धार्मिक स्वातंत्र्य—आशीर्वाद की शाप?
ख्रिस्ती धर्मजगतात, धार्मिक स्वातंत्र्याच्या कल्पनेचा जन्म अतिशय यातनामय वेणा सोसून झाला होता. तो म्हणजे स्वमताग्रह, पूर्वग्रह आणि असहिष्णुतेविरुद्धचा एक संघर्षच होता. त्यासाठी, रक्तरंजित धार्मिक युद्धांमध्ये असंख्य लोकांना प्राणार्पणे करावी लागली. या दुःखद इतिहासातून आपल्याला काय धडे मिळतात?
“ख्रिस्ती इतिहासात लोकांना नेहमी छळ सहन करावा लागला आहे,” असे रॉबिन लेन फॉक्स, पेगन्स ॲण्ड ख्रिश्चन्स या आपल्या पुस्तकात लिहितात. प्रारंभिक ख्रिश्चनांना पंथ मानले जात आणि सामाजिक सुव्यवस्थेला त्यांचा धोका आहे असा त्यांच्यावर दोषारोप करण्यात आला होता. (प्रेषितांची कृत्ये १६:२०, २१; २४:५, १४; २८:२२) त्याचा परिणाम म्हणून, काहींना छळ सोसावा लागला आणि रोमन आखाड्यांमध्ये जंगली पशुंसमोर टाकून त्यांना ठार मारण्यात आले. असा हा कडा विरोध असतानाही, तत्त्ववेत्या टर्टुलियनसारख्या (पृष्ठ ८ वरील चित्र पाहा) काहींनी धार्मिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून विनंती केली. सा.यु. २१२ मध्ये त्याने लिहिले: “प्रत्येक माणसाला आपापल्या विश्वासांनुसार उपासना करता यावी हा मूलभूत मानवी हक्क आहे, मानवी स्वभावाचा विशेष अधिकारच आहे.”
सा.यु. ३१३ साली, कॉन्स्टंटाईनच्या शासनाखाली मिलानचे आज्ञापत्र काढल्यावर रोमी लोकांकडून ख्रिश्चनांचा होणारा छळ थांबवण्यात आला; या आज्ञापत्रामुळे ख्रिश्चनांना आणि गैरख्रिस्ती धर्मांना धार्मिक स्वातंत्र्याचे समान हक्क मिळाले. रोमी साम्राज्यात “ख्रिस्ती धर्म” कायदेशीर करण्यात आल्यावर स्थिती एकदम बदलली. परंतु, सा.यु. ३४० च्या सुमारास एका तथाकथित ख्रिस्ती लेखकाने गैरख्रिस्ती लोकांचा छळ केला जावा असे म्हटले. शेवटी, सा.यु. ३९२ साली, कॉन्स्टँटिनोपलचे आज्ञापत्र काढल्यावर सम्राट थिओडोशियस पहिले यांनी आपल्या साम्राज्यात गैरख्रिस्ती धर्मांवर बंदी घातली आणि अशाप्रकारे धार्मिक स्वातंत्र्याला अकाली मृत्यू आला. रोमन “ख्रिस्ती धर्म” हा राष्ट्रीय धर्म झाल्यावर, चर्च आणि शासनाने मिळून छळाची मोहीमच हाती घेतली जी शतकानुशतके चालत राहिली आणि ही मोहीम कळसाला पोचली ती ११ व्या ते १३ व्या शतकांतल्या रक्तरंजित धार्मिक लढायांनी व १२ व्या शतकात सुरू झालेल्या धर्मसभांच्या क्रूरतेने. रूढ झालेल्या विश्वासांवर किंवा स्थापित धार्मिक विश्वासांच्या मक्तेदारीवर कोणी संशय करण्याचे धाडस केले तर त्यांना पाखंडी ठरवून हुडकून काढले जाई आणि त्यांचा छळ केला जाई. या सर्वाला काय कारणीभूत होते?
धार्मिक एकता राष्ट्राचा सर्वात मजबूत पाया असतो आणि वेगवेगळ्या धर्मांमुळे सामाजिक सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असतो या सबबी देऊन धार्मिक असहिष्णुता चालू दिली जात होती. १६०२ साली, इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथच्या एका मंत्र्याने असा वाद घातला: “एका राष्ट्रात दोन भिन्न धर्मांना सहिष्णुता दाखवली जाते तेव्हा राष्ट्राला कधीच सुरक्षा नसते.” पण वास्तविकतेत, भिन्न धार्मिक मताच्या लोकांचा राष्ट्राला किंवा स्थापित धर्माला खरोखर धोका आहे की नाही हे शोधून काढण्यापेक्षा त्यांच्यावर बंदी आणणे हीच सर्वात सोपी गोष्ट होती. द कॅथोलिक एन्सायक्लोपिडिया म्हणते: “लौकिक अधिकाऱ्यांनी आणि चर्चच्या अधिकाऱ्यांनीही धोकेदायक पाखंडी आणि निरुपद्रवी पाखंडी यांच्यातला जराही फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.” परंतु, ही स्थिती बदलणार होती.
सहिष्णुतेचा वेदनामय जन्म
युरोपमध्ये झालेला बदल प्रोटेस्टंटवादामुळे निर्माण झालेल्या खळबळीचा परिणाम होता; ही एका पंथाची चळवळ होती आणि ती काही केल्या संपेना. बघता बघता, प्रोटेस्टंट धर्मसुधारणेच्या चळवळीने धर्माच्या आधारावर युरोपला विभाजित केले आणि विवेकानुसार वागण्याच्या स्वातंत्र्याची कल्पना लक्षात आणून दिली. उदाहरणार्थ, सुप्रसिद्ध धर्म सुधारक मार्टिन ल्युथर याने १५२१ मध्ये आपण घेतलेल्या भूमिकेचे कारण देत असे म्हटले: “माझा विवेक देवाच्या वचनाचा गुलाम आहे.” या विभाजनामुळे तीस वर्षांचे युद्ध (१६१८-४८) ही क्रूर धार्मिक युद्धांची एक श्रृंखलाच सुरू होऊन तिने सबंध युरोपला ग्रासून टाकले.
परंतु, युद्ध सुरू असताना मात्र पुष्कळांच्या हे लक्षात आले की लढायांनी प्रगती होणार नाही. तेव्हा एका मागोमाग एक आज्ञापत्रे काढण्यात येऊ लागली; फ्रान्समध्ये काढलेले नॅन्टसचे आज्ञापत्र (१५९८) युद्धग्रस्त युरोपमध्ये शांती प्रस्थापित करण्याचा व्यर्थ प्रयत्न कसा ठरला याचे एक उदाहरण आहे. या आज्ञापत्रांवरूनच सहिष्णुतेची ही आधुनिक धारणा हळूहळू निर्माण झाली. सुरवातीला, “सहिष्णुता” हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरला जात. “काही परिस्थितींमुळे आपल्याला या पंथांना सहिष्णुता दाखवावी लागली . . . तर, ते पाप आहे—गंभीर पाप—यात शंका नाही, पण निदान युद्धाइतके घोर नाही,” असे सुप्रसिद्ध मानवतावादी इरॅसमस यांनी १५३० मध्ये लिहिले. या नकारात्मक अर्थामुळेच, पॉल द फ्वा या फ्रान्सवासीयाप्रमाणे काहीजणांना १५६१ साली ‘सहिष्णुतेविषयी’ बोलण्याऐवजी ‘धार्मिक स्वातंत्र्याविषयी’ बोलणे जास्त आवडत होते.
परंतु, कालांतराने सहिष्णुतेला कमी गांभिर्याचे पाप नव्हे तर स्वातंत्र्याचे रक्षक मानले जाऊ लागले. ही कमकुवतपणाची कबुली नव्हे, तर संरक्षणाची हमी होती. वेगवेगळे विश्वास आणि भिन्न विचारपद्धतीचा हक्क जेव्हा आधुनिक समाजाचा मूलाधार मानला जाऊ लागला तेव्हा धर्मवेडेपणाला पळ काढावाच लागला.
अठराव्या शतकाच्या शेवटी, स्वातंत्र्य आणि समानता यांच्याशी सहिष्णुता जोडण्यात येऊ लागली. हे विचार मग नियम आणि घोषणांच्या स्वरूपात व्यक्त होऊ लागले; फ्रान्समधील सुप्रसिद्ध मानव आणि नागरिकाच्या हक्कांची घोषणा (१७८९) किंवा अमेरिकेतले हक्कांचे पत्र (१७९१) ही त्याची उदाहरणे. एकोणीसाव्या शतकापासून या पत्रकांचा स्वतंत्र विचारपद्धतीवर प्रभाव पडू लागला तसे, सहिष्णुता आणि त्यामुळे मिळणारे स्वातंत्र्य शाप नसून आशीर्वाद आहेत असे लोक मानू लागले.
मर्यादित स्वातंत्र्य
स्वातंत्र्य हे जितके मूल्यवान तितकेच मर्यादित असते. सर्वांना मिळणाऱ्या अधिक स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्र असे काही नियम बनवतात की ज्यांमुळे व्यक्तिगत स्वातंत्र्याला आळा बसतो. पुढे दिलेले विषय स्वातंत्र्याशी संबंधित असून सध्या अनेक युरोपियन राष्ट्रांमध्ये त्यांच्यावर वाद होत आहे: खासगी जीवनावर सरकारी नियमांचे कितपत नियंत्रण असावे? ते किती प्रभावकारी आहे? स्वातंत्र्यावर त्याचा काय परिणाम होतो?
जनतेच्या आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा वादविषय प्रसारमाध्यमांतून समोर आणला गेला आहे. काही धार्मिक गटांवर मती भ्रष्ट करण्याचा, पैसा उकळण्याचा, लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यांचा आरोप करण्यात आला आहे आणि पुष्कळदा या आरोपांसाठी ठोस पुरावा नसतो. अल्पसंख्यांक धार्मिक गटांवर प्रेसने पुष्कळ लेख छापले आहेत. “पंथ” असे हिणवणारे नाव तर सर्रास वापरले जाते. जनतेकडून दबाव आल्यामुळे, सरकारांनी तर तथाकथित धोकेदायक पंथांची यादी देखील तयार केली.
फ्रान्सला, सहिष्णुतेची परंपरा आणि धर्म व सरकार वेगळे असण्याचा गर्व आहे. ते “स्वतंत्रता, समानता, बंधुत्व” यांचा देश असल्याचे गर्वाने सांगते. तथापि, फ्रिडम ऑफ रिलिजन ॲण्ड बिलिफ—अ वर्ल्ड रिपोर्ट या पुस्तकानुसार, त्या देशात “नवीन धार्मिक चळवळींचा विरोध करण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी एक शैक्षणिक मोहीम” सुचवण्यात आली आहे. परंतु, अनेकांना असे वाटते की, यामुळे धार्मिक स्वातंत्र्याला धोका निर्माण होऊ शकतो. तो कसा?
धार्मिक स्वातंत्र्यांना धोके
कायदेकानून पाळणाऱ्या आणि त्यांचा आदर करणाऱ्या सर्व धार्मिक गटांना ज्यावेळी राष्ट्र समानतेने वागवते तेव्हा खरे धार्मिक स्वातंत्र्य असू शकते. परंतु, कोणते धार्मिक गट धर्म नाहीत हे सरकार आपली मनमानी करून ठरवते तेव्हा हे शक्य होत नाही कारण त्यामुळे सरकारकडून धर्मांना मिळणारे फायदे त्यांना मिळत नाहीत. “वाहनचालकांना परवाना दिला जातो त्याप्रमाणे एखादे राज्य धर्मांना मान्यता देण्याचा हक्क स्वतःचा असल्याचे गृहीत धरते तेव्हा धार्मिक स्वातंत्र्याची पूज्य कल्पना पोकळ वाटू लागते,” असे १९९७ साली टाईम पत्रिकेने निरीक्षण केले. अलीकडेच एका फ्रेंच अपील कोर्टाने असे घोषित केले की, याचा परिणाम “जाणून किंवा अजाणतेत जुलूमशाहीत होतो.”
प्रसारमाध्यमावर एकाच गटाची मक्तेदारी असते तेव्हाही मूलभूत स्वातंत्र्यांना धोका असतो. पण खेदाची गोष्टी ही आहे की, अनेक देशांमध्ये असेच घडत आहे. उदाहरणार्थ, धार्मिकरित्या काय अचूक आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात, पंथ-विरोधी संघटनांनी स्वतःला वकिल, न्यायाधीश आणि पंच बनवून प्रसारमाध्यमाद्वारे स्वतःचे कलुषित मत जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, ल माँड या फ्रेंच वृत्तपत्राने म्हटल्याप्रमाणे, या संघटना काहीवेळा “धर्मपंथ पाडण्याच्या ज्या वृत्तीविरुद्ध लढा देत आहेत तीच वृत्ती स्वतः दाखवतात आणि त्यामुळे ‘विरोधी मत असलेल्यांचा छळ करण्याचे वातावरण’ निर्माण होण्याची भीती असते.” वृत्तपत्राने असा प्रश्न केला: “अल्पसंख्यांक धार्मिक गटांचे समाजात नाव वाईट केल्याने . . . आवश्यक स्वातंत्र्यांना धोका निर्माण होत नाही का?” झीटश्रीफ्ट फूर रेलिज्योन्ससुखओलोजी (धर्माच्या मानसशास्त्रासाठी पत्रिका) यात मार्टिन क्रील म्हणतात: “किती पंथ आहेत यापेक्षा पंथांचा छळ हीच सर्वात जास्त चिंताजनक गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचे तर: कायद्याचे उल्लंघन न करणाऱ्या नागरिकांना शांतीने जगू द्यावे. धर्म आणि तत्त्वप्रणाली या स्वतंत्र आहेत आणि त्या स्वतंत्र राहू द्याव्यात, जर्मनीतसुद्धा.” यासाठी आपण एक उदाहरण पाहू या.
“सर्वात निष्ठावान नागरिकांना”—धोकेदायक हे नाव
स्पेनच्या सुप्रसिद्ध एबीसी वृत्तपत्रात सांगितल्यानुसार, कॅथोलिक अधिकाऱ्यांच्या मते “सर्व पंथांमध्ये सर्वात धोकेदायक” गट कोणता असावा? तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, एबीसी वृत्तपत्रात यहोवाच्या साक्षीदारांविषयी सांगितले होते. त्यांच्यावर केलेले आरोप अपक्षपाती, वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केले होते का? पुढे दिल्याप्रमाणे, इतर सूत्रांनी काय म्हटले ते पाहा:
“यहोवाचे साक्षीदार लोकांना, प्रामाणिकपणे कर द्यावेत, युद्धांमध्ये किंवा युद्धाच्या तयारीत भाग घेऊ नये, चोरी करू नये असे शिकवतात, सर्वसाधारणपणे ते असे जीवन जगायला शिकवतात ज्यानुसार इतरही जगू लागले तर समाजात मिळूनमिसळून राहण्याचा दर्जा सुधारेल.”—सर्जिओ ॲल्बेसानो, टॅलेंटो, नोव्हेंबर-डिसेंबर १९९६.
“काही वेळा [यहोवाच्या साक्षीदारांविषयी] बदनामी करणाऱ्या अफवा पसरवल्या जातात, पण मला तरी त्यांचा देशातील संस्थांना काही धोका आहे असे मुळीच वाटत नाही. ते शांती-प्रिय, इमानदार आणि अधिकाऱ्यांना आदर देणारे नागरिक आहेत.”—बेल्जियन लोकसभेतला सदस्य.
“संयुक्त प्रजासत्ताकमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना सर्वात प्रामाणिक लोक म्हणून ओळखले जाते.”—जर्मन वृत्तपत्र झिन्डलफींगर झायटुंग.
“[यहोवाच्या साक्षीदारांना] आदर्श नागरिक म्हणता येईल. ते न चुकता कर देतात, आजारी लोकांची काळजी घेतात आणि निरक्षरता घालवण्याचा प्रयत्न करत आहेत.”—अमेरिकन वृत्तपत्र सान फ्रान्सिसको एक्सॅमिनर.
“स्थिर वैवाहिक संबंध टिकवून ठेवण्यामध्ये इतर धर्माच्या सदस्यांपेक्षा यहोवाचे साक्षीदार जास्त यशस्वी आहेत.”—अमेरिकन एथनोलॉजिस्ट.
“आफ्रिकन देशातल्या नागरिकांमध्ये सर्वात नीतिप्रिय आणि प्रामाणिक लोक म्हणजे यहोवाचे साक्षीदार.”—डॉ. ब्रायन विल्सन, ऑक्सफोर्ड विद्यापीठ.
“कित्येक दशकांपासून विवेकानुसार वागण्याचे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये त्या धर्माच्या लोकांनी पुष्कळ हातभार लावला आहे.”—नॅट हेन्टफ, फ्री स्पीच फॉर मी—बट नॉट फॉर दी.
“त्यांनी . . . आपल्या लोकसत्ताक राज्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींचे संरक्षण करण्यात निश्चितच हातभार लावला आहे.”—प्राध्यापक सी. एस. ब्रेडन, धीज ऑल्सो बिलिव्ह.
लोकांच्या वरील म्हणण्याप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांना जगभरात आदर्श नागरिक म्हणून ओळखले जाते. शिवाय, ते मोफत बायबल शिक्षण देण्याचे कार्य करतात आणि कौटुंबिक मूल्यांचा पुरस्कार करतात म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साक्षरतेच्या वर्गांमुळे कित्येक लाखो लोकांना मदत देण्यात आली आहे, तर त्यांच्या माणुसकीच्या कार्यांमुळे कित्येक दशकांमध्ये हजारो लोकांना मदत झाली आहे, विशेषतः आफ्रिकेत.
वस्तुनिष्ठतेचे महत्त्व
आज निर्दोष लोकांवर टपून बसलेले दुष्ट लोक समाजात भरलेले आहेत. म्हणून, धर्माबद्दल दावे केले जातात तेव्हा सावध असण्याची निश्चितच गरज आहे. पण काही पत्रकार, वस्तुनिष्ठ तज्ज्ञांकडून माहिती मिळवण्याऐवजी, दिवसेंदिवस ज्यांचे सदस्य कमी होत आहेत त्या चर्चेसकडून किंवा ज्यांची वस्तुनिष्ठता शंकास्पद आहे अशा पंथ-विरोधी संघटनांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहतात तेव्हा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन मिळतो का आणि धार्मिक स्वातंत्र्याला ते पोषक ठरते का? उदाहरणार्थ, ज्या वृत्तपत्राने यहोवाच्या साक्षीदारांना “सर्व पंथांमध्ये सर्वात धोकेदायक” असे म्हटले त्या वृत्तपत्राने हे कबूल केले की, त्यांनी छापलेली माहिती “[कॅथोलिक] चर्चच्या अधिकाऱ्यांकडून” मिळाली होती. शिवाय, एका फ्रेंच पत्रिकेत असे निरीक्षण करण्यात आले होते की, तथाकथित पंथांविषयीचे लेख बहुतेककरून पंथ-विरोधी संघटनांकडून असायचे. वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्याची ही सर्वात अपक्षपाती पद्धत आहे असे तुम्हाला वाटते का?
मूलभूत मानवी हक्कांशी संबंधित असलेली आंतरराष्ट्रीय न्यायालये आणि संघटना जसे की युएन असे म्हणतात, “धर्म आणि पंथ यांमधला भेद ओढून ताणून दाखवलेला फरक वाटतो म्हणून तो स्वीकारण्यासारखा नाही.” मग काहीजण “पंथ” हा नकारात्मक शब्द का वापरतात? धार्मिक स्वातंत्र्याला धोका आहे याचा तो आणखी एक पुरावा आहे. मग, या आवश्यक स्वातंत्र्याचे रक्षण कसे करता येईल?
[८ पानांवरील चौकट/चित्रं]
धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थक
युरोपमध्ये १६ व्या शतकात, धर्मिक युद्धांमध्ये झालेल्या कत्तलीतून धार्मिक स्वातंत्र्याच्या स्पष्ट हाका ऐकू येत होत्या. धार्मिक स्वातंत्र्याच्या या चर्चेलाही हे अपील लागू होतात.
सेबॅसटियन शॅटेयॉन (१५१५-६३): “पाखंडी म्हणजे कोण? आपल्या मताशी सहमत नसलेल्या सर्वांना आपण पाखंडी समजतो एवढेच, आणखी काही नाही असे मला तरी वाटते. . . . या शहरात किंवा प्रदेशात तुम्हाला धर्मनिष्ठ समजले जात असेल, तर दुसऱ्या ठिकाणी पाखंडी समजले जाते.” प्रसिद्ध फ्रेंच बायबल अनुवादक आणि सहिष्णुवादाचा आवेशी समर्थक शॅटेयॉन यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या वादविवादात एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवले: एखाद्याला व्यक्तीला पाखंडी कोण ठरवते?
डर्क वॉल्कर्टसन कोमहर्ट (१५२२-९०): “आपण हे वाचलेलेच आहे की, गतकाळात . . . जेरूसलेममध्ये खुद्द येशूने आणि मग युरोपमध्ये कित्येक हुतात्म्यांनी . . . खरे बोलण्यामुळे [समाजात] खळबळ माजवली होती. . . . ‘खळबळ माजवणे’ या शब्दाचा अर्थ अचूकपणे आणि स्पष्टपणे दिला पाहिजे.” कोमहर्ट यांनी असा वाद घातला की, धार्मिक मतभेद आणि समाजातल्या सुव्यवस्थेत खळबळ माजवणे यांना सारखे समजले जाऊ नये. त्यांनी असा प्रश्न विचारला: कायद्याचे तंतोतंत पालन करणारे कायद्याला मानणारे लोक सामाजिक सुव्यवस्थेला खरोखरच धोका आहेत का?
पायर द बेल्वॅ (१५४०-१६११): “विविध धर्म असल्याने राज्यात अव्यवस्था निर्माण होते आणि तिला प्रोत्साहन मिळते असे मानणे म्हणजे अज्ञानी” असण्यासारखे आहे. धर्मयुद्धे चालली होती त्या काळात (१५६२-९८) लिखाण करणारा फ्रेंच वकिल अर्थात बेल्वॅ यांनी असा वाद मांडला की, देशाची एकता ही धार्मिक एकतेवर आधारलेली नाही, अर्थात सरकार धर्मांकडून येणाऱ्या दबावांनी दबले जात असेल तर गोष्ट वेगळी आहे.
टॉमस हेल्वीस (सु. १५५०-सु. १६१६): “[राजाची] प्रजा सर्व मानवी नियमांना आज्ञाधारक आणि विश्वासू असली, तर त्याला त्यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा करत येणार नाही.” इंग्लिश बॅप्टिस्ट्सचा एक संस्थापक असलेल्या हेल्वीस यांनी चर्च आणि राष्ट्र वेगळे असण्याबाबत लिखाण केले; सर्व चर्चेसना आणि पंथांना धार्मिक स्वातंत्र्य द्यावे आणि लोकांवर व संपत्तींवर केवळ नागरी अधिकार गाजवावा असे त्याने राजाला अर्जवले. त्याच्या लिखाणांमध्ये सध्या उपस्थित झालेल्या एका प्रश्नावर जोर दिला होता: राज्याने लोकांच्या आध्यात्मिक जीवनावर कितपत नियंत्रण करावे?
अज्ञात लेखक (१५६४): “विवेकानुसार वागण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मान्य असलेल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य न देता केवळ तिला अमान्य असलेला धर्म न पाळण्याची परवानगी देऊन चालणार नाही.”
[चित्रं]
टर्टुलियन
शॅटेयॉन
द बेल्वॅ
[चित्राचे श्रेय]
सर्व फोटो: © Cliché Bibliothèque Nationale de France, Paris