वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ५/८ पृ. ११-१५
  • मुलांचे लैंगिक शोषण एक जागतिक समस्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुलांचे लैंगिक शोषण एक जागतिक समस्या
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही कारणे
  • हे आहेत तरी कोण?
  • धर्मही गोवलेला
  • काय करता येईल?
  • एकमात्र तरणोपाय
  • आपल्या मुलांचे संरक्षण कोण करील?
    सावध राहा!—१९९९
  • जगव्याप्त संकटप्रसंग
    सावध राहा!—१९९९
  • ही समस्या का वाढत आहे?
    सावध राहा!—२००३
  • संकटग्रस्त मुले
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ५/८ पृ. ११-१५

मुलांचे लैंगिक शोषण एक जागतिक समस्या

स्वीडनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

मानवी समाज अशा खळबळजनक प्रकारच्या बाल दुर्व्यवहाराने अक्षरशः हादरून गेला आहे की ज्याची व्यापकता आणि स्वरूप अलीकडील वर्षांपर्यंत इतकी सर्वज्ञात नव्हती. यासंबंधाने काय करता येऊ शकेल हे विचारात घेण्याच्या उद्देशाने, १३० राष्ट्रांचे प्रतिनिधी स्टॉकहोम, स्वीडन येथे व्यापारी उद्देशांसाठी बालकांच्या लैंगिक दुर्व्यवहाराविरुद्ध पहिल्या जागतिक परिषदेसाठी एकत्र आले. सावध राहा! नियतकालिकाचा एक बातमीदार देखील या प्रसंगी हजर होता.

माग्दालेन अवघ्या १४ वर्षांची होती तेव्हा तिला फिलिपाईन्सच्या मॅनिला शहरातल्या एका बियर बारमध्ये “होस्टेसची” नोकरी स्वीकारण्याच्या मोहात पाडण्यात आले. खरे तर, तिचे काम वेगळेच होते; तिला पुरुष गिऱ्‍हाईकांना एका लहानशा खोलीत नेऊन त्यांच्या लैंगिक उपभोगासाठी विवस्त्र व्हावे लागत असे—दररोज रात्री सरासरी १५ आणि शनिवारी ३० पुरुष येत असत. कधीकधी आपल्याला असह्‍य होत असल्याचे सांगितल्यावरही तिच्या मॅनेजरच्या जबरदस्तीमुळे तिचा नाइलाज होत असे. सहसा तिचा दिवस पहाटे चारला संपायचा; एव्हाना ती जाम थकलेली, उदास आणि अत्यंत दुःखी असे.

लहानसा अनाथ सॉरून हा कंबोडियातील नॉम पेन्ह शहरात राहणारा एक बाजारू मुलगा होता. त्याला उपदंश जडला होता आणि परदेशी लोकांबरोबर तो “फिरायला गेल्याचे” लोकांना माहीत होते. एका पगोड्यात त्याच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि येथे एक पूर्वीचा भिक्षुक त्याची ‘काळजी घेणार होता.’ पण, या माणसाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि कुंटणपणा करून परदेशी लोकांशी शरीरसंबंध ठेवायला त्याला भाग पाडले. सॉरूनची पगोड्यातली खोली पाडण्यात आली तेव्हा तो आपल्या मावशीकडे राहायला गेला पण तेव्हादेखील त्याला शरीरविक्रय करणे भाग होते.

मागील वर्षाच्या उत्तरार्धात संपन्‍न झालेल्या, व्यापारी उद्देशांसाठी बालकांच्या लैंगिक दुर्व्यवहाराविरुद्ध जागतिक परिषदेत विचारात घेतलेल्या भयंकर समस्येची ही निव्वळ दोन उदाहरणे आहेत. हा प्रकार किती व्यापक आहे? लाखो मुले यात गोवलेली आहेत—काहीजण तर कोट्यवधी मुले गोवली असल्याचे सांगतात. एका प्रतिनिधीने या समस्येविषयी थोडक्यात असे सांगितले: “लहान मुलामुलींना लैंगिक आणि आर्थिक उपभोग्य वस्तू असल्यागत विकत घेण्यात अथवा देण्यात येते. देशाच्या आत आणि सीमेपलीकडेही या मुलांची तस्करी केली जाते, त्यांना कुंटणखान्यांमध्ये कैद करण्यात येते आणि कित्येक लैंगिक शोषणकर्त्यांची वासना तृप्त करण्यासाठी त्यांना भाग पाडण्यात येते.”

सदर अधिवेशनात आपले स्वागतपर भाषण देताना, स्वीडनचे पंतप्रधान, योरन परसॉन यांनी या शोषणाचे वर्णन करताना त्यास “अपराधाचा सर्वात निर्दय, सर्वात रानटी आणि निंद्य प्रकार” म्हटले. संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या महिला प्रतिनिधीने म्हटले की “मुलांवर चहूकडून केलेला हा आघात . . . , अत्यंत घृणास्पद आहे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा यापेक्षा तिरस्करणीय मार्ग असूच शकत नाही.” सबंध परिषदेदरम्यान लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची व्यापकता, स्वरूप, कारणे, आणि परिणाम यांवर विचारविनिमय केला जात असताना अशाचप्रकारचे अनेक निषेधात्मक उद्‌गार व्यासपीठावरून ऐकावयास मिळाले.

“त्याची व्यापकता अनेक देशांपर्यंत असून त्यामुळे झालेला आघात पिढ्यान्‌पिढ्या कायम राहतो,” असे एका माहितीसूत्राने सांगितले. तर आणखी एकाने असे म्हटले की, “अब्जावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या या अवैध शरीरविक्रय व्यापारात वर्षाला अंदाजे दहा लाख मुलांचा प्रवेश होतो.” परिणाम? “मुलांची आत्मप्रतिष्ठा, अस्मिता आणि त्यांचा स्वाभिमान यांना धक्का पोहंचतो आणि कुणावरही भरवसा ठेवणे त्यांना जड जाते. त्यांचे शारीरिक आणि भावनात्मक आरोग्य धोक्यात येते, त्यांच्या हक्कांचा भंग होतो आणि त्यांचे भविष्य संकटात येते.”

काही कारणे

ही समस्या एवढ्या प्रचंड प्रमाणावर वाढत जाण्यामागे कोणती कारणे आहेत? असे सांगण्यात आले, की काही मुलांना “परिस्थितींमुळे नाइलाजास्तव शरीरविक्रयाच्या धंद्यात शिरावे लागते; आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी, कपड्यांचा आणि इतर वस्तूंचा खर्च भागवण्यासाठी ते हा जीवननिर्वाहाचा मार्ग पत्करतात. इतर काही मुले प्रसार माध्यमांतून सतत पाहायला मिळणाऱ्‍या पैसेवाल्यांच्या प्रतिमेने प्रलोभित होतात.” काहींना पळवून नेऊन बळजोरीने शरीरविक्रय करायला भाग पाडले जाते. इतर कारणांमध्ये, सर्वत्र मोठ्या वेगाने होत चाललेला नैतिक मूल्यांचा ऱ्‍हास आणि सर्वसामान्यपणे जाणवणारी आशाहीनता यांचा देखील उल्लेख करण्यात आला.

अनेक लहान मुले कुटुंबात सोसाव्या लागणाऱ्‍या दुर्व्यवहाराला कंटाळून या सेक्स व्यापारात प्रवेश करतात—घरात चालणारी मारहाण आणि कुटुंबियांकडून लैंगिक अत्याचार झाल्यामुळे ते रस्त्यावर येतात. येथे, बालसंभोगींकडून आणि इतरांकडून, आणि असे दिसते की पोलिसांकडूनही त्यांचा लैंगिक दुर्व्यवहार होण्याची भीती असते. या समस्येवर आधारित भाड्याने मिळणारी मुलं (इंग्रजी) या शीर्षकाखाली एका अहवालात ब्राझीलच्या सहा वर्षांच्या कातियाविषयी सांगितले आहे. एकदा तिला एका पोलिसाने पकडले आणि अश्‍लील चाळे करायला भाग पाडले, वरून धमकीही दिली की तिने त्याच्या साहेबाजवळ याविषयी अवाक्षरही काढले तर तो तिच्या घरच्या सर्वांना ठार करेल. दुसऱ्‍या दिवशी तो आणखी पाच जणांना घेऊन आला आणि त्या सर्वांची अशी इच्छा होती की तिने त्यांच्यासाठी देखील तेच लैंगिक चाळे करावेत.

द चिल्ड्रन्स आँब्युड्‌स्मन या स्वीडिश संस्थेने प्रतिनिधींना सांगितले: “बाल वेश्‍याव्यवसायाच्या कारणांविषयी अभ्यास केल्यावर हे निर्विवादपणे सिद्ध होते की [सेक्स] पर्यटन हे त्यामागचे एक प्रमुख कारण आहे.” एका अहवालात म्हटले होते: “मागील दहा वर्षांत बाल वेश्‍याव्यवसायात झालेली भयंकर वाढ पर्यटनसंबंधी व्यवसायांमुळेच घडून आली आहे. विकसनशील देशांत, बाल वेश्‍याव्यवसाय म्हणजे पर्यटकांना आकर्षित करण्याचे एक नवीनतम माध्यम बनले आहे.” युरोप, संयुक्‍त संस्थाने, जपान आणि इतर देशांतील पर्यटकांचे “सेक्स दौरे” सबंध जगात बाल वेश्‍यांच्या मागणीत प्रचंड प्रमाणात भर पाडतात. एका युरोपियन विमान सेवेने एका लहान मुलीच्या अत्यंत अश्‍लील मुद्रेतील प्रक्षोभक कार्टून चित्राचा सेक्स दौऱ्‍यांची जाहिरात करण्यासाठी उपयोग केला. प्रवासी कंपन्या दर वर्षी हजारो पर्यटकांसाठी सेक्स दौऱ्‍यांची व्यवस्था करतात.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाल-संभोग उद्योगाला आंतरराष्ट्रीय प्रमाणावर जो बढावा दिला जात आहे त्याचा देखील कारणांच्या लांबलचक यादीत समावेश करण्यात आला. इंटरनेट आणि त्याच्याशी संबंधित इतर संगणक तंत्र, बीभत्स साहित्याचा मोठा साठा उपलब्ध करून देणारे प्रमुख माध्यम बनले आहेत. शिवाय, व्हिडियो साहित्य कमी किंमतीत उपलब्ध असल्यामुळे बालकांचे बीभत्स चित्रण करणारे साहित्य निर्माण करणे देखील सोपे झाले आहे.

हे आहेत तरी कोण?

लहान मुलांशी लैंगिक दुर्व्यवहार करणारे बहुतांश प्रौढ बालसंभोगी असतात. बालसंभोग्यांना लहान मुलांविषयी विकृत आकर्षण असते. स्वीडनच्या चिल्ड्रन्स आँब्युड्‌समन संस्थेनुसार, बालसंभोगी “अश्‍लील चाळे करणारे रंगेल, गबाळे म्हातारेच किंवा मग आक्रमक धडधाकट पुरुषच असतील असे काही नाही. बहुतेक बालसंभोगी सुशिक्षित, मध्यमवयीन असतात आणि सहसा मुलांच्या सहवासात काम करणारे शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते किंवा पाळकही असतात.”

सदर स्वीडिश गटाने रोसार्यो नावाच्या १२ वर्षीय फिलिपिनो मुलीच्या उदाहरणाकडे लक्ष वेधले; या मुलीशी, सेक्स दौऱ्‍यावर आलेल्या ऑस्ट्रियाच्या एका डॉक्टरने लैंगिक अत्याचार केला. त्याच्या या अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला.

जिनेवा येथील युनिसेफच्या (संयुक्‍त राष्ट्रसंघाचा बालक निधी) कार्यकारी संचालिका कॅरल बेलमी यांनी या १२ वर्षीय फिलिपिनो मुलीविषयी पुढीलप्रमाणे म्हटले: “सहसा ज्या प्रौढांकडून मुलांची काळजी घेण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची अपेक्षा केली जाते नेमके तेच लोक हा अतिनिंद्य प्रकार खपवून घेतात आणि त्याला प्रोत्साहनही देतात. आपल्या प्रतिष्ठेचा आणि अधिकाराचा गैरवापर करून मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्‍यांमध्ये शिक्षक, आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, राजकारणी आणि पाळक वर्गातील सदस्यांचा समावेश आहे.”

धर्मही गोवलेला

स्टॉकहोम येथील परिषदेला हजर असलेल्या रोमन कॅथलिक चर्चच्या एका प्रतिनिधीने मुलांचे शोषण म्हणजे “सर्वात अघोर गुन्हा” आणि “मूल्यांचा भयंकर विपर्यास आणि ऱ्‍हास यांचा परिणाम” असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तथापि, कॅथलिक चर्चच्या स्वतःच्या पाळक वर्गात अशा गोष्टींचा भयंकर परिणाम दिसून आला आहे.

न्यूजवीकच्या ऑगस्ट १६, १९९३ अंकात, “पाळक आणि लैंगिक दुर्व्यवहार” या शीर्षकाखालील लेखातून “अमेरिकन कॅथलिक चर्चच्या आधुनिक इतिहासातील पाळकांशी संबंधित असणाऱ्‍या सर्वात घृणास्पद कांडाविषयी” हवाला देण्यात आला आहे. या लेखानुसार: “१९८२ सालापासून अंदाजे ४०० पाळकांविरुद्ध दोषपत्रे सादर करण्यात आली असली तरीसुद्धा काही चर्च सदस्यांचे असे म्हणणे आहे की जवळजवळ २,५०० पाळकांनी लहान किंवा षोडशवयीन मुलांशी लैंगिक गैरवर्तन केले आहे. . . . या कांडामुळे चर्चला आर्थिक नुकसान तर झालेच आहे, शिवाय यामुळे चर्चची अत्यंत लाजिरवाणी स्थिती झाली असून—त्याच्या नैतिक अधिकारालाही काही प्रमाणावर धक्का बसला आहे.” सबंध जगातील इतर धर्मांचीही हीच गत आहे.

संयुक्‍त राज्याचे एक लैंगिक-गुन्हेगारी सल्लागार रे वायर यांनी स्टॉकहोम परिषदेला दोन मुलांविषयी सांगितले ज्यांच्यावर एका पाळकाने अत्यंत पाशवी अत्याचार केला होता. त्या मुलांपैकी एक आता बाल दुर्व्यवहाराला बळी पडणाऱ्‍या मुलांच्या कल्याणासाठी एक संस्था चालवतो तर दुसरा स्वतः मुलांवर अत्याचार करू लागला आहे.

थायलंडच्या मीडानान्दू बायकू या बौद्ध पंडिताने सांगितले की, “थायलंडमध्ये सर्व थरांतील मुलांच्या व्यावसायिक उद्देशांसाठी होणाऱ्‍या लैंगिक शोषणाचा दोष काही विशिष्ट प्रकारच्या बौद्ध प्रघातांवरही लावता येईल. थायलंडच्या खेडेगावांत, शरीरविक्रयाच्या धंद्यात जबरदस्तीने ढकलण्यात आलेल्या मुलांनी समाजाला जो पैसा परत केला त्यातून काहीवेळा भिक्षुकांनी आपले खिसे भरले.”

काय करता येईल?

संयुक्‍त राज्यातील लेस्टर विद्यापीठाच्या डॉ. जुलिया ओ‘कनेल डेविडसन यांनी, लैंगिक शोषणकर्ते आपल्या वर्तनासाठी जे स्पष्टीकरण देतात त्याचा परिषदेतर्फे निषेध करण्यात यावा असे आवाहन केले. लैंगिक अत्याचार करणारे सहसा बालक लैंगिकरित्या स्वैराचारी आणि अनैतिक आहे असे गृहित धरून या मुद्यावर भर देतात आणि त्यांची सबब अशी असते की बालक आधीच खराब आणि भ्रष्ट झालेला असतो. शोषण करणारे इतरजण हा विपर्यस्त आणि खोटा दावा करतात की, त्यांच्या कृतींमुळे कोणतेही नुकसान होणार नाही, आणि उलट मुलाला फायदाच होईल.

सेक्स पर्यटनाशी निगडीत असलेल्या एका गटाने शाळेच्या अभ्यासक्रमातून शिक्षणाच्या माध्यमाने याविरुद्ध लढा देण्याचे सुचवले. शिवाय, मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्धची माहिती या पर्यटकांना त्यांच्या सबंध प्रवासादरम्यान—म्हणजे प्रवासाला निघण्याआधी, प्रवास करताना आणि मुक्कामी पोहंचल्यावर देण्यात यावी.

नवीन संपर्क तंत्रांसंबंधी एका गटाने सुचवले की मुलांचे शोषण करणारे साहित्य नाहीसे करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन देशादेशांत पुरवण्यात आले पाहिजे. या क्षेत्रातील कार्यावर नियंत्रण करणारी एक केंद्रीय आंतरराष्ट्रीय एजेन्सी स्थापन करण्याविषयीही विचार करण्यात आला. संगणकाच्या माध्यमाने बालकांच्या अश्‍लील साहित्याचा प्रसार करणे आणि अशाप्रकारचे साहित्य बाळगणे, हे सर्व देशांत दंडनीय अपराध म्हणून घोषित करण्यात यावेत आणि त्यांसाठी कायद्याने शिक्षा ठरवून द्याव्यात असाही एका गटाने सल्ला दिला.

आईवडिलांना काय करता येईल? प्रसार माध्यमाच्या भूमिकेवर विचार करणाऱ्‍या एका गटाने पालकांना आपल्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पत्करण्याचे सुचवले. त्याने म्हटले: “मुले मोठी होऊन प्रसार माध्यमांचा वापर करू लागतात तसतसे पालक त्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे तर माहितीच्या माध्यमांविषयी अतिरिक्‍त संदर्भ, स्पष्टीकरण देऊ शकतात आणि वेगवेगळ्या माहिती माध्यमांचा परिचय करून देऊ शकतात ज्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्‍या प्रसार माध्यमांच्या प्रभावावर संतुलन राखण्यात मदत मिळेल आणि मुलांच्या ग्रहणशक्‍तीचाही विकास होऊ शकेल.”

परिषदेचा अहवाल सादर करणाऱ्‍या एका स्वीडिश टीव्ही कार्यक्रमाने, पालकांनी आपल्या मुलांकडे जास्त लक्ष द्यावे आणि त्यांना धोक्यांविषयी सतर्क करावे या मुद्यांवर भर दिला. तथापि त्यांनी एक इशारा दिला: “मुलांना फक्‍त ‘घाणेरड्या म्हाताऱ्‍यांपासूनच’ सावध राहण्याची ताकीद देऊ नये . . . कारण त्यांना यामुळे असे वाटू लागते की त्यांनी फक्‍त वयस्क, गबाळ्या दिसणाऱ्‍या माणसांपासूनच सांभाळून राहिले पाहिजे, पण खरे पाहता अशाप्रकारचे गुन्हे करणारे युनिफॉर्म किंवा अगदी टिपटॉप सूट घातलेलेसुद्धा असू शकतात. म्हणूनच, त्यांच्याबद्दल असामान्य रूची दाखवणाऱ्‍या अनोळखी लोकांपासून त्यांना सावध केले पाहिजे.” अर्थात, मुलांना ओळखीच्या लोकांसहित, त्यांना उद्देशून अयोग्य चाळे करणाऱ्‍या कोणत्याही व्यक्‍तीविषयी सावध केले पाहिजे—आणि अशांविरुद्ध संबंधित अधिकाऱ्‍यांकडे तक्रार करण्याचे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

एकमात्र तरणोपाय

तथापि, स्टॉकहोम परिषद एक मात्र सांगू शकली नाही, आणि ते म्हणजे, मुलांच्या लैंगिक शोषणाच्या कारणांचे कशाप्रकारे निर्मूलन करावे. या कारणांपैकी काही म्हणजे, नैतिक मूल्यांचा सर्वत्र वेगाने होणारा ऱ्‍हास, भौतिक वस्तूंचा वाढता लोभ आणि हव्यास; अन्यायापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेल्या कायद्यांविषयी वाढता अनादर; इतरांचे कल्याण, त्यांचा स्वाभिमान आणि जीवन यांविषयी वाढती बेपर्वाई; झपाट्याने कोलमडत चाललेली कौटुंबिक व्यवस्था; लोकसंख्येच्या विस्फोटामुळे सर्वदूर पसरलेले दारिद्र्‌य, बेकारी, नागरीकरण, आणि स्थलांतरण; परदेशी आणि निर्वासित लोकांविषयी वाढता जातीयवाद; अंमली पदार्थांचे सतत वाढणारे उत्पादन आणि क्रय-विक्रय; तसेच धार्मिक मते, प्रथा आणि रितीरिवाजांचा विपर्यास.

मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय मन हेलावून सोडणारा असला तरीसुद्धा, बायबलचे लक्षपूर्वक वाचन करणाऱ्‍यांसाठी हा दुष्ट प्रकार काही नवलाचा नाही. असे का? कारण आपण बायबलच्या भाषेत, “शेवटल्या काळी” राहात आहोत आणि देवाच्या वचनानुसार, “कठीण दिवस” आले आहेत. (२ तीमथ्य ३:१-५, १३) हे लक्षात घेता, नैतिकता अत्यंत खालच्या पातळीला सरसावली आहे यात नवल ते काय?

तथापि, बायबल या जगाच्या अतिप्रचंड समस्यांच्या एकमात्र उपायाकडे लक्ष वेधते तो म्हणजे—सर्वसमर्थ देवातर्फे संपूर्ण शुद्धीकरण. लवकरच तो आपले सामर्थ्य प्रगट करून पृथ्वीवरील त्याच्या नीतिमान तत्त्वांचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्‍या सर्वांना नाहीसे करील: “कारण सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”—नीतिसूत्रे २:२१, २२; २ थेस्सलनीकाकर १:६-९.

ज्यांचा “उच्छेद होईल” अशांमध्ये लहान मुलांना शरीरविक्रय करायला लावणाऱ्‍या सर्वांचा आणि मुलांचा वाईट उद्देशांसाठी उपयोग करणाऱ्‍या नीतिभ्रष्ट लोकांचाही समावेश होईल. देवाचे वचन म्हणते: “जारकर्मी . . . व्यभिचारी . . . पुरूषसंभोग [किंवा मुलांचा संभोग] घेणारे . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) ते पुढे असेही सांगते की, “अमंगळ . . . जारकर्मी,” ह्‍यांच्यावर ‘दुसऱ्‍या मरणाची’ सत्ता येईल—अर्थात त्यांचा कायमचा विनाश होईल.—प्रकटीकरण २१:८.

देव पृथ्वीचे शुद्धीकरण करून एक संपूर्णतः नवे आणि न्यायी व्यवस्थीकरण आणील, “नवे आकाश व नवी पृथ्वी.” (२ पेत्र ३:१३) तेव्हा, त्याने निर्मिलेल्या त्या नव्या जगात नीतिभ्रष्ट, अपमार्गी लोक कधीच निरपराध्यांचा गैरफायदा घेणार नाहीत. निरपराध्यांना कोणाच्याही दुष्ट कृत्यांना बळी पडण्याची भीती राहणार नाही कारण “कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.

[१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“अपराधाचा सर्वात निर्दय, सर्वात रानटी आणि निंद्य प्रकार.”—स्वीडनचे पंतप्रधान

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“दर आठवडी, १ कोटी ते १ कोटी २० लाख माणसे अल्पवयीन वेश्‍यांकडे जातात.”—द इकॉनॉमिस्ट, लंडन

[१४ पानांवरील संक्षिप्त आशय]

सेक्स पर्यटन हे विकसनशील देशांतील लहान मुलांच्या शोषणाचे मुख्य कारण आहे

[१३ पानांवरील चौकट]

सेक्स पर्यटन—का?

(पर्यटक मुलांसोबत शरीरसंबंध का ठेवतात यामागची काही कारणे)

(१) अनोळखीपणामुळे स्वतःच्या राहत्या ठिकाणी असलेल्या सामाजिक निर्बंधांपासून तो मुक्‍त असतो

(२) स्थानिक भाषेचे जेमतेम ज्ञान असल्यामुळे किंवा अजिबातच ज्ञान नसल्यामुळे, पैशाच्या मोबदल्यात मुलांसोबत शरीरसंबंध ठेवण्यात काही गैर नाही किंवा हा मुलांना दारिद्र्‌यातून बाहेर ओढण्याचा एक मार्ग आहे असे समजण्यासाठी त्यांची सहज फसगत होऊ शकते

  (३) जातीयवादी मनोभाव असल्यामुळे हे प्रवासी ज्यांना स्वतःपेक्षा खालचे समजतात त्यांचे शोषण करतात

(४) विकसनशील देशांत लैंगिक उपभोग घेणे खिशाला सहज परवडण्यासारखे आहे हे पाहून या पर्यटकांना आणखीनच चेव येतो

[१५ पानांवरील चौकट]

या समस्येचा जगव्याप्त विस्तार

(खाली दिलेली आकडेवारी वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्‍यांच्या आणि इतर संघटनांच्या अंदाजानुसार आहे)

कॅनडा: दलालांच्या संघटित टोळ्यांमार्फत हजारो षोडशवयीन मुलींना वेश्‍याव्यवसायात अडकवण्यात येत आहे

कोलंबिया: बोगोटाच्या वेश्‍या वस्त्यांमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्‍या बालकांच्या संख्येत मागील सात वर्षांत पाचपट वाढ झाली आहे

चीन: २,००,००० ते ५,००,००० बालक वेश्‍याव्यवसायात आहेत. अलीकडच्या वर्षांत अंदाजे ५,००० चीनी मुलींना लाडीगोडी लावून देशाबाहेर नेण्यात आले आणि म्यानमारमध्ये वेश्‍याव्यवसायासाठी विकण्यात आले

तैवान: ३०,००० मुलामुलींचा समावेश

थायलंड: ३,००,००० मुलामुलींचा समावेश

पूर्व युरोप: १,००,००० मुलेमुली शरीरविक्रयात गोवलेली आहेत. यांपैकी पुष्कळांना पश्‍चिम युरोपातील वेश्‍यागृहांत पाठवण्यात येते

फिलिपाईन्स: ४०,००० मुलामुलींचा समावेश

ब्राझील: कमीतकमी २,५०,००० बाल वेश्‍या

भारत: ४,००,००० बालक सेक्स उद्योगात गोवलेली आहेत

मोझांबिक: कल्याणकारी संस्थांनी मुलांमुलींच्या लैंगिक शोषणासाठी संयुक्‍त राष्ट्रांच्या शांतीरक्षक सैनिकांना जबाबदार ठरवले आहे

म्यानमार: दर वर्षी १०,००० मुलींची आणि स्त्रियांची थायलंडच्या वेश्‍यागृहांत रवानगी केली जाते

श्रीलंका: ६ ते १४ वयोगटातील १०,००० मुलेमुली वेश्‍यागृहांत बंदिस्त आणि १० ते १८ वयोगटातील ५,००० मुलेमुली पर्यटकांच्या विश्रामगृहांत स्वतंत्रपणे काम करतात

संयुक्‍त संस्थाने: अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार १,००,००० मुले यात गोवलेली आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा