वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ५/८ पृ. ३-४
  • संकटग्रस्त मुले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संकटग्रस्त मुले
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बाल सैनिक आणि अनाथालये
  • मुलांच्या घामातून
    सावध राहा!—१९९९
  • मुलांचे लैंगिक शोषण एक जागतिक समस्या
    सावध राहा!—१९९७
  • स्त्रियांप्रती भेदभाव
    सावध राहा!—१९९८
  • जगव्याप्त संकटप्रसंग
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 ५/८ पृ. ३-४

संकटग्रस्त मुले

“बालकांच्या कल्याणाच्या दृष्टीने वेळीच आवश्‍यक गुंतवणूक न केल्यास, सबंध मानव समाजापुढे असलेले दीर्घ पल्ल्याचे मूलभूत प्रश्‍न, आहेत तेथेच राहतील.”—संयुक्‍त राष्ट्रे बाल निधी.

सबंध जगभरातील मुले संकटात सापडलेली आहेत. स्टॉकहोम, स्वीडन येथे १९९६ मध्ये व्यापारी उद्देशांसाठी मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध जागतिक परिषद यात ही शोकांतिका केवढी भयंकर आहे याचा खात्री पटवणारा पुरावा सादर करण्यात आला; या परिषदेला १३० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. उदाहरणार्थ, जगाच्या अनेक भागांमध्ये लाखो लहान मुलींना—अगदी दहा वर्षांच्या कोवळ्या मुलींना देखील—जबरदस्तीने वेश्‍याव्यवसायात ढकलले जाते असे नमूद करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न विद्यापीठ कायदा पत्रिका (इंग्रजी) यात असे म्हटले होते की, हा जबरदस्तीचा वेश्‍याव्यवसाय “या काळातला गुलामगिरीचा सर्वात भयंकर प्रकार” म्हणण्यात आला आहे. वर्षानुवर्षे या मुलींवर शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचार केल्यावर हा दुष्परिणाम त्यांच्या सबंध आयुष्यभर टिकतो. बहुतेक प्रकरणांत, या मुली हा अत्याचार निमूटपणे सहन करतात कारण त्यांना जिवंत राहण्याकरता पोट भरायचे असते. दुसरा पर्याय म्हणजे उपाशी राहून मरणे. दुःखाची गोष्ट म्हणजे, यांतील पुष्कळशा निराधार मुलांना, दारिद्र्‌याच्या तावडीत सापडलेल्या त्यांच्या आईवडिलांनीच पैशांखातर वेश्‍याव्यवसायाच्या गर्तेत जबरदस्तीने ढकललेले असते.

या स्पष्ट दिसणाऱ्‍या शोकांतिकेत आणखी भर पडते ती, बाल मजुरीच्या अत्यंत वादग्रस्त विषयाची. आशिया, दक्षिण अमेरिका आणि इतर ठिकाणी तसेच संयुक्‍त संस्थानांतील काही भटक्या समाजांमध्ये पाच वर्षांच्या चिमुकल्या पोरांकडूनही “बाल मजुरी” करवून घेण्यात येते. लहानशा यंत्रमानवांसारखी ही मुले काम करत असतात; तेही भयंकर परिस्थितींमध्ये जेथे या चिमुकल्यांची कोवळी शरीरे आणि मने उद्‌ध्वस्त होतात. बहुतेकांना शिक्षण, आईवडिलांचे प्रेम, सुरक्षित वाटणारी घरे, खेळणी, खेळायला-बागडायला बगीचे म्हणजे काय हेच ठाऊक नसते. पुष्कळांवर त्यांचे आईवडिलच निर्दयीपणे अत्याचार करतात.

बाल सैनिक आणि अनाथालये

या शोकांतिकेत आणखी जास्त भर म्हणजे, गनिमी सैन्यांत बाल सैनिकांची वाढ. मुलांचे अपहरण करून किंवा त्यांना गुलामांच्या बाजारांमधून विकत आणून पद्धतशीररित्या त्यांना रानटी वागणूक दिली जाते; काहीवेळा तर त्यांना खून होत असलेला पाहायला लावतात. इतकेच नव्हे, तर काहींना स्वतःच्या आईवडिलांचा खून करायला लावतात किंवा त्यांच्यातली खूनी भावना वाढवण्यासाठी मादक औषधे घ्यायला लावतात.

आफ्रिकेतल्या हजारो बाल सैनिकांमधला हळवेपणा मारल्याने काय परिणाम झाला आहे याचे उदाहरण पुढे दिले गेले आहे. अंगावर काटे आणणारा हा संवाद सामाजिक कार्यकर्ता आणि बाल सैनिकामध्ये झाला; तो लहान मुलगा आपल्यात उरलेला निष्पापीपणा टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे यातून स्पष्ट होते:

“तू खून केलास? ‘नाही.’

तुझ्याकडे बंदूक होती? ‘हो.’

तू नेम धरलास? ‘हो.’

तू गोळी झाडलीस का? ‘हो.’

मग काय झालं? ‘ते खाली पडले.’”

दुधाचे दात अजून पडले नाहीत तर ही सहा-सहा वर्षांची कोवळी मुले सैनिक बनलेली असतात. अहवालानुसार, अगदी १९८८ मध्ये देखील सबंध जगभरात २,००,००० बाल सैनिक होते.

असे म्हटले जाते की, १९८८ आणि १९९२ या सालांदरम्यान एका आशियाई देशातल्या अनाथालयात ५५० बालकांना, बहुतेक मुलींना, उपाशी ठेवून ठार मारण्याचे ठरवण्यात आले. एक डॉक्टर म्हणतात: “या अनाथ मुलांजवळ वेदना शमवण्याची औषधंही नव्हती. मरायला टेकलेले असतानाही त्यांना खाटेला बांधून ठेवले होते.”

युरोपात काय घडत आहे? तेथील एका देशात, लैंगिक शोषणासाठी मुलींचे अपहरण करणारा एक बाल अश्‍लीलतेचा आंतरराष्ट्रीय गट उघडकीस आला तेव्हा सगळीकडे खळबळ माजली होती. त्यातील काही दुर्दैवी मुलींचा खून करण्यात आला होता किंवा त्यांना उपाशी ठेवून ठार मारण्यात आले होते.

या अहवालांवरून हेच दिसून येते की, अनेक देशांमध्ये बाल अत्याचार आणि शोषण ही खरोखरीच एक समस्या आहे. पण, ही समस्या जगव्याप्त आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्‍ती ठरेल का? या प्रश्‍नाचे उत्तर पुढच्या लेखात दिले जाईल.

[४ पानांवरील चित्र]

लायबेरियातील एक बाल सैनिक

[चित्राचे श्रेय]

John Gunston/Sipa Press

[४ पानांवरील चित्र]

कोलंबियातील एका वीटभट्टीत, लहान मुले विटा वाहून नेण्याचे काम करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा