सुरक्षित जीवनाच्या शोधात
सुरक्षिततेबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते आहेत. एकाला नोकरी म्हणजे सुरक्षितता; तर दुसऱ्याला धन म्हणजे सुरक्षितता; आणखी तिसऱ्या व्यक्तीला गुन्हेगारी नसलेले जग म्हणजे सुरक्षितता. पण तुमचे मत याहून काही वेगळे आहे का?
तुमचे मत काहीही असले, तरी स्वतःचे जीवन होता होईल तितके सुरक्षित बनवायला तुम्ही पण निश्चितच खटपट करत असाल. स्वतःचे जीवन सुरक्षित करण्याकरता युरोपमधील लोक काय करत आहेत ते पाहा.
उच्च शिक्षण
युरोपियन कमिशनचे अध्यक्ष झाक सॉन्ते यांच्या मते, युरोपीय संघात २० टक्के तरुणतरुणी बेकार आहेत. त्यामुळे, मला सुरक्षा देणारी पक्की नोकरी कशी मिळेल हा एकच प्रश्न त्या वयोगटातल्या लोकांना अधिक महत्त्वाचा वाटतो. अनेकांच्या मते, अशी नोकरी मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उच्च शिक्षण; लंडनच्या द संडे टाईम्स नुसार, उच्च शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना “नोकरी मिळवण्याचा जास्त वाव असतो.”
उदाहरणार्थ, जर्मनीमध्ये “शिक्षणाला आणि पदवीला कधी नव्हते इतके महत्त्व दिले जाऊ लागले आहे,” असे वृत्त नॉसाऊइशे नॉइए प्रेस देते. त्या देशात, विद्यापीठातून पदवी प्राप्त करायला एका विद्यार्थ्याला साधारणतः २२,००,००० रुपयांचा खर्च होत असला तरीही त्यांना शिक्षण आणि पदवी महत्त्वाची वाटते.
शिक्षणाला जे महत्त्व देतात आणि आपल्याला चांगली पक्की नोकरी मिळावी असे ज्यांना वाटते त्या तरुणांचे खरोखरच कौतुक केले पाहिजे. त्यातल्या त्यात, कोणाकडे खास कौशल्य किंवा शैक्षणिक पात्रता असली तर नोकरी शोधताना त्यांना त्याचा अधिकच फायदा होतो. पण उच्च शिक्षण हाती असल्यावर नोकरी मिळण्याची खात्री असते का? एक विद्यार्थीनी म्हणाली: “माझ्या या शिक्षणामुळे पुढं माझं करियर बनू शकणार नाही, शिवाय मला कायमची नोकरी मिळणार नाही हे मला आधीपासूनच ठाऊक होतं.” या तरुणीची गोष्ट काही वेगळी नाही. एका अलीकडील वर्षातच, जर्मनीमध्ये बेकार असलेल्या पदवीधर लोकांचे प्रमाण अगदी टोकाला गेले.
एका वृत्तपत्रानुसार, फ्रान्समध्ये, तरुणांमधील बेकारीचे प्रमाण वाढल्यामुळे बारावीला कोणी विचारतही नाही आणि म्हणून तरुणतरुणी विद्यापीठात जातात. तरीही, विद्यापीठात शिकणाऱ्या या अनेक विद्यार्थ्यांना हे ठाऊक असते की, “फक्त पदवी मिळवून फायदा नसतो.” दि इंडीपेंडंट नुसार, ब्रिटनमध्ये, “शिक्षणाच्या दबावाखाली विद्यार्थी दबले जात आहेत.” असुरक्षित जीवनाला तोंड कसे द्यायचे यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे तर सोडाच, पण विद्यापीठातील जीवनामुळे उलट खिन्नता, चिंता आणि कम-स्वाभिमान यांसारख्या समस्या निर्माण होतात.
सहसा, हातात एखादे कला-कौशल्य असल्यामुळे किंवा कामाचे व्यावहारिक ज्ञान असल्यामुळे जितक्या सहजपणे चांगली नोकरी मिळू शकते तितक्याच सहजपणे डिग्री मिळवून नोकरी मिळत नाही.
दहा हजार वस्तू पुरेत?
अनेकांना असे वाटते की, धनसंपत्तीमुळे माणसाचे जीवन सुरक्षित होते. यात खरोखर तथ्य आहे असे आपल्याला वाटेल, कारण बँकेत पुरेसा पैसा असला म्हणजे संकटकाळी तो कामाला येतो. बायबलही म्हणते, की ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ (उपदेशक ७:१२) परंतु, अमाप धनसंपत्तीने एखाद्या व्यक्तीचे जीवन आणखीनच सुरक्षित बनते हे खरे आहे का?
नेहमीच हे खरे ठरत नाही. गेल्या ५० वर्षांमध्ये धनसंपत्ती किती वाढली आहे याचा विचार करा. दुसरे महायुद्ध संपले तेव्हा, जर्मन लोकांमधील बहुतेकांकडे काही म्हणजे काहीच नव्हते. आज मात्र, एक जर्मन वृत्तपत्र सांगते की, एका सर्वसाधारण जर्मन व्यक्तीजवळ १०,००० वस्तू आहेत. आर्थिक आढावे खरे ठरले तर, येत्या पिढींकडे त्याहीपेक्षा अधिक वस्तू असतील. पण धनसंपत्ती जमा केल्याने जीवन अधिकच सुरक्षित बनते का? नाही, जर्मनीत घेतलेल्या एका सर्वेनुसार ३ व्यक्तींपैकी २ व्यक्तींच्या मते, २०-३० वर्षांपूर्वी जीवन जितके सुरक्षित वाटायचे तितके आज राहिलेले नाही. याचाच अर्थ, धनसंपत्ती वाढल्याने लोकांना सुरक्षा जाणवत नाही.
हे पटण्यासारखे आहे कारण आधीच्या लेखात सांगितल्यानुसार असुरक्षितपणा हा मानसिक ताण आहे. आणि मानसिक ताण भौतिक संपत्तीने पूर्णपणे घालवण्यासारखा नसतो. पैशामुळे गरिबीची झळ इतकी लागत नाही आणि अडीअडचणीच्या काळातही पैसा मदतीला येतो हे मान्य आहे. पण काही वेळा, पैशांची चणचण भासत असताना जितका त्रास होतो तितकाच त्रास श्रीमंतीनेही होतो.
म्हणून, भौतिक वस्तूंना आवश्यक तेवढेच महत्त्व दिल्यास, आपल्याला हे लक्षात ठेवायला मदत होईल की, धनसंपत्तीचा फायदा होत असला तरी सुरक्षित जीवनामागील ते प्रमुख कारण नाही. येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने आपल्या शिष्यांना उत्तेजन देत म्हटले: “कोणाजवळ पुष्कळ संपत्ति असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” (लूक १२:१५) जीवनात पूर्ण सुरक्षा हवी असल्यास, भौतिक संपत्तीच तेवढी पुरेशी नसते.
वयस्कर लोकांना, काही वस्तू मोलवान असतात म्हणून प्रिय वाटत नसतात तर त्यांच्याशी त्यांच्या काही जुन्या आठवणी जुळलेल्या असतात म्हणून. या वयस्करांना धनसंपत्तीपेक्षा आपल्या प्राणाला धोका आहे याचीच जास्त चिंता वाटत असते.
सावधान!
“गुन्हेगारीची . . . समस्या, गेल्या ३० वर्षांपासून सबंध जगभरात वाढत चालली आहे,” असे ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे व्यावहारिक मार्ग (इंग्रजी) या पुस्तिकेत म्हटले आहे. पोलिसांना तर रात्रंदिवस आराम नाही. काही लोक या परिस्थितीला कसे तोंड देत आहेत?
व्यक्तिगत सुरक्षेची सुरवात घरातूनच होते. उदाहरणार्थ स्वीत्झर्लंडमध्ये, चोरांपासून सुरक्षित असलेली घरे बांधणे हे एका आर्किटेक्टची खासियत आहे; त्या घरांना सुरक्षा कुलुपे असतात, मजबूत दरवाजे असतात आणि खिडक्यांना सळ्या बसवलेल्या असतात. या घरांचे मालक, “स्वतःचे घर म्हणजे महल” असेच समजतात. फोकस या बातमीपत्रकानुसार, या घरांची किंमत फार जास्त असते, पण तरीही त्यांची मागणी तितकीच जास्त आहे.
घरामध्ये आणि घराबाहेर आणखी सुरक्षित वाटावे म्हणून काही ठिकाणी लोकांनी आपल्या परिसरावर पहारा ठेवण्याच्या काही स्किम्स तयार केल्या आहेत. शहराच्या बाहेर राहणाऱ्या काही लोकांनी तर सुरक्षा कंपनींना पैसे देऊन आपल्या परिसरात ठरलेल्या वेळी फेऱ्या मारायला सांगितले आहे. अनेकांना वाटते की, रात्रीच्या वेळी एकान्त असलेल्या रस्त्यांवरून एकट्या-दुकट्यांचे जाणे-येणे बरे नाही. शिवाय, आपल्या मुलांविषयी स्वभावतः चिंतीत असलेले पालक त्यांचे रक्षण करायला कदाचित जास्त काळजी घेतील. या पानावरील पेटीत दिलेल्या सूचना वाचून पाहा.
पण सर्वांनाच चोरांपासून सुरक्षित असलेली घरे घेण्याची ऐपत नाही. शिवाय, परिसरांवर पहारा ठेवणाऱ्या स्किम्समुळे आणि सुरक्षा कंपनींच्या फेऱ्यांमुळे एकंदर गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होणार नाही; फरक एवढाच होईल की, तिकडे होणाऱ्या चोऱ्या सुरक्षा नसलेल्या दुसऱ्या ठिकाणी होऊ लागतील. म्हणून गुन्हेगारीमुळे लोकांच्या जीवाला असलेला धोका काही संपत नाही. आपले जीवन सुरक्षित बनवण्यासाठी गुन्हेगारीचा बंदोबस्त करायचा फक्त प्रयत्न करून चालणार नाही.
रोगावर उपाय करा—फक्त लक्षणांवर नव्हे
आपल्या प्रत्येकाला आपले जीवन सुरक्षित असावे असे स्वभावतःच वाटते आणि म्हणून आपल्या परीने आपण जे काही करतो त्यात काही गैर नसते. पण आपल्या जीवनाला असुरक्षित करणारी गुन्हेगारी, बेकारी आणि बाकीच्या इतर गोष्टी मानवजातीला ग्रासून टाकलेल्या एका रोगाची फक्त लक्षणे आहेत. या रोगावर उपाय काढायचा असेल, तर फक्त लक्षणांवर उपचार करून चालणार नाही. पण या लक्षणांच्या मुळाशी असलेले कारण शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
आपल्याला वाटणाऱ्या असुरक्षिततेचे मूळ कारण कोणते आहे? ते मूळ कारण उपटून काढून आपले जीवन नेहमीसाठी सुरक्षित कसे करता येईल? याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.
[६ पानांवरील चौकट]
आपल्या लहान मुलांचे संरक्षण करण्याचे मार्ग
लहान मुलांवर होणारे हल्ले, अपहरण आणि खून यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे आपल्या मुलांना खाली सांगितलेल्या गोष्टी शिकवणे अनेक पालकांना फायद्याचे वाटले आहे:
१. त्यांना एखादी गोष्ट आवडत नसेल आणि कोणी त्यांना ती करायला सांगितली तर सरळ सरळ नाही म्हणणे.
२. कोणालाही जननांगांना हात लावायला देऊ नये; पालक सोबत असताना डॉक्टर किंवा नर्सची गोष्ट वेगळी.
३. धोका जाणवल्यास पळावे, ओरडावे, किंचाळावे किंवा जवळपास कोणी मोठे माणूस असेल तर मदत मागावी.
४. मुलांना कोणतीही घटना किंवा संभाषण अस्वस्थ करणारे वाटत असेल तर पालकांना त्याविषयी लगेचच सांगावे.
५. पालकांपासून काहीही लपवून ठेवू नये.
शेवटचा मुद्दा, आपल्या मुलांचा सांभाळ करायला कोणाला ठेवत असताना पालकांनी काळजीपूर्वक विचार करावा.
[५ पानांवरील चित्रं]
फक्त शिक्षणाने, धनसंपत्तीने किंवा गुन्हेगारीचा बंदोबस्त करायचा प्रयत्न केल्याने जीवन सुरक्षित होत नाही