वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. २४-२५
  • पाचू—रत्नांमध्ये अत्यंत मौल्यवान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाचू—रत्नांमध्ये अत्यंत मौल्यवान
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पाचूच्या खाणी—प्राचीन काळापासूनच
  • उच्च सुरक्षितता निरुपयोगी
  • नीट पारख करून खरेदी करा!
  • संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार कोलंबिया
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • गुप्त खजिन्यासारखा शोध घेत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. २४-२५

पाचू—रत्नांमध्ये अत्यंत मौल्यवान

तेजस्वी हिरव्या रंगासाठी मौल्यवान समजल्या जाणाऱ्‍या पाचूंनी इतिहासातील सर्वात जुन्या सम्राटांच्या मुकुटांची आणि सिंहासनांची शोभा वाढवली आहे. गतकाळाप्रमाणेच आजही तो संपत्ती आणि शक्‍तीचे द्योतक आहे.

जगभरात, पाचूंना सहसा हिऱ्‍यांपेक्षा मौल्यवान मानले जाते. तसे पाहिले तर, माणिकांनाच मौल्यवान रत्न समजले जाते. परंतु, भूगर्भशास्त्रज्ञ टेरी ऑटवे असा दावा करतात की, “कॅरेटच्या आधारे पाहिले तर सर्वोत्तम दर्जाच्या पाचूंना जगात सर्वात मौल्यवान रत्ने मानली जातात.” दर्जावर अवलंबून, मुठीत मावणारा आणि ३ ग्रॅम वजनाचा पाचू १० लाख डॉलर्सच्या किंमतीचा असू शकतो!

पाचू दुर्मिळ असल्यामुळेही ते मौल्यवान आहेत. ते बेरिल स्फटिकाच्या गुणसमुहातील आहेत. पाचूमध्ये ॲल्युमिनियम आणि सिलिकोन हे सर्वसाधारण घटक आणि बेरिलियम हा दुर्मिळ घटक असतो. क्रोमियम अथवा व्हॅनॅडियम यातील कोणत्याही एका सूक्ष्ममात्रिक मूलद्रव्यामुळे पाचूंना सुंदर हिरवी छटा प्राप्त होते.

पाचूच्या खाणी—प्राचीन काळापासूनच

हजारो वर्षांपर्यंत पाचूंचा जगभरातला बहुतेक सगळा साठा ईजिप्तमधूनच यायचा. कैरोच्या आग्नेय दिशेला सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुप्रसिद्ध क्लिओपात्राच्या खाणींमधून प्रथम ईजिप्शियन लोकांनी आणि नंतर रोमन व तुर्क लोकांनी भरपूर रत्न काढले. ते फारच परिश्रमाचे काम असले असावे! वाळवंटातले कडक ऊन त्यावर पुन्हा जमिनीखालच्या खाणीतली ती धूळ आणि घाण यामुळे कामगारांना फारच कष्टदायी वाटले असावे. त्याशिवाय, नाईल नदीपासून काफल्यामार्फत सर्व आवश्‍यक वस्तू आणावे लागत होते; सगळे काही सुरळीत पार पडले की या प्रवासाला कमीत कमी एक आठवडा लागायचा. इतक्या पहाडासमान अडचणी असतानाही, खाणींचे काम सा.यु.पू. ३३० पासून ते सा.यु. १२३७ पर्यंत सतत चालू होते.

प्राचीन काळी, पाचूंचे सौंदर्य आणि त्यांच्यात चमत्कारिक, रोग बरे करण्याची शक्‍ती आहे हा समज असल्यामुळे लोकांना ते जवळ बाळगण्यास फार आवडत होते. नानाविध रोगांवर उपाय म्हणूनही पाचूंना मूल्यवान मानले जायचे. शिवाय, स्त्रियांमध्ये फलत्व आणि इच्छा निर्माण करण्याची त्याच्यात शक्‍ती आहे असेही मानले जायचे. ईजिप्त आणि इतर राष्ट्रांमध्ये, इतकेच नव्हे तर, भारतामध्येही याचा फायदेशीर व्यापार फार झपाट्याने होऊ लागला.

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्पेन येथील आक्रमण करणारे दक्षिण अमेरिकेत येईस्तोवर ही मक्‍तेदारी चालू होती. त्यानंतर लागलीच, हेमेनेथ दे केसाथा याने सध्या कोलंबिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या प्रदेशावर आक्रमण केले. काही वर्षांनंतर, १५५८ मध्ये, स्पॅनिश लोकांनी मुझो येथील खाणीचा शोध लावला. तेथे मिळालेले पाचू सर्वोत्कृष्ट आणि आकारानेही विलक्षण मोठे होते.

स्पॅनिश लोकांनी लागलीच खाणीवर ताबा मिळवला आणि तेथील लोकांना गुलाम बनवून ते त्यांच्याकडून रत्ने खोदून काढायचे अवघड आणि धोकेदायक काम करवून घेऊ लागले. काही वर्षांतच, आकाराने मोठे आणि जवळजवळ निर्दोष असलेले असंख्य पाचू युरोपमध्ये पोचले; यातले पुष्कळ पाचू ऑटोमन तुर्कांच्या, पर्शियन शाहांच्या, भारतातल्या राजघराण्यांतल्या लोकांच्या हातीही पडले. या रत्नांवर कोरीवकाम आणि नक्षीकाम करण्यात आले होते; मौल्यवान रत्नांच्या साठ्यात ते मुख्य रत्न बनले.

उच्च सुरक्षितता निरुपयोगी

आज जगातले सर्वात गरीब लोक फार कष्टाने हे रत्न कठीण, खडतर जमिनीतून खणून काढतात; त्यामुळे फ्रेड वॉर्ड हे पत्रकार त्यांच्याविषयी म्हणतात: “पाचूच्या व्यापारातील एक मोठा विरोधाभास हाच आहे की, ज्या लोकांना हे रत्न सापडतात ते लोक पाचूचा अलंकार करण्यासाठी पैसे गोळा करण्याचे स्वप्नही पाहू शकत नाहीत.” खाणीतल्या कामगारांना एखादा रत्न चोरण्याचा मोह अनावर होत असावा म्हणून पुष्कळ खाणींच्या आत सुरक्षा ठेवली जाते. मशिन गन घेतलेले गार्ड, कष्टाने रत्न खोदून, खरडून काढणाऱ्‍या कामगारांवर कडक पहारा ठेवतात.

परंतु, हे सर्व उपाय करूनही तज्ज्ञांचे असे मत आहे की पाचूंचा जगभरात होणारा बहुतेक व्यापार अवैध आहे. “पुष्कळ पाचू काळा बाजार नावाच्या जागतिक बाजारात नोंद न करता, कर न बसता, अदृश्‍यपणे प्रवेश करतात. कधी न कधी सर्वोत्तम प्रतीचा जवळजवळ प्रत्येक पाचू चोरला जातो,” असे नॅशनल जिओग्रॅफिक ही पत्रिका म्हणते.

नीट पारख करून खरेदी करा!

पाचू ज्या पद्धतीने तयार होतात त्यामुळे त्यांच्या आत अनेक स्वाभाविक आंतरिक वैगुण्ये असतात. ही वैगुण्ये रत्नाच्या पृष्ठभागावर पोचतात तेव्हा चरे पडतात आणि त्यामुळे रत्नाची फिनिशींग खराब होते आणि त्याचे मूल्य खूप घटते. शतकांपासून, विक्रेत्यांनी हे पृष्ठभागांवरील दोष लपवण्यासाठी स्वच्छ आणि पॉलिश केलेले हे रत्न देवदारूच्या अथवा पामच्या गरम तेलात बुडवून नाहीसे केले आहेत. या तापवण्याच्या प्रक्रियेमुळे रत्नातल्या चऱ्‍यांमधील हवा निघून तेल आत शिरते आणि दोष अगदी सफाईने झाकले जातात. अशी प्रक्रिया केलेले रत्न मग सर्वोत्तम रत्न म्हणून विकले जातात. परंतु, एक-दोन वर्षांत तेल सुकून जाते आणि दोष पुन्हा दिसू लागतात, त्यामुळे ग्राहक गोंधळात पडतात आणि नाराज होतात.

संभाव्य ग्राहकाने, नकली पाचू बनवले जातात याचीही खबरदारी घेतली पाहिजे. मध्य युगात, खऱ्‍या पाचूंसारखेच नकली पाचू बनवायला हिरवी काच पॉलिश करून पैलू पाडण्याची प्रथा चांगलीच रूढ होती. आतापर्यंत, पुष्कळांना खोटे पाचू देऊन फसवले गेले आहे. नॅशनल जिओग्रॅफिक असे निरीक्षण करते: “सर्वसामान्य लोकांसोबत तज्ज्ञांना देखील फसवले जाते.” परंतु, अशा चाचण्या उपलब्ध आहेत की ज्यांच्याद्वारे रत्नविद्येत पारंगत असलेले जाणकार, पाचू खरा आहे याची हमी देऊ शकतात.

मानवाच्या लोभीपणाने पाचूची प्रतिमा डागाळली असली, तरीही पाचू अत्यंत सुंदर, दुर्मिळ आणि मौल्यवान रत्न आहेत. देवाच्या सृष्टीचे ते एक मौल्यवान अद्‌भुत कृत्य आहे.

[२५ पानांवरील चित्राचे श्रेय]

सर्व पाचू: S. R. Perren Gem and Gold Room, Royal Ontario Museum; Ancient Egypt Gallery, Royal Ontario Museum

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा