विपत्तीच्या दोन बाजू
मेक्सिकोतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
गोडोफ्रेडो आणि जिसेला नावाचे यहोवाचे साक्षीदार असलेले विवाहित दांपत्य आपल्या लहान मुलांसह आपल्या घरात असतानाच मेक्सिकोतील वहाकाच्या किनारपट्टीला पॉलीन तुफानाचा तडाखा बसला. त्यांचं घर डांबराच्या प्रेस्सबोर्डाचं होतं. सुसाट्याच्या वाऱ्यात एक एक करून शीट्स निघू लागल्या. शेवटी, थोडासाच भाग शाबूत राहिला आणि ते जणू उघड्यावरच पडले.
जिसेलाने त्यांचं आठ महिन्यांचं बाळ हातात धरलं होतं आणि बाकीची तीन मुलं तिला आणि गोडोफ्रेडोला बिलगली होती; सुसाट्याचं वारं सुटलं होतं आणि दोन-अडीच तास ते तशाच अवस्थेत तग धरून राहण्याचा प्रयत्न करत होते. काहीवेळा, तुफानाचा जोर वाढला की, सगळे जमिनीवर आदळायचे आणि त्यांना उठताही यायचं नाही. पण, सगळेच्या सगळे वाचले.
आकापुल्को येथे राहणारी एक यहोवाची साक्षीदार नेली, हिने घरात पाणी शिरताना पाहिलं आणि पटापट घरातल्यांना जागं केलं. बघता बघता पाणी भरत गेलं आणि पाण्याचा जोर इतका वाढला की नेली वाहतच गेली पण तिच्या मुलीने तिला बाहेर ओढून काढली. खिडक्यांच्या सळ्यांना धरून त्या उभ्या राहिल्या; पाणी त्यांच्या छातीपर्यंत भरलं, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. एवढ्यात कोणा माणसाच्या हाका त्यांना ऐकू आल्या. तो त्यांच्या शेजारचा माणूस होता; त्याने त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःच्या घरी घेऊन गेला. त्याच्या घरातून त्यांनी स्वतःच्या घराचा नाश होताना पाहिला; एक मोटार गाडी त्यांच्या घरावर आदळली आणि घराचा चेंदामेंदा झाला. ते सुन्न होऊन पाहतच राहिले कारण काही मिनिटांआधी ते तिथंच होते.
ऑक्टोबर ८, १९९७ रोजी बुधवारचा दिवस होता; दुपारच्या वेळी, वहाका राज्यातील किनारपट्टीला पॉलीन तुफानाचा तडाखा बसला. ताशी २०० किलोमीटर वेगाचं सुसाट्याचं वारं वाहत होतं. मग, गुरुवारी, ऑक्टोबर ९ ला पहाटेच्या वेळीच गरेरो राज्यात या तुफानाने धुमाकूळ घातला. अकापुल्कोच्या शहराचे जास्तच नुकसान झाले; १० मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या आणि त्यात घरे, गाड्या, जनावरं, माणसं असं सर्वकाही वाहून गेलं. तुफान पुढे सरकत गेले, पण आधी जेथे रस्ते होते तेथे चक्क १० मीटर खोलीच्या गटारीच तयार झाल्या होत्या. द न्यूझ या वृत्तपत्रकानुसार, मेक्सिकोतल्या रेड क्रॉस संस्थेने अंदाज बांधला की, जवळजवळ ४०० लोक मरण पावले आणि दोन राज्यांमध्ये घरे नष्ट झाल्याने २०,००० ते २५,००० लोक उघड्यावर पडले. पण या विपत्तीतही ख्रिस्ती प्रीतीची काही हृदयस्पर्शी दृश्ये दिसून येत होती.
यहोवाचे लोक मदतीला धावून येतात
पॉलीन तुफानाची बातमी कळताच, मेक्सिकोतल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात, देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून साक्षीदारांचे फोन येऊ लागले आणि त्यांना मदत कशी करता येईल याची विचारपूस ते करू लागले. बाहेरच्या देशांकडूनही मदत मिळाली. लवकरात लवकर एक मदत कार्य समिती तयार करण्यात आली आणि कितीतरी टन अन्न, कपडे आणि इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्याशिवाय, बांधकामाचे साहित्य आणले गेले आणि एकदमच नष्ट झालेल्या किंवा थोडेफार नुकसान पोचलेल्या ३६० घरांच्या आणि कित्येक किंग्डम हॉल्सच्या दुरुस्तीला लागलीच सुरवात झाली. हजारो ख्रिस्ती भाऊ-बहिणी मदत करण्यात, मदतीचे साहित्य वेगवेगळे करून पॅक करून, त्या त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आणि त्यांचे वाटप करण्यात किंवा दुरुस्ती करण्यात गुंतलेले होते.
काही दुकानदारांना साक्षीदारांच्या या मदतीचे इतके कौतुक वाटले की, त्यांनी देखील अन्न, बांधकाम साहित्य आणि इतर वस्तू देणगी म्हणून दिल्या. इतर दुकानदारांनी आपल्या किंमती कमी केल्या. मदत मिळालेल्या साक्षीदारांना हे प्रेम पाहून आणि विशेषतः पाठवलेल्या वस्तूंसोबत आलेली उत्तेजनात्मक पत्रं वाचून अगदी गहिवरून आलं.
दुःखाची गोष्ट म्हणजे, होसे फाऊस्टीनो हा १८ वर्षांचा एक साक्षीदार आणि साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करणारे तिघेजण या तुफानात मृत्यूमुखी पडले. त्यांच्या नातेवाईकांनी, विशेषकरून होसेच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांचे आणि मंडळीने दिलेल्या उत्तेजनाचे आभार मानले.
काही सकारात्मक परिणाम
पॉलीन तुफानानंतर, पुष्कळ लोकांनी बायबलचा अभ्यास मागितला, अनेक साक्षीदारांच्या विश्वासात नसलेल्या नातेवाईकांनीसुद्धा. त्याचप्रमाणे, शेजारपाजारचे लोकही साक्षीदारांचा आशेचा संदेश ऐकून घेऊ लागले. साक्षीदारांनी बाकीच्या लोकांना देखील अन्न वाटण्यात मदत केली. एके प्रसंगी, आपल्या कंपनीने दान केलेल्या अन्न पदार्थांचे वाटप करायला यहोवाच्या साक्षीदारांची निवड का करण्यात आली असे एका माणसाला विचारले असताना तो म्हणाला: “कारण तुम्हा लोकांचे काम फार व्यवस्थित असतं आणि तुम्ही फार इमानदार आहात. शिवाय, कोणाला जास्त गरज आहे आणि कोणाला नाही हे तुम्हा लोकांनाच जास्त माहीत, कारण या क्षेत्रातल्या सर्वांना तुम्ही चांगले जाणून आहात.”
अंत समीप येतो तसे आणि या विपत्तींचे प्रमाण वाढत जाते तसे, प्रतिकूल परिस्थितींमध्येही बायबल तत्त्वांचे पालन होत असलेले पाहून केवढे उत्तेजन मिळते!
[११ पानांवरील चित्र]
बांधकामात लहान मुलं मदत करताना
[१२ पानांवरील चित्र]
पॉलीन तुफानानंतर वहाकामध्ये साक्षीदार नवीन किंग्डम हॉल बांधत असताना