एड्स—साथीचा अंत दिसत नाही
अमेरिकेच्या पश्चिम भागात कॅरेन लहानाची मोठी झाली.a यहोवाची साक्षीदार असल्यामुळे कुठे वाकडे पाऊल पडू नये म्हणून तिने सुरवातीपासूनच खबरदारी घेतली होती. १९८४ मध्ये, २३ वर्षांची झाल्यावर तिचा बिलशी विवाह झाला; दोन वर्षांआधीच तो साक्षीदार बनला होता. त्यांना दोन गोड मुलं झाली—एक मुलगा आणि एक मुलगी.
१९९१ पर्यंत तरी सगळं काही सुरळीत चाललं होतं, दोघंही सुखी-समाधानी होते. त्या वर्षाच्या शेवटी, बिलच्या जिभेवर एक पांढरा चट्टा दिसू लागला आणि तो काही जाईना. मग बिल डॉक्टरांकडे गेला.
त्यानंतर काही दिवसांनी, कॅरेन आणि तिची मुलं बागेतला पालापाचोळा गोळा करत होते. बिल आपला वऱ्हांड्याच्या पायरीवर बसला होता; त्याने कॅरेनला हाक मारली. तिला आपल्या शेजारी बसायला सांगून तिला जवळ घेऊन म्हणाला, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याच सोबत मला नेहमी नेहमी राहायचंय. मग त्यासाठी डोळ्यांत अश्रू कशाला? एड्स ज्यामुळे होतो त्या एचआयव्हीची लागण बिलला झाली असा डॉक्टरांना संशय होता.
मग कुटुंबातल्या सगळ्यांची परीक्षा झाली. बिल आणि कॅरेन पॉझिटिव्ह निघाले. यहोवाचा साक्षीदार बनण्याआधी बिलला हा संसर्ग झाला होता; त्याच्यामुळे मग कॅरेनलाही झाला. पण मुलं मात्र नेगेटिव्ह होती. तीन वर्षांच्या आत बिल दगावला. कॅरेन म्हणते: “तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा देखणा माणूस, तुम्ही जिवापाड प्रेम करता तो माणूस हळूहळू कमजोर होतो, त्याचा फक्त सापळा उरतो तेव्हा मनाची काय अवस्था होते ते शब्दांत व्यक्त करता येत नाही. मी रड रड रडले. आमच्या लग्नाला दहा वर्षं व्हायला फक्त तीन महिने उरले होते—त्याआधीच बिल आम्हाला सोडून गेला. मुलांना आणि मला त्यानं काही कमी पडू दिलं नाही.”
कॅरेनही आपल्या पतीच्या पाठोपाठ जाईल असे डॉक्टरांनी तिला सांगितले; पण ती अजूनही जिवंत आहे. ती एड्सच्या सुरवातीच्या टप्प्यात आहे.
कॅरेन ही एड्स झालेल्या लोकांपैकीचे केवळ एक उदाहरण. परंतु आज एचआयव्ही/एड्स झालेले असे सुमारे ३ कोटी लोक आहेत—ही संख्या, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि पॅराग्वे या तिन्ही देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. अंदाजांनुसार, आफ्रिकेत २ कोटी १० लाख लोक एड्सग्रस्त आहेत. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, हे शतक संपेल तेव्हा ही संख्या ४ कोटींपर्यंत वाढू शकेल. एका यु.एन. रिपोर्टनुसार, आतापर्यंत येऊन गेलेल्या सर्वात मोठ्या साथीनेही या रोगाचा हात धरलेला नाही. १५ ते ४९ वर्षांच्या वयोगटातल्या शरीरसंबंध ठेवणाऱ्या प्रौढांपैकी शंभरातील एकाला एचआयव्ही संसर्ग झालेला आहे. यांमध्ये, १० मधील फक्त एकाच व्यक्तीला आपल्याला संसर्ग झाल्याचं माहीत आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये तर २५ टक्के प्रौढ संसर्गित आहेत.
सन १९८१ मध्ये, ही साथ सुरू झाली तेव्हापासून १,१०,७०,००० लोक एड्सला बळी पडले आहेत. अंदाजानुसार असं म्हटलं जातं, की १९९७ सालातच २० लाख ३ हजार लोक दगावले. तरीही, एड्सच्या या संघर्षात आशेची नवीन किरणं दिसताहेत. गेल्या काही वर्षांत, श्रीमंत राष्ट्रांमधील एड्सच्या नवीन केसेसचं प्रमाण घटलं आहे. शिवाय, अशी काही औषधं निघालीत ज्यांमुळे प्रकृती सुधारण्याची आणि जास्त काळ जगण्याची आशा मिळते.
तुम्ही एड्सपासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकता? अलीकडे, उपचार आणि लशी यांत काही प्रगती झाली आहे का? या रोगाचं निर्मूलन कधी होईल का? या प्रश्नांची उत्तरं पुढील लेखांमध्ये दिली जातील.
[तळटीपा]
a नावं बदलण्यात आली आहेत.