आमच्या वाचकांचे मनोगत
मस्तिष्काघात “मस्तिष्काघाताचा सामना करणे” (मार्च ८, १९९८) ही लेखमाला जणू माझ्या प्रार्थनेचंच उत्तर होती. काही वर्षांपूर्वी मी आणि माझे पती एका अधिवेशनाला गेलो असताना यांना मस्तिष्काघात झाला. आपल्याला काय होत आहे हे ते चिठ्ठीवर लिहून मला सांगू लागले तेव्हा कागदावर त्यांचा हात थरथरू लागला; त्यांच्या संपूर्ण उजव्या बाजूवर परिणाम झाला होता. या लेखामुळे मला किती मदत झाली हे मला तुम्हाला सांगताच येणार नाही. यहोवाला आपली काळजी आहे ही जाणीव किती सुखावणारी आहे!
एफ. एस. एच., अमेरिका
हे मासिक मिळण्याच्या थोड्यावेळाआधीच, मला नेमका काय त्रास होतोय हे मी माझ्या पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण मस्तिष्काघात झाल्यामुळे मी ते तिला नीट सांगू शकत नव्हतो. चक्क तीन वेळा मी हे मासिक वाचून काढलं आहे. आणि केवळ मीच नाही तर माझ्या पत्नीनं देखील ते वाचलं आहे.
आर. झेड., इटली
बरीच वर्षे यहोवाची विश्वासूपणे सेवा केल्यावर मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मस्तिष्काघातामुळे मृत्यू झाला; त्यांचा मृत्यू होण्याआधी ते विशिष्ट प्रकारे का वागत होते हे समजण्यासाठी या लेखानं माझी मदत केली. भावनात्मक बदल तसेच आपल्याला कसं वाटतं हे व्यक्त करण्याची अडचण यांविषयीचे जे स्पष्टीकरण दिले होते त्यावरून माझे वडील नेमकं काय सोसत होते हे समजण्यासाठी मला मदत झाली.
व्ही. सी., अमेरिका
एका वर्षापूर्वी मला देखील मस्तिष्काघात झाला होता आणि शरीराच्या डाव्या बाजूला अजूनही ताकद नाही. या लेखांमुळे मस्तिष्काघातासंबंधी असलेल्या सगळ्या शंकाकुशंका दूर होतील. केवळ म्हाताऱ्या लोकांनाच मस्तिष्काघात होतो ही गोष्ट खरी नाही. मला मस्तिष्काघात झाला तेव्हा मी केवळ ४७ वर्षांची होते.
ए. ए. इंग्लंड
माझी मुलगी ल्यूटसी अवघ्या दोन महिन्यांची असताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसला होता; त्यामुळे या लेखानं मला तिची स्थिती समजून घेण्यास मदत केली; आपल्याला नेमकं कसं वाटतं, काय होतंय हे ती व्यक्त करू शकत नाही. पण, याचं कारण काय हे समजण्यासाठी या लेखानं माझी मदत केली आहे.
एन. के., स्लोव्हाकिया
एका पुनर्वसन केंद्रामध्ये मी एक ट्रेन्ड नर्स म्हणून काम करत असल्यामुळे मस्तिष्काघात झालेल्या रुग्णांची सेवा करताना मला पुष्कळ काही शिकायला मिळालं. या लेखातून, मस्तिष्काघात झालेल्या व्यक्तीच्या घरच्या लोकांची खरी स्थिती समजून घेण्याचा जो सहानुभूतीपूर्ण प्रयत्न केला गेला आहे ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली.
एल. सी., अमेरिका
माझ्या आईला देखील एक सौम्य इस्केमीक ॲटॅक येऊन गेला आहे. तशी तर ती पूर्णपणे यातून सावरली आहे पण तिच्या मनावर मात्र याचा खूप परिणाम झाला आहे. यापूर्वी ती खंबीर मनाची आणि आत्मविश्वासी होती पण अलीकडे ती फारच हळवी झाली आहे. या रोगामुळे मनावर देखील किती परिणाम होतो हे स्पष्ट केल्याबद्दल आभारी आहे.
आर. सी., इटली
दोन वर्षांपूर्वी माझ्या आईला दोन वेळा मस्तिष्काघात झाला होता. पहिल्या वेळी तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि दुसऱ्या वेळी तिच्या उजव्या अंगावरून वारं गेलं. कधीकधी मी तिच्यावर जाम चिडते आणि नको ते बोलून बसते तेव्हा तिला फार वाईट वाटतं. पण, तुमच्या लेखानं मला तिची स्थिती अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यास मदत केली आहे.
आर. टी. सी., ब्राझील