जीवन कथा
मी विश्वासू लोकांचं आयुष्य बहरताना पाहिलंय
कधीकधी कोणाबरोबर बोललेल्या गोष्टी आपल्या वर्षानुवर्षं लक्षात राहतात. मलाही अशीच एक ५० वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते. मी आणि माझा मित्र केनियामध्ये होतो. आम्ही बरेच महिने प्रवास केला होता. त्यामुळे आम्ही दोघंही पार काळे पडलो होतो. मग असंच एका संध्याकाळी आम्ही दोघं शेकोटीसमोर बसून गप्पा मारत होतो. नुकतंच पाहिलेल्या एका धार्मिक पिक्चरवर आमची चर्चा चालली होती. तेव्हा माझा मित्र म्हणाला, “त्यात बायबलबद्दल चुकीचं सांगितलंय.”
मी हसलो, कारण मला नव्हतं वाटलं की त्याला धार्मिक विषयांमध्ये आवड असेल. मी त्याला म्हटलं “तुला काय माहितीये रे बायबलबद्दल?” त्याने लगेच उत्तर दिलं नाही. पण नंतर तो म्हणाला की त्याची आई एक यहोवाची साक्षीदार आहे. आणि त्याला बऱ्याच गोष्टी तिच्याकडून कळल्या आहेत. मग मलाही उत्सुकता लागली, म्हणून मी त्याला त्याबद्दल आणखी विचारलं.
आमची ही चर्चा रात्रभर रंगली. माझ्या मित्राने मला सांगितलं की बायबलमध्ये सैतानाला जगाचा शासक म्हटलंय. (योहा. १४:३०) कदाचित तुम्हाला ही गोष्ट लहानपणापासून माहीत असेल, पण माझ्यासाठी ती नवीन होती. ही गोष्ट ऐकल्यावर मी गोंधळात पडलो. कारण मला नेहमी वाटायचं की एक दयाळू आणि प्रेमळ देव या जगावर राज्य करतोय. पण खरंतर मी माझ्या आयुष्यात जे पाहिलं होतं, त्यावरून एक वेगळंच चित्र दिसत होतं. मी २६ वर्षांचाच होतो. तरी मी अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या, ज्या मला सतावत होत्या.
माझे बाबा अमेरिकेच्या वायू सेनेत पायलट होते. त्यामुळे तरुण असताना मला हे चांगलं माहीत होतं, की आण्विक युद्ध खरोखर होऊ शकतं. कारण लष्कर कोणत्याही क्षणी अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीत होतं. मी कॅलिफोर्नियात कॉलेजमध्ये असताना व्हियेतनाममधलं युद्ध सुरू होतं. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी या युद्धाविरुद्ध आंदोलनं करायला सुरुवात केली. पोलिस आमच्यावर लाठीमार करायचे, आम्हाला हाकलून लावायचे, कधीकधी तर अश्रुधूर सोडायचे. त्यामुळे आम्हाला पुढचं काहीच दिसायचं नाही आणि गुदमरल्यासारखं व्हायचं. तो काळ बंडाचा काळ होता. बघावं तिथे उलथापालथ चालली होती. राजकीय नेत्यांच्या हत्या होत होत्या. सगळीकडे आंदोलनं आणि दंगली चालू होत्या. देशात काय झालं पाहिजे याबद्दल प्रत्येकाचा वेगवेगळा विचार होता. सगळीकडे गोंधळच गोंधळ होता.
लंडनहून मध्य आफ्रिकेला
१९७० मध्ये, मी अलास्कामध्ये काम करायला सुरुवात केली आणि भरपूर पैसे कमवले. त्यानंतर मी लंडनला गेलो. तिथे एक मोटरसायकल विकत घेतली आणि कुठे जायचं याचा काहीही विचार न करता दक्षिण दिशेने प्रवास करायला सुरुवात केला. काही महिन्यांनंतर मी आफ्रिकेला जाऊन पोचलो. प्रवासात मला असे बरेच लोक भेटले, ज्यांना त्यांच्या समस्यांमधून सुटका हवी होती. कारण ते सगळे त्यांच्या परिस्थितीमुळे हैराण झाले होते.
हे सगळं ऐकून आणि बघून माझी खातरी पटली होती, की हे जग एक दुष्ट स्वर्गदूत चालवतोय असं जे बायबल म्हणतं ते बरोबर आहे. पण हे सगळं घडत असताना देव कुठे होता, हे मला कळत नव्हतं.
येणाऱ्या काही महिन्यात मला याचं उत्तर मिळालं. आणि पुढे आयुष्यात कठीण परिस्थितींतही खऱ्या देवाला विश्वासू राहणारे लोकसुद्धा मला भेटले.
उत्तर आयर्लंड—“बॉम्ब आणि बुलेटचा देश”
नंतर मी लंडनला परत गेलो आणि माझ्या मित्राच्या आईला भेटलो. त्यांनी मला बायबल दिलं. त्याच्या काही काळाने मी ॲमस्टरडॅमला गेलो. तिथे मला एका साक्षीदाराने रस्त्याच्या दिव्याखाली बायबल वाचताना पाहिलं. आणि त्यांनी मला बायबल शिकायला मदत केली. मग मी आयर्लंडला गेलो. तिथे मी यहोवाच्या साक्षीदारांचं शाखा कार्यालय शोधून काढलं. मी दरवाजावर थाप मारली, तेव्हा आर्थर मॅथ्यूज यांनी दरवाजा उघडला. ते खूप वर्षांपासून सत्यात होते. मी त्यांना बायबल अभ्यासाची विनंती केली आणि ते माझ्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार झाले.
मी अगदी मनापासून अभ्यासाला सुरुवात केली. मी बायबल तर वाचायचोच, पण त्यासोबतच साक्षीदारांची बरीच पुस्तकं आणि साहित्यही मी अक्षरशः अधाशासारखी वाचून काढली. आणि हे सगळं खूप मजेदार होतं. मी जेव्हा सभांना जायचो, तेव्हा मी पाहायचो की लहान-लहान मुलांनापण अशा प्रश्नांची उत्तर माहीत होती, जी मोठमोठ्या हुशार माणसांना वर्षानुवर्षं माहीत नव्हती. ‘हे जग एवढं दुष्ट का आहे? देव कोण आहे? मेल्यानंतर आपलं काय होतं?’ मी माझा जास्तीत जास्त वेळ साक्षीदारांसोबत घालवू लागलो. हे साहजिकच होतं म्हणा, कारण त्या देशात मी दुसऱ्या कोणालाही ओळखत नव्हतो. त्यांनी मला यहोवावर प्रेम करायला आणि त्याची इच्छा पूर्ण करायला शिकवलं.
नायजल, डेनिस आणि मी
१९७२ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला. त्याच्या एका वर्षानंतर, मी पायनियरिंग सुरू केली, आणि उत्तर आयर्लंडमधल्या न्यूरी इथल्या एका छोट्याशा मंडळीत सेवा सुरू केली. तिथे डोंगराच्या बाजूला मी एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. बाजूच्या शेतामध्ये गायी चरत असायच्या. मी त्यांच्यासमोर माझ्या भाषणाची तयारी करायचो. असं वाटायचं, त्या रवंथ करता-करता माझं भाषण ऐकत आहेत. त्यांनी मला कधी सल्ला दिला नाही, पण त्यामुळे मला श्रोत्यांकडे बघून भाषण देण्याची सवय लागली. मग १९७४ मध्ये, मला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. आणि नायजल पिट्ट यांनासुद्धा माझ्यासोबतच नेमण्यात आलं. पुढे नायजल आणि मी आयुष्यभराचे मित्र बनलो.
त्या काळात उत्तर आयर्लंडमध्ये खूप हिंसा चालली होती. म्हणूनच काहींनी या देशाला “बॉम्ब आणि बुलेटचा देश” असं नाव दिलं होतं. रस्त्यावर मारामाऱ्या चालायच्या, गोळीबार व्हायचा, कारमध्ये बॉम्ब ठेवले जायचे, दंगली व्हायच्या. आणि या सगळ्यामागे राजकीय आणि धार्मिक मुद्दे असायचे. पण, प्रोटेस्टंट आणि कॅथलिक या दोन्ही गटांना माहीत होतं की साक्षीदार राजकारणात कोणाचीच बाजू घेत नाहीत. त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त आणि सुरक्षितपणे प्रचार करू शकत होतो. सहसा लोकांना हे माहीत असायचं की दंगली कुठे आणि कधी उसळतील. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही जाऊ नये, म्हणून ते आम्हाला आधीच सावध करायचे.
असं असलं तरी धोक्याची परिस्थिती कधीच आली नाही असं झालं नाही. एक दिवस मी आणि डेनिस कॅरिगन जवळच्या एका शहरात प्रचार करायला गेलो होतो. डेनिससुद्धा पायनियर होता. त्या शहरात कोणीही साक्षीदार नव्हतं. आणि याआधी आम्ही तिथे फक्त एकदाच गेलो होतो. तिथे एका हॉटेलमध्ये असताना एका बाईने आमच्यावर ब्रिटिश हेर असल्याचा आरोप लावला. कारण आम्ही आयरिश लोकांसारखं बोलत नव्हतो. या आरोपामुळे आम्ही पार घाबरून गेलो. त्या काळात ब्रिटिश सैनिकांशी कोणी हसून जरी बोललं तरी त्यांना मारलं जायचं किंवा त्यांच्या गुडघ्यात गोळी घातली जायची. आम्ही तिथून बाहेर आलो आणि थंडीत कुडकुडत बसची वाट पाहू लागलो. मग त्या हॉटेलसमोर एक कार आली. तेव्हा ती बाई बाहेर आली आणि कारमधल्या दोन माणसांशी बोलू लागली आणि आमच्याकडे बोट दाखवू लागली. त्या माणसांनी गाडी हळूहळू आमच्याकडे आणली. त्यांनी आम्हाला बस कधी येणार वगैरे असे प्रश्न विचारले. जेव्हा बस आली तेव्हा ते ड्रायवरसोबत बोलले. त्यांचं काय बोलणं झालं ते आम्हाला ऐकू आलं नाही. बसमध्ये दुसरं कोणीच नव्हतं. म्हणून आम्ही विचार केला, ‘आता आमची खैर नाही. आमच्यासोबत काय होईल काय माहीत.’ कदाचित आम्हाला शहराबाहेर नेऊन आमचा कायमचा बंदोबस्त करतायत की काय, असं आम्हाला वाटलं. पण तसं काहीही झालं नाही. मी जेव्हा बसमधून उतरत होतो, तेव्हा मी ड्रायवरला विचारलं: “ती माणसं आमच्याबद्दल काही विचारत होती का?” तो म्हणाला: “मला माहीत आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही घाबरू नका. मी बोललो त्यांच्याशी. तुम्ही अगदी सुरक्षित आहात.”
मार्च १९७७, आमचा लग्नाचा दिवस
१९७६ मध्ये डब्लिन इथे एक प्रांतीय अधिवेशन झालं. तिथे मी पॉलिन लोमॅक्स हिला भेटलो. ती इंग्लंडवरून आलेली एक खास पायनियर होती. ती खूप विश्वासू होती. स्वभावाने प्रेमळ आणि नम्र होती. ती आणि तिचा भाऊ रे, लहानपणापासूनच सत्यात वाढले होते. आम्ही भेटल्यावर एका वर्षातच आमचं लग्न झालं. आणि आम्ही उत्तर आयर्लंडमधल्या बॅलिमेना इथे खास पायनियर म्हणून सेवा करू लागलो.
काही काळ आम्ही दोघं प्रवासी कार्यात होतो. तेव्हा आम्ही बेलफास्ट, लंडनडेरी आणि अशा बऱ्याच ठिकाणी सेवा केली. ही अशी ठिकाणं होती, जिथे कधीही हिंसाचार व्हायचा. पण आम्हाला भाऊबहिणींच्या विश्वासामुळे खूप प्रोत्साहन मिळालं. त्यांनी आपले धार्मिक विश्वास, मतभेद आणि शत्रुत्व बाजूला ठेवून यहोवाची सेवा करायला सुरुवात केली होती. आणि यहोवानेही त्यांना आशीर्वाद दिले आणि सुरक्षित ठेवलं.
आम्ही दहा वर्षं आयर्लंडमध्ये राहिलो. त्यानंतर १९८१ मध्ये आम्हाला गिलियड प्रशालेच्या ७२ व्या क्लाससाठी जाण्याचं आमंत्रण मिळालं. तिथून आम्हाला पश्चिम आफ्रिकेच्या सिएरा लियोन इथे जाण्याची नेमणूक मिळाली.
सिएरा लियोन—गरिबीतही विश्वासू असणारे भाऊबहीण
आम्ही एका मोठ्या घरात ११ भाऊबहिणींसोबत राहायचो. आम्ही सगळे जण एक किचन, तीन टॉयलेट, दोन बाथरूम, एक फोन, एक वॉशिंग मशीन आणि एक कपड्यांचा ड्रायर वापरायचो. तिथे कधीही वीज जायची, काहीही भरवसा नसायचा. छतावर कायम उंदीर फिरत असायचे आणि तळघरात नागही असायचे.
गिनीमधल्या अधिवेशनाला जाण्यासाठी नदी ओलांडताना
तिथे राहणं जरा कठीण होतं, पण प्रचार करायला खूप मजा यायची. कारण तिथले लोक बायबलचा आदर करायचे आणि लक्ष देऊन ऐकायचे. आणि बरेच जण सत्यातही आले. तिथले लोक मला “मिस्टर रॉबर्ट” म्हणून हाक मारायचे. आणि पॉलिनला ते “मिसेस रॉबर्ट” म्हणायचे. पण काही काळानंतर मी शाखा कार्यालयाच्या कामात खूप व्यस्त झालो. त्यामुळे माझा जास्त वेळ त्या कामातच जायचा. पण पॉलिन नेहमी जायची प्रचाराला. म्हणून लोक तिला “मिसेस पॉलिन” म्हणायला लागले आणि मला “मिस्टर पॉलिन.” पॉलिनला याची खूप मजा वाटायची.
सिएरा लियोनमध्ये प्रचाराच्या मोहिमेला जाताना
तिथले बरेच भाऊबहीण खूप गरीब होते. पण यहोवाने नेहमी त्यांच्या गरजा पुरवल्या. कधीकधी तर एक चमत्कारच झालाय असं वाटायचं. (मत्त. ६:३३) मला एक बहीण आठवते, जिच्याकडे फक्त त्याच दिवसापुरते पैसे होते. आणि त्यात ती फक्त तिच्यासाठी आणि तिच्या मुलांसाठी जेवण विकत घेऊ शकत होती. पण तिने तिचे सगळे पैसे एका आजारी भावाला देऊन टाकले, कारण मलेरियाची औषधं घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. मग अचानक त्याच दिवशी, एक बाई त्या बहिणीकडे केस कापण्यासाठी आली. आणि तिला त्या दिवसापुरते पैसे मिळाले. असे आम्ही कित्येक अनुभव पाहिलेत.
नाइजीरिया—एका नवीन संस्कृतीशी जुळवून घेणं
आम्ही नऊ वर्षं सिएरा लियोनमध्ये होतो. नंतर आम्हाला नाइजीरिया बेथेलमध्ये पाठवण्यात आलं. तिथलं शाखा कार्यालय खूप मोठं होतं. माझ्यासाठी तिथे काम करणं नवीन नव्हतं. कारण मी सिएरा लियोनमध्येही हेच काम करत होतो. पण पॉलिनसाठी हा एक खूप मोठा आणि कठीण बदल होता. कारण ती दर महिन्याला १३० तास प्रचार करायची आणि तिच्याकडे चांगले बायबल अभ्याससुद्धा होते. पण बेथेलमध्ये आता तिला शिलाई काम दिलं होतं. त्यामुळे तिला जुळवून घ्यायला थोडा वेळ लागत होता, पण नंतर तिला कळलं की भाऊबहीण तिच्या कामाची किती कदर करतात. आणि म्हणून तिने बेथेलमधल्या बाकीच्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्याकडे लक्ष दिलं.
नाइजीरियाची संस्कृती आमच्यासाठी नवीन होती. आम्हाला बरंच काही शिकायचं होतं. एकदा एक भाऊ एका बहिणीला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये भेटायला आला. ती नुकतीच बेथेलमध्ये आली होती. मी हात मिळवायला हात पुढे केला, तर ती चक्क खाली वाकून माझ्या पाया पडू लागली. मी थक्कच झालो! माझ्या डोक्यात लगेच दोन वचनं आली. प्रेषितांची कार्यं १०:२५, २६ आणि प्रकटीकरण १९:१०. माझ्या मनात विचार आला, ‘मी तिला थांबवायला हवं का?’ पण त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की ती बेथेलमध्ये आली आहे; बायबल काय शिकवतं हे तिला नक्की माहीत असेल.
नंतर मी जितका वेळ या बहिणीबरोबर बोलत होतो, मला लाजल्यासारखं वाटत होतं. मग मी तिथल्या भाऊबहिणींकडे थोडी विचारपूस केली. तेव्हा मला कळलं की ती बहीण तिथल्या रितीप्रमाणे वागत होती. देशाच्या काही भागात अजूनही तशीच रीत होती. पुरुषसुद्धा अशाच प्रकारे खाली वाकून नमस्कार करायचे. पण हा उपासनेचा भाग नव्हता, तर ते असाच आदर दाखवायचे. आणि असं आपल्याला बायबलमध्येसुद्धा वाचायला मिळतं. (१ शमु. २४:८) बरं झालं मी त्या बहिणीला असं काही बोललो नाही, ज्यामुळे तिला नंतर वाईट वाटलं असतं.
आम्ही नाइजीरियातल्या अशा बऱ्याच भाऊबहिणींना भेटलो, जे वर्षानुवर्षं यहोवाला विश्वासू होते. मला तुम्हाला आयझया ॲडगबोनाa यांचं उदाहरण सांगायचंय. तरुण असतानाच तो सत्य शिकला होता. पण पुढे त्याला कुष्ठरोग झाला. त्यामुळे त्याला कुष्ठरोग्यांच्या वस्तीत पाठवण्यात आलं. तिथे तो एकटाच साक्षीदार होता. तिथे विरोध होत असतानाही, त्याने ३० पेक्षा जास्त कुष्ठरोग्यांना सत्य शिकायला मदत केली. इतकंच काय, तर त्याने त्या वस्तीत एक मंडळीसुद्धा सुरू केली.
केनिया—तिथले भाऊ माझ्याशी धीराने वागले
केनियामध्ये, आईने सोडून दिलेलं गेंड्याचं पिल्लू
१९९६ मध्ये आम्हाला केनिया शाखेत पाठवण्यात आलं. सुरुवातीला मी ज्या गोष्टीबद्दल सांगितलं होतं, त्यानंतर मी केनियात पहिल्यांदाच जात होतो. आम्ही बेथेलमध्ये राहिलो. तिथे सतत माकडं यायची. कधीकधी आपल्या बहिणी जेव्हा फळं घेऊन जायच्या तेव्हा ती त्यांच्या हातून फळं हिसकावून घ्यायची. एक दिवशी एका बहिणीकडून तिच्या खोलीची खिडकी उघडी राहिली. ती आल्यावर बघते तर काय माकडांची टोळी मस्त मजेत फळं खात होती. त्यांना बघून ती बहीण जोरात ओरडून खोलीबाहेर पळाली. आणि ती माकडंपण चीं-चीं करत खिडकीबाहेर पळून गेली.
मग मी आणि पॉलिनने स्वाहिली भाषेच्या एका मंडळीत सेवा करायला सुरुवात केली. नंतर मला मंडळीचा पुस्तक अभ्यास घेण्यासाठी नेमण्यात आलं. आज आपण त्याला मंडळीचा बायबल अभ्यास म्हणतो. मला स्वाहिली भाषा नीट येत नव्हती. पण मला प्रश्न वाचता यावेत म्हणून मी आधीच तयारी करायचो. पण जर भाऊबहिणींनी थोडी वेगळी उत्तरं दिली, तर मी पार गडबडून जायचो. कारण ते काय बोलत आहेत हे मला काहीच समजायचं नाही. आणि मला खूप लाजल्यासारखं व्हायचं. मला भाऊबहिणींबद्दल खूप वाईट वाटत होतं. मला त्यांची भाषा येत नव्हती, तरी त्यांनी धीराने मला समजून घेतलं.
अमेरिका—भाऊबहीण समृद्ध असूनही विश्वासू
आम्ही केनियामध्ये जेमतेम वर्षभर होतो. मग आम्हाला १९९७ मध्ये ब्रुकलिन बेथेलमध्ये बोलवण्यात आलं. अमेरिका हा एक श्रीमंत देश आहे. पण श्रीमंतीसुद्धा एक समस्या ठरू शकते. (नीति. ३०:८, ९) पण या देशातही भाऊबहिणी विश्वासाने यहोवाची सेवा करतात. ते आपला वेळ आणि साधनं स्वतःला श्रीमंत बनवण्यासाठी नाही, तर यहोवाच्या संघटनेला हातभार लावण्यासाठी वापरतात.
इतक्या वर्षांत, भाऊबहिणींनी वेगवेगळ्या परिस्थितींत जो विश्वास दाखवलाय तो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलाय. आयर्लंडमध्ये हिंसा होत असतानाही त्यांनी विश्वास दाखवला. आफ्रिकेत गरिबी असूनही तिथल्या भाऊबहिणींचा विश्वास कमी झाला नाही. अमेरिकेत इतकी श्रीमंती असूनही त्यांनी विश्वास सोडून दिला नाही. आपले भाऊबहीण जेव्हा वेगवेगळ्या परिस्थितींतही विश्वासू राहतात, तेव्हा हे पाहून आपला स्वर्गातला पिता नक्कीच खूश होत असेल, नाही का?
पॉलिनसोबत वॉरविक बेथेलमध्ये
बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्याची वर्षं “विणकराच्या यंत्रापेक्षाही वेगाने सरत” गेली आहेत. (ईयो. ७:६) आता आम्ही वॉरविक इथे जागतिक मुख्यालयात सेवा करतोय. आम्हाला अशा लोकांबरोबर सेवा करण्याचा सन्मान मिळालाय, जे खरोखरच एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. आपला राजा येशू ख्रिस्त याला मदत करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो, ते आम्ही आनंदाने आणि समाधानाने करतोय. आणि आपला हा प्रेमळ राजा लवकरच त्याच्या विश्वासू लोकांना भरभरून आशीर्वाद देईल.—मत्त. २५:३४.
a १ एप्रिल १९९८ च्या टेहळणी बुरूज अंकात पान क्रमांक २२-२७ वर आयझया ॲडगबोना यांची जीवन कथा तुम्हाला वाचायला मिळेल. २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.