वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. ७-१०
  • सदासर्वदाचे—सुरक्षित जीवन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सदासर्वदाचे—सुरक्षित जीवन
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सुरक्षित सुरवातीचा पूर्णतः अंत
  • आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या
  • “आता तुमच्या यहोवा देवाला बोलवा ना”
  • नीतिमत्ता, स्वास्थ्य आणि निर्भयता
  • सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल
    सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल
  • खरी सुरक्षितता आज व सर्वदा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सुरक्षित जीवनाच्या शोधात
    सावध राहा!—१९९८
  • असुरक्षिततेच्या भावनांवर कशी मात कराल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. ७-१०

सदासर्वदाचे—सुरक्षित जीवन

तुम्हाला खूप ताप येतो तेव्हा डोकेदुःखी घालवण्यासाठी सहसा तुम्ही एखादी गोळी घेता किंवा कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवता. या गोळीने किंवा थंड पाण्याच्या पट्ट्यांनी तापाची लक्षणे नाहीशी होतात खरी, पण तसे पाहिले तर तापाचे मूळ कारण काढून टाकण्यासाठी काहीच केलेले नसते. आणि तुमची तब्येत आणखीनच खराब असली, तर कोणा अनुभवी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो.

मानवजातीलाही असुरक्षिततेचा ताप चढला आहे; तो ताप काही केल्या उतरत नाहीय. आपल्याला आराम वाटावा म्हणून आपण घरच्या घरीच काही तरी उपाय करतो खरे, पण आपल्याला नेमके काय झाले आहे ते जाणून घेणाऱ्‍या कोणा तज्ज्ञाकडे गेल्याशिवाय आपण बरे होऊ शकत नाही. आणि या बाबतीत आपला निर्माणकर्ता, यहोवा देव याच्याशिवाय मानवजातीबद्दल आणखी कोणालाच उत्तम माहिती नाही. आपल्यावर आलेल्या समस्यांमुळे आपले जीवन असुरक्षित झाले आहे हे तो जाणून आहे.

सुरक्षित सुरवातीचा पूर्णतः अंत

देवाचे वचन आपल्याला सविस्तर माहिती देते की, यहोवा देवाने पहिल्या मानवी जोडप्याला परिपूर्ण असे निर्माण करून त्यांना एका सुरक्षित वातावरणात ठेवले होते. त्यांना चिंता काय गोष्ट आहे हे माहीतच नव्हते. मानवांनी संपूर्ण सुरक्षिततेत सदासर्वकाळ परादीसमध्ये जगावे हाच देवाचा मूळचा उद्देश होता. मानवांना जेथे ठेवण्यात आले होते तेथे “दिसण्यात सुंदर व अन्‍नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे” होती. त्यांच्या सर्व शारीरिक गरजा त्याचप्रमाणे भावनिक गरजाही पूर्ण केल्या होत्या याची नोंद घ्या कारण तेथील वातावरण “दिसण्यात सुंदर” होते असे म्हटले आहे. याचाच अर्थ, पहिल्या मानवी जोडप्याचे जीवन स्थिर आणि त्रासमुक्‍त असेल अशा ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले होते.—उत्पत्ति २:९.

आदाम आणि हव्वेने देवाचा प्रेमळ सार्वभौम अधिकार झिडकारला आणि तेव्हापासूनच शंका, भीती, लाज, दोष आणि असुरक्षितपणा यांची सुरवात झाली. देवाला सोडून दिल्यावर, आदाम ‘भ्यायला’ हे त्याने कबूल केले. या पहिल्या मानवांनी स्वतःचे अंग झाकून घेतले आणि त्यांच्या प्रेमळ निर्माणकर्त्यापासून ते लपले; याच निर्माणकर्त्यासोबत आतापर्यंत ते मनमोकळेपणाने राहत होते आणि त्याचा फायदाही त्यांना होत होता.—उत्पत्ति ३:१-५, ८-१०.

पण, यहोवाच्या मूळ उद्देशात तीळमात्र फरक झालेला नाही. बायबल सांगते की, आपला निर्माणकर्ता हा प्रेमळ देव आहे; त्याच्या साहाय्याने मानवजात लवकरच या पृथ्वीचे रूपांतर एका बागेसमान परिस्थितीत करू शकतील आणि तेथे नेहमीसाठी सुरक्षिततेत जगू शकतील. संदेष्ट्या यशयाद्वारे असे वचन देण्यात आले आहे: “मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो. . . तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा.” (यशया ६५:१७, १८) याच नवीन आकाश आणि पृथ्वीविषयी प्रेषित पेत्र म्हणतो की, त्यामध्ये “नीतिमत्त्व वास करिते.”—२ पेत्र ३:१३.

हे कसे साध्य होईल? यहोवाने स्थापन केलेल्या एका सरकाराकरवी. याच राज्यासाठी प्रार्थना करायला येशू ख्रिस्ताने त्याच्या अनुयायांना शिकवले: “हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.

मानवी सरकारांऐवजी देवाचे राज्य शासन करील आणि लोकांना आवडेल अशा पद्धतीने संबंध पृथ्वीवर देवाचा उद्देश साकार करील. (दानीएल २:४४) आदामाच्या काळापासून मानवजात शंका, भीती, लाज, दोष आणि असुरक्षिततेने ग्रासून गेले आहेत; हे सर्व नाहीसे केले जाईल. बायबलमध्ये सांगितल्यानुसार, ते राज्य अगदी जवळ येऊन ठेपले आहे. देवाचे राज्य यावे अशी ज्यांना उत्कट इच्छा आहे त्यांना आताच्या या असुरक्षित जगातही थोडीफार सुरक्षा लाभते.

आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या

दावीद हा देवाचा सेवक होता; भीती काय असते आणि संकट म्हणजे काय हे त्याने चांगलेच अनुभवले होते. तरीही स्तोत्र ४:८ मध्ये दावीदाने असे लिहिले: “मी स्वस्थपणे पडून लागलीच झोपी जातो, कारण हे, परमेश्‍वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस.” (तिरपे वळण आमचे.) काहीवेळा दावीद समस्यांनी घेरलेला असायचा तरीही यहोवा त्याला निर्भय ठेवायचा. यावरून आपल्याला काही शिकायला मिळते का? असुरक्षित जगात राहूनही आपण थोडीफार सुरक्षा कशी प्राप्त करू शकतो?

उत्पत्तीमधील आदाम आणि हव्वेच्या अहवालाचा विचार करा. त्यांना असुरक्षित केव्हा वाटू लागले? निर्माणकर्त्यासोबत त्यांचे व्यक्‍तिगत नाते त्यांनी तोडले आणि मानवजातीकरता असलेल्या त्याच्या उद्देशानुरूप चालायचे नाकारले त्या क्षणी. म्हणूनच, आपण जर याच्या उलट केले, म्हणजेच यहोवाच्या अगदी जवळ गेलो आणि त्याच्या इच्छेनुरूप जगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आतासुद्धा फार सुरक्षित जीवन जगता येईल.

बायबलचा अभ्यास करून यहोवाला जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला जीवनाचा अर्थ समजू लागतो. तेव्हाच आपण कोण आहोत आणि येथे का आलो आहोत हे आपल्याला उमजेल. देवावर आपण प्रीती केली, मानवजातीकरता त्याचा उद्देश काय हे जाणून घेतले आणि त्या उद्देशात आपला काय भाग आहे हे समजून घेतले तरच आपल्याला सुरक्षित वाटू शकेल. कित्येक वर्षांपूर्वी पॉल नावाच्या एका व्यक्‍तीला याचा प्रत्यय आला.

जर्मनीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या बेटावर पॉलचा जन्म झाला होता आणि तेथेच तो लहानाचा मोठाही झाला. त्याच्या पालकांना दुसऱ्‍या महायुद्धाच्या दरम्यान फार वाईट अनुभव आला होता म्हणून त्याच्या घरात कोणीही धर्म मानत नव्हते. तरुण असताना पॉल कसा होता त्याविषयी तो म्हणतो: “माझा कशावरच विश्‍वास नव्हता आणि मी कोणाशी धड नीट वागतही नव्हतो. दारू पिऊन मी माझे दुःख विसरायचा प्रयत्न करायचो; आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी मी पिऊन तर्रर्र व्हायचो. मला सतत असुरक्षित वाटायचे.”

मग एकदा पॉल यहोवाच्या साक्षीदारांशी बोलला. पॉलने खूप वाद घातला, पण साक्षीदाराने सांगितलेली एक गोष्ट त्याच्या मनात घर करून राहिली. “कोणतीही गोष्ट आपोआप होत नसते.” म्हणजेच, निसर्गात आपल्याला दिसणाऱ्‍या सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता असलाच पाहिजे.

“मी त्यावर खूप विचार केला आणि शेवटी मला मान्य करावंच लागलं.” मग, पॉलने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केला आणि यहोवा कोण आहे हे जाणून घेतले. तो म्हणतो: “माझ्या पालकांनंतर यहोवा ही एकच व्यक्‍ती होती जिने माझ्यासाठी सर्वकाही केलं.” १९७७ साली पॉलचा बाप्तिस्मा झाला आणि तो एक साक्षीदार बनला. तो म्हणतो: “जीवनाचा उद्देश काय आहे हे मला आता ठाऊक झालाय. यहोवाच्या इच्छेनुरूप राहायला मला आवडतं. मला निर्भय वाटतं कारण मला किंवा माझ्या घरातल्यांना काही होईल आणि यहोवाला भविष्यात ते ठीक करता येणार नाही असं काहीच नाही.”

या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळते? पॉलच्या मनावर जो ताण होता, त्याला जी असुरक्षितता वाटायची त्यावर तो मात करू शकला—भौतिक धनसंपत्तीवर नव्हे तर आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून. निर्माणकर्त्यासोबत आपला नातेसंबंध त्याने मजबूत केला. लाखो यहोवाच्या साक्षीदारांचाही देवासोबत असाच नातेसंबंध आहे. यामुळे इतरांसाठी आत्मत्याग करायला त्यांना एक प्रकारची शक्‍ती मिळते. यहोवाचे साक्षीदार, वेळ काढून लोकांच्या घरी जातात आणि त्यांना आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला लावून स्वतःचे जीवन सुरक्षित करण्यासाठी मदत देतात. पण साक्षीदार केवळ प्रचारच करत नाहीत.

“आता तुमच्या यहोवा देवाला बोलवा ना”

जुलै १९९७ मध्ये, ओडेर नदीला पूर येऊन उत्तर युरोपच्या पुष्कळशा भागांमध्ये पाणी भरले तेव्हा जर्मनीतल्या यहोवाच्या साक्षीदारांना शेजारच्या पोलंड राष्ट्रामधील लोकांची दयनीय अवस्था कळली. मग त्यांनी काय केले? बर्लिनमधील आणि सभोवतालच्या प्रदेशातील साक्षीदारांनी काही दिवसांतच ४६ लाख ४० हजारांहून अधिक रक्कम गोळा करून केवढी उदारता दाखवली!

बांधकामाचा अनुभव असलेल्यांना बर्लिनपासून पोलंड येथील व्रोतस्लॉवच्या जवळपासच्या भागांपर्यंत यायला सहा तासांचा प्रवास करावा लागला; हे सर्व त्यांनी स्वतःच्या खर्चाने केले. एका लहानशा गावात, पुष्कळशा घरांना खूप नुकसान पोहंचले होते. एका साक्षीदार कुटुंबाच्या घराभोवती तर २० फूट पाणी जमा झाले होते. पुढच्या महिन्यात त्या घरातल्या मुलीचे लग्न होणार होते आणि लग्नानंतर ती आपल्या पतीसोबत तेथेच राहणार होती. पण या कुटुंबाचे तर सगळे काही नष्ट झाले होते. आता त्यांची मदत कोण करणार? त्यांच्या घराचे काय?

पूराचे पाणी निचरल्यावर, शेजारच्या माणसाने टोमणा देत म्हटले: “आता तुमच्या यहोवा देवाला बोलवा ना, तो नाही का मदत करणार?” पण दुसऱ्‍याच दिवशी जर्मनीहून आलेल्या मोटार गाड्या एका मागोमाग येऊन त्या घरासमोर थांबल्या तेव्हा शेजारी पाहतच राहिले! गाड्यांमधून काही अनोळखी लोक उतरले आणि भराभरा घराची दुरुस्ती करू लागले. “कोण आहेत हो हे? आणि हा सगळा खर्च कोण करतंय?” असे विचारल्याशिवाय त्या शेजाऱ्‍याला राहावले नाही. साक्षीदार कुटुंबाने समजावून सांगितले की, हे त्यांचे आध्यात्मिक भाऊ होते आणि त्यांनीच सर्व साहित्यांचा खर्च केला होता. त्या घराची दुरुस्ती झाली आणि तेथील आजूबाजूचे लोक अवाक्‌ होऊन पाहतच राहिले. सुदैवाने, लग्न ठरलेल्या दिवशीच पार पडले.

यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचा भाग असल्याने केवळ आध्यात्मिक लाभच मिळत नाहीत तर या असुरक्षित जगात थोडीफार सुरक्षाही लाभते याचा प्रत्यय त्या कुटुंबाला आला. असा अनुभव त्यांच्या एकट्यांनाच आला नाही. त्या सबंध पूरग्रस्त भागात, यहोवाच्या साक्षीदारांच्या कितीतरी घरांची आणि किंग्डम हॉल्सची दुरुस्ती करण्यात आली. साक्षीदार नसलेल्या शेजाऱ्‍यांनाही मदत देण्यात आली. त्यांच्या घरांचीसुद्धा पुष्कळशी दुरुस्ती करण्यात आली आणि त्यांनी त्यांचे आभार मानले.

नीतिमत्ता, स्वास्थ्य आणि निर्भयता

फणफणत्या तापातून आपण एकदम बरे झाल्यावर, ज्या डॉक्टरांमुळे आपण बरे झालो त्यांचे आपण किती आभार मानतो! त्याचप्रमाणे, मानवजातीला ग्रासून टाकलेला असुरक्षिततेचा ज्वर—देवाच्या राज्याकरवी—नेहमीसाठी काढून टाकला जाईल तेव्हा आपल्या निर्माणकर्त्याचे आपण किती आभार मानू! होय, “[नीतिमत्तेचे] फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.” केवढी भव्य प्रत्याशा!—यशया ३२:१७.

[१० पानांवरील संक्षिप्त आशय]

भौतिक धनसंपत्तीवर नव्हे तर आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून आपण मनावरचा ताण घालवू शकतो

[८, ९पानांवरील चित्र]

देव नव्या जगाचे अभिवचन देतो जेथे सर्वांना सर्वकाळची सुरक्षा मिळेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा