वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १२/८ पृ. १०-१३
  • पूल—नसते तर?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूल—नसते तर?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्राचीन काळातले पूल
  • पूल आणि आपल्या बदलत्या गरजा
  • पुलांच्या रचनांचे प्रकार
  • टॉवर ब्रिज लंडनचे प्रवेशद्वार
    सावध राहा!—२००७
  • वास्को द गामा नावाचा स्मारक पूल
    सावध राहा!—१९९८
  • लहान बेटाचे व्यस्त विमानतळात परिवर्तन
    सावध राहा!—१९९८
  • सिडनी—बंदर असलेले उत्साही शहर
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १२/८ पृ. १०-१३

पूल—नसते तर?

“पुलाने येथपर्यंत येऊ शकला म्हणून पुलाचे आभार माना.”—जॉर्ज कोलमन, १९ व्या शतकातला इंग्रजी नाटककार.

पुलावरून तुम्ही शेवटल्या वेळी कधी आला होता? तुमच्या लक्षात तरी आलं का? लाखो लोक दररोज पुलांवरून प्रवास करत असतात. पण आपल्याला त्यांचं इतकं काही कौतुक वाटत नाही. आपण चालत, दुचाकी वाहनाने किंवा गाडीने पुलांवरून किंवा पुलांखालून जातो पण त्यांच्याकडे विशेष लक्ष देत नाही. ते पूल नसते तर काय झालं असतं?

मानवांनी आणि प्राण्यांनी हजारो वर्षांपासून पार करता न येणाऱ्‍या खिंडारी, नद्या, दऱ्‍या किंवा खोरी पुलांच्याच साहाय्याने पार केल्या आहेत; वेगवेगळ्या प्रकारचे पूल असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. कैरो, लंडन, मॉस्को, न्यूयॉर्क, सिडनीसारख्या शहरांची नावं घेतली की तिथल्या पुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. होय, पुलांचा फार प्राचीन इतिहास आहे.

प्राचीन काळातले पूल

सुमारे २,५०० वर्षांआधी, बॅबिलोनच्या नायटोक्रिस राणीने इफ्रात नदी पार करण्यासाठी एक पूल बांधला. का? ग्रीक इतिहासकार हेरोडोटस त्याचं उत्तर देतो: “या नदीमुळे [बॅबिलोनचे] दोन वेगळे भाग होते. आधीच्या राजांच्या शासनादरम्यान, एका भागातून दुसऱ्‍या भागात जाण्यासाठी बोटीतून जावे लागायचे; माझ्या मते, ते फार त्रासदायक असले असेल.” बांधकामासाठी लाकूड, विटा आणि दगड तर मसाल्यासाठी लोखंड आणि शिसं यांचा उपयोग करून नायटोक्रिसनं प्राचीन काळातल्या एका सुप्रसिद्ध नदीवर पूल बांधला.

काहीवेळा तर, पुलांनी इतिहासाला कलाटणी दिली आहे. पर्शियाचा सम्राट, राजा डॅरियस, सायथियन लोकांविरुद्ध लढाई करायला निघाला तेव्हा आशियातून युरोपपर्यंत सर्वात लवकर पोचणारा मार्ग त्याला हवा होता. त्यासाठी त्याच्या ६,००,००० लोकांच्या सैन्याला, बॉस्पोरस खाडी पार करावी लागणार होती. दाट धुकं आणि धोकेदायक प्रवाहांमुळं बोटीने ही खाडी पार करणं धोक्याचं होतं, म्हणून डॅरियसने होड्या एकत्र बांधल्या आणि त्यांचा ९०० मीटर लांबीचा एक सपाट, तरंगता पूल तयार केला. आज मात्र हीच खाडी पार करायला तुम्हाला दारयावेशासारखा त्रास घ्यायची गरज नाही. इस्तान्बूल, टर्की इथल्या बॉस्पोरस पूलांवरून गाडीनं गेलात, तर दोन मिनिटंही लागणार नाहीत.

तुम्ही बायबल विद्यार्थी असला, तर पूल नसल्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली अशी एक घटना तुम्हाला आठवतच असेल. बॅबिलोनच्या नबुखद्‌नेस्सर राजाने टायरच्या द्वीप शहराला वेढा घातला तेव्हा काय घडलं ते आठवतं का? त्या शहरावर कब्जा करायला तो १३ वर्षं प्रयत्न करत राहिला पण त्याला काही जमलं नाही. त्याचं एक कारण म्हणजे, द्वीप आणि मुख्य भूमीला जोडणारा पूल नव्हता. (यहेज्केल २९:१७-२०) त्यानंतर तीनशे वर्षांनी जेव्हा थोर सिकंदरने मुख्य भूमीपासून द्वीपापर्यंत पूल बांधला तेव्हाच शहरावर कब्जा करता आला.

पहिल्या शतकापर्यंत, रोम हे केंद्रस्थान बनलं होतं, पण रोमचं साम्राज्य जोडण्यासाठी रस्त्यांसोबत पुलांचीही गरज होती. आठ-आठ टन वजनाचे दगड वापरून रोमन इंजिनियर्सनी कमानी पूल बांधले; यांची रचना इतक्या कमालीची होती की आज, जवळजवळ दोन हजार वर्षांनंतरही हे पूल अजून शाबूत आहेत. त्यांचे जलसेतू (अक्विडक्ट) आणि खिंडपूलही (व्हायाडक्ट) पुलांचेच प्रकार होते.

मध्ययुगात, पुलांना किल्ले म्हणूनही वापरलं जात असे. सा.यु. ९४४ मध्ये, डॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी लंडन येथील टेम्स नदीवर सॅक्सन लोकांनी एक लाकडी पूल बांधला. सुमारे तीनशे वर्षांनंतर, या लाकडी पुलाच्या जागी ओल्ड लंडन ब्रिज बांधण्यात आला; हा पूल इतिहासात आणि कवितांमध्येही गाजला.

पहिली एलिझाबेथ राणी इंग्लंडमध्ये राजपदी आली तेव्हा, ओल्ड लंडन ब्रिज केवळ किल्ला राहिला नाही. चक्क पुलावरच इमारती बांधण्यात आल्या होत्या. खालच्या मजल्यावर दुकानं होती. आणि वरच्या मजल्यांवर? धनिक व्यापारी आणि राजाच्या दरबारातल्या लोकांची देखील तिथं निवासस्थानं होती. लंडन ब्रिज लंडनमधील जीवनाचं केंद्रस्थान बनलं होतं. पुलावरच्या दुकानांकडून आणि निवासस्थानांकडून गोळा केलं जाणारं भाडं पुलाच्या देखभालीचा खर्च भागवण्यासाठी वापरलं जात. आणि लंडन पूल वापरण्यासाठी लोकांकडून पैसे आकारले जातात बरं का!

युरोपियन लोक लाकूड आणि दगडांचे पूल बनवत तर दक्षिण अमेरिकेचे इंका लोक दोरखंडाचे पूल बनवायचे. सान लुईस रेचा पूल याचं जगप्रसिद्ध उदाहरण आहे; पेरूमधील आप्युरीमाक नदी पार करण्यासाठी हा पूल बांधला होता. एका विशिष्ट वनस्पतीच्या तंतुंनी इंका लोक माणसाइतक्या जाडीचे मोठाले वळलेले दोरखंड बनवायचे. मग दगडी खांबांवर हे दोरखंड ठेवून नदीवरून दोन्ही बाजूने ताणून घ्यायचे. दोन्ही बाजूला दोरखंड बांधून घेतल्यावर, लाकडी फळ्यांचा तक्‍ता त्यावरून लटकवायचे. दर दोन वर्षांनी नवीन दोरखंड बसवले जायचे. या पुलाचं बांधकाम इतकं उत्तम होतं व देखभालही इतक्या चांगल्याप्रकारे केली जायची की तो पूल चक्क पाचशे वर्षं टिकला!

पूल आणि आपल्या बदलत्या गरजा

भूकंप, जोरदार वारं आणि तापमानातील बदल यांचा पुलांना प्रतिकार करता आला पाहिजे. आपण पाहिलंय त्याप्रमाणे, अगदी अलीकडच्या काळापर्यंत, इंजिनियर्स, पुलांच्या बांधकामासाठी लाकूड, विटा किंवा दगडांचा उपयोग करत असत. एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी मोटारगाड्या आल्या तेव्हा, जड वाहनांमुळे आधी बांधलेल्या पुलांमध्ये काही सुधार करायची, शिवाय, विस्तारायची गरज भासली.

स्टीम इंजिनचा शोध लागल्यामुळेही पुलांचं बांधकाम आणि रचना यांना अधिकच चालना मिळाली. सर्वात सोयीस्कर रेलमार्गाच्या आड खाडी किंवा खोल दरी येत असे. अडथळा ओलांडणारा शिवाय आणखीन फ्रेट कार जोडल्यावर वजन पेलणारा पूल बांधणं शक्य होतं का? घडीव लोखंडाच्या पुलांनी तात्पुरती समस्या सोडवली. एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातला सर्वात सुप्रसिद्ध असलेला एक पूल म्हणजे दक्षिण वेल्समधील मेनई खाडीवरचा निलंबित पूल होय. तो स्कॉटलंडच्या टॉमस टेलफर्ड या इंजिनियरने रचला होता आणि त्याचं बांधकाम १८२६ मध्ये पूर्ण झालं. त्याचा पल्ला १७६ मीटर असून तो अजूनही वापरला जातो! पण घडीव लोखंड मजबूत नसायचं आणि पूल कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सर्रास बंद पडायचे. शेवटी, १८०० च्या दशकाच्या उत्तरार्धात पोलादाचं उत्पादन सुरू झालं. या धातुचे गुणधर्म टिकाऊ, सुरक्षित पूल बांधायला साजेसे होते.

पुलांच्या रचनांचे प्रकार

पुलांच्या रचनांचे सात मुख्य प्रकार आहेत. (वरची पेटी पाहा.) इथं, आपण दोन प्रकारांविषयी चर्चा करू.

प्रक्षेप बहाली पुलांचे, नदीच्या दोन्ही बाजूला दोन प्रचंड मोठे बुरूज असतात. जलतरण तलावात सूर मारण्याचा डायव्हींग बोर्ड जसा तलावाच्या कडेला लावलेला असतो अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक बुरूजाला बहाल लावले जातात. मग, मध्यभागी मजबूत कमान घालून बहाल जोडले जातात आणि पूल तयार केला जातो.

नदीचा प्रवाह उसळता असला किंवा नदीचं पात्र फारच भुसभुशीत असलं, तर प्रक्षेप बहाली पूलच जास्तकरून बांधले जातात कारण मग नदीच्या पात्राच्या मध्यभागी खांब रोवायची गरज नसते. प्रक्षेप बहाली पूल मजबूत असल्यामुळे, रेल गाड्यांसारख्या जड वाहतुकीसाठी ते एकदम उत्तम असतात.

एखाद्या सर्कशीत कलाबाजाला दोरखंडावरून चालत असलेला तुम्ही कदाचित पाहिलं असेल. तो खरं तर पुलावरून—निलंबित पुलावरून—जातोय हे तुमच्या लक्षात आलं का? आजकालचे काही निलंबित पूल आणि अशी ताणलेली दोरखंड यांमध्ये जवळजवळ तितकंच साम्य असतं. कदाचित दोन्ही बाजूला दोरखंडाची दोन्ही टोकं बांधून तिच्यावर एक पाळणा अडकवलेला असेल. हा दोरखंड तिरपा असतो आणि प्रवासी पाळण्यात बसल्यावर दुसऱ्‍या टोकाला पोचण्यासाठी स्वतःला पुढे ढकलतो. जगभरातले लोक सहसा साधेसुधे दोरखंडांचे पूल वापरतात.

अर्थात, दोरखंडाच्या पुलावरून मोटारगाडी चालवणं काही शक्य नाही. पोलादी साखळ्या आणि पोलादी वायरच्या केबल्सचा शोध लागल्यावर, जड वाहनांकरता निलंबित पूल बांधणं शक्य झालं. आधुनिक निलंबित पुलांचा मुख्य पल्लाच १,२०० मीटर किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. सहसा निलंबित पुलामध्ये, प्रत्येक बुरूजाला आधार देणारे दोन पोलादी खांब असतात. हजारो वायरींनी बनवलेले पोलादी केबल या बुरूजांना आणि खाली रस्त्याला बांधलेले असतात. वाहतुकीचा आणि रस्त्याचा संपूर्ण भार या केबल्सवरच असतो. बांधकाम उत्तम असेल, तर निलंबित पूल सर्वात सुरक्षित असू शकतात.

आधी तुम्ही पुलांकडे फारसं लक्ष दिलं नसणार. आता मात्र तुम्ही पुलावरून कधी चाललात, तर स्वतःला विचारा: ‘या पुलाविषयी मला काय ठाऊक आहे? हा बांधला कधी?’ त्याचं जवळून निरीक्षण करा. हा प्रक्षेप बहाली पूल आहे की निलंबित पूल आहे की दुसरा कोणता पूल आहे? पुलासाठी तीच रचना का निवडली गेली?

मग पूल पार करताना, जरा खाली नजर टाका आणि स्वतःला विचारा, ‘या पुलाशिवाय माझं कसं चाललं असतं?’

[१२ पानांवरील चौकट/चित्र]

पुलांचे प्रकार

१. तुळई पूल सहसा महामार्गांवर वापरले जातात. या तुळ्या खांबावर किंवा बहालांवर आधारलेल्या असतात. या पुलांचा ३०० मीटर इतका गाळा असू शकतो.

२. कैची पूल, त्रिकोणी आकाराच्या कैच्यांनी आधारलेले असतात. हे पूल मोठ्या खिंडी, नद्या आणि इतर अडथळ्यांवरून बांधले जातात आणि सहसा रूलमार्गांसाठी वापरले जातात.

३. कमानी पूल असा असतो की, प्रत्येक गाळ्याची कमान असते. पुलांमधला हा सर्वात जुना प्रकार आहे. जलसेतू आणि खिंडपुलांसाठी रोमन लोक अशा प्रकारची कमान बांधत असत आणि दोन कमानी जोडण्यासाठी एकाच दगडाचा उपयोग करत. असे अनेक पूल आजही शाबूत आहेत.

४. केबल-स्टेड पूल निलंबित पुलांसारखेच दिसतात पण फरक इतकाच असतो, की केबल्स थेट बुरूजांना बांधलेले असतात.

५. सरकते पूल जहाजांना मार्ग करून देण्यासाठी वर उठवले जाऊ शकतात किंवा बाजूला सरकवले जाऊ शकतात. लंडनचा टॉवर पूल हे याचं उत्तम उदाहरण आहे.

६. प्रेक्षप बहाली पूल यांच्याविषयी लेखात स्पष्टीकरण दिलं आहे.

७. निलंबित पूल यांच्याविषयी लेखात माहिती दिली आहे.—वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया, १९९४.

[१३ पानांवरील तक्‍ता]

काही प्रसिद्ध पूल

निलंबित

स्टोरबेल्ट डेन्मार्क १,६२४ मीटर

ब्रुकलिन अमेरिका ४८६ मीटर

गोल्डन गेट अमेरिका १,२८० मीटर

जीआंगयीन यांग्झे चीन १,३८५ मीटर

प्रक्षेप बहाली

फोर्थ (दोन गाळे) स्कॉटलंड ५२१ मीटर प्रत्येकी

क्वीबेक कॅनडा ५४९ मीटर

मिसिसिप्पी नदी अमेरिका ४८० मीटर

पोलादी कमान

सिडनी हार्बर ऑस्ट्रेलिया ५०० मीटर

बर्चनफ झिम्बाब्वे ३२९ मीटर

केबल-स्टेड

पॉन दी नॉरमान्दी फ्रान्स ८५६ मीटर

स्कार्नसेने नॉर्वे ५३० मीटर

[१० पानांवरील चित्र]

आल्मेरिया, स्पेन इथं जुन्या कमानी पुलावर आधुनिक तुळई पूल

[१३ पानांवरील चित्र]

ब्रुकलिन पूल, न्यूयॉर्क, अमेरिका (निलंबित)

[१३ पानांवरील चित्र]

टॉवर पूल, लंडन, इंग्लंड (सरकता)

[१३ पानांवरील चित्र]

सिडनी हार्बर पूल, ऑस्ट्रेलिया (कमानी)

[१३ पानांवरील चित्र]

सेटो ओहाशी, जपान (केबल-स्टेड)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा