वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 २/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भयसूचना—‘सुपररोगजंतूंची’
  • महागात पडणारे डिप्रेशन
  • सूड घेण्याचा धंदा
  • विवाह आरोग्यदायी
  • हिंसक हिरो
  • “तरुणींचा मुख्य मारेकरी”
  • जमिनीतील खेकडे आणि परिस्थितीकी
  • कुटुंबासोबत जेवणे
  • तंबाखूच्या कंपन्यांमार्फत खेळक्रिडेचा पुरस्कार
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९४
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९५
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९९
g99 २/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

भयसूचना—‘सुपररोगजंतूंची’

दक्षिण आफ्रिकेच्या स्टार वृत्तपत्रानुसार, “हल्ली अतिशय शक्‍तिशाली ॲन्टिबायऑटिक्सचा देखील ‘सुपररोजंतूवर’ काहीएक परिणाम होत नसल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचीही झोप उडाली पाहिजे.” याबद्दल सावधगिरीचा इशारा देताना रोगचिकित्सक माईक डव म्हणतात की, “एकेकाळी आटोक्यात आणलेले किंवा पूर्णपणे नाहीसे केलेले रोग आता बदललेल्या स्वरूपात पुन्हा डोके वर काढत आहेत.” वाजवीपेक्षा जास्त ॲन्टिबायऑटिक्सचा वापर केल्यामुळे टीबी, मलेरिया, टायफॉइड, प्रमेह, मस्तिष्कदाह आणि निमोनिया हे रोग नवीन रूप धारण करून आले आहेत; या रोगांवर उपचार करणे आता महाकठीण झाले आहे शिवाय आजकालच्या गोळ्याऔषधांचाही यांवर काहीच परिणाम होत नाही. परिणामस्वरूप, दर वर्षी केवळ टीबीमुळे तीस लाखांहून अधिक लोक दगावतात. परंतु, पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्यास रुग्णांना थोडीफार मदत होऊ शकते: भरपूर द्रव पदार्थ पिणे, पुरेशी झोप घेणे आणि घसा बसला असल्यास मिठाच्या, गरम पाण्याने गुळण्या करणे असे उपाय सुरवातीला करून पाहा. ॲन्टिबायऑटिक्ससाठी डॉक्टरांना गळ घालू नका; ॲन्टिबायऑटिक्सची खरोखरच गरज आहे का हे डॉक्टरांनाच ठरवू द्या. आणि डॉक्टरांनी जर ते लिहून दिले तर सांगितल्याप्रमाणे औषधांचा कोर्स पूर्ण करा; बरे वाटते असे समजून औषधे घेण्याचे मध्येच थांबवू नका. आपल्याला सर्दीपडसे, फ्लू होतो तो बॅक्टेरियामुळे नव्हे तर व्हायरसमुळे होत असतो; त्यामुळे अशा दुखण्यांवर ॲन्टिबायऑटिक्सचा काहीच परिणाम होणार नाही हे लक्षात असू द्या. डव यांच्या म्हणण्यानुसार, “जागतिक स्थरावर ही एक अत्यंत चिंतेची बाब असून त्यामुळे आरोग्यासंबंधी एक अतिशय मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे; तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी सगळ्यांनीच एकजुटीने प्रयत्न करण्यास हवा.”

महागात पडणारे डिप्रेशन

ब्राझीलियन वृत्तपत्र ओ ग्लोबो म्हणते की, “शारीरिक रोगांच्या तुलनेत—डिप्रेशन (निराशा) हे जगभरात कामावरील गैरहजरीचे आणि उत्पादनाची गुणवत्ता खालवण्याचे एक प्रमुख कारण आहे.” जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल दाखवून देतो, की १९९७ साली केवळ मानसिक रोगांमुळे २,००,००० लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, मूड बदलणे यासारख्या अगदी किरकोळ मानसिक विकारांमुळे देखील जगभरातील १४.६ कोटी लोकांच्या कामावर विपरित परिणाम घडला आहे; ही संख्या, श्रवण समस्यांनी पीडलेल्या १२.३ कोटी लोकांपेक्षा किंवा कामाच्या ठिकाणी अपघातांत सापडलेल्या २.५ कोटी लोकांपेक्षा जास्त आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक गाय गूडविन यांच्या एका अभ्यासानुसार निराशेची ही समस्या येणाऱ्‍या दिवसांत आणखीनच वाढेल; आणि उत्पादनाची गुणवत्ता घसरल्यामुळे तसेच निराशेच्या व्याधीवरील खर्चिक उपचारामुळे समाजाला जबरदस्त भुर्दंड बसेल. एकट्या अमेरिकेतच, दर वर्षी डिप्रेशनमुळे बसणारा भुर्दंड ५३ अब्ज डॉलरच्या घरात जातो.

सूड घेण्याचा धंदा

“पूर्ण गुप्तता पाळली जाईल” अशी हमी देणारी आणि जपानमध्ये वाटेल तिथे तुमच्या सेवेस हजर राहणारी एक टोकियो कंपनी अशी जाहिरात देते: “तुमच्यासाठी आम्ही सूड घेऊ.” सदर कंपनीचा मालक म्हणतो: “एखाद्या व्यक्‍तीने आमच्या गिऱ्‍हाईकाला ज्या प्रकारचा त्रास दिला असेल तोच त्रास त्याला द्यायचा” हे आमच्या कंपनीचे ब्रीद आहे. आसाही इव्हनिंग न्यूस यात दिलेल्या अहवालानुसार ही कंपनी “वाईट कृत्यांचा कायदेशीर मोबदला” देईल. उदाहरणार्थ, “काहीतरी कारस्थान करून एखाद्याला नोकरीवून काढणे, कलह निर्माण करणे;” लोकांचे संबंध बिघडवणे; आणि “एखाद्या सहकर्मीला नोकरीवरून कमी करणे किंवा लैंगिक छळ करणाऱ्‍या बॉसचा चारचौघांपुढे अपमान करणे.” कंपनीला दररोज फोन करणाऱ्‍या सुमारे ५० लोकांपैकी २० जण खून करण्याविषयी विचारपूस करतात; पण कंपनीचा एक सर्वसामान्य नियम असा आहे, शारीरिक बळाचा उपयोग करायचा नाही आणि कायद्याचा भंगही करायचा नाही; अर्थात ‘कधीकधी स्थिती अगदी येथवर येऊन पोहंचते.’ कितीतरी लोक या कंपनीत नोकरीला असून यांपैकी बहुतेक जण इतर ठिकाणी पूर्ण वेळची नोकरी करतात. यांपैकी काही असे आहेत ज्यांनी स्वतः एकेकाळी या गोष्टी सोसल्या होत्या आणि आता बदला घेण्यासाठी ते इतरांची मदत करू इच्छितात. सावधगिरीचा इशारा देताना कंपनीचा मालक म्हणतो, “तुमच्या एखाद्या कृतीमुळे कधीकाळी कुणाला दुखावलं असेल, त्याच्या जखमा अजून ओल्या असतील तेव्हा सांभाळून राहा!”

विवाह आरोग्यदायी

द न्यू यॉर्क टाईम्स वृत्तपत्रात एक संशोधक म्हणतो विवाहामुळे स्त्रीपुरुष दोघांचे “आयुर्मान वाढते, शारीरिक-भावनिक आरोग्य सुधारते शिवाय, आर्थिक सुबत्ता लाभते.” १९७२ साली प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, विवाहित स्त्रिया अधिक प्रमाणात मानसिक तणावाखाली असतात; पण यास शिकागो विद्यापीठाच्या प्राध्यापिका लिंडा जे. व्हेट यांचा विरोध आहे. डॉ. व्हेट यांच्या निदर्शनास आले की, “विवाहामुळे लोकांच्या वागणुकीत चांगले बदल होऊन ते आरोग्यसंपन्‍न होतात,” उदाहरणार्थ, त्यांचे मद्यसेवन कमी होते. विवाहामुळे डिप्रेशनही कमी होते. खरे तर, अविवाहित पुरुषांच्या एका समूहावर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की जे पुरुष अविवाहितच राहिले त्यांचे डिप्रेशन पुढे अधिकच वाढले. परंतु, मिनेसोटा विद्यापीठाचे डॉ. विल्यम जे डोअर्टी म्हणतात, की या संशोधनातून हाती लागलेली माहिती ढोबळमानाने खरी असेलही पण विवाह करणारा प्रत्येकच आनंदी असतो किंवा योग्य साथीदार निवडला नाही तरीही आनंदी आणि आरोग्यसंपन्‍न असेल असा त्याचा अर्थ होत नाही.

हिंसक हिरो

अलीकडेच, संयुक्‍त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने प्रसार माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्‍या हिंसाचाराच्या परिणामाचा अभ्यास केला; या अभ्यासानुसार भरपूर हाणामारी दाखवणाऱ्‍या चित्रपटांचे हिरोज मुलांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि आदर्श मानले जातात. वरील अभ्यास करण्यासाठी २३ राष्ट्रांतील १२ वर्षीय पाच हजार मुलांची मुलाखत घेतली होती; यांपैकी २६ टक्के मुलांनी वर्तनाच्या बाबतीत आदर्श म्हणून “पॉप स्टार आणि संगितकारांपेक्षा (१८.५ टक्के), धर्मगुरूंपेक्षा (८ टक्के) किंवा राजकीय नेत्यांपेक्षासुद्धा (३ टक्के)” पिक्चरमधील या हिरोंना सगळ्यात पहिले स्थान दिले होते असे ब्राझीलचे झ्यूरनाल डा टार्डी म्हणते. सदर अभ्यासाचे सूत्रसंचालक प्राध्यापक जो ग्रूबल यांच्या म्हणण्यानुसार प्रामुख्याने, संकटप्रसंगांतून स्वतःचा बचाव कसा करावा हे शिकण्यासाठी मुले हिंसक हिरोंना आपला आदर्श मानतात. ग्रूबल अशी सूचना देतात, की मुले जितकी हिंसाचारास सरावतात तितकीच त्यांची वागणूक अतिरेकी बनते. ते पुढे म्हणतात: “हिंसाचारात गैर काहीच नाही आणि त्यामुळे फायदाच होतो असा संदेश प्रसार माध्यमे देत असतात.” काल्पनिक-वास्तविक यातला भेद करण्यास आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यात पालक महत्त्वाची भूमिका निभावतात यावर ग्रूबल यांनी जोर दिला.

“तरुणींचा मुख्य मारेकरी”

नॅन्डो टाईम्स असा अहवाल देते, की आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांमध्ये टीबीचा तडाखा बसतो तो सहसा वयाची पासष्टी ओलांडलेल्या पुरुषांनाच. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्लूएचओ) विश्‍व पातळीवर मात्र टीबी हा रोग “तरुणींचा प्रमुख मारेकरी” ठरला आहे असा सदर अहवाल म्हणतो. डब्ल्युएचओच्या विश्‍व टीबी कार्यक्रमाचे डॉ. पॉल डोलीन म्हणतात: “पत्नी, माता आणि अर्थार्जन करणाऱ्‍या स्त्रिया यांना ऐन तारुण्याच्या बहरात टीबीचा तडाखा बसतो.” गोटबोर्ग, स्वीडन येथे अलीकडेच झालेल्या एका वैद्यकीय चर्चासत्रात तज्ज्ञांनी म्हटले, की जगभरात ९०० कोटीहून अधिक स्त्रियांना टीबीचा संसर्ग झाला आहे. यांपैकी अधिकांश १५ ते ४४ वर्षे वयोगटातील असून दर वर्षी एक कोटी स्त्रिया मृत्यूमुखी पडतील. ब्राझीलच्या ओ एस्टाडो डी एस. पाऊलो वृत्तपत्रानुसार त्यांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणजे हा रोग पूर्णपणे बरा होण्याआधीच अनेक स्त्रिया गोळ्याऔषधे घेण्याचे सोडून देतात.

जमिनीतील खेकडे आणि परिस्थितीकी

अरण्यात जमिनीवर पडणाऱ्‍या पालापाचोळ्याचे विघटन मुंग्या, वाळवी आणि कृमी करत असतात; पण जिथे सहसा पूर येतो त्या उष्णप्रदेशांतील पर्जन्यवनांच्या बाबतीत काय? या ठिकाणी हेच काम जमिनीतले खेकडे करतात. कोस्टा रिकाच्या पॅसिफिक किनारपट्टीवरील अरण्याच्या विस्तृत क्षेत्रावर पालापाचोळा नसून जमिनीवर असंख्य मोठमोठी बिळे पाहून अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील एका पर्यावरणतज्ज्ञाला नवल वाटले. रात्रीच्या वेळी त्याने पाहिले तेव्हा एक एकर जमिनीतून सुमारे २४,००० खेकडे पालापाचोळा, फळे, बी-बियाणे शोधण्यासाठी बाहेर येऊन आपल्या तीन फूट बिळांमध्ये हे सगळे घेऊन जाताना दिसले. आठ इंचांच्या या खेकड्यांना श्‍वासोच्छ्‌वास करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे कल्ले असतात; पैदास करण्यासाठी ठराविक वेळीच समुद्रात जाणारे हे खेकडे खोल मूळ धरलेल्या वृक्षांसाठी पोषक असतात. लंडनचे द टाईम्स वृत्तपत्र अहवाल देते, की सबंध अरण्याची परिस्थितीकी या प्राण्यांवरच अवलंबून असते.

कुटुंबासोबत जेवणे

कॅनडाचे टोरोन्टो स्टार वृत्तपत्रानुसार ५२७ किशोरवयीनांच्या एका अभ्यासातून असे उजेडात आले, की आठवड्यातून कमीतकमी पाच वेळा आपल्या कुटुंबासोबत जेवण करणारे युवक “ड्रग्सच्या आहारी जाण्याची किंवा डिप्रेशनला बळी पडण्याची शक्यता फार कमी होती; अभ्यासात ते तुलनात्मकपणे जास्त हुशार होते आणि आपल्या वयाच्या इतर युवकांसोबतही त्यांचे जास्त चांगले संबंध होते. ज्या युवकांना ‘फारसे जुळवून न घेणारे’ असे नाव मिळाले होते ते आठवड्यातून मोजून दोन किंवा तीन दिवस आपल्या कुटुंबासोबत जेवतात.” मानसशास्त्रज्ञ ब्रूस ब्रायन म्हणतात, की सबंध कुटुंब एकत्र बसून जेवतात हे “निकोप कौटुंबिक जीवनाचे लक्षण आहे.” कुटुंबासोबत एकत्र मिळून जेवण केल्याने कौटुंबिक बंधने मजबूत होतात, दळणवळणाची कौशल्ये वाढतात आणि आपलेपणाची भावना निर्माण होते, असे अहवाल म्हणतो. याशिवाय, जेवतानाचे शिष्टाचार हे शिकण्याचा तसेच गप्पागोष्टी, हसणेखेळणे आणि प्रार्थना यांत सहभागी होण्याची संधी मिळते. नियमितपणे एकत्र मिळून जेवणाऱ्‍या एका तरुणीने म्हटले आम्ही जर सुरवातीपासून असे जेवलो नसतो तर “आज माझ्या कुटुंबासोबत माझे इतके जवळचे संबंध असले असते, असे मला वाटत नाही.”

तंबाखूच्या कंपन्यांमार्फत खेळक्रिडेचा पुरस्कार

आपल्या उत्पादनांचा पुरस्कार करण्यासाठी तंबाखूच्या कंपन्या खेळक्रिडेचा आणि इतर करमणुकींचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात; यामुळे “क्रिडा . . . आणि धुम्रपान यांत संबंध जुळतो,” असे ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन हेल्थ प्रमोशन फाऊन्डेशनच्या ऱ्‍हॉन्डा गॅलबली म्हणतात. परिणामस्वरूप, खेळक्रिडेमधून सहसा झळकणाऱ्‍या तंबाखूच्या धूर्त जाहिरातींमुळे लोकांना धूम्रपान करण्याचे उत्तेजन मिळू शकते. ब्रिटनच्या कॅन्सर रिसर्च कॅम्पेनच्या निदर्शनास आले की, “ज्या मुलांना टीव्हीवर फॉर्म्युला वन मोटर रेस पाहण्याचा शौक आहे अशी मुले धुम्रपान सुरू करण्याची शक्यता दुप्पट आहे,” असा अहवाल पानोस समाचार एजन्सी देते. “युरोपमध्ये, केवळ कारच्या रेसला बढावा देण्यासाठी तंबाखूच्या कंपन्या दर वर्षी १०.० कोटी डॉलर खर्च करतात.” शिवाय, कार्स म्हणजे वारंवार टीव्हीवर झळकणाऱ्‍या चालत्याफिरत्या जाहिरातीच होय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा