सात मुलांचं संगोपन करताना मिळालेले आशीर्वाद आणि आलेल्या अडचणी
बर्ट आणि मार्ग्रेट डिकमन यांच्याद्वारे कथित
सन १९२७ मध्ये ओहामा, नेब्रास्का, अमेरिका इथं माझा जन्म झाला आणि दक्षिण डाकोटा या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. १९२९-४२ चा काळ हा महामंदीचा काळ होता; त्या काळातील माझ्या बालपणाचे ते वाईट दिवस मला अजूनही आठवतात. त्या दिवसांत आई एक प्रकारचं सूप बनवायची ज्याला ती ग्रेव्हयार्ड स्ट्यू (उपासमारीचं सूप) म्हणायची. फ्राईंग पॅनमध्ये थोडीशी चरबी आणि पाणी घालून तयार केलेल्या या सूपमध्ये आम्ही ब्रेड बुडवून खात असू. जवळजवळ सर्वच कुटुंबांसाठी हा एक कठीण काळ होता.
माझ्या घरच्यांनी स्थानिक प्रॉटेस्टंट धर्माची दांभिकता स्वतः पाहिली होती; त्यामुळे धर्माविषयी त्यांना काहीच रस वाटत नव्हता. माझ्याबाबतीत सांगायचं तर, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मी दोन वर्षं लष्करात काढली होती आणि त्यामुळे माझ्या आचारविचारांवर तिथल्याच वातावरणाचा प्रभाव पडला होता. मला दारू आणि जुगाराची चटक लागली तीही इथंच.
एकदा रजेवर असताना मी एका डान्स पार्टीला गेलो तेव्हा मार्ग्रेट शाल्ट नावाच्या एका तरुणीशी माझी गाठ पडली; ती जर्मन-युक्रेनियन वंशातली होती. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि तीन महिने प्रियाराधन केल्यानंतर १९४६ साली आम्ही लग्न केलं. आठ वर्षांत आम्हाला सात मुलं झाली; खरंच, आईबाप होणं कसं असतं हे तेव्हा आम्हाला समजलं.
सन १९५१ मध्ये लाकडाच्या वखारित काम करत असताना माझा जबरदस्त अपघात झाला; त्यात माझा डावा हात जवळजवळ तुटलाच. तब्बल दोन वर्षं, उपचारांसाठी मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. साहजिकच, पाच मुलांची जबाबदारी आता एकट्या मार्ग्रेटवर पडली. पण परिचितांच्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीमुळे तिनं कसंबसं सांभाळून घेतलं. हॉस्पिटलमध्ये असताना जीवनाचा उद्देश काय याचा विचार करण्यासाठी मला बराच वेळ मिळाला. मी बायबलही वाचण्याचा प्रयत्न केला पण त्यातलं काहीच मला समजत नव्हतं.
हॉस्पिटलमधून घरी आल्यावर काही दिवसांतच आम्ही वॉशिंग्टन राज्यातील ऑपर्च्युनिटी या शहरात राहायला गेलो; तिथं माझ्या मेहुण्यासोबत मी बांधकाम व्यवसाय करू लागलो. आता मार्ग्रेटची कहाणी तिच्याचकडून ऐका.
मी खूप व्यस्त होते!
मी लहानाची मोठी झाले ती एका फार्मवर; धान्य पिकवणं, दुभती जनावरं पाळणं, हवाबंद डब्यांत फळं आणि भाज्या भरणं अशी कामं आम्ही फार्मवर करत असू. कष्ट करण्याची मला आधीपासूनच सवय होती; यामुळे पुढे माझ्या जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणींना तोंड देण्याची मला तालीम मिळाली. महामंदीच्या काळात इतर अनेक कुटुंबांपेक्षा आमचा बऱ्यापैकी निभाव लागला कारण निदान पोटाची खळगी भरण्यासाठी तरी आमच्याजवळ नेहमी काही ना काही असायचंच.
माझ्या आईबाबांना धर्मात काहीच रस नव्हता; मी मात्र अधूनमधून सन्डे स्कूलला जायचे. मग वयाच्या १९ व्या वर्षी मी बर्टशी लग्न केलं. आमचं लग्न चर्चमध्ये न लागता माझ्या माहेरी, बैठकीच्या खोलीत एका पाळकांनी आमचं लग्न लावलं आणि एक छोटासा सभारंभ पार पडला. काही काळातच आम्हाला सात मुलं झाली. रिचर्ड, डॅन, डग, गॅरी, मायकल, केन आणि शेवटी १९५४ साली झालेला स्कॉट. इतक्या मुलांचं संगोपन करणं काही साधीसोपी गोष्ट नव्हती.
आम्ही ऑपर्च्युनिटी शहरात राहायला आलो त्यानंतर एकदा बायबलवर चर्चा करण्यासाठी एक स्त्री आमच्या घरी आली. नरकाग्नीच्या शिकवणुकीची मला भयंकर भीती वाटायची; त्यामुळं या शिकवणुकीवर त्या स्त्रीचा विश्वास आहे का याविषयी मी तिला विचारलं. नरकाग्नीची तसेच अमरात्म्याची शिकवण ही बायबलची शिकवण नाही हे तिनं मला सांगितलं तेव्हा मला किती हायसं वाटलं होतं! मला सतत मरणाची भीती वाटायची आणि देव जर एक प्रेमळ देव आहे तर तो नरकात आपल्याला यातना का देतो हे मला कधीच समजलं नव्हतं. त्याचक्षणी मी पक्का निश्चय केला, अशा चुकीच्या गोष्टी मी माझ्या मुलांना कधीच शिकवणार नाही.
सन १९५५ मध्ये मी “लेट गॉड बी ट्रू”a या पुस्तकातून बायबलचा अभ्यास करू लागले. पण, ही गोष्ट माझ्या पेन्टिकॉस्टल धर्म प्रचारकाला समजली तेव्हा व्हायचं तेच झालं. एकाकी त्यांना माझा पुळका आला आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या तावडीतून मला वाचवण्याचा ते प्रयत्न करू लागले. पण, या प्रयत्नात त्यांनी एक मोठी चूक केली—मला नरकाग्नीविषयी ते शिकवू लागले! साक्षीदारांसोबत मी अभ्यास करू नये म्हणून त्यांनी तीन पेन्टिकॉस्टल स्त्रियांना देखील माझ्याकडे पाठवलं.
मी साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करायचे तेव्हा बर्ट बैठकीच्या खोलीत बसून आमचं सगळं बोलणं ऐकत असत. नंतर त्यांनी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्चन ग्रीक स्क्रिपचर्स वाचायला घेतलं आणि त्यातल्या पुष्कळशा गोष्टी त्यांना समजू लागल्या. त्यावेळी ते शिफ्ट ड्युटी करायचे आणि त्यांची ही ड्युटी मध्यरात्री संपायची. अर्थात, ते घरी येईपर्यंत मी केव्हाच झोपी गेलेली असायचे. एकदा रात्री मी गपचुप खाली आले आणि पाहते तर ते चोरून माझी पुस्तकं वाचत होते! त्यांना चाहूल न लागू देता, मी पुन्हा मागे गेले; ते स्वतःहून या गोष्टींचं परीक्षण करत आहेत याबद्दल मला मनस्वी आनंद झाला होता. शेवटी, तेही बायबलचा अभ्यास करू लागले आणि १९५६ साली आमचा बाप्तिस्मा झाला.
आठ वर्षांत मला सात मुलं झाली होती; त्यामुळे त्या सर्वांचं करणं, शिवाय घरातली दररोजची कामं करता करता माझी पुरेवाट व्हायची. पण, मुलं आपापली कामं करायचं शिकली. बरेचदा मी गमतीनं म्हणायचे, की माझ्याकडे एक सोडून सात सात ऑटोमॅटिक डिशवॉशर आहेत! प्रत्येकजण आळीपाळीनं हे काम करायचा. अर्थात, बर्टही तितकीच मदत करायचे. शिस्तीच्या बाबतीत ते कडक असले आणि घरामध्ये त्यांनी काही नियम घालून दिले असले तरी मुलं त्यांच्याशी अगदी मन मोकळेपणानं बोलायची. मुलं त्यांच्या वडिलांचा मान जरूर राखायची पण त्याचा अर्थ ती सतत त्यांच्या भीतीखाली वावरायची असा नाही. मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची जबाबदारीही बर्टनं अगदी सकुशलतेने पार पाडली; डॅडीनं सांगितलेलं ‘द बड्र्स ॲण्ड बीसचं’ गुपीत मुलांना आताही आठवतं.
सन १९६६ मध्ये आमचा सगळ्यात मोठा मुलगा रिचर्ड, ब्रुकलिनमधील न्यू यॉर्क शहरातील वॉचटावर सोसायटीच्या मुख्यालयांत एक स्वयंसेवक म्हणून सेवा करण्यासाठी गेला. घरट्यातनं माझं पहिलं पाखरू उडून गेलं तेव्हा मला खूप कठीण गेलं. दररोज टेबलवरची त्याची रिकामी खुर्ची पाहून माझं अंतःकरण पिळवटून यायचं. पण त्याला चांगला अनुभव आणि प्रशिक्षण मिळत आहे याबद्दल मी आनंदी होते.
आता यापुढची कहाणी बर्टकडून ऐका.
मुलांवर बायबल तत्त्वांचे संस्कार
स्पोकॅन, वॉशिंग्टन इथं माझा आणि मार्ग्रेटचा बाप्तिस्मा झाला होता. मुलांवर बायबल तत्त्वांचे संस्कार करण्याचं आव्हान आता आमच्यासमोर होतं; काहींना कदाचित ही पद्धत जुनी वाटेल. खोटं बोलणं किंवा दुटप्पी वागणंबोलणं मी मुळीच खपवून घेत नव्हतो याची मुलांना पूर्ण जाणीव होती. आपण यहोवाला नेहमी सर्वोत्तम दिलं पाहिजे हे आम्ही त्यांना शिकवलं होतं.
पण, मुलं माझ्याजवळ येऊन आपल्या मनातलं बोलायला घाबरायची नाहीत इतकी आमच्यात जवळीक होती आणि मी बराच वेळ त्यांच्या सहवासात घालवायचो, त्यांच्यासोबत मिळून काही गोष्टी करायचो. आम्ही सगळे मिळून कधी समुद्रकिनाऱ्यावर, कधी डोंगरांवर सहलींना जात असू तर कधी सॉफ्टबॉल खेळत असू. आम्ही काही प्राणी पाळले होते शिवाय आमची एक बागही होती आणि प्रत्येक जण त्याला वाटून दिलेलं काम करायचा. अशाप्रकारे कष्ट करणं आणि खेळणंबागडणं या दोन्ही गोष्टी मुलं शिकले. आमच्या सगळ्या कार्यहालचालींत संतुलन राखण्याचा आम्ही प्रयत्न करत असू.
एक ईश्वरशासित साहसी कार्य
आध्यात्मिक गोष्टींबद्दल बोलायचं तर आम्ही सगळे मिळून राज्य सभागृहातील ख्रिस्ती सभांना जात असू तसेच कुटुंब मिळून नियमितपणे बायबलचा अभ्यास करत असू. १९५७ साली आम्ही सीॲटल, वॉशिंग्टन इथं यहोवाच्या साक्षीदारांच्या एका अधिवेशनासाठी गेलो होतो. त्या कार्यक्रमात, जिथं देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची अधिक गरज होती तिथं स्थलांतर करण्याचं आमंत्रण सर्व कुटुंबांना दिलं होतं. आम्हा सर्वांना ही कल्पना आवडली आणि आम्ही त्या तयारीला लागलो. पहिल्यांदा, १९५८ साली आम्ही मिसूरीला गेलो आणि मग १९५९ मध्ये मिसिसिपीला.
सन १९५८ मध्ये आम्ही आमच्या पहिल्या मोठ्या ईश्वरशासित साहसी कार्यावर निघालो. त्यासाठी मी एक कँपिंग ट्रेलर (वाहन) बनवला आणि जुन्या १९४७ च्या थ्री सीटर, सिक्स-सिलिंडर डिसोटो गाडीला तो जोडला. त्या वर्षी आम्ही सगळे म्हणजे एकूण नऊ जणं न्यू यॉर्कमधील आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला याच गाडीनं गेलो. कित्येक आठवडे आम्ही प्रवास केला; पश्चिम किनाऱ्यावरील स्पोकॅन आणि न्यू यॉर्कचा हा २,६०० पेक्षा अधिक मैलांचा प्रवास करताना आम्ही अधूनमधून थांबत असू! सबंध कुटुंब मिळून आम्ही केलेला हा मजेदार प्रवास मुलं अजूनही विसरली नाहीत.
केकच्या अनुभवातून शिस्त शिकणे
या अधिवेशनात आम्हाला फ्रम पॅरडाईस लॉस्ट टू पॅरडाईस रिगेन्डb हे पुस्तक मिळालं होतं. दर आठवडी कुटुंब मिळून आम्ही जो बायबल अभ्यास करत असू त्यात आता आम्ही या पुस्तकाचाही अभ्यास करू लागलो. आमची सगळीच मुलं अगदी लहान वयापासून चांगलं वाचायला शिकली. मुलं शाळेतून घरी आल्यावर माझी पत्नी मार्ज मुलांसोबत काही वेळ घालवायची; मुलं बायबल वाचायची आणि ती त्यांचं वाचन ऐकायची. आम्ही मुलांना टीव्हीच्या आहारी जाऊ दिलं नाही.
आमच्या घरात शिस्तीचं आणि मानसन्मानाचं वातावरण होतं. एकदा मार्ग्रेटनं एक मोठा केक बनवला होता; तिच्या हातचा केक सर्वांना खूप आवडायचा. त्यादिवशी तिनं जेवणात गाजराचंही काहीतरी बनवलं होतं. मुलांनी भाज्यांची निदान चव तरी घ्यावी असा आमचा आग्रह असायचा. पण डगची आणि गाजराची जणू दुश्मनीच. गाजर खाल्ले नाहीत तर केक मुळीच मिळणार नाही असं त्याला सांगण्यात आलं होतं. पण त्यानं काही ऐकलं नाही. त्यावर मार्ग्रेटनं त्याला बजावलं, “तू जर हे गाजर खाल्ले नाहीत तर तुझ्या वाट्याचा केक मी कुत्र्याला टाकीन.” डगला वाटलं आई गंमत करतेय, पण मार्गेटनं खरंच त्याच्यादेखत तो केक कुत्र्याला टाकला. डगचा आवडता केक कुत्र्यानं लगेच फस्त केला आणि डग पाहातच राहिला. या अनुभवातून डग आणि इतर मुलं देखील धडा शिकले. आम्ही दोघं बोलायचो तसं करायचोही.
आम्ही खूप मजेत होतो
मी आणि मार्ग्रेट नेहमी मत्तय ६:३३ मध्ये दिलेल्या येशूच्या शब्दांप्रमाणे चालत होतो; ते वचन असं म्हणतं: “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” सबंध कुटुंब मिळून आम्ही आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न करत असू. सर्व मिळून प्रचार कार्याला जाण्याची मजा काही औरच होती; या शिवाय, आळीपाळीनं एक-एक जण माझ्याबरोबर घरोघरचं कार्य करत असे. प्रत्येकाकडे स्वतःची बॅग, बायबल आणि पुस्तकं-मासिकं असायची. त्यांनी काही प्रगती केली तर आम्ही त्यांची प्रशंसा करायचो. अशावेळी मार्ग्रेट त्यांना मायेनं जवळ घ्यायची. अशाप्रकारे, आम्ही आमचं प्रेम कृतीतून प्रदर्शित करत असू. मुलांसाठी आम्ही नेहमीच वेळ काढायचो; खरंच, आम्ही सगळे खूप मजेत होतो!
मुलं मोठी होऊ लागली तेव्हा लोकांना सभांना घेऊन येणं, राज्य सभागृह उघडणं, अशी कामं मुलं जबाबदारीनं पार पाडायची. आपल्या उपासनेचं स्थान म्हणून ते राज्य सभागृहाची कदर करायचे आणि ते सुव्यवस्थित ठेवण्यात त्यांना आनंद वाटायचा.
आम्ही त्यांना ख्रिस्ती सभांमध्ये उत्तरं देण्याचं प्रोत्साहन द्यायचो. ईश्वरशासित सेवा प्रशालेत ती लहान लहान भाषणं देऊ लागली; इथेच हळूहळू आमची मुलं उत्तम वक्तेही बनली. आमचा पाचवा मुलगा मायकल याला चारचौघांपुढे जाऊन बोलणं मुळीच आवडत नसे त्यामुळे स्टेजवर त्याची खूप फजिती व्हायची. कधीकधी, त्याला पुढे काही बोलताच यायचं नाही आणि तो अक्षरशः रडू लागायचा. पण हळूहळू त्यानं यावर मात केली; आता त्याचं लग्न झालं असून एक प्रवासी पर्यवेक्षक या नात्यानं सेवा करत असल्यामुळे तो निरनिराळ्या मंडळ्यांना भेटी देऊन आठवड्यांतून कित्येकवेळा भाषणं देतो. किती मोठा बदल!
शिस्तीविषयी मुलांचा दृष्टिकोन
मायकलवर जुन्या पद्धतीचे अर्थात बायबलच्या तत्त्वांचे संस्कार झाले असल्यामुळे याविषयी त्याचं मतं काय हे जाणून घेण्यासाठी सावध राहाने! त्याच्याशी चर्चा केली. “आमचे वडील कडक शिस्तीचे असले तरी ते तितकेच मायाळू देखील होते. मला आठवतं, किशोरवयात असताना मी एका रेडिओ स्टेशनमध्ये कामाला लागलो. मला पूर्ण-वेळेची पायनियर सेवाही करता यावी म्हणून मला एक कार हवी होती. रेडिओ स्टेशनच्या मॅनेजरनं मला त्याची टु-डोर फोर्ड मस्टान कनव्हर्टिबल कार दाखवली; त्या काळात, सर्वच युवकांना या वेगवान कारचं आकर्षण होतं. लोकांना आपल्यासोबत सेवेत घेऊन जाण्यासाठी ही कार इतकी काही चांगली नव्हतीच पण तरीही माझं मन त्यावर बसलं होतं. मी वडिलांकडे गेलो; मनात भीती तर होतीच. या कारबद्दल मी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले: “चल, याविषयी आपण सविस्तर बोलू.” त्यांना काय म्हणायचं हे मला माहीत झालं! माझ्याशी चर्चा करून एक चांगली कार घेण्याचे फायदे काय हे त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे मी फोर-डोर सिडान कार विकत घेतली; प्रचार कार्यात एकूण १,६०,००० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत मी कार चालवली तेव्हा माझी खात्री पटली, की ‘खरंच, वडिलांचं म्हणणं बरोबर होतं.’
“लहानपणी, वॉशिंग्टन ते मिसूरी आणि मग मिसिसिपीला राहायला जाणं हा आमच्यासाठी एक मजेदार अनुभव होता. आम्ही खूप मजा केली. आम्ही नऊ जणं एक पूर्ण वर्ष ८ बाय ३७ फूटच्या ट्रेलरमध्ये राहिलो तरी आम्ही खूप खूप मजा केली; शिवाय, उत्तम योजना करण्यास आणि कमी जागेतही एकमेकांसोबत खेळीमेळीने राहण्यास आम्ही शिकलो. अर्थात, आम्हाला बाहेरच खेळायला आवडत असे.
“वडील ज्या पद्धतीनं आमच्यासोबत दैनिक वचनाची चर्चा करायचे ती पद्धत मला अजूनही आठवतं आणि मी ती कधीच विसरू शकत नाही. १९६६ साली साऊथ लॅन्सिंग, न्यू यॉर्क येथील किंग्डम फार्मवर वडिलांसाठी असलेल्या एका प्रशालेसाठी ते गेले होते; तिथं त्यांनी पाहिलं, की दर दिवशी दैनिक वचनावर विवेचनं देण्यासाठी बेथेल कुटुंब सदस्य संशोधन करत असत. त्यामुळे आमच्या कुटुंबातही त्यांनी हीच पद्धत सुरू केली. आम्हा सात मुलांपैकी प्रत्येकाला एक दिवस, संशोधन केलेल्या विषयावर विवेचन मांडण्यासाठी नियुक्त केलं जायचं. याबद्दल कधी कधी आम्ही कुरकूरही करायचो; पण त्यामुळेच संशोधन कसं करायचं, विवेचनं कशी मांडायची हे आम्ही शिकलो. अशा चांगल्या सवयी आयुष्यभर सुटत नाहीत.
“आमच्यासाठी आईवडिलांनी जे त्याग केले होते ते पाहून मी खूप प्रभावित झालो. खरं तर माझे दोन थोरले भाऊ रिचर्ड आणि डॅन पैसा कमवून कुटुंबाला मदत करू शकले असते; पण आईवडिलांनी त्यांना स्वयंसेवक या नात्याने वॉचटावर संस्थेच्या जागतिक मुख्यालयांत सेवा करण्यासाठी ब्रुकलीन, न्यू यॉर्कला जाण्याचं उत्तेजन दिलं. इतकंच काय, पण आम्हाल पाच जणांना विमान प्रवास करून हे मुख्यालय स्वतः पाहायला मिळावं म्हणून आईवडिलांनी पैशांची बचतही केली. याचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला. यामुळे यहोवाच्या संस्थेविषयी आम्हाला आणखीन कदर वाटू लागली.
“आता या पुढची कहाणी वडिलांकडून ऐका.”
आम्हाला धक्केही खावे लागे
इतर कुटुंबाप्रमाणेच आमच्याही घरात समस्या होत्या, आम्हालाही धक्के खावे लागले. मुलं लग्नाच्या वयात आली तेव्हा पहिल्या नजरेत प्रेमात पडून लग्नाची घाई न करण्याबद्दल मला त्यांना सल्ला द्यावा लागला. प्रियाराधन करत असताना फक्त ते दोघंच नाहीत याची खात्री आम्ही करायचो. आपला जीवनसाथी निवडण्याआधी त्यांनी जीवनात काही अनुभव घ्यावा असं आम्हाला वाटत होतं. यामुळे कधीकधी दुःखद प्रसंग ओढवायचे, त्यांच्या भावना दुखावल्या जायच्या. पण नंतर, ‘प्रभूमध्ये, लग्न करा’ हा बायबलचा सल्ला किती सुज्ञ आहे हे त्यांनी स्वतः अनुभवलं. या बाबतीत सुज्ञपणे वागल्याबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा करायचो.—१ करिंथकर ७:३९.
आमचा सगळ्यात धाकटा मुलगा स्कॉट यानं आमचं मन दुखावलं. तो जिथं काम करायचा तिथल्या वाईट लोकांशी तो संगती करू लागला. शेवटी, त्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आलं. यामुळे आम्हा सगळ्यांनाच एक जबरदस्त धक्का बसला; पण त्याच्या बाबतीत वडिलांनी जो निर्णय घेतला होता त्याचा आम्ही आदर केला. यहोवाची सेवा करणं हाच जीवनाचा सगळ्यात उत्तम मार्ग आहे हे या कटू अनुभवातून स्कॉट शिकला.
आमचा मुलगा मंडळीतून गेला तो गेलाच असा विचार आम्ही कधीच केला नाही. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पाच वर्षांनंतर मंडळीत त्याचा पुनःस्वीकार करण्यात आला. मागे वळून पाहताना तो म्हणतो, “मंडळीतून मला बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा एका गोष्टीनं मला खूप मदत केली आणि ती म्हणजे कुटुंबासोबत मला जास्त सहवास राखता येत नसला तरी माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे हे मला माहीत होतं.” स्कॉट पुढे प्रगती करत राहिला आणि मागच्या आठ वर्षांपासून तो एका मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे.
दुसरी एक दुखद गोष्ट म्हणजे अलीकडेच १९९८ साली विशितला आमचे दोन नातवंडं देखील बहिष्कृत झाले. पण, यहोवाकडून मिळणाऱ्या शासनामुळे पुढे चांगलेच परिणाम निष्पन्न होतात यामुळे आम्हाला सांत्वन मिळतं.
आमच्या जीवनातील एक मोठा बदल
सन १९७८ पर्यंत पाहता पाहता आमची सातची सात मुलं घरटं सोडून गेली होती. दरम्यान हीटिंग, वेन्टिलेशन आणि एअर कंडिशनींग सिस्टम्स चालवण्याच्या कामाचा अनुभव मला आला होता. १९८० साली मला आणि मार्ग्रेटला नऊ महिन्यांसाठी वॉच टावर संस्थेच्या ब्रुकलिन मुख्यालयांत सेवा करण्याचं आमंत्रण मिळालं तेव्हा आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आम्ही इथं आलो होतो फक्त नऊ महिन्यांसाठी पण आज आम्हाला इथं अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत.
आमच्या जीवनात आम्हाला विपुल आशिर्वाद मिळाले. जुन्या पद्धतीनं अर्थात बायबलच्या तत्त्वांनुसार मुलांना वाढवणं एक साधीसोपी गोष्ट नव्हती; पण त्याचं प्रतिफळ आम्हाला जरूर मिळालं. सध्या आमची पाच मुलं मंडळीमध्ये वडील म्हणून सेवा करत आहेत आणि एक प्रवासी पर्यवेक्षक आहे. आम्हाला २० नातवंडं आणि ४ पतवंडं आहेत; यांच्यापैकी बहुतेक जण सत्यात असून ते विश्वासूपणे देवाची सेवा करत आहेत.
स्तोत्रकर्त्याचे पुढील शब्द किती खरे आहेत हे आम्ही खुद्द अनुभवलं आहे: “पाहा, संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातांतील बाणांप्रमाणे आहेत.”—स्तोत्र १२७:३, ४.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे १९४६ साली प्रकाशित; सध्या या पुस्तकाची छपाई होत नाही.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित
[२०, २१ पानांवरील चित्रं]
सन १९९६ मध्ये, आमच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी (उजवीकडून) आमची मुलं, सुना आणि नातवंडं (अगदी उजवीकडे) यांसोबत