आमच्या आईवडिलांनी आम्हाला देवावर प्रेम करायला शिकवलं
एलिझाबेथ ट्रेसी यांच्याद्वारे कथित
काही शस्त्रधारी माणसांनी आईबाबांना कारमधून अक्षरशः ओढून काढलं. काही वेळाआधी हीच माणसं एक मोठा जमाव घेऊन आमच्यावर चालून आली होती. आईबाबांना नेल्यावर मी आणि माझी बहीण कारच्या मागच्या सीटवर गपचूप बसून राहिलो; आपल्याला आईबाबांना पुन्हा कधी पाहायला मिळेल की नाही, ही भीती आमच्या मनात होती. १९४१ साली, अमेरिकेतल्या ॲलबामा राज्यातल्या सेल्मा नावाच्या गावात हा असा भीतीदायक अनुभव आम्हाला का आला? आणि आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलेल्या गोष्टींचा या घटनेशी काय संबंध होता?
ड्युई फाऊंटन. माझे वडील. अगदी तान्हे बाळ असतानाच त्यांचे आईवडील मरण पावल्यामुळं टेक्सास इथं एका फार्मवर राहणाऱ्या त्यांच्या एका नातेवाइकानं त्यांना लहानाचं मोठं केलं. मोठेपणी ते तेलगिरणीत कामावर लागले. १९२२ साली वयाच्या २३ व्या वर्षी टेक्सासच्याच एका विनी नावाच्या सुंदर मुलीशी त्यांचं लग्न झालं. ते दोघं मिळून सुखी संसाराची स्वप्नं पाहू लागले.
टेक्सासच्या पूर्वेकडे लाकूडतोडीचा व्यवसाय चालतो त्या भागात, गॅरिसन नावाच्या एका लहानशा गावात बाबांनी घर बांधलं. तिथेच ते कापूस आणि मका वगैरे पिकवायचे. त्यांनी आपल्या फार्मवर बरीच जनावरेही पाळली होती. काही वर्षांनी आम्हा भावंडांचा जन्म झाला—१९२४ साली मे महिन्यात ड्युई ज्युनियर, १९२५ डिसेंबरमध्ये एड्विना आणि १९२९ साली जून महिन्यात माझा जन्म झाला.
बायबल सत्य शिकायला मिळाले
आई आणि बाबा चर्च ऑफ क्राइस्टचे सदस्य होते; त्यामुळं, आपल्याला बायबलचं बऱ्यापैकी ज्ञान आहे असा त्यांचा ग्रह होता. पण १९३२ साली असं घडलं, की जी. डब्ल्यु. कुक यांनी वॉचटावर सोसायटीनं प्रकाशित केलेली डेलिव्हरन्स आणि गव्हर्मेंट ही पुस्तकं माझ्या वडिलांच्या भावाला, म्हणजे मन्रो फाउंटन यांना दिली. मन्रो काकांना, आपण शिकलेल्या नवनवीन गोष्टी माझ्या आईवडिलांनाही सांगावंसं खूप वाटायचं. त्यामुळे ते सहसा सकाळीच आमच्या घरी येऊन द वॉचटावर हे मासिक आम्हाला वाचून दाखवायचे आणि मग ते मासिक आमच्याचकडे “विसरून” जायचे. अर्थातच, नंतर आई व बाबा ते वाचायचे.
एकदा रविवारच्या दिवशी सकाळी मन्रो काकांनी एका शेजारच्या घरी बायबल स्टडीसाठी येणार का म्हणून बाबांना विचारलं. मि. कुक यांना बायबलमधला कोणताही प्रश्न विचार, ते त्याचं उत्तर देतील असं त्यांनी बाबांना सांगितलं. बायबल स्टडीवरून बाबा परतले तेव्हा भलत्याच खुशीत होते; ते म्हणाले, “माझ्या सर्व प्रश्नांची मला उत्तरं मिळाली, शिवाय आणखीही बरंच काही मला समजलं! आपल्याला बायबलचं पूर्ण ज्ञान आहे असं मला वाटत होतं; पण मि. कुक जेव्हा नरक, आत्मा, पृथ्वीबद्दल देवाचा उद्देश, देवाच्या राज्यात कशाप्रकारे हा उद्देश पूर्ण होईल, वगैरे एकेक गोष्ट स्पष्ट करून सांगू लागले तेव्हा मला जाणवलं की आपल्याला तर बायबलचं काहीच ज्ञान नाही!”
आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत रीघ असायची. नातेवाईक, ओळखीचे लोक असे बरेच पाहुणे यायचे. आईबाबांसोबत त्यांच्या गप्पागोष्टी रंगायच्या; आम्ही सगळे मिळून फज, पॉपकॉर्न वगैरे खाण्याचे पदार्थ बनवायचो. कधीकधी आई पियानो वाजवायची आणि बाकीचे सारेजण मिळून गाणी गायचे. हळूहळू या गप्पागोष्टी बायबलच्या विषयांकडे वळू लागल्या. आम्हा मुलांना मोठ्यांमध्ये चाललेलं सर्व बोलणं तर कळत नव्हतं, पण तरीसुद्धा आपल्या आईवडिलांना देवाबद्दल आणि बायबलबद्दल किती प्रेम आहे हे आम्हाला अगदी स्पष्ट दिसायचं; त्यामुळं आम्ही सर्व भावंडं देखील देवावर आणि त्याच्या वचनावर तितकंच प्रेम करू लागलो.
आसपासच्या इतर काही कुटुंबांनीही त्यांच्या घरी दर आठवड्याला बायबलच्या चर्चा करण्याची संमती दिली; या चर्चा सहसा टेहळणी बुरूज मासिकाच्या नवीन अंकात आलेल्या एखाद्या विषयावर असायच्या. कधीकधी ॲपलबी आणि नॅकडोचज या जवळच्याच गावांत एखाद्या कुटुंबाकडे सभा असायची; मग आम्ही सर्वजण आमच्या मॉडल ए फोर्ड मोटारीत बसून तिथं जायचो. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, आम्ही सभा कधीच चुकवल्या नाहीत.
शिकलेल्या गोष्टींनुसार कार्य
अभ्यास करण्यासोबतच कार्य करणंही आवश्यक आहे हे लवकरच आईबाबांना लक्षात आलं. देवावर आपलं प्रेम असेल तर शिकलेल्या गोष्टी इतरांना जाऊन सांगणंही महत्त्वाचं आहे हे त्यांना जाणवलं. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) पण आपले विश्वास लोकांना जाऊन सांगणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. कारण ते दोघंही अतिशय लाजाळू आणि गरीब स्वभावाचे होते. पण देवावर त्यांचं निरातिशय प्रेम होतं आणि याच प्रेमानं त्यांना हे कठीण काम करण्याची प्रेरणा दिली; शिवाय आपल्या या अनुभवावरून त्यांनी आम्हा मुलांना देखील नेहमी यहोवावर विसंबून राहायला शिकवलं. बाबा म्हणायचे: “यहोवा देव आपल्यासारख्या शेतकऱ्यांनाही प्रचार करायला शिकवतो!” १९३३ साली आईबाबांनी टेक्सासच्या हेन्डरसन शहराजवळ एका तळ्यात बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपण आपले जीवन समर्पित केल्याचं जाहीर केलं.
ख्रिस्ती लोकांना असलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेविषयी बाबांना बरेच प्रश्न होते; त्यामुळे १९३५ सालाच्या सुरवातीला त्यांनी वॉचटावर संस्थेला एक पत्र लिहिलं. (योहान १४:२; २ तीमथ्य २:११, १२; प्रकटीकरण १४:१, ३; २०:६) त्यांच्या पत्राचं उत्तर कुणी दिलं असेल, तर स्वतः जोसेफ. एफ. रुदरफोर्ड म्हणजे संस्थेच्या तेव्हाच्या अध्यक्षांनी. पण ब्रदर रुदरफोर्ड यांनी बाबांच्या प्रश्नांची थेट उत्तरं देण्याऐवजी मे महिन्यात वॉशिंग्टन डी.सी. इथं होणार असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनाला येण्याचं त्यांना आमंत्रण दिलं.
‘शक्यच नाही!’ बाबा म्हणाले. ‘आपण शेतकरी माणसं. ६५ एकर जमिनीवर पिकं उगवली आहेत. आणि नेमकी तेव्हाच कापणी करून पिकं विकायला नेण्याची वेळ असेल.’ पण झालं असं, की यानंतर काही दिवसांनीच मोठा पूर आला आणि पिकं, कुंपणं, पूल सर्वकाही वाहून गेलं; आता अधिवेशनाला न जाण्याचं बाबांजवळ काहीच निमित्त उरलं नाही. त्यामुळं, आणखी काही साक्षीदारांसोबत भाड्याने घेतलेल्या एका शाळेच्या बसमध्ये आम्ही पण १,६०० किलोमीटरचा प्रवास करून अधिवेशनाला गेलो.
अधिवेशनात, “मोठ्या संकटातून” बचावणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायात’ कोण सामील आहेत हे स्पष्ट करून सांगण्यात आलं तेव्हा आईबाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. (प्रकटीकरण ७:९, १४) त्यानंतर आयुष्यभर, परादीस पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची ही आशा आई आणि बाबांसाठी एक प्रेरक शक्ती ठरली. त्यांनी आम्हा मुलांना देखील ‘खऱ्या जीवनाची’ आशा म्हणजेच यहोवाच्या अभिवचनानुसार पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा ‘बळकट धरण्याचं’ सदोदीत प्रोत्साहन दिलं. (१ तीमथ्य ६:१९; स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३, ४) मी तेव्हा जेमतेम पाच वर्षांची होते, पण त्या अधिवेशनाला जाण्याचा आनंददायक अनुभव माझ्या आठवणीत राहिला.
अधिवेशनावरून परतल्यावर आम्ही सर्वांनी मिळून पुन्हा पेरणी केली आणि त्यावेळचं पीक हे आजपर्यंत आलेलं सर्वात चांगलं पीक होतं. आईबाबांना आणखीनच पक्की खात्री पटली, की यहोवावर पूर्ण भरवसा ठेवणाऱ्यांना कधीही निराशा पदरी पडणार नाही. त्यांनी एका खास प्रकारच्या प्रचार कार्याची जबाबदारी स्वीकारली; त्यात त्यांना दर महिन्याला ५२ तास सेवेसाठी द्यावे लागायचे. पुढच्या पेरणीची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपली सर्व संपत्ती विकून टाकली! बाबांनी आम्हा पाच जणांना राहता येईल असा एक खास २० बाय ८ फुटांचे ट्रेलर तयार करून घेतले आणि ते ओढण्यासाठी एक नवी कोरी फोर्ड गाडी विकत घेतली. मन्रो काकांनी पण तेच केलं आणि त्यांचे कुटुंबही ट्रेलरमध्ये राहू लागलं.
आम्हा मुलांवर सत्याचे संस्कार
आई आणि बाबांनी १९३६ सालाच्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण वेळेची सेवा म्हणजे पायनियर सेवा सुरू केली. आमचं पूर्ण कुटुंब पूर्व टेक्सासच्या गावोगावी प्रचार करू लागलं. या भागात राज्याची सुवार्ता अद्याप सांगण्यात आली नव्हती. जवळजवळ एक वर्षभर आम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत राहिलो. आम्हाला हे खूप आवडायचं. आई बाबांनी आम्हाला नेहमी सुरवातीच्या ख्रिश्चनांचं अनुकरण करायला शिकवलं ज्यांनी बायबलच्या सत्याचा प्रसार करण्याकरता आपलं आयुष्य वेचलं; आणि आईबाबांनी हे आम्हाला केवळ त्यांच्या शब्दांतूनच नव्हे तर कृतीतूनही शिकवलं.
आम्हा मुलांना खासकरून आईबद्दल खूपच आदर वाटायचा कारण आपलं घरदार सोडून तिनं फारच मोठा त्याग केला होता. पण एक वस्तू जी विकायला ती कधीही तयार झाली नाही, ती म्हणजे तिचं शिलाई मशीन. पण एका अर्थानं ते बरंच झालं कारण तिला शिवणकाम उत्तम येत असल्यामुळे आमच्याजवळ नेहमी छान छान कपडे असायचे. दर अधिवेशनाला ती आम्हाला सुंदर नवनवीन ड्रेस शिवायची.
एकदा हर्मन जी. हेन्शल त्यांच्या कुटुंबासोबत वॉचटावर सोसायटीचे साऊंड ट्रक घेऊन आमच्या भागात आल्याचं मला आठवतं. ते सहसा गर्दीच्या ठिकाणी ट्रक उभा करायचे आणि मग रेकॉर्ड केलेलं एक लहानसं भाषण ऐकवायचे; त्यानंतर ते लोकांच्या घरी जाऊन त्यांना जास्त माहिती द्यायचे. हर्मन हेन्शलच्या मिल्टन नावाच्या चौदा पंधरा वर्षांच्या मुलासोबत माझ्या भावाची म्हणजे ड्युई ज्युनियरची चांगलीच दोस्ती जमली होती. आता मिल्टन वॉचटावर सोसायटीच्या अध्यक्षपदी आहेत.
कोलंबस, ओहायो इथं १९३७ साली झालेल्या अधिवेशनात एड्विनाचा बाप्तिस्मा झाला आणि आईबाबांना स्पेशल पायनियर म्हणून खास सेवा करण्याकरता नेमण्यात आलं. त्या वेळी स्पेशल पायनियर्सना महिन्याला कमीतकमी २०० तास प्रचार कार्य करावं लागायचं. आज मी त्या दिवसांचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी देखील माझ्या पतीला त्यांच्या ख्रिस्ती सेवेतील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात सदैव पाठिंबा देऊ शकले.
कोणत्याही कुटुंबासोबत बायबल अभ्यास सुरू केल्यावर, त्या कुटुंबातल्या मुलांना काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाव्यात म्हणून बाबा आम्हा मुलांना त्यांच्याकडे घेऊन जायचे. तिथं ते आम्हाला बायबल उघडून काही वचनं वाचून दाखवायला सांगायचे आणि काही सोपे प्रश्न विचारायचे. त्यामुळे त्या लहान मुलांपैकी बरीच आजपर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत. आणि अर्थातच आम्हालाही देवावर प्रेम करत राहण्याचं प्रोत्साहन मिळालं.
ड्युई ज्युनियर मोठा झाल्यावर त्याला इतक्या कमी जागेत दोन लहान बहिणींसोबत राहणं अडचणीचं वाटू लागलं. त्यामुळं १९४० साली तो वेगळा राहू लागला आणि त्यानं दुसऱ्या एका ब्रदरसोबत पायनियर सेवा सुरू केली. नंतर त्याचं ऑड्री बॅरन हिच्याशी लग्न झालं. ऑड्रीलाही आमच्या आईबाबांकडून बरंच काही शिकायला मिळालं आणि ती त्यांच्यावर खूप प्रेम करू लागली. १९४४ साली ख्रिस्ती तटस्थतेमुळे ड्युई ज्युनियरला तुरुंगात जावं लागलं तेव्हा ऑड्री काही दिवस आमच्या लहानशा ट्रेलरमध्ये येऊन राहिली.
मिसूरी राज्यातल्या सेंट लुई शहरात १९४१ साली झालेल्या मोठ्या अधिवेशनात ब्रदर रुदरफोर्ड यांनी खास पहिल्या ओळीत बसलेल्या ५-१८ वयोगटाच्या मुलामुलींना उद्देशून एक भाषण दिलं होतं. एड्विना आणि मी पण त्यांच्यात होतो. ब्रदर रुदरफोर्ड यांचं अगदी मोकळ्या आवाजात आणि शांत स्वरातलं बोलणं ऐकताना असं भासत होतं जणू कोणी आपल्याच घरात आपल्या लहान मुलांना प्रेमानं काहीतरी समजावून सांगतोय. त्यांनी भाषणात सगळ्या मुलांच्या आईवडिलांना प्रोत्साहन दिलं: “आज ख्रिस्त येशूनं आपल्या करारबद्ध लोकांना आपल्यासमोर एकत्रित केलं आहे आणि तो त्यांना निग्रहपूर्वक सांगतो आहे की आपापल्या मुलांवर नीतिमत्वाच्या मार्गात चालण्याचे संस्कार करा.” मग ते म्हणाले: “त्यांना जास्तीतजास्त घरात राहू द्या आणि त्यांना सत्याचा मार्ग शिकवा!” आमच्या आईबाबांनी हा सल्ला पाळला याचा आम्हाला किती आनंद वाटतो!
त्याच अधिवेशनात आम्हाला जेहोवाज सर्व्हंट्स डिफेन्डेड नावाचं नवं बुकलेट देण्यात आलं; यात अशा काही कोर्ट केसेसविषयी माहिती होती ज्यांचा निकाल यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूनं लागला होता. त्यांपैकी काही तर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातही लढवण्यात आल्या होत्या. बाबांनी आमच्या सर्वांसोबत बसून त्या बुकलेटचा अभ्यास घेतला. त्या अभ्यासामुळे, अवघ्या काही आठवड्यांनंतर ॲलबामातल्या सेल्मा शहरात घडलेल्या त्या घटनेसाठी एका अर्थानं आमची मानसिक तयारीच झाली, पण हे आम्हाला तेव्हा लक्षात आलं नाही.
सेल्मा येथे आमच्यावर हल्ला
तो भीतीदायक अनुभव आम्हाला आला, त्या दिवशी सकाळी बाबांनी शेरिफ, महापौर आणि पोलीस महानिरिक्षक यांना प्रत्येकी एकेक पत्र नेऊन दिलं होतं; या पत्रात आम्हाला प्रचार सेवा करण्याचा कायदेशीर अधिकार असून आम्ही कायद्याच्या संरक्षणात आहोत असं स्पष्ट करण्यात आलं होतं. पण त्यांनी मात्र आम्हाला गावाबाहेर घालवण्याचं ठरवलं.
दुपारी पाच शस्त्रधारी माणसं आमच्या ट्रेलरजवळ आली आणि आईला, माझ्या बहिणीला आणि मला त्यांनी ताब्यात घेतलं. मग ते आतल्या सगळ्या सामानाची फेकाफेक करू लागले; काहीतरी बेकायदेशीर वस्तू आमच्याजवळ सापडेल असा त्यांचा ग्रह असावा. बाबा बाहेरच होते, त्यांना त्यांनी ट्रेलर कारला जोडायला सांगितलं. ती माणसं बंदुका घेऊन बाबांच्या मागे मागे चालत होती. एवढं होऊनही मला भीती वाटत नव्हती. आमच्यासारख्या लोकांवर हे लोक का उगंच संशय घेताहेत या विचारानं मला आणि माझ्या बहिणीला तर अक्षरशः हसू येत होतं. पण बाबांनी आमच्याकडे रागानं पाहताच आम्ही दोघीही गप्प बसलो.
आम्ही जायला निघालो तेव्हा ती माणसं एड्विना आणि मला त्यांच्या कारमध्ये बसण्याची जबरदस्ती करू लागले. पण बाबांनी त्यांना ठणकावून सांगितलं “मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला असं करू देणार नाही!” थोडा वाद झाल्यानंतर आम्ही आईबाबांसोबत एका गाडीतून जावं आणि ते लोक त्यांच्या कारमधून आमच्या पाठोपाठ येतील असं ठरलं. गावाबाहेर पंचवीसएक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी आम्हाला रस्त्याच्या एका बाजूला गाडी थांबवायला सांगितली आणि आई-बाबांना आपल्याबरोबर घेऊन गेले. मग ती माणसं एकेक करून आईबाबांची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागली: “आपल्या फार्मवर जाऊन राहा आणि मुलींना चांगलं वळण लावा. त्या तुमच्या धर्मात काही ठेवलेलं नाही!” बाबांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही.
शेवटी एक माणूस म्हणाला: “ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. पण पुन्हा कधी डॅलस काउंटीत दिसलात तर एकालाही जिवंत सोडणार नाही!”
निदान आमची एकमेकांपासून ताटातूट झाली नाही याचंच समाधान मानून, आम्ही बरेच तास प्रवास करून रात्री एका ठिकाणी मुक्कामासाठी थांबलो. त्या लोकांच्या गाडीचा नंबर आम्ही लिहून घेतला होता, त्यामुळं बाबांनी लगेच वॉचटावर सोसायटीला सगळा किस्सा कळवला आणि काही महिन्यांनंतर पोलिसांनी त्या माणसांना हुडकून काढलं आणि त्यांना अटक केली.
गिलियड मिशनरी स्कूल
एड्विनाला १९४६ साली साऊथ लँसिंग, न्यूयॉर्क इथं वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या ७ व्या क्लाससाठी बोलावण्यात आलं. गिलियड स्कूलमध्ये शिकवणाऱ्या ॲलबर्ट श्रोडर यांनी बिल एल्रॉड यांच्याजवळ (पूर्वी ते दोघे एकत्र पायनियरिंग करत होते) एड्विनाच्या चांगल्या गुणांची प्रशंसा केली. बिल तेव्हा ब्रूकलिन न्यूयॉर्क इथं यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात, अर्थात बेथेलमध्ये काम करत होते.a एड्विना आणि बिल यांची ओळख झाली आणि एड्विनाला गिलियडची पदवी मिळाल्यानंतर जवळपास एका वर्षानंतर त्यांचं लग्न झालं. त्या दोघांनी बरीच वर्षं पूर्ण वेळेची सेवा केली. पाच वर्षं त्यांनी बेथेलमध्ये देखील सेवा केली. मग १९५९ साली गिलियडच्या ३४ वा क्लासला एके दिवशी ब्रदर श्रोडर यांनी एक गोड बातमी दिली; त्यांचा लाडका दोस्त बिल आता जुळ्या मुलांचा (एक मुलगा आणि एक मुलगी) पिता बनला होता.
आईबाबांबरोबर मेरिडियन मिसिसिप्पी इथं सेवा करत असताना १९४७ सालाच्या शेवटी शेवटी आम्हा तिघांनाही गिलियडच्या ११ व्या क्लासला येण्याचं आमंत्रण आलं. आम्हाला विश्वासच बसेना, कारण नियमाप्रमाणे गिलियड क्लासला उपस्थित राहण्याकरता मी अजून वयानं लहान होते, शिवाय, आईबाबांचं वय होऊन गेलं होतं. पण आम्हाला ही खास सवलत देण्यात आली, आणि अशारितीनं आम्हाला बायबल शिक्षणाच्या या व्यापक अभ्यासक्रमाचा फायदा करून घेण्याची बहुमोल संधी अनपेक्षितपणे मिळाली.
आईबाबांसोबत मिशनरी सेवा
आम्हाला कोलंबिया, दक्षिण अमेरिका इथं नेमण्यात आलं. पण गिलियडची पदवी मिळाल्याच्या एक वर्षानंतरच, म्हणजे १९४९ सालाच्या डिसेंबर महिन्यात आम्ही इथं येऊ शकलो. बोगोटा इथं आल्यावर आम्ही एका मिशनरी होममध्ये राहू लागलो; तीन जणं इथं आधीपासूनच राहात होती. सुरवातीला बाबांना स्पॅनिश शिकणं इतकं कठीण गेलं की त्यापेक्षा लोकांना इंग्लिश शिकवलं तर बरं होईल असं त्यांना वाटू लागलं! ही एकच नव्हे, अशा कितीतरी समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलं, पण त्या बदल्यात आम्हाला इतके आशीर्वाद मिळाले की त्यांचा हिशोबच नाही! १९४९ साली कोलंबियात एकूण शंभर साक्षीदारही नव्हते, पण आज १,००,००० पेक्षाही जास्त आहेत!
बोगोटा इथं पाच वर्षं सेवा केल्यानंतर आई आणि बाबांना कॅली शहरात पाठवण्यात आलं. दरम्यान १९५२ साली कोलंबियातच मिशनरी सेवा करणारे रॉबर्ट ट्रेसी यांच्याशी माझं लग्न झालं.b आम्ही १९८२ सालापर्यंत कोलंबियातच राहिलो, मग आम्हाला मेक्सिको इथं नेमण्यात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही मेक्सिकोतच सेवा करत आहोत. १९६८ साली आईबाबांना आजारपणामुळं अमेरिकेला परत जावं लागलं. उपचार घेऊन बरे झाल्यावर ते दोघं मोबाईल, ॲलबामा इथं स्पेशल पायनियर म्हणून सेवा करू लागले.
आईबाबांची काळजी
वय वाढत गेलं तसतसे आईबाबा थकत गेले; त्यांना आधाराची, मदतीची गरज भासू लागली. त्यामुळे त्यांना एड्विना आणि बिल यांना जवळ पडेल अशा ठिकाणी म्हणजे अथेन्स, ॲलबामा इथं नेमण्यात आलं; त्यांनी तशी खास विनंती केली होती. नंतर आमचा भाऊ, ड्युई ज्युनियर यानं असं सुचवलं, की त्या सर्वांनी साऊथ कॅरोलायनाला यावं म्हणजे सबंध कुटुंब जवळ राहील. त्यामुळं मग बिल आपल्या कुटुंबासोबत, आईबाबांना घेऊन ग्रीनवुड इथं राहायला आले. सर्वांनी असं सहकार्य केल्यामुळं रॉबर्टला आणि मला कोलंबियामध्ये आमची मिशनरी सेवा सोडून यावं लागलं नाही. आईबाबांची चांगली काळजी घेतली जात असल्यामुळं आम्ही निश्चिंत होतो.
मग, १९८५ साली बाबांना अर्धांगवायू झाला, त्यांना बोलता येईनासे झाले आणि ते अंथरुणाला खिळले. आईबाबांची चांगली काळजी घेण्यासाठी काय व्यवस्था करता येईल हे ठरवण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली. मग असं ठरलं, की ऑड्री बाबांची काळजी घेईल आणि रॉबर्ट आणि मी जमेल तेव्हा त्यांना येऊन भेटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दर आठवडी चांगले अनुभव लिहून पाठवू.
बाबांची आणि माझी शेवटची भेट मला अजूनही आठवते. त्यांना नीट बोलता येत नव्हतं. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला मेक्सिकोला परत जावं लागेल, तेव्हा ते आवंढा गिळून मोठ्या मुश्किलीनं एकच शब्द बोलले, “आदियोस!” आमची मिशनरी सेवा सुरू ठेवण्याच्या आमच्या निर्णयाला आपली मनापासून संमती असल्याचं जणू ते आम्हाला सांगत होते. १९८७ साली जुलै महिन्यात बाबा गेले आणि नऊ महिन्यांनी आईपण मरण पावली.
माझ्या बहिणीनं (तिच्या पतीचाही मृत्यू झाला) मला मागे एक पत्र लिहिलं होतं. त्यात आम्हा सगळ्यांना आमच्या आईबाबांबद्दल असलेल्या भावना तिनं अगदी अचूक शब्दांत व्यक्त केल्या. ती म्हणते: “आईबाबांनी ख्रिस्ती संस्कारांच्या रूपात जी संपत्ती आपल्याला दिली आहे ती मला कशाहीपेक्षा जास्त मौल्यवान वाटते. त्या दोघांनी आपल्याला लहानपणापासून जे शिकवलं, ज्या पद्धतीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करायचं होतं, असं मला कधी क्षणभरही वाटत नाही. त्यांचा दृढ विश्वास, त्यांचा स्वार्थत्याग, आणि यहोवावरचा त्यांचा संपूर्ण भरवसा मला कितीतरी वेळा जीवनातल्या समस्यांना तोंड देताना प्रेरणादायक ठरला आहे.” शेवटी एड्विनानं लिहिलं, “प्रेमळ देव यहोवा याच्याच सेवेला आपण जीवनात प्राधान्य दिलं तर आपण किती आनंदी राहू शकतो हे आईबाबांनी शब्दांतूनच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला शिकवलं. असे आईवडील दिल्याबद्दल मी यहोवा देवाचे उपकार मानते.”
[तळटीपा]
a टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) मार्च १, १९८८ अंकातील पृष्ठ ११-१२ पाहा.
b टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) मार्च १५, १९६० अंकातील पृष्ठ १८९-९१ पाहा.
[२२, २३ पानांवरील चित्रं]
फाउंटन कुटंब: (डावीकडून) ड्युई, एड्विना, विनी, एलिझाबेथ, ड्युई ज्युनियर; उजवीकडे: हेन्शल यांच्या साउंड ट्रकवर बसलेले एलिझाबेथ आणि ड्युई ज्युनियर (१९३७); खाली उजवीकडे: १६ वर्षांची एलिझाबेथ प्लेकार्ड घालून