तरुण लोक विचारतात . . .
दूर राहूनही प्रणयाराधन करणं कसं शक्य आहे?
“यहोवाच्या साक्षीदारांच्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला आलेल्या काही खास पाहुण्यांना मी नुकतंच त्यांच्या हॉटेलवर नेऊन सोडलं होतं. तेथून परतणार तोच आणखी एक ग्रूप तिथं आला. त्यांच्याशी बोलायला मी थांबलो आणि ऑडेटशी माझी गाठ पडली. पुढे त्याच आठवड्यात आमची पुन्हा भेट झाली. पत्रव्यवहार सुरू झाला, त्यातून ओळख वाढली आणि दोन वर्षांनंतर आमचं कोर्टशीप [प्रणयाराधन] सुरू झालं.”—टोनी.
आजच्या या जगात एकमेकांशी संपर्क साधणे आता मुश्कील मुळीच राहिलेले नाही. उलट, अलीकडे विमान प्रवास स्वस्त झाल्यामुळे, टेलिफोनचे जाळे जगभर पसरल्यामुळे, स्पीड पोस्टमुळे तसेच इंटरनेटमुळे रोमान्सच्या दुनियेत नवनवीन सुसंधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे एकमेकांपासून शेकडो, हजारो मैल दूर असूनही प्रणयाराधनाची कल्पना आकर्षक वाटू शकते; विशेषतः, तुम्ही राहता त्या ठिकाणी मनासारखा सोबती मिळणे शक्य नसते तेव्हा.
काही जोडप्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहून प्रणयाराधन करणे एक वरदान ठरले आहे. उदाहरणार्थ, टोनी म्हणतो: “आमच्या लग्नाला आज १६ वर्षं झाली आहेत आणि आम्ही दोघंही अगदी आनंदी आहोत.” काही जण असाही वाद घालतील की एकमेकांपासून दूर राहून प्रणयाराधन करण्याचा एक फायदा म्हणजे शारीरिक आकर्षणावर न भाळता आपण एकमेकांना जाणून घेत असतो. होय, वेगवेगळ्या ठिकाणांहून रोमान्स करण्याचे असे काही फायदे असले तरीही त्यात काही विशिष्ट आव्हाने देखील आहेत.
एकमेकांना जाणून घेणे
तुम्ही ज्याच्याशी विवाह करण्याचा विचार करता त्याच्याविषयी होईल तितके जाणून घेणे केव्हाही चांगलेच. पण, फ्रँक नावाचा एक पती आपल्या स्वतःच्या अनुभवावरून असे म्हणतो की, दूरच्या ठिकाणाहून “एखाद्या व्यक्तीला खरोखर जाणून घेणं म्हणजे त्या व्यक्तीच्या ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्य’ कसा आहे हे जाणून घेणं इतकं सोपं नसतं.” (१ पेत्र ३:४) डग नावाच्या आणखीन एका ख्रिश्चनाने दूरच्या ठिकाणाहून डेटिंग केले होते; याविषयी तो म्हणतो: “मागे वळून पाहताना मी हेच म्हणू शकतो, की आम्ही एकमेकांना इतकं चांगलं जाणून घेतलं नव्हतं.”
आपल्यापासून शेकडो, हजारो मैल दूर असलेल्या एखाद्या व्यक्तीला जाणून घेणे खरेच शक्य आहे का? होय, शक्य आहे; पण त्यासाठी जरा जास्त प्रयत्न करावे लागतील. डग म्हणतो “वारंवार फोन करण्यासाठी आमच्याजवळ पैसे नव्हते; त्यामुळे आम्ही आठवड्यातून एकदा एकमेकांना पत्र लिहित असू.” जोन आणि फ्रँक या जोडप्याची गोष्ट मात्र निराळी; पत्र लिहिण्यावर या दोघांचे समाधान होत नसे. जोन म्हणते, “सुरवातीला आम्ही पत्र लिहित असू, मग फोनवर बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर फ्रँकनं मला एक लहानसा टेप रेकॉर्डर पाठवला. आणि दर आठवडी रेकॉर्ड केलेली एक कॅसेट आम्ही एकमेकांना पाठवत असू.”
प्रामाणिक असणे अत्यावश्यक
तुम्ही कुठल्याही प्रकारे दळणवळण राखत असला तरी एकमेकांशी प्रामाणिक असणे अत्यंत म्हत्त्वाचे आहे. एस्तेर नावाची एक ख्रिस्ती पत्नी म्हणते, “तुम्ही खोटं बोलत असाल तर एक ना एक दिवस ते उघड होऊन तुमच्या नातेसंबंधावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे एकमेकांशी, इतकेच नाही तर स्वतःशी देखील प्रामाणिक असा. तुमच्या मनाला एखादी गोष्ट पटत नसली तर ती सोडून देऊ नका; त्यावर चर्चा करा.” या संदर्भात प्रेषित पौल एक उत्तम सल्ला देतो: “तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला.”—इफिसकर ४:२५; पडताळा इब्री लोकांस १३:१८.
असे कोणते काही विषय आहेत ज्यांची तुम्ही आवर्जून चर्चा केलीच पाहिजे? प्रणयाराधन करणाऱ्या सर्व जोडप्यांनी आपली ध्येये, मुलेबाळे, आर्थिक बाबी आणि आरोग्य यांसारख्या विषयांची तर चर्चा करावीच. पण, असेही काही विषय आहेत ज्यांच्याकडे त्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, कदाचित लग्नानंतर दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही स्थलांतर करावे लागेल. मग यासाठी तुमची मानसिक आणि भावनिक तयारी आहे का? हे तुम्हाला कसे ठरवता येईल? यापूर्वी तुम्ही कधी स्थलांतर केले आहे का, किंवा अनेक दिवस घरच्या लोकांपासून तुम्ही कधी दूर राहिला आहात का? जोनच्या भावी पतीची अशी इच्छा होती, की त्या दोघांनी वॉचटावर संस्थेत अर्थात सावध राहा! नियतकालिकेच्या प्रकाशकांचे मुख्यालय येथे स्वयंसेवक म्हणून सेवा करावी. जोन आठवून सांगते: “मी एका लहानशा खोलीत, कमी पैशांत राहू शकेल का, याविषयी त्यानं मला विचारलं, तेव्हा त्याविषयी आम्हाला सविस्तर चर्चा करावी लागली.”
तुम्ही ज्या व्यक्तीशी प्रणयाराधन करता ती दुसऱ्या देशातली असल्यास त्या देशाच्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची तुमची तयारी आहे का? “तुम्हाला आताच, म्हणजे प्रणयाराधनाच्या काळात एकमेकांची संस्कृती आवडू लागली आहे का?” असे प्रश्न फ्रँक विचारतो. “अशा महत्त्वाच्या विषयांची सुरवातीलाच चर्चा केली जावी. जितक्या लवकर तुम्ही या गोष्टी जाणून घ्याल तितके चांगले; कारण तोपर्यंत भावनिकरित्या तुम्ही एकमेकांत फार गुंतून गेले नसता शिवाय तोपर्यंत तुमचा खूपसा पैसाही खर्च झालेला नसतो.” होय, पर्यटक म्हणून चारपाच दिवस एका नवीन देशांत राहणे वेगळे आणि आयुष्यभर एका नवीन देशांत जाऊन राहणे हे वेगळे. तुम्हाला नवीन भाषा शिकावी लागेल का? तिथल्या राहणीमानात मोठा फरक असल्यास तुम्ही त्यास जुळवून घेऊ शकाल का? असे तर नाही ना, की व्यक्तीपेक्षा तिथल्या संस्कृतीवरच तुम्ही जास्त भाळला आहात? असे असल्यास, अशा प्रकारचे आकर्षण कदाचित काही दिवसांत ओसरून जाईल. पण विवाह मात्र दोन व्यक्तींमधील आयुष्यभराचे बंधन असते.—मत्तय १९:६
टोनी म्हणतो: “मला एका मुलीबद्दल माहीत आहे; ती दुसऱ्या एका देशातली होती आणि तिनं कॅरिबियनमधील एका व्यक्तीशी लग्न केलं होतं. पण बेटावर जीवन जगणं तिला कठीण वाटू लागलं. तिथल्या सततच्या उष्ण हवामानामुळे ती आजारी पडली. तिथलं खाणंपिणं वेगळं होतं आणि तिला राहून राहून घरच्या लोकांची आठवण यायची. नाईलाज म्हणून, दोघं नवराबायको तिच्या मायदेशी राहायला गेले. पण तिच्या नवऱ्याला तिथली जीवनशैली अतिशय भौतिकवादी वाटली; शिवाय, आपल्या कुटुंबासोबत, शेजाऱ्यांसोबत त्याची जी जवळीक होती त्याचीही त्याला आठवण येऊ लागली. आज ती दोघं विभक्त झाली आहेत; तो त्याच्या देशात आणि ती तिच्या देशात राहते. मुलं मात्र दोघांच्या प्रेमाला, काळजीला पारखी झाली आहेत.”
दूर राहणाऱ्या एका व्यक्तीशी किंवा मग एका दुसऱ्या देशातील व्यक्तीशी विवाह करायचा म्हणजे एक ना अनेक प्रश्न उभे ठाकतात. उदाहरणार्थ, प्रवास करण्यासाठी, एकमेकांशी संपर्क राखण्यासाठी होणारा जादा खर्च उचलण्यास तुम्ही तयार आहात का? लिडिया आठवून सांगते: “सुरवातीला फिल गंमतीनं म्हणायचा, की आपली फोनची बिल्स इतकी वाढतायेत, त्यापेक्षा लग्न केलेलं बरं; आज मात्र आमचे सगळे पैसे माझ्या आईला फोन करण्यात खर्च होतात!” शिवाय, पुढे मुलेबाळे झाली तर? काहींना तर आपले स्वतःचे नातेवाईकही नीट माहीत नसतात; काही जण आपल्या नातेवाईकांशी फोनवर देखील बोलू शकत नाहीत; कारण काय? तर भाषेची समस्या! अर्थात, अशा समस्या सोडवणे अशक्य आहे अशातला हा भाग नाही. पण विवाह करण्याआधी एखाद्याने या सगळ्या गोष्टींचा पूर्वविचार करावा.—पडताळा लूक १४:२८.
तो किंवा ती खरेच कशी आहे?
तुमचा इच्छित जोडीदार तुमच्याशी खरोखरच प्रामाणिक आणि मन मोकळा आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल? “प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते,” असे मत्तय ७:१७ म्हणते. त्या जोडीदाराची कामे कशी आहेत? तो बोलतो तसे वागतो का? पूर्वीची कार्ये त्याच्या भावी ध्येयाला पाठिंबा देतात का? एस्तेर म्हणते: “सगळ्यात पहिलं, आम्ही एकमेकांचे आध्यात्मिक ध्येय काय आहे हे जाणून घेतलं. तो आठ वर्षांपासून पूर्ण-वेळेचा सुवार्तिक म्हणून सेवा करत होता; त्यामुळे पुढेही हेच करण्याची त्याची इच्छा आहे याबद्दल मला खात्री वाटली.”
पण समजा तुम्ही ज्या व्यक्तीशी प्रणयाराधन करता ती विशिष्ट प्रश्नांबद्दल अळमटळम करणारी वाटली तर काय? पुढे सगळे काही ठिक होईल असे म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. उलट, खोलात जाऊन विचार करा. का? असा प्रश्न विचारा. एक नीतिसूत्र म्हणते: “मनुष्याच्या मनांतील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढितो.” (नीतिसूत्रे २०:५) “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो,” असा इशारा दुसरे एक नीतिसूत्र देते.—नीतिसूत्रे १४:१५.
समक्ष भेटणे
पण पत्राद्वारे किंवा फोनद्वारे एखाद्या व्यक्तीविषयी सगळीच माहिती मिळत नसते. लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी, की प्रेषित योहानाने देखील आपल्या ख्रिस्ती बांधवांना अनेक पत्रे लिहिली. या पत्रांमार्फत त्यांच्यातील प्रेमसंबंध बळकट झाले असले तरीही योहान म्हणतो: “मला तुम्हास पुष्कळ लिहावयाचे होते, ते कागद व शाई ह्यांनी लिहावेसे वाटत नाही; तर तुम्हांकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो.” (२ योहान १२) त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवणे यापेक्षा चांगला आणखीन मार्ग नाही. याकरता दोघांपैकी एकाला काही दिवसांसाठी स्थलांतर करणे योग्य असेल जेणेकरून तुम्ही एकमेकांच्या जवळ असू शकता. यामुळे जी व्यक्ती स्थलांतर करते तिला तिथल्या हवामानाचा आणि राहणीमानाचा आधीच अनुभव येईल कारण पुढे हेच ठिकाण त्याचे किंवा तिचे स्वतःचे घर होईल.
एकत्र असताना तुम्ही वेळेचा सगळ्यात चांगला उपयोग कसा करू शकता? यासाठी एकमेकांचे गुण दिसून येतील असे काहीतरी करा. उदाहरणार्थ, देवाच्या वचनाचा एकत्र मिळून अभ्यास करा. ती व्यक्ती मंडळीमध्ये आणि सेवेमध्ये कसा सहभाग घेते ते पाहा. एकत्र मिळून घरातली दररोजची कामे करा, जसे की साफसफाई करणे, शॉपिंग करणे. कामाच्या तणावाखाली ती व्यक्ती कसे वागते याचे निरीक्षण केल्याने तिच्याविषयी बरेच काही समजू शकते.a
आपल्या संभाव्य सासरच्या माणसांसोबत देखील वेळ घालवणे जरुरीचे आहे. त्यांच्यासोबत चांगले नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करा. कारण पुढे तुमचा विवाह झाल्यानंतर तुम्ही त्यांच्याच कुटुंबाचे सदस्य व्हाल. त्यामुळे तुम्ही त्यांना चांगले ओळखता का? त्यांच्याशी तुमचे जमते का? जोन असा सल्ला देते: “शक्य असल्यास, दोन्ही कुटुंबांनी एकत्र वेळ घालवणे चांगले आहे.” टोनी पुढे असे निरीक्षण करतो: “तुमचा मित्र किंवा मैत्रीण ज्याप्रकारे तिच्या किंवा त्याच्या कुटुंबाशी व्यवहार करते तसाच व्यवहार ती तुमच्याशीही करेल.”
तुम्ही प्रत्यक्ष भेटून प्रणयाराधन करा किंवा फोनद्वारे, पत्राद्वारे प्रणयाराधन करा; निर्णय घेण्यात मात्र घाई करू नका. (नीतिसूत्रे २१:५) तुमचा विवाह यशस्वी होणार नाही हे दिसून येते तेव्हा प्रणयाराधन थांबवण्याचा निर्णय घेणे शहाणपणाचे ठरेल. (नीतिसूत्रे २२:३) किंवा मग जास्त उघड, प्रामाणिक दळणवळणासाठी अधिक काळ जाऊ देण्याची गरज असेल.
वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रणयाराधन करणे नक्कीच सोपे नाही; पण, ते फलदायी देखील असू शकते. अर्थात, हा निश्चित एक गंभीर विषय आहे. त्यामुळे घाई करू नका. एकमेकांना जाणून घ्या. त्यानंतर मग तुम्ही विवाह करण्याचा निर्णय घेतलाच तर प्रणयाराधनेचा काळ तुमच्यासाठी पस्तावा करणारा काळ नव्हे तर सुखद, गोड आठवणींचा काळ राहील.
[तळटीपा]
a प्रणयाराधनावरील अधिक माहितीसाठी वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे या पुस्तकातील पृष्ठे २५५-६० पाहा.
[२५ पानांवरील चित्र]
सुरवातीलाच आपली ध्येये, मुलेबाळे आणि आर्थिक बाबी या विषयांची आवर्जून चर्चा करा