वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 ३/८ पृ. २६-२७
  • तेल माड—बहुउपयोगी तालवृक्ष

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तेल माड—बहुउपयोगी तालवृक्ष
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समृद्ध इतिहास
  • सोनेरी तेल काढण्याची क्रिया
  • आईस्क्रिम ते चेहऱ्‍याच्या क्रिमपर्यंत
  • समुद्रात आपत्ती जमिनीवर दुर्घटना
    सावध राहा!—२००४
सावध राहा!—१९९९
g99 ३/८ पृ. २६-२७

तेल माड—बहुउपयोगी तालवृक्ष

सॉलोमन बेटांमधील “सावध राहा!” नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

ग्वादलकनाल—या बेटाचे नाव काढताच अनेकांना दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी झालेल्या भीषण लढाईची आठवण होते. परंतु, पूर्वी रणभूमी असलेल्या सॉलोमन बेटांमधील या ठिकाणी कोणी आज गेले तर त्यांना वेगळेच चित्र पाहायला मिळेल—दूरपर्यंत रांगेत उभे असलेले सैनिक नव्हे तर डौलदार तेल माडाचे वृक्ष दिसतील.

या हिरव्यागार आणि शोभिवंत तेल माडांच्या जागी एकेकाळी उरलेले बॉम्ब आणि युद्धातली इतर हानीकारक साधने टनावारी पडलेली होती. पण युद्धांतली ही साधने काढून तेल माडाच्या वृक्षांसाठी जागा करण्यात आली. या वृक्षाची लागवड कशी सुरू करण्यात आली? शिवाय हा उंचपुरा तालवृक्ष बहुउपयोगी आहे हे का म्हणता येईल?

समृद्ध इतिहास

तेल माडासारख्याच एका वृक्षाचे प्रथम आधुनिक वर्णन १५ व्या शतकाच्या मध्यात वेनेशियन आल्वीझे काडामोस्टो याने नमूद केले होते; त्याने आफ्रिकेच्या पश्‍चिम किनाऱ्‍याचा शोध केला होता. मग, सुमारे ५०० वर्षांआधी आफ्रिकन गुलांमांनी हे फळ आपल्यासोबत अटलांटिकपलीकडील देशांमध्ये नेले. अशाप्रकारे, पाम तेल हे जगभरातल्या वनस्पती तेलांपैकी सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे तेल बनले. तेल उत्पन्‍न करणाऱ्‍या इतर कोणत्याही वनस्पतीपेक्षा प्रती एकरामागे तेल माडांच्या तेलाचे उत्पन्‍न सर्वाधिक आहे. शिवाय, तेल माडाचे झाड सलग २५ ते ३० वर्षे फळाचे आणि तेलाचे उत्पन्‍न देत राहते.

सन १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात केलेला एक शोध, विशेषतः, पूर्व आशियातील काही देशांमध्ये पाम तेलाच्या उत्पन्‍नातील महत्त्वाचा घटक ठरला. पूर्वी असा समज होता की, तेल माडांचे परागण मुख्यतः वाऱ्‍यामार्फत होत असे. त्यामुळे, चांगले उत्पन्‍न मिळाले नाही की हवामान अनुकूल नव्हते असे म्हटले जायचे. तथापि, अलीकडील संशोधनात हे प्रकट झाले आहे की, परागण हे मुख्यतः कीटकांमार्फत केले जाते! त्यामुळे पश्‍चिम आफ्रिकेतून जेथे परागण करणारे कीटक होते त्या पूर्व आशियात या वृक्षांची बदली झाल्याने फार फायदा झाला.

तेल माडाच्या शेंदरी फळांतून दोन प्रकारचे तेल मिळते. ही दोन्ही तेले विविध प्रकारच्या उत्पादनांमध्ये वापरली जातात; यातील काही उत्पादने तुम्ही बहुतेक वापरत असाल. ते पाहण्याआधी आपण आधी पाम तेलाच्या कारखान्याला भेट देऊन तेल कसे काढतात ते पाहू या.

सोनेरी तेल काढण्याची क्रिया

कारखान्यात आम्ही जातो तेव्हा आमचा मार्गदर्शक अभिवादन करतो आणि आम्हाला आत नेतो. आमच्या सभोवताली मोठमोठाली यंत्रे सुरू आहेत. सर्वात पहिले पाऊल म्हणजे, तेल माडाची फळे एका मोठ्या लंबगोलाकार स्टीम ओव्हनमध्ये ठेवतात असे तो सांगतो. फळांच्या प्रत्येक गुच्छात दाटीवाटीने भरलेली सुमारे २०० खजुराइतकी लहान फळे असतात. स्टीम ओव्हनमध्ये फळे निर्जंतुक होतात आणि गुच्छापासून वेगळे व्हायला मदत होते.

पुढचे पाऊल म्हणजे, स्ट्रीपर नावाच्या एका यंत्राने गुच्छापासून फळे वेगळी करणे. ही वेगळी केलेली फळे एका मोठ्या मिश्रण यंत्रात घातली जातात; तेथे वरची साल आणि बी वेगळे केले जातात. त्यानंतर ही तंतूमय मांसल साल एका मोठ्या दाबणीत किंवा प्रेसमध्ये चिरडून त्यातून कच्च्या स्वरूपातले पाम तेल काढले जाते. स्वच्छ आणि शुद्ध केल्यावर, हे पाम तेल ठिकठिकाणी पाठवायला तयार होते.

परंतु, आणखी एक प्रकारचे तेल काढले जाते. हे बियातील मगजापासून काढले जाते. तेल माडाच्या बियातील मगज काढण्यासाठी प्रथम ते फोडावे लागते. त्यानंतर हा मगज दाबून त्यातून हे मौल्यवान द्रव्य काढले जाते. या तेलाला पाम मगज तेल म्हणतात.

मगजांपासून निघालेली पेंड जनावरांसाठी पौष्टिक खाद्य बनवायला वापरली जाते. त्याचप्रमाणे, गुच्छांपासून फळे वेगळी केल्यावर उरलेले गुच्छ पुन्हा शेतात खत म्हणून वापरले जातात. फळातील तंतू आणि कवच यांचाही कारखान्याच्या बॉयलर्ससाठी इंधन म्हणून उपयोग केला जातो. कमालीचीच प्रक्रिया आहे, होय ना!

आईस्क्रिम ते चेहऱ्‍याच्या क्रिमपर्यंत

सोयाबीन तेलाखालोखाल जगात सर्वाधिक वापरले जाणारे वनस्पती तेल म्हणजे पाम तेल. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणते: “१७०० च्या दशकादरम्यान, इंग्रज लोक पाम तेलाचा औषध आणि हाताला लावायची क्रीम म्हणून वापर करत होते.” तथापि आज, आईस्क्रिम, मार्जरीन, वनस्पती तूप आणि खाद्य तेलांमध्ये त्याचप्रमाणे साबण आणि सौंदर्य प्रसाधनांसारख्या उत्पादनांमध्येही त्याचा उपयोग केला जातो.

पाम मगज तेलाचा उपयोग मार्जरीनसाठी शिवाय चॉकलेट आणि इतर मिठाईंसाठीही केला जातो. पण तेलाचा एवढाच उपयोग नाही. आणखी प्रक्रिया केल्यावर पाम तसेच पाम मगज तेलातील घटक औषध, साबण, डिटर्जंट, मेणबत्ती आणि स्फोटक वस्तूही तयार करण्यासाठी वापरले जातात!

तेल माडाच्या वृक्षाने सॉलोमन बेटांवर फारच लोकप्रियता मिळवली आहे. तेल माडाचा अर्थव्यवस्थेवर केवढा प्रभाव आहे हे यावरून दिसून येते की, देशातील १३ टक्के निर्यात माल याच वृक्षाच्या उत्पन्‍नातून निघतो.

या तेल माडाकडे पाहिले की, याच्या गडद शेंदरी रंगाच्या फळाचे उत्पन्‍न आईस्क्रिमच्या रूपात एका हसऱ्‍या बाळाच्या तोंडातून टपकत असावे आणि त्याच्या आईने चेहऱ्‍याला लावलेल्या मेकअपमध्येही असावे ही केवढी गंमत. होय, तेल माडाचे वृक्ष खरोखरच बहुगुणी वृक्ष आहे आणि त्याच्या भरघोस उत्पन्‍नाबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे.

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

दर दिवशी दोन टन उत्पन्‍न—हाताने

धप्प . . . धप्प. धप्प . . . धप्प! मळ्यातले कामगार तेल माडाच्या फळांची कापणी करतात तेव्हा खाली पडणाऱ्‍या फळांच्या गुच्छांच्या या आवाजाने जमीन दणाणून जाते. झाडावर इतक्या वरती असलेली ही फळे कशी काढली जातात?

एका लांब काठीला धारदार खुरपे बांधून मळ्यातले कामगार ही फळे काढतात; काहीवेळा ही फळे चार मजली इमारतीइतक्या उंचावर असतात. एका दिवसात, प्रत्येक कामगार सरासरी ८० ते १०० गुच्छे तोडतात आणि गाडीत घालून नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला आणून ठेवतात. प्रत्येक गुच्छाचे वजन सुमारे २५ किलो इतके असते, म्हणजे हे उचलण्याचे काम काही सोपे नसते! एक टन पाम तेल काढायला साडे चार टन फळे लागतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा