एड्स—भवितव्यासाठी काय आशा?
एचआयव्हीवर एकतर उपचार नाही आणि तो टाळण्यासाठी औषधसुद्धा नाही, पण इतरही कारणांमुळे या रोगाला आटोक्यात आणणं कठीण होतं. यातील एक कारण म्हणजे, अनेक लोक संसर्ग होण्याचा धोका पत्करायला तयार आहेत पण आपली जीवनशैली बदलायला मात्र मुळीच तयार नाहीत. उदाहरणार्थ, अमेरिकेत, एड्स झालेल्या लोकांची संख्या कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचं प्रमाण तसंच्या तसंच आहे. असोसिएटेड प्रेसचं म्हणणं असं आहे की, “अनेक लोक प्रतिबंधाविषयीच्या सूचना पाळत नाहीत.”
अहवालानुसार, एचआयव्हीनं संसर्गित झालेले सुमारे ९३ टक्के लोक जगातल्या विकसनशील देशांमध्ये राहतात; या देशांना एड्स रोगाला तोंड देण्यात आणखी इतर समस्या आहेत. यांपैकी अनेक देश इतके गरीब आहेत की आरोग्य निगेची प्राथमिक सेवा देखील इथं धड उपलब्ध नाही. जरी त्या देशांमध्ये नवीन औषधं उपलब्ध असती—बहुतेक नाहीतच—तरी एका वर्षाच्या उपचाराचा खर्च, तेथील अनेकजणांनी अख्ख्या आयुष्यात कमवलं नसेल त्यापेक्षाही जास्त झाला असता!
तरीही आपण असं धरून चालू या की, एक स्वस्त औषध तयार करण्यात आलं आहे आणि त्यामुळे हा रोग चक्क बरा करता येतो. पण हे औषध सर्व गरजवंतांपर्यंत पोचू शकेल का? कदाचित नाही. युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडनुसार, दर वर्षी ४० लाख मुलं पाच रोगांमुळे दगावतात—या रोगांचा प्रतिबंध करणाऱ्या स्वस्त लशी उपलब्ध असूनही!
उपचारासाठी औषधं मिळत नसलेल्या देशांमधील संसर्ग झालेल्या लोकांविषयी काय? सॅन्टा क्रूझ, कॅलिफोर्निया येथील इंटरनॅशनल हेल्थ प्रोग्रॅम्सच्या रूथ मोटा यांनी कित्येक विकसनशील राष्ट्रांमध्ये एचआयव्ही प्रतिबंध आणि निगा कार्यक्रम राबवण्यात मदत केली आहे. त्या म्हणतात: “औषधं मिळणं फक्त महत्त्वाचं नाही तर सकारात्मक मनोवृत्तीही महत्त्वाची असते, हे मी अनुभवावरून सांगते. एचआयव्हीचा संसर्ग झालेले असे लोक मला ठाऊक आहेत जे औषधं न घेता १० ते १५ वर्षांपर्यंत जगलेत. औषधं तर फायदेकारक असतातच पण फक्त औषधं खाऊन माणूस बरा होत नसतो. त्यामध्ये, मनोवृत्ती, समाजाचा पाठिंबा, आध्यात्मिकता आणि पोषण या सर्व गोष्टी सामावलेल्या असतात.”
उपाय जरूर निघेल
एक न एक दिवशी एड्सचं निर्मूलन होईल असा विश्वास ठेवायला काही कारण आहे का? होय, निश्चितच. प्रभूची प्रार्थना किंवा आमच्या स्वर्गातील पित्या जिला म्हणतात त्या प्रार्थनेच्या शब्दांत सर्वात उत्तम आशा आढळते. बायबलमधील मत्तयच्या पुस्तकात दिलेल्या त्या प्रार्थनेत, देवाची इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही व्हावी अशी विनंती आपण करतो. (मत्तय ६:९, १०) मानवांनी सदासर्वदा रोगांनी ग्रस्त असावे ही काही देवाची इच्छा नाही. देव त्या प्रार्थनेचं उत्तर निश्चितच देईल. असं करताना, तो केवळ एड्सच नव्हे, तर मानवजातीला ग्रासून टाकणाऱ्या इतर सर्व रोगांचंही निर्मूलन करील. त्यावेळी “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.
तोपर्यंत, प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय. अनेक रोगांवर सहसा दोन उपाय असतात: प्रतिबंध किंवा शक्य असल्यास इलाज. पण एचआयव्हीच्या बाबतीत अशी निवड नाही. त्याचा प्रतिबंध तर करता येतो पण सध्या तरी त्यावर कोणताही इलाज नाही. तेव्हा अशा घातक रोगांचा धोका का पत्करावा? इलाज नसण्यापेक्षा प्रतिबंध हा शंभर पटीनं बरा.
[९ पानांवरील संक्षिप्त आशय]
“फक्त औषधं खाऊन माणूस बरा होत नसतो. त्यामध्ये, मनोवृत्ती, समाजाचा पाठिंबा, आध्यात्मिकता आणि पोषण या सर्व गोष्टी सामावलेल्या असतात.”—रूथ मोटा
[९ पानांवरील चौकट/चित्र]
“मंडळीचा खूप आधार मिळाला”
प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना असं आर्जवलं: “आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) आधीच्या लेखात उल्लेखलेल्या कॅरेन आणि बिलला एचआयव्हीचा संसर्ग झाल्यामुळे ते आजारी पडलेत हे यहोवाच्या साक्षीदारांच्या तिथल्या मंडळीला कळाल्यावर त्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली याविषयी कॅरेनची आई म्हणते: “मंडळीचा खूप आधार मिळाला. बिलला न्यूमोनिया झाला तेव्हा कॅरेन स्वतः आजारी होती. त्यात, बिलची आणि मुलांची काळजी घेणं तिला शक्य नव्हतं. (घेता घेता तिची पुरेवाट झाली होती.) पण बांधवांनी त्यांच्या घराची साफसफाई केली, कार दुरुस्त केली, धुणं धुतलं. कायद्याचे सर्व व्यवहार पार पाडून दुसऱ्या एका घरात शिफ्ट व्हायला मदत केली. त्यांच्यासाठी बाजारहाट करून स्वयंपाक वगैरे करून द्यायचे. त्यांना भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक आधार दिला. कशाचीही कमी पडू दिली नाही.”
[८ पानांवरील चित्र]
वैवाहिक सोबत्याशी विश्वासू राहिल्याने एचआयव्हीचा संसर्ग टाळता येतो