोंड उघडत नाहीत—याचाच फायदा अत्याचार करणारे घेतात.
अलीकडील काळात, जगभरात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराचा पुरावा वाढत आहे; म्हणून आता इतका पुरावा आहे की कोणीही हे अमान्य करू शकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पण तरीही पुष्कळांचे हे मत आहे की, लहान मुलांवरील अत्याचाराच्या समस्येचे उच्चाटन करणे अत्यंत कठीण काम आहे. त्यामुळे असे प्रश्न उद्भवतात: आपल्या मुलांना खरोखर संरक्षण देणारे कोणी आहे का? आपल्यापैकी जे पालक आहेत ते देवाकडून प्राप्त झालेल्या या दानाचे संरक्षण कसे करू शकतात आणि सहज बळी पडणाऱ्या आपल्या चिमुकल्यांची काळजी कशी घेऊ शकतात? पालक कोणाकडून मदत घेऊ शकतात?
[७ पानांवरील चौकट/चित्र]
इंटरनेटवरील छापा
काही महिन्यांआधीच, इंटरनेटवरील बाल अश्लीलतेविरुद्ध केलेल्या एका मोठ्या गुप्त चौकशीत, १२ देशांमध्ये पोलिसांनी १०० हून अधिक संशयित बालसंभोगींच्या घरांवर छापे घातले. संयुक्त संस्थानांत असलेल्या फक्त एकाच बालसंभोगी गटाकडून त्यांना लहान मुलांची १,००,००० हून अधिक अश्लील चित्रे मिळाली.
या पाच महिन्यांच्या इंटरनेट चौकशीत सहकार्य केलेल्या एका ब्रिटिश गुप्त पोलिसाने असे म्हटले: “कोणत्याही सात्विक मनाच्या व्यक्तीला ही चित्रे पाहून मळमळ होऊ लागेल.” यात मुले आणि मुलीही होत्या; काही तर फक्त दोन वर्षांचे होते. बेल्जियन पोलिस म्हणाले की, इंटरनेटवरील चित्रे “बाल अश्लीलतेची सर्वात किळसवाणी चित्रे होती. . . . हे सर्व इतक्या टोकापर्यंत गेले की, सर्वात उत्तेजक चित्रे देण्यासाठी काहींनी तर स्वतःच्याच मुलांवर अत्याचार केले.” एका माणसाने, आपल्या भाचीचा बलात्कार करत असतानाचे फोटो स्वतःजवळ ठेवले आणि ते संगणकात घातले.
संशयितांमध्ये शिक्षक, एक शास्त्रज्ञ, एक कायदा विद्यार्थी, एक वैद्यकीय विद्यार्थी, एक स्काऊटमास्टर, एक अकाऊंटंट आणि विद्यापीठातील एक प्राध्यापक गोवलेले होते.
[६ पानांवरील चित्र]
एका स्फोटक यंत्रामुळे या मुलाचा उजवा हात अधू झाला
[चित्राचे श्रेय]
UN/DPI Photo by Armineh Johannes
[७ पानांवरील चित्राचे श्रेय]
Photo ILO/J. Maillard