जगावरील दृष्टिक्षेप
शेती उत्पादनांची पौष्टिकता घटली?
सुपीक जमीन कमी होत चालल्यामुळे फळांची आणि भाज्यांची पौष्टिकता घटत आहे का? जमिनीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते तरी नाही. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्केली वेलनेस लेटर म्हणते: “रोपांमधील जीवनसत्त्वे खरे तर रोपेच निर्माण करतात.” त्यामुळे आवश्यक असणारी खनिजे जमिनीत नसली तर झाडांची नीट वाढच होणार नाही. झाड फुलोऱ्याच्या अवस्थेत येणार नाही किंवा मग ते सुकून जाईल आणि शेवटी मरेलही. हे टाळण्यासाठी जमिनीत खनिजे घालण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा उपयोग करतात. वेलनेस लेटर म्हणते: “तुम्ही विकत घेता ती फळे आणि भाज्या रसरशीत, ताजी दिसत असल्यास तुम्ही खात्री बाळगू शकता की त्यांत आवश्यक पोषक पदार्थ आहेत.”
गुन्हेगारी आणि वंशवाद
अलीकडे ग्रीसमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण भयंकर वाढले आहे; काहींच्या मते यासाठी पूर्व युरोप, बालकन आणि खासकरून अल्बेनियातून येणाऱ्या निर्वासितांचा आणि परदेशी स्थायिक झालेल्या लोकांचा लोंढा जबाबदार आहे. टू व्हीमा या वृत्तपत्राचे एक स्तंभलेखक, रीचारडॉस सॉमरीटिस म्हणतात, की ही वाढती गुन्हेगारी चिंतेचे कारण बनली असून त्यामुळे त्या देशातल्या परदेशी लोकांविषयी एक प्रकारची “भीती निर्माण झाली असून त्यांच्याविरुद्ध खासकरून जातीयवादी भावना उफाळत आहेत.” पण, असे दिसून आले आहे, की गुन्हेगारीत सापडलेल्या परदेशी लोकांची आणि ग्रीक लोकांची संख्या जवळजवळ सारखीच आहे. उदाहरणार्थ, सर्व्हेवरून असे समजते की, “१०० गुन्ह्यांपैकी ९६ प्रकरणांत गुन्हेगार हा ग्रीक असतो,” असा वृत्तपत्राचा अहवाल आहे. सॉमरीटिसच्या मते, ‘गुन्हेगारीमागची कारणे जातीयवादाशी संबंधित नसून लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीशी संबंधित आहेत.’ “परदेशी लोकांबद्दल शंकेखोर वृत्ती निर्माण करण्याबद्दल आणि जातीयवादाला खतपाणी घालण्याबद्दल” तसेच ग्रीसमधील गुन्हेगारीची एकच बाजू लोकांपुढे मांडल्याबद्दल सॉमरीटिस यांनी प्रसार माध्यमांनाही जबाबदार ठरवले आहे.
चीनमध्ये मृगाची दुर्मिळ जात पुन्हा आढळते
चायना टुडे असा अहवाल देते की, “मागील ५० वर्षांहून अधिक वर्षे तिबेटचा तांबडा मृग नामशेष झाला असे समजले जात होते; पण तो तिबेटच्या स्वतंत्र क्षेत्रात असलेल्या शानान प्रांतात पुन्हा सापडला आहे.” हा तांबडा मृग चार फूट उंच आणि जवळजवळ ११० किलो वजनाचा असतो; त्याच्या मौल्यवान शिगांसाठी शिकार केल्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. याशिवाय, युद्धामुळे आणि पर्यावरणातील बदलांमुळे देखील त्यांची संख्या रोडावली. असा अंदाज बांधला जातो, की या अतिशय देखण्या जातीचे जेमतेम २०० मृग उरले असून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राण्यांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.
गंगा नदीवरील मेळा
या वर्षाच्या एप्रिल महिन्यात, कुंभ मेळ्याच्या अंतिम टप्प्यात लाखो हिंदूंनी गंगास्नान केले. कुंभ मेळा हा तीन महिने चालणारा हिंदू धर्मियांचा एक सोहळा असून अमरत्वाचे वरदान प्राप्त करण्यासाठी तो साजरा केला जातो. दर तीन वर्षांनी चार भारतीय शहरात म्हणजे पौराणिक आख्यायिकेनुसार अमृत प्राप्त करण्यासाठी स्वर्गात देवदैत्यांमध्ये युद्ध झाले तेव्हा पृथ्वीवर ज्या चार शहरांत अमृत पडले तेथे आळीपाळीने हा सोहळा पार पडतो. यापूर्वी, भारताच्या पवित्र जलांत स्नान करण्यासाठी गेलेल्या अनेक लोकांचे तिथल्या चेंगराचेंगरीत जीव गेले आहेत.
“जगाला आग लागली ते वर्ष”
वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर या आंतरराष्ट्रीय अरण्य प्रकल्पाचे मुख्य, शानपॉल शानरेनो असे म्हणतात की, “१९९७ हे आगीचे वर्ष म्हणून आठवणीत राहील.” ॲनटार्टिका सोडून बाकीच्या हरएक खंडात मोठमोठ्या आगी लागल्या होत्या. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडच्या क्षेत्रफळाइतकी असलेली इंडोनेशिया आणि ब्राझीलची मौल्यवान जंगले भस्मसात झाली होती. याची कारणे लागवडीकरता मुद्दामहून जमीन साफ केल्यापासून ते कोरड पडण्यापर्यंत निरनिराळी असू शकतात; ही कारणे एल नीनोमुळे निर्माण झालेल्या कमालीच्या हवामानाचा परिणाम असल्याचे समजले जाते. शिवाय, जीवशेष ऊर्जेमुळे कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणात वाढ झाल्याने हवेतील प्रदुषण वाढते आणि पृथ्वीचे तापमान वाढते, असा अहवाल लंडनचे वृत्तपत्र द इंडिपेंडेंट देते. श्री. शानरेनो सूचना देतात: “आपण विनाशाचे दुष्ट चक्र निर्माण करत आहोत ज्यात आगीचे वाढते प्रमाण, हवामानातील बदलांमुळे आणि या बदलांसाठी कारणीभूत असलेल्या घटकांमुळे निर्माण होते.”
गरज, अधिक कॅल्शिअमची
“तरुण लोकांमध्ये हाडांची वाढ होत असल्यामुळे त्यांना गरज असते अधिक कॅल्शिअमची,” अशी सूचना जर्मन वार्तापत्र गेझून्टहीट इन व्हॉर्ट ऊन्ट बिल्ट (हेल्थ इन वर्ड ॲण्ड पिक्चर) देते. दररोज १,२०० मिलिग्रॅम कॅल्शिअम घेण्याचा सल्ला दिला जात असला तरीही जर्मनीतील १५ ते १९ वर्षे वयोगटातल्या केवळ ५६ टक्के तरुणींना आणि ७५ टक्के तरुणांना इतके कॅल्शिअम मिळते. “सबंध युरोपमध्ये, तरुणींसाठी असलेला कॅल्शियम पुरवठा अपुरा पडतो” असे युरोपियन फाऊंडेशन फॉर ओस्टिओपोरोसिसच्या (अस्थिसुषिरतेच्या) मारी फ्रेसर म्हणतात. कॅल्शिअमची ही कमी लगेच लक्षात येत नसली तरी म्हातारपणी मात्र अस्थिसुषिरता हा रोग होण्याची संभावना असू शकते. “चीझ, दूध, दही, तीळ, ॲमरँथच्या बिया, सोयाबीन्स, पाले भाज्या, कवची फळे, मासे हे भरपूर कॅल्शिअम देणारे अन्नपदार्थ आहेत,” असे तो लेख म्हणतो.
मृत्यूला क्षुल्लक लेखणे
झूरनाल ड्यू ब्राझील म्हणते: “मृत्यूला क्षुल्लक लेखायचे नसेल तर आईवडिलांनी आणि शिक्षकांनी, चित्रपटांच्या आणि टीव्हीच्या माध्यमातून वीरतेला जो बढावा दिला जातो तो कमी करावा.” रीउ दे झानेइरूमधील एक अभ्यास दाखवून देतो, की १० टक्के गुन्हे १३ वर्षांखालच्या मुलांच्या हातून घडतात. सदर लेखाचे म्हणणे आहे की, “ही मुले बंदुका घेऊनच फिरत असतात आणि आपल्या शाळेतील मुलांना जखमी करतात, ठार मारतात आणि वयाने आपल्यापेक्षा लहान असलेल्यांशी लैंगिक दुर्व्यवहार करतात.” मानसोपचारतज्ज्ञ आल्फ्रेड्यू कास्ट्रू नेट्यू म्हणतात: “हल्लीच्या आपल्या या संस्कृतीत स्पर्धेला बढावा दिला जातो आणि हवे ते मिळवण्यासाठी एखाद्याचा जीवही घेतला जाऊ शकतो हे चित्रपटांतून दाखवले जाते; पण यांमुळे मुलांचा अधिकच भ्रमनिरास होतो.” शिक्षक झूझेफा पेक म्हणतात, की बंदुकांऐवजी चांगल्या गोष्टी शिकवतील अशी खेळणी मुलांच्या हातात दिली जावी आणि “चित्रपटांतला जो हिरो सर्वांची कत्तल करत सुटतो तो खरा तर मुर्ख, खोटा असतो आणि हत्यार हे प्रतिष्ठेचे किंवा ताकदीचे चिन्ह नसून लोकांना ठार करणारे असते,” हे मुलांना पटवून देणे अत्यावश्यक आहे.
रुग्णांना लुबाडणे
अलीकडे जर्मनीच्या हॉस्पिटल्समध्ये चोऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. एम्सडेटेनर टागब्लाट वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, “कोलोनच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समध्ये दर वर्षी तीनशे चोऱ्या झाल्याचे सांगितले जाते. हातात फुलांचा गुच्छ, मुखावर लोभसवाणे हास्य असणाऱ्या चोराला तर हॉस्पिटलमध्ये माल मिळतोच.” रुग्णाला भेटायला आल्याचे सोंग करून येणारे हे भामटे रुग्णाच्या टेबल्सपासून त्याच्या कपाटापर्यंत प्रत्येक मालावर हात मारतो. रुग्ण वयस्क असेल तर या भामट्यांचे काम आणखीनच सोपे होऊन जाते. उदाहरणार्थ, एक वयस्कर मनुष्य आपल्या उशाखाली पैशांची बरीच मोठी रक्कम ठेवायचा. त्यातच रुग्णांना भेटण्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे आणि कुणालाही हॉस्पिटलमध्ये येणाची मोकळीक असल्यामुळे या भामट्यांना जणू रान मोकळे असते. म्हणूनच, रुग्णांना सूचना दिली जाते, की त्यांनी आपले पैसे आणि मौल्यवान वस्तू हॉस्पिटलच्या तिजोरीत किंवा दुसरीकडे कुठे कुलूप लावून ठेवाव्यात किंवा मग जपून ठेवण्यासाठी कुणाकडे तरी द्याव्यात.
कानाचे ठसे
लंडनमध्ये अलीकडेच एका घरफोड्याला केवळ त्याच्या कानांमुळे पकडण्यात आले. ते कसे? आपण गुन्हा केला त्या ठिकाणी आपल्या बोटांचे ठसे राहू नयेत याची त्याने पूर्ण काळजी घेतली होती तरीही त्याला एक सवय होती; घरफोडी करण्याआधी घरात कोणी आहे की नाही याची चाहूल घेण्यासाठी तो खिडकीवर किंवा दाराच्या कुलुपावर आपला कान लावत असे; अशाप्रकारे तो त्या ठिकाणी आपल्या कानाचे ठसे सोडायचा. स्कॉटलंडच्या ग्लॅसगो विद्यापीठात न्यायवैद्यक असलेले प्राध्यापक पीटर वॉनेसस म्हणतात: “प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे निरनिराळे असतात तसेच कानांचे देखील.” फरक एवढाच, की केस आणि नखांप्रमाणेच प्रौढता गाठल्यानंतर देखील कानांची वाढ होत राहते, असा अहवाल लंडनचे द डेली टेलिग्राफ देते. पण वर उल्लेखलेल्या घरफोड्याच्या बाबतीत आढळून आले त्याप्रमाणेच आपलेही कान कितीही मोठे किंवा कितीही लहान असले तरी पोलिसवाल्यांना मात्र एवढे ठाऊक असते, की प्रत्येकाच्या कानाचे ठसे वेगवेगळे असतात. ब्रिटनमध्ये, कानाच्या ठशांवर या घरफोड्याला पकडल्याचा हा पहिलाच प्रकार असून, त्याने पाच घरफोडी केल्याचे कबूल केले.