स्वातंत्र्यांचे संरक्षण—कसे?
इंडोनेशियाच्या रेंगसडेंगक्लॉक या लहान गावात, विविध जातीय गट कित्येक वर्षे शांतीने एकत्र राहत होते. पण जानेवारी ३०, १९९७ रोजी तिथला वरपांगी सहिष्णुवाद संपुष्टात आला. एका धार्मिक सणाच्या दिवशी भल्या पहाटे तीन वाजण्याआधी एक आस्तिक ढोल वाजवू लागला तेव्हा अचानक मारामारी सुरू झाली. ढोलाच्या आवाजाचा त्रास होत असल्यामुळे दुसऱ्या धर्माच्या एका माणसाने आपल्या त्या शेजाऱ्याला शिव्या दिल्या. त्यावरून बाचाबाची सुरू होऊन ती इतक्या विकोपास गेली की दगडफेक सुरू झाली. दिवस उजाडला. इतरजणही त्या भांडणात सामील झाले. दंगल अधिकच वाढली. संध्याकाळपर्यंत दोन बौद्ध मंदिरांची आणि ख्रिस्ती धर्मजगताच्या चार चर्चेसची मोडतोड करण्यात आली होती. या घटनेचे वृत्त देताना इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून वृत्तपत्रात असा मथळा होता “असहिष्णुतेच्या ठिणगीने जातीय दंगलीची आग पेटवली.”
अनेक देशांमध्ये, ज्या अल्पसंख्यांक जातींच्या हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, त्यांच्याप्रती बहुधा असहिष्णुता दाखवली जाते. फक्त कायद्यानुसार स्वातंत्र्याची हमी दिल्याने असहिष्णुतेचे मूळ कारण नाहीसे केले जात नाही. वरवर पाहता दिसून येत नाही याचा अर्थ असहिष्णुता अस्तित्वातच नाही असा नाही. पुढे परिस्थितींमध्ये बदल झाला आणि भेदभावाचे वातावरण पसरले तर ही सुप्त असहिष्णुता लगेचच डोके वर काढू शकते. लोकांचा प्रत्यक्षात छळ होत नसला, तरी त्यांच्याबद्दल वैमनस्य बाळगले जात असेल किंवा त्यांच्या कल्पनांवर दडपण आणले जात असेल. हे कसे टाळता येते?
असहिष्णुतेचे मूळ कारण शोधणे
काहीतरी वेगळे वाटले किंवा असामान्य वाटले, विशेषतः आपल्या मतांपेक्षा काहीतरी भिन्न असले की नकार दर्शवणे किंवा शंका करणे हा आपला स्वभाव असतो. याचा अर्थ सहिष्णुता अशक्य कोटीतली गोष्ट आहे का? सर्व प्रकारच्या असहिष्णुतेचा आणि धर्म किंवा विश्वासाच्या आधारावर करण्यात आलेल्या भेदभावाचा नायनाट (इंग्रजी) या युएनच्या प्रकाशनात असे म्हटले आहे की, “असहिष्णुता आणि धर्म किंवा विश्वासाच्या बाबतीत भेदभाव यांची सर्वात महत्त्वाची मूळ कारणे” म्हणजे अज्ञान आणि तोटकी माहिती. तथापि, असहिष्णुतेचे मूळ कारण अज्ञान याविरुद्ध लढा देता येतो. तो कसा? योग्य प्रमाणात शिक्षण प्राप्त करून. “भेदभाव आणि असहिष्णुतेला लढा देण्यासाठी शिक्षण हा प्रमुख मार्ग असू शकतो,” असे मानवी हक्कांच्या युएन मंडळाचे अहवाल सांगतो.
या शिक्षणाचे ध्येय काय असले पाहिजे? युनेस्को कुरियर ही पत्रिका सुचवते की, धार्मिक चळवळींबद्दल मनात तिरस्कार बाळगण्याऐवजी, “भीती निर्माण करणाऱ्या आणि इतरांचा बहिष्कार करायला लावणाऱ्या प्रभावांचा सामना करण्यास आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची, सारासार विचार, आणि साधक बाधक कारणमीमांसा करण्याची क्षमता विकसित करण्यास तरुणांची मदत करणे हे सहिष्णुतेच्या शिक्षणाचे ध्येय असावे.”
स्पष्टतः, “सारासार विचार आणि साधक बाधक कारणमीमांसा” करायला प्रोत्साहन देण्यामध्ये प्रसारमाध्यम महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. अनेक आंतरराष्ट्रीय संघटना हे ओळखून आहेत की, प्रसारमाध्यम लोकांचे विचार बदलण्यास आणि लोकांमध्ये परस्पर सामंजस्य निर्माण करण्यास उत्तेजन देते. परंतु, प्रसारमाध्यमाने सहिष्णुतेची भावना निर्माण करायची असेल—काही प्रसारमाध्यमांसारखे असहिष्णुतेची भावना निर्माण करण्याऐवजी—तर विश्वसनीय, वस्तुनिष्ठ बातम्या देण्याची गरज आहे. काही वेळा, पत्रकारांना सर्वसामान्य स्वीकृत मताच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल. त्यांनी वस्तुनिष्ठ परीक्षण आणि अपक्षपाती निरीक्षण केले पाहिजे. पण तेवढेच पुरेसे आहे का?
असहिष्णुतेला लढा देण्याचा सर्वोत्तम मार्ग
सहिष्णुता म्हणजे सर्वांचे आचारविचार एकच असावेत असे नाही. लोकांना कदाचित एकमेकांचे मत पटणार नाही. काहींचा असा ठाम विश्वास असेल की, दुसऱ्या व्यक्तीचे विश्वास पूर्णतः चुकीचे आहेत. त्याविषयी ते कदाचित जाहीरपणे बोलूनही दाखवतील. परंतु, भेदभावाची भावना निर्माण करण्यासाठी जोपर्यंत ते खोट्या अफवा पसरवत नाहीत तोपर्यंत हे ठीक आहे; त्याला असहिष्णुता म्हणता येणार नाही. असहिष्णुता तेव्हा प्रदर्शित होत असते जेव्हा एखाद्या गटाचा छळ केला जातो, खास कायद्यांद्वारे त्यांना धारेवर धरले जाते, वाळीत टाकले जाते, त्यांच्यावर बंदी आणली जाते किंवा आणखी इतर मार्गाने त्यांना आपला धर्म पाळण्यात बाधा आणली जाते. असहिष्णुता टोकाला जाते तेव्हा काहीजण हत्या करतात आणि इतरांना आपल्या विश्वासांसाठी प्राण द्यावा लागतो.
असहिष्णुतेविरुद्ध लढा कसा दिला जाऊ शकतो? जाहीरपणे ती उघडकीस आणता येऊ शकते, जशी प्रेषित पेत्राने आपल्या काळातल्या धार्मिक नेत्यांची असहिष्णुता उघडकीस आणली. (प्रेषितांची कृत्ये २४:१०-१३) पण शक्य असेल तेव्हा असहिष्णुतेला लढा देण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्यासाठी कार्य करणे—सहिष्णुतेचा पुरस्कार करणे म्हणजेच लोकांना इतरांची बाजू समजून घेण्यास शिकवणे. आधी संदर्भ दिलेल्या असहिष्णुतेला काढून टाकण्यासंबंधीच्या युएन अहवालात असे म्हटले आहे: “धर्म किंवा विश्वासासंबंधीच्या सर्व प्रकारच्या असहिष्णुतेचा आणि भेदभावाचा उगम मानवाच्या मनात असल्यामुळे सर्वात आधी या मानवी मनाला ठीक करण्याचे पाऊल उचलले पाहिजे.” अशा शिक्षणाने लोकांना आपल्या विश्वासांचे परीक्षण करायलाही प्रेरणा मिळेल.
संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेचे डायरेक्टर जनरल, फेडेरिको मेयर यांनी लिहिले: “सहिष्णुता हा ठाम मताच्या व्यक्तीचा सद्गुण आहे.” रेफॉर्म या पत्रिकेत डोमिनिकन पाळक, क्लॉड जेफ्रे यांनी म्हटले: “खरी सहिष्णुता ठाम विश्वासावर आधारलेली असते.” जी व्यक्ती स्वतःच्या विश्वासांतच समाधानी आहे तिला सहसा इतरांच्या विश्वासांचा धोका वाटणार नाही.
वेगवेगळ्या विश्वासांच्या लोकांशी बोलणे हा सहिष्णुतेला प्रोत्साहन देणारा सर्वोत्तम मार्ग यहोवाच्या साक्षीदारांना आढळला आहे. साक्षीदार, “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल,” ही येशूची भविष्यवाणी गंभीरपणे घेतात आणि म्हणून ते जाहीर सुर्वातिकाच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. (मत्तय २४:१४) या कार्यात त्यांना विविध धर्माच्या लोकांचे—त्याचप्रमाणे नास्तिकांचे—विश्वास जाणून घेण्याची संधी मिळते. तसेच, कोणी इच्छुक असेल तर साक्षीदार स्वतःचे काय विश्वास आहेत हे सांगण्यासही तयार असतात. अशाप्रकारे, ज्ञान आणि समज वाढवायला ते प्रोत्साहन देतात. असे ज्ञान आणि समज असल्याने सहिष्णुतेची भावना वाढायला सोपी जाते.
सहिष्णुता आणि त्या पलीकडे
अनेकांचे सद्हेतू असूनही आणि पुष्कळांनी एकोप्याने प्रयत्न करूनही धार्मिक असहिष्णुता ही आजही एक समस्या आहे. खरा बदल येण्यासाठी यापेक्षाही काही करणे आवश्यक आहे. ल माँड द देबा या फ्रेंच वृत्तपत्राने समस्येवर भर देत म्हटले: “आधुनिक समाजात भावनिक आणि आध्यात्मिक पोकळी निर्माण झाली आहे. धार्मिक स्वातंत्र्याला जे लोक धोका निर्माण करतात त्यांच्यापासून कायदा संरक्षणाची हमी देऊ शकतो. कारण नसताना भेदभाव न करता धार्मिक स्वातंत्र्य, कायद्यासमोर समान असण्याची हमी देऊ शकते आणि ती द्यायला हवी.” डेमॉक्रसी ॲण्ड टॉलरन्स हे पुस्तक कबूल करते: “सबंध जगभरात, परस्परांना समजून घेण्याचे आणि एकमेकांचा आदर करण्याचे वातावरण निर्माण करण्याचे ध्येय गाठायला आपल्याला बराच अवकाश आहे.”
बायबल असे वचन देते की लवकरच मानवजातीला एकाच खऱ्या देवाच्या शुद्ध उपासनेत एकत्र केले जाईल. या एकतेमुळे खरा जागतिक समाज किंवा बंधुत्व तयार होईल जेथे एकमेकांबद्दल आदरभाव दाखवला जाईल. मानवांमध्ये अज्ञान राहणार नाही कारण देवाचे राज्य लोकांना यहोवाचे मार्ग शिकवील आणि अशा तऱ्हेने त्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या जातील. (यशया ११:९; ३०:२१; ५४:१३) या पृथ्वीवर खरी समानता आणि स्वातंत्र्य पाहायला मिळेल. (२ करिंथकर ३:१७) मानवजातीसाठी देवाचे काय उद्देश आहेत यांची अचूक समज प्राप्त करून तुम्ही अज्ञान आणि असहिष्णुतेचा सामना करू शकता.
[११ पानांवरील चौकट/चित्र]
धर्म धोक्यात
अलीकडील वर्षांमध्ये, फ्रान्स येथे यहोवाच्या साक्षीदारांना इतर धर्मांप्रमाणे समान हक्क न देता अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडेच, या साक्षीदारांच्या धार्मिक कार्यांसाठी मिळालेल्या देणग्यांवर जबरदस्त कर बसवण्यात आला. फ्रान्समधील २,००,००० ख्रिश्चनांच्या आणि समर्थकांच्या या गटाला निकामी करण्याच्या हेतूने तेथील अधिकाऱ्यांनी ५०० लाख डॉलरचा कर (कर आणि दंड) बसवून अन्याय केला आहे. हा धडधडीत धार्मिक भेदभाव असून स्वातंत्र्य, बंधुत्व आणि समानतेच्या सर्व तत्त्वांच्या विरुद्ध आहे.
[१० पानांवरील चित्र]
असहिष्णुतेमुळे सहसा हिंसा घडते
[१२ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांचे धार्मिक कार्य चालत असतानाही, फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मते त्यांचा हा धर्म नाही!