एड्स—आटोक्यात कसा आणणार?
सध्या तरी, एड्सवर कोणताही उपाय नाही आणि लवकरात लवकर उपाय निघेल अशी वैद्यकीय क्षेत्राकडून काही चिन्हं दिसत नाहीत. नवीन उपचारांमुळे रोगाचा विकास थांबवता येत असला, तरी संसर्ग होऊ न देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. परंतु, प्रतिबंधाविषयी चर्चा करण्याआधी, एड्स जंतूचा (एचआयव्ही) एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग कसा होतो आणि कसा होत नाही याची आपण चर्चा करू या.
एका व्यक्तीला चार प्रमुख मार्गांनी संसर्ग होऊ शकतो: (१) दूषित झालेली सुई किंवा सिरींज वापरल्याने, (२) संसर्गित व्यक्तीशी शरीरसंबंध (कोणत्याही प्रकारचा संभोग) ठेवल्याने, (३) रक्त आणि रक्तातील घटकांच्या संक्रमणांद्वारे; पण अधिक विकसित देशांमध्ये एचआयव्हीसाठी रक्ताची तपासणी होत असल्यामुळे तेथे हा धोका आता कमी झाला आहे, आणि (४) जन्माआधी किंवा जन्माच्या वेळी किंवा स्तनपान करताना एचआयव्हीनं संसर्गित असलेल्या मातेद्वारे.
यु.एस. सेंटर्स फॉर डिझिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यानुसार, अलीकडील वैद्यकीय पुरावा म्हणतो की, (१) सर्दी किंवा फ्ल्यू होतो तसा एड्स होत नाही, (२) एड्स झालेल्या व्यक्तीच्या शेजारी बसल्याने किंवा एड्सग्रस्त व्यक्तीला हात लावल्याने किंवा मिठी मारल्याने एड्स होत नाही, (३) संसर्गित व्यक्तीनं हात लावलेलं, तयार केलेलं किंवा वाढलेलं जेवण खाल्ल्यामुळे एड्स होत नाही आणि (४) एड्सग्रस्त लोक वापरत असलेल्या मुतारी, टेलिफोन, कपडे किंवा खाण्यापिण्याची भांडी वापरल्याने एड्स होत नाही. शिवाय सीडीसीचं म्हणणं आहे की, डास किंवा इतर कोणत्याही कीटकाद्वारे या जंतूचा संसर्ग होत नाही.
प्रतिबंधाचे मार्ग
एड्स जंतू संसर्गित लोकांच्या रक्तात सापडतो. कोणा संसर्गित व्यक्तीला इंजेक्शन दिले, तर जंतू असलेले रक्त सुईवर किंवा सिरींजमध्ये राहू शकते. अशातऱ्हेने, त्या दूषित झालेल्या सुईने आणखी कोणाला इंजेक्शन दिल्यास हा जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो. तुम्हाला सुईबद्दल किंवा सिरींजबद्दल शंका वाटत असल्यास, डॉक्टरांना किंवा नर्सला विचारायला मुळीच कचरू नका. तो तुमचा हक्क आहे; कारण हा जीवन मरणाचा प्रश्न आहे.
हा एड्स जंतू, संसर्गित लोकांच्या वीर्यात किंवा योनी द्रवातही आढळतो. म्हणून प्रतिबंधाविषयी सीडीसीचा सल्ला असा आहे: “शरीरसंबंध टाळणे हाच एकमेव खात्रीचा उपाय आहे. शरीरसंबंध ठेवलाच, तर संसर्ग न झालेल्या व्यक्तीसोबत विवाहाच्या दीर्घकालीन परस्पर विश्वासू बंधनात बांधले जाईपर्यंत थांबून राहा.”
तुम्हाला संरक्षण हवे असल्यास, ‘परस्पर विश्वासू नातेसंबंध’ टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही विश्वासू असला आणि तुमचा सोबती विश्वासू नसला, तर तुम्ही सुरक्षित नाही. ज्या समाजांमध्ये शरीरसंबंध ठेवण्याबाबतीत किंवा आर्थिक बाबतीत पुरुषांचं वर्चस्व असतं अशा समाजांमधील स्त्रियांना सहसा फार जड जातं. काही देशांमध्ये स्त्रियांना पुरुषांसमोर शरीरसंबंधाचं नावसुद्धा घ्यायला मनाई असते, तर शरीरसंबंध ठेवण्याच्या सुरक्षित पद्धतींविषयी दोघांनी एकमताने काही ठरवणं दूरचीच गोष्ट झाली.
तथापि, अशा सर्वच स्त्रिया पुरुषांपुढं निमूट राहतात असं नाही. पश्चिम आफ्रिकेच्या एका देशात घेतलेल्या अभ्यासावरून दिसून आलं की, आर्थिकरित्या स्वावलंबी असलेल्या काही स्त्रिया आपल्या संसर्गित पतींसोबत शरीरसंबंध टाळू शकल्या आणि त्यामुळे मारहाण वगैरेचे काही प्रकारही घडले नाहीत. न्यू जर्सी, अमेरिका इथं पुरुषाने कंडोम वापरला नाही तर काही स्त्रियांनी शरीरसंबंध ठेवायला नकार दिला. लेटेक्स कंडोममुळे एचआयव्ही संसर्गापासून आणि शरीरसंबंधांनी पसरणाऱ्या इतर रोगांपासून संरक्षण मिळू शकत असले, तरी त्यांचा योग्य प्रकारे आणि सातत्याने वापर केला पाहिजे.
परीक्षा कधी करावी
आधीच्या लेखात उल्लेखिलेल्या कॅरेनला संसर्ग होऊ नये म्हणून फारसं काही करता आलं नसतं. लग्नाआधी कितीतरी वर्षांआधी तिच्या पतीला एचआयव्हीचा संसर्ग झाला होता; शिवाय त्यांचे लग्न झाले तेव्हा एड्सची साथ आणि एचआयव्हीची परीक्षा यांना नुकतीच सुरवात झाली होती. आज मात्र काही देशांमध्ये एचआयव्हीची परीक्षा करणं सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याची काही शंका असल्यास, लग्नाआधी परीक्षा करून घेण्यात सुज्ञता आहे. कॅरेन असा सल्ला देते: “नीट विचार करून आपला जीवनसाथी निवडा. चुकीची निवड केली, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल—जीवही जाऊ शकतो!”
लग्नानंतर दोघांपैकी एकाने इतर ठिकाणी शारीरिक संबंध ठेवला असेल, तर परीक्षा केल्याने निर्दोष सोबतीचं संरक्षण होऊ शकेल. एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांपर्यंत ते दिसून येणार नाही म्हणून अनेक परीक्षा कराव्या लागतील. शारीरिक संबंध ठेवण्यात येऊ लागले (त्यावरून अविश्वासू सोबतीला क्षमा केली असे सूचित होते), तर कंडोमचा वापर केल्यामुळे संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळू शकेल.
शिक्षणामुळे काय होऊ शकतं?
एड्सची सुरवात होण्याच्या कित्येक वर्षांआधी बायबल लिहिण्यात आलं असलं, तरी त्यातील तत्त्वांनुरूप जगल्याने या रोगापासून संरक्षण मिळू शकतं ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. उदाहरणार्थ, बायबलप्रमाणे लग्नाबाहेरील संबंध बाध्य आहेत, लग्नामध्ये परस्पर निष्ठा ठेवण्याची मागणी केली आहे, शिवाय, ख्रिश्चनांनी केवळ बायबल तत्त्वांचं पालन करणाऱ्यांशीच विवाह करावा असंही त्यात म्हटलं आहे. (१ करिंथकर ७:३९; इब्री लोकांस १३:४) त्याचप्रमाणे, शरीराला मलिन करणाऱ्या सर्व प्रकारच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापासून आणि रक्त घेण्यापासूनही अलिप्त राहायला सांगितलं आहे.—प्रेषितांची कृत्ये १५:२०; २ करिंथकर ७:१.
एचआयव्हीने पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येण्याविषयी कोणते धोके आहेत याबद्दल माहिती करून घेणं सुज्ञतेचं आहे. एड्सविषयी माहिती करून घेतल्याने लोकांना स्वतःचं संरक्षण करता येतं.
एड्स ॲक्शन लीग असं म्हणतं: “बहुतेक केसेसमध्ये एड्स टाळता येतो. उपाय निघेस्तोवर शिक्षण हाच एड्सवरील सर्वोत्तम आणि सध्या अस्तित्वात असलेला एकमेव [सामाजिक] प्रतिबंध आहे.” (तिरपं वळण आमचं.) पती-पत्नीने एकमेकांसोबत आणि आपल्या मुलांसोबत मनमोकळेपणानं एड्सविषयी चर्चा करणं उत्तम आहे.
कोणते उपचार?
एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर निदान सहा ते दहा वर्षं तरी रोगाची लक्षणं काही दिसून येत नाहीत. त्या वर्षांदरम्यान, शरीरात एक लढाई चालू असते. जंतूंची भरभराट होते आणि ते प्रतिकारशक्तीच्या पेशींचा निःपात करतात. त्यावर, प्रतिकारशक्तीच्या पेशी त्यांचा प्रतिकार करतात. पण दररोज लाखोलाख नवीन जंतू तयार होत गेल्यावर हळूहळू प्रतिकारशक्ती क्षीण होत जाते.
प्रतिकारशक्तीला मजबूत करण्यासाठी अनेक औषधं तयार करण्यात आली आहेत; त्या औषधांची कठीण-कठीण नावं आहेत—एझेडटी, डीडीआय आणि डीडीसी वगैरे. काहींना वाटलं, या औषधांचा पुष्कळ फायदा होईल आणि कदाचित रोगावर उपायही निघेल, पण त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. कालांतराने ही औषधं फक्त निकामीच ठरत नाहीत, तर काहींना यांच्यामुळे गंभीर दुष्परिणामही झाले आहेत—जसे की, रक्त पेशी घटणे, रक्त साखळण्यासंबंधी दोष निर्माण होणे, हातापायांच्या नसांना हानी पोचणे वगैरे.
आता नवीन औषधं निघाली आहेत: त्यांना प्रोटीझ इन्हीबिटर्स म्हणतात. इतर दोन ॲन्टीव्हायरल औषधांसोबत ही औषधे घ्यायला डॉक्टर सांगतात. परीक्षांवरून हे निष्पन्न झालं आहे की, या ट्रिपल थेरपीने व्हायरस मरत नसला, तरी शरीरातील त्याच्या वाढीवर जवळजवळ आळाच बसतो.
ज्यांच्यात लक्षणं दिसून येत होती त्या लोकांच्या आरोग्यात ट्रिपल थेरपीनं बराच सुधार झाला आहे. तथापि, तज्ज्ञांना ठामपणे असं वाटतं की, एचआयव्हीची लागण झालेल्या लोकांना लवकरात लवकर, लक्षणं दिसून येण्याआधी औषधं दिली तरच अधिक फायदा होतो. तसं केल्यावर, संसर्गाचं संपूर्णतः एड्समध्ये रूपांतर होण्यापासून कदाचित अनिश्चित कालावधीपर्यंत प्रतिबंध करणं शक्य होऊ शकेल. हा उपचार नवीनच असल्यामुळे, या थेरपीनं संसर्ग केवढ्या काळापर्यंत आटोक्यात ठेवता येऊ शकतो हे अद्याप पाहायचं आहे.
ट्रिपल थेरपी फार खर्चीक आहे. तीन ॲन्टीव्हायरल औषधं, पुन्हा लॅब टेस्टींगचा सरासरी खर्च एका वर्षाला ४,८०,००० रुपये इतका येतो. या आर्थिक ओझ्याशिवाय, ट्रिपल थेरपी घेत असलेल्या रुग्णाला वारंवार फ्रिजकडे धाव घ्यावी लागते, कारण औषधं फ्रिजमध्येच ठेवावी लागतात. तसं पाहिलं तर, काही गोळ्या दिवसातून दोनदा तर काही दिवसातून तीनदा घ्याव्या लागतात. काही अनशेपोटी तर काही जेवणानंतर घ्याव्या लागतात. एड्स रुग्णाला इतरही संसर्ग होण्याची शक्यता असते; त्यासाठी पुन्हा वेगळी औषधं घ्यावी लागतात तेव्हा थेरपी आणखीनच कठीण होऊन बसते.
परंतु, एखाद्या व्यक्तीने ट्रिपल थेरपी मध्येच बंद केली तर काय होईल याची डॉक्टरांना जास्त काळजी वाटते. जंतू वाढण्याची प्रक्रिया पुन्हा झपाट्याने सुरू होईल आणि उपचारातून वाचलेले जंतू आधीच्या औषधांना कदाचित दाद देणार नाहीत. औषधांना दाद न देणाऱ्या एचआयव्हीच्या अशा जंतूंवर उपचार करणं महाकठीण होऊन बसेल. शिवाय, दुसऱ्या लोकांनाही या तगड्या जंतूचा प्रसाद मिळेल.
लशी यावरचं उत्तर?
काही एड्स संशोधकांचं असं ठाम मत आहे की, एड्सच्या जागतिक साथीला आळा घालण्याचा मार्ग सुरक्षित आणि प्रभावकारी लस होय. जंतू क्षीण करून पीत ज्वर, कांजण्या, गालफुगी आणि रुबेल्ला यांवर गुणकारी लशी बनवल्या आहेत. सहसा, क्षीण केलेला एखादा जंतू जेव्हा शरीरात सोडला जातो, तेव्हा प्रतिकारशक्ती केवळ त्याचा नाश करून टाकत नाही, तर खऱ्या जंतूच्या हल्ल्याचा यशस्वीरित्या प्रतिकार करण्यासाठी संरक्षक साधनंही तयार करते.
माकडांवर केलेल्या अलीकडील दोन प्रयोगांवरून एचआयव्हीच्या बाबतीत समस्या अशी दिसून आली आहे की, क्षीण केलेला जंतूही जीवघेणा ठरू शकतो. म्हणजे, रोगापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेली लसच रोगाला कारणीभूत ठरू शकते.
म्हणून लशीचा शोध लावण्यात निष्फळतेशिवाय दुसरं काही हाती लागलेलं नाही. असंख्य प्रयोग करूनही एचआयव्हीवर काहीच परिणाम झालेला नाही; हेच प्रयोग जरा दुबळ्या जंतुंवर करण्यात आले असते, तर ते निश्चितच नष्ट झाले असते. शिवाय, एचआयव्हीचे जंतू प्रत्येक वेळी आपल्या वेगळ्या कॉप्या काढतात म्हणून त्यांना पटकन ओळखता येत नाही. (सध्या, सबंध जगभरात एचआयव्हीचे कमीत कमी दहा वेगवेगळे जंतुंचे प्रकार आहेत.) या समस्येत आणखी भर म्हणजे, जंतूचा प्रतिकार करण्यासाठी लशीने ज्या प्रतिकार पेशींना तयार केलेलं असतं त्या पेशींवरच हा जंतू हल्ला चढवतो.
संशोधनात, अर्थशास्त्राचाही महत्त्वाचा वाटा आहे. वॉशिंग्टन येथील इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सीन इनिशिएटिव्ह असं म्हणते, “खाजगी उद्योगक्षेत्र आपल्यातर्फे कोणतेही वचन देत नाही.” कशामुळे तर, विकसनशील देशांमध्येच या लशीची अधिक विक्री होणार असल्यानं फारसा फायदा होणार नाही म्हणून.
या सर्व अडचणी असतानाही, संशोधक मात्र वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करून गुणकारी लस शोधण्याचं काम जारी ठेवताहेत. परंतु एवढ्यात, लस तयार होईल अशी काही शक्यता वाटत नाही. समजा, अशी एखादी यशस्वी लस तयार करण्यात आलीच तर, त्यानंतर मानवांवर तिचा प्रयोग करून पाहण्याचं कठीण, खर्चीक शिवाय घातक ठरण्याची संभावना असलेलं काम येतं.
[५ पानांवरील चौकट]
एचआयव्हीचा संसर्ग कोणाला होतो?
जगभरात, दररोज सुमारे १६,००० लोकांना संसर्ग होतो. असं म्हटलं जातं, की यातील ९० टक्क्यांहून अधिक लोक विकसनशील देशांमधील आहेत. १० पैकी १ जण १५ वर्षांखालील लहान मूल असतं. उरलेल्या प्रौढ व्यक्ती आहेत; त्यांच्यापैकी ४० टक्क्यांहून अधिक स्त्रियांची संख्या आहे आणि निम्म्याहून अधिक १५ ते २४ वर्षांच्या वयोगटातल्या आहेत.—जागतिक आरोग्य संघटना आणि जॉईंट युनायटेड नेशन्स प्रोग्रॅम ऑन एचआयव्ही/एड्स.
[७ पानांवरील चौकट]
एखाद्याला संसर्ग झाला हे कळणार कसं?
कोणा व्यक्तीकडे फक्त पाहून संसर्ग झाला आहे का हे सांगता येत नाही. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या काही लोकांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत; असे लोक प्रकृतीने सुदृढ दिसत असले, तरी ते दुसऱ्यांना हा जंतू देऊ शकतात. आपल्याला संसर्ग झालेला नाही असं कोणा व्यक्तीने सांगितल्यावर त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो का? तसं काही सांगता येत नाही. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या अनेकांना स्वतःलाच ते ठाऊक नसतं. ज्यांना माहीत असतं, ते कदाचित कोणाला सांगणार नाहीत किंवा लबाड बोलतील. अमेरिकेत घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार, एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या १० पैकी ४ जणांनी, शरीरसंबंध ठेवण्याआधी आपल्या साथीदारांना आपल्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला हे सांगितलं नाही.
[६ पानांवरील चौकट/चित्र]
एचआयव्ही आणि एड्समधील संबंध
एचआयव्ही म्हणजे, “ह्यूमन इंम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस,” शरीरातील रोगावर हल्ला चढवणाऱ्या प्रतिकारशक्तीचा हळूहळू नाश करणारा हा जंतू आहे. एड्स म्हणजे, “ॲक्वायर्ड इंम्यूनोडेफिशिएन्सी सिंड्रोम.” हा एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतरचा शेवटला, जीवघेणा टप्पा आहे. एचआयव्हीने प्रतिकारशक्ती केवढी क्षीणवलेली असते हे नावावरूनच स्पष्ट होतं; त्यामुळे एरवी प्रतिकारशक्तीने ज्या संसर्गांविरुद्ध लढाई केली असती, त्या संसर्गांना शरीराची दारं सताड उघडी होतात.
[चित्राचे श्रेय]
CDC, Atlanta, Ga.
[७ पानांवरील चित्र]
विवाह करण्याचा विचार करण्याआधी एचआयव्ही परीक्षा करून घेण्यात सुज्ञता आहे