आज धार्मिक असहिष्णुता
“विचार, विवेक आणि धर्माच्या स्वातंत्र्यावर सर्वांचा हक्क आहे; या हक्कात स्वतःचा धर्म किंवा विश्वास बदलण्याचे स्वातंत्र्य आणि एकट्याने किंवा समूहासोबत आणि सार्वजनिकरित्या किंवा खाजगीत शिक्षण, आचरण, उपासना आणि पालन करण्याद्वारे आपला धर्म किंवा विश्वास प्रकट करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे.” लेख १८, मानवी हक्कांची जागतिक घोषणा, १९४८.
तुमच्या देशात तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे का? जगातले बहुतेक देश या नेक तत्त्वाला वरवरून मान्यता देतात; पुष्कळदा ते तत्त्व आंतरराष्ट्रीय घोषणांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु, असा अंदाज केला जातो की, पुष्कळ देशांमध्ये जेथे असहिष्णुता आणि दुजाभाव कटु वास्तविकता आहेत तेथे कोट्यवधी लोकांना आज धार्मिक स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. दुसऱ्या बाजूला पाहता, पुष्कळ लोक भिन्न देश, जात किंवा धार्मिक समाजात राहतात जेथे कायद्याने स्वातंत्र्याची हमी मिळते आणि त्या देशाच्या संस्कृतीत सहिष्णुता जपली जात आहे असे भासते.
परंतु, अशा या देशांमध्येही काही लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आहे. “धर्म किंवा विश्वासांबद्दलचा मतभेद बहुतेक सर्वच आर्थिक, सामाजिक आणि तात्त्विक व्यवस्थांमध्ये तसेच जगाच्या सर्व भागांमध्ये अस्तित्वात आहे,” असे मानवी हक्कांच्या युएन मंडळाने नियुक्त केलेले भूतपूर्व खास बातमीदार, ऑन्जेलु डॉलमेडा रिबेरो यांनी म्हटले. १९९७ साली प्रकाशित झालेल्या फ्रिडम ऑफ रिलिजन ॲण्ड बिलीफ—अ वर्ल्ड रिपोर्ट या आपल्या पुस्तकात केविन बॉईल आणि जुलिएट शीन हे संपादक म्हणतात: “अल्पसंख्यांक धर्मांचा धार्मिक कारणांवरून छळ [आणि] विश्वासांवर प्रतिबंध आणि व्यापक भेदभाव . . . या सर्व गोष्टी विसाव्या शतकाच्या अंतातल्या दररोजच्या घटना आहेत.”
परंतु, धार्मिक भेदभावाचा परिणाम फक्त अल्पसंख्यांक धर्मांवर होत नाही. धार्मिक असहिष्णुतेविषयी लिहिताना, मानवी हक्कांच्या युएन मंडळाचे खास बातमीदार, प्राध्यापक अब्दुलफत्ताख आमोर असे म्हणाले की, “असा एकही धर्म नाही ज्याचा अनादर होऊ शकत नाही.” तुम्ही राहता तेथे कदाचित काही धर्मांच्या बाबतीत असहिष्णुता आणि भेदभाव सर्रासपणे दाखवला जात असेल.
भेदभावाचे विविध प्रकार
धार्मिक भेदभावाचे अनेक प्रकार असू शकतात. काही देशांमध्ये तर, बाकीच्या सर्व धर्मांवर बंदी आणून एकाच धर्माला अनुमती दिली जाते आणि तो राष्ट्रीय धर्म होतो. इतर देशांमध्ये, काही विशिष्ट धर्मांच्या कार्यावर बंदी आणण्यासाठी कायदे मंजूर केले आहेत. काही देशांमध्ये असे कायदे केले आहेत की ज्यांचा आपापल्या मनाचाच अर्थ लावला जातो. इस्राएलमध्ये, “धर्मांतराचा हेतू असलेली” माहितीपत्रके किंवा साहित्य देशात आणल्यामुळे, छापल्यामुळे, वितरण केल्यामुळे किंवा जवळ बाळगल्यामुळे शिक्षा व्हावी असा कायदा प्रस्तुत केला आहे; त्या कायद्याचा दुरुपयोग करण्याची केवढी शक्यता आहे तेच पाहा. म्हणूनच, इंटरनॅशनल हेराल्ड ट्रिब्यून बातमीपत्रात असे वृत्त आले होते: “इस्राएलमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा छळ केला आहे आणि त्यांच्यावर हल्ला केला आहे.” लॉडमधील यहोवाच्या साक्षीदारांचे एक राज्य सभागृह अल्ट्राऑर्थोडॉक्स धर्मवेड्या लोकांनी तीनदा फोडले होते आणि दोनदा त्याची तोडफोड केली होती. पोलिसांनी काही करायला नकार दिला.
फ्रिडम ऑफ रिलिजन ॲण्ड बिलिफ या पुस्तकात असहिष्णुतेची आणखी काही उदाहरणे दिली आहेत: “पाखंडमत किंवा पाखंडी या फक्त भूतकाळातल्या कल्पना नाहीत. . . . ज्यांनी स्थापित मतापासून निराळे मत स्वीकारले आहे त्यांचा बहिष्कार, छळ करणे आणि त्यांच्याशी दुजाभावाने वागणे हे असहिष्णुतेचे प्रमुख कारण आहे. पाकिस्तानातले अहमादी आणि ईजिप्त, इरान आणि मलेशियातले [बहाइस] तसेच पूर्व युरोपमधील पुष्कळ देश, ग्रीस आणि सिंगापोर येथील यहोवाचे साक्षीदार ही काही उदाहरणे आहेत.” स्पष्टतः, धार्मिक स्वातंत्र्याला जगाच्या अनेक भागांमध्ये धोका आहे.
ही समस्या पाहता, संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेचे डायरेक्टर जनरल फेडेरिको मेयर यांनी असे जाहीर केले की, पुढचे उदयास येणारे जग “उत्साह देणारे नाही. . . . स्वातंत्र्याच्या वाऱ्याने द्वेषाच्या विस्तवांना पुन्हा पेटवले आहे.” संयुक्त राज्याच्या एसेक्स विद्यापीठातील मानवी हक्क केंद्राच्या अध्यक्षांनी हा धोका खरोखर आहे हे कबूल करत असे म्हटले: “सर्व पुरावा हेच दर्शवतो की, धार्मिक असहिष्णुता . . . आधुनिक जगात कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.” अशी ही वाढती असहिष्णुता धार्मिक स्वातंत्र्याला धोकेदायक आहे; कदाचित तुमचेही धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात असू शकते. पण धार्मिक स्वातंत्र्य इतके महत्त्वाचे का आहे?
धोका कशाला आहे?
“कोणताही समाज स्वतंत्र आहे असे त्याचे वर्णन करण्याआधी धार्मिक स्वातंत्र्य ही एक मूलभूत गरज आहे. . . . धर्माचे स्वातंत्र्य आणि विश्वासाचा प्रचार करण्याचा हक्क नसला, तर विवेकानुसार वागण्याचे हक्क आणि खरोखरची लोकसत्ता असूच शकत नाही,” असे समाजशास्त्रज्ञ ब्रायन विल्सन ह्यूमन वॅल्यूज इन अ चेंजिंग वर्ल्ड या आपल्या पुस्तकात म्हणाले. तसेच, अलीकडेच, एका फ्रेंच कोर्टाने मान्यता दिली की, “धर्माचे स्वातंत्र्य हा जनतेच्या स्वातंत्र्यांचा एक मूलभूत घटक आहे.” म्हणून, धर्मावर तुमचा विश्वास असला अगर नसला, तरी धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याविषयी तुम्हाला आस्था असली पाहिजे.
धार्मिक स्वातंत्र्याबद्दल एखाद्या देशाच्या दृष्टिकोनाचा त्याच्या नावलौकिकावर आणि आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेवरही पुष्कळ परिणाम होतो. सन १९९७ मध्ये, ५४ राष्ट्रांच्या युरोपमध्ये सुरक्षितता आणि सहयोग संघटनेच्या एका सभेत प्रस्तुत केलेल्या एका अहवालात असे म्हटले होते: “मानवी हक्कांमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे धार्मिक स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेला ते अत्यावश्यक आहे. अशा हक्कांना अवमानणारी किंवा पद्धतशीररित्या अवमान करण्यास परवानगी देणारी कोणतीही व्यवस्था, मूलभूत मानवी हक्कांचा आदर करणाऱ्या न्याय्य आणि प्रजासत्ताक राज्यांसोबत सदस्यत्वाचा यथायोग्य दावा करू शकत नाही.”
धर्माचे स्वातंत्र्य हे इमारतीच्या पायाचा एक भाग असल्यासारखे आहे. नागरी, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक स्वातंत्र्यांसारखी इतर स्वातंत्र्ये त्यावर उभारलेली असतात. पायाच दुबळा झाला, तर सबंध इमारत दुबळी बनते. प्राध्यापक फ्रान्चेस्को मारजॉटा-ब्रोल्यो थोडक्यात असे मांडतात: “[धार्मिक] स्वातंत्र्याला आळा बसतो तेव्हा त्याच्या पाठोपाठ इतर स्वातंत्र्यांवरही त्याचा परिणाम होतो.” इतर स्वातंत्र्यांचे संरक्षण करायचे असेल, तर सर्वात आधी धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करायला हवे.
एखाद्या गोष्टीचे संरक्षण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता हे जाणण्यासाठी त्याबद्दल समजून घेणे आवश्यक आहे. धार्मिक स्वातंत्र्याची मुळे कोठे आहेत? ते कसे मिळवण्यात आले आणि त्यासाठी काय किंमत मोजावी लागली?
[४ पानांवरील चित्र]
धार्मिक असहिष्णुतेमागे मोठा इतिहास आहे