वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ५/१५ पृ. ४-७
  • खरी सुरक्षितता आज व सर्वदा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरी सुरक्षितता आज व सर्वदा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या सेवकांकरता सुरक्षितता
  • देव आपल्या लोकांसाठी जे काही करतो
  • सर्वांसाठी खरी सुरक्षितता?
  • सरतेशेवटी—सर्वकाळासाठी खरी सुरक्षितता!
  • सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल
    सुरक्षित भवितव्य—तुम्हास कसे लाभेल
  • सदासर्वदाचे—सुरक्षित जीवन
    सावध राहा!—१९९८
  • देव भविष्यात काय करेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • उत्तम जीवनाचे अभिवचन दिले आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ५/१५ पृ. ४-७

खरी सुरक्षितता आज व सर्वदा

यहोवा देव आपल्या लोकांना सुरक्षितता देऊ शकतो यात काहीच शंका नाही. तो ‘सर्वसमर्थ’ आहे. (स्तोत्र ६८:१४) त्याच्या अनुपम नावाचा अर्थ, “तो व्हावयास लावतो,” असा आहे. स्वतःची अभिवचने पूर्णत्वास नेण्यासाठी व आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी वाटेत येणारी कोणतीही अडखळणे पार करण्यास सबंध विश्‍वातील एकमेव समर्थ व्यक्‍ती, अशी त्याची ओळख आपल्याला यावरून मिळते. देव स्वतः म्हणतो: “त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:११.

देव त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍यांना सुरक्षितता देतो. त्याचे वचन याची खात्री देते. बुद्धिमान राजा शलमोन याने ईश्‍वरी प्रेरणेने म्हटले: “परमेश्‍वराचे [यहोवा, NW] नाम बळकट दुर्ग आहे, त्यात धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो.” तो पुढे म्हणतो: “जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.”—नीतिसूत्रे १८:१०; २९:२५.

देवाच्या सेवकांकरता सुरक्षितता

यहोवाने आपल्यावर विसंबून राहणाऱ्‍या लोकांना नेहमीच सुरक्षितता दिली आहे. उदाहरणार्थ, संदेष्टा यिर्मया यास देवाचे संरक्षण लाभले. बाबेलच्या सैन्यांनी धर्मत्यागी जेरूसलेमला वेढले तेव्हा लोकांना, ‘कष्टी होऊन भाकर तोलून खावी’ लागली. (यहेज्केल ४:१६) इतकी बिकट परिस्थिती आली, की काही स्त्रियांनी आपलीच मुले शिजवून खाल्ली. (विलापगीत २:२०; ४:१०) त्या वेळेस यिर्मयाच्या निर्भय प्रचारामुळे त्याला बंदिवान केले होते तरीही “नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक रोटी मिळत” राहावी याकडे यहोवाने जातीने लक्ष पुरवले.—यिर्मया ३७:२१.

बाबेली लोकांमार्फत जेरूसलेमचे पतन झाले तेव्हा यिर्मयाला ठार मारण्यात आले नाही किंवा त्यास बंदिवान करून जबरीने बाबेलासही नेण्यात आले नाही. उलटपक्षी, “[बाबेलच्या] नायकाने त्याला अन्‍नसामग्री व इनाम देऊन रवाना केले.”—यिर्मया ४०:५.

यानंतर कित्येक शतकांनी येशू ख्रिस्ताने देवाच्या सेवकांना हमी दिली: “ह्‍यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्तय ६:३१-३३.

यहोवाच्या सेवकांना सध्याच्या सर्वच संकटांपासून ईश्‍वरी संरक्षण लाभेल असा याचा अर्थ होतो का? नाही, याचा असा अर्थ होत नाही. विश्‍वासू लोकांवर कोणत्याच उपद्रवांचा परिणाम होत नाही, असे नाही. खरे ख्रिश्‍चन देखील आजारी पडतात, छळ सोसतात, गुन्हेगारीला बळी पडतात, दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडतात व इतर प्रकारेसुद्धा त्रास सहन करतात.

यहोवा उपद्रवांपासून अद्याप संपूर्ण सुरक्षितता देत नसला तरीसुद्धा, अहवाल दाखवतात की तो आपल्या सेवकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा उपयोग निश्‍चितच करतो. ख्रिश्‍चन लोक आपआपल्या जीवनात बायबल तत्त्वांचा अवलंब करत असल्यामुळे देखील त्यांचा अनेक समस्यांपासून बचाव होतो. (नीतिसूत्रे २२:३) एवढेच नव्हे तर, संकटकाळी एकमेकांना साहाय्य करणाऱ्‍या प्रेमळ बंधू व भगिनींच्या जागतिक संघटनेची सुरक्षितता ते अनुभवतात. (योहान १३:३४, ३५; रोमकर ८:२८) उदाहरणार्थ, युद्धग्रस्त रवांडातील आपल्या बांधवांची दयनीय अवस्था पाहून युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांनी लगेच देणग्या दिल्या व ६५ टन कपडे तसेच १६,००,००० डॉलर किमतीची औषधे, खाद्यपदार्थ व इतर आवश्‍यक वस्तू त्यांच्याकडे रवाना केल्या.—पडताळा प्रेषितांची कृत्ये ११:२८, २९.

यहोवा खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर परीक्षा येऊ देत असला तरीसुद्धा तो सहन करण्यासाठी सामर्थ्य, साहाय्य व सुबुद्धी देईल याबद्दल त्यांना खात्री आहे. सहविश्‍वासू जनांना लिहिताना प्रेषित पौलाने म्हटले: “मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.”—१ करिंथकर १०:१३.

देव आपल्या लोकांसाठी जे काही करतो

आज लक्षावधी लोक आनंदाने यहोवाची इच्छा पूर्ण करतात. देवाची सेवा करण्यासाठी त्यांना भाग पाडले जात नाही; त्याच्या बद्दलचे ज्ञान व त्याच्यावर असलेले प्रेम यांमुळे ते असे करतात. तसेच, देवाला आपल्या निष्ठावान सेवकांवर प्रेम असल्यामुळे, आज्ञाधारक मानवजात सर्वदा शांती, आरोग्य व सुरक्षितता उपभोगू शकेल अशा परादीसमध्ये पृथ्वीचे रूपांतर करण्याची त्याची योजना आहे.—लूक २३:४३.

देव एका स्वर्गीय सरकारामार्फत हे साध्य करील ज्याचा शासक, त्याचा नियुक्‍त राजा, येशू ख्रिस्त असेल. (दानीएल ७:१३, १४) बायबल या सरकाराचा, ‘देवाचे राज्य’ व “स्वर्गाचे राज्य” असा उल्लेख करते. (१ करिंथकर १५:५०; मत्तय १३:४४) देवाचे राज्य सर्व मानवी सरकारांना नाहीसे करून त्यांची जागा घेईल. पृथ्वीवर अनेक सरकार असण्याऐवजी केवळ एकच सरकार असेल. ते सबंध पृथ्वीवर धार्मिकतेने शासन करील.—स्तोत्रसंहिता ७२:७, ८; दानीएल २:४४.

यहोवा सर्वांना या राज्यात येण्याचे निमंत्रण देतो. तो ज्या विविध मार्गांनी असे करतो त्यांपैकी एक मार्ग म्हणजे, मानवजातीसाठी राज्य काय करील ह्‍याचे वर्णन करणाऱ्‍या पुस्तकाचे अर्थात बायबलचे व्यापक वितरण करणे होय. बायबल जगातील सर्वाधिक प्रसार असलेले पुस्तक असून आता ते पूर्ण, अथवा त्याचा काही भाग २,००० पेक्षा अधिक भाषांत उपलब्ध आहे.

बायबल राज्याबद्दल जे शिकवते ते समजण्यासाठी यहोवा देव लोकांना प्रेमळपणे साहाय्य करतो. शिक्षण देण्याद्वारे व इतरांना शास्त्रवचनांचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्याकडे लोकांना पाठवण्याद्वारे तो असे करतो. यहोवाचे पन्‍नास लाखापेक्षा अधिक साक्षीदार आता २३० पेक्षा अधिक राष्ट्रांत देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करीत आहेत.

सर्वांसाठी खरी सुरक्षितता?

देवाच्या नीतिमान दर्जांचा अवलंब करण्याद्वारे त्याच्या राज्याच्या प्रजाजनांपैकी एक असण्याचे निमंत्रण सर्वच जण स्वीकारतील का? नाही, कारण अनेक जणांना देवाची इच्छा पूर्ण करण्यात अजिबात स्वारस्य नाही. त्यांचे जीवन सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्‍या सहायक प्रयत्नांचा ते अव्हेर करतात. खरोखर येशूने पुढीलप्रमाणे वर्णन केलेल्या लोकांसारखेच आपण असल्याचे ते शाबीत करतात: “कारण ह्‍या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्‍यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये, आणि [देवाने] त्यांना बरे करू नये.”—मत्तय १३:१५.

देवाच्या नीतिमान मार्गांच्या अनुरूप जीवन जगण्यास नकार देणारे लोक अस्तित्वात असताना पृथ्वीवर खरी सुरक्षितता कशी असू शकते? असूच शकत नाही. अभक्‍त लोक, यहोवाची सेवा करू इच्छिणाऱ्‍या लोकांच्या सुरक्षिततेला धोका ठरतात.

परिवर्तन करण्यासाठी देव लोकांना भाग पाडत नाही, परंतु, तो नेहमीच दुष्टपणा सहन करून घेणार नाही. यहोवा आपल्या मार्गांबद्दल व उद्देशांबद्दल लोकांना शिक्षण देण्यासाठी सहनशीलतापूर्वक व सातत्याने आपल्या साक्षीदारांना पाठवत असला तरीसुद्धा, तो आणखी फार काळ असे करत राहणार नाही. येशू ख्रिस्ताने पूर्वभाकीत केले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

“शेवट” यात देवाच्या आदर्शांचा अव्हेर करणाऱ्‍यांसाठी काय राखून ठेवलेले आहे? त्यात त्यांना प्रतिकूल न्यायदंड मिळेल व त्यांचा विनाश होईल. ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांच्यावर सूड उगवण्यात येणार आहे व युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल असे बायबल सांगते.’—२ थेस्सलनीकाकर १:६-९.

सरतेशेवटी—सर्वकाळासाठी खरी सुरक्षितता!

यहोवाचे शांतीचे मार्ग नाकारणाऱ्‍यांचा नाश झाल्यावर लगेच, देवाचे राज्य पृथ्वीवरील धार्मिक जनांच्या लाभासाठी सुरक्षिततेचे वैभवी युग आणील. (स्तोत्रसंहिता ३७:१०, ११) आज आपण ज्या जगात राहतो त्याच्या तुलनेत ते नवीन जग केवढे विपरीत असेल!—२ पेत्र ३:१३.

दुष्काळ व उपासमार अस्तित्वात नसतील. सर्वांसाठी भरपूर अन्‍न असेल. बायबल म्हणते की ‘सर्व लोक मिष्टान्‍नाची मेजवानी करतील.’ (यशया २५:६) अन्‍नाचा तुटवडा असणारच नाही, कारण ‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’—स्तोत्रसंहिता ७२:१६.

भविष्यात लोक झोपड्यांमध्ये व गरीब वसतींमध्ये राहणार नाहीत. देवाच्या राज्यात सर्वांसाठी उत्तम घरे असतील व सर्वजण स्वतःच्या जमिनीवर उगविलेले अन्‍न खातील. बायबल हमी देते: “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील.”—यशया ६५:२१.

व्यापक बेकारीऐवजी, उत्पन्‍नशील काम असेल व लोक त्यातून चांगले प्रतिफळ मिळवतील. देवाचे वचन म्हणते: “माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत.”—यशया ६५:२२, २३.

राज्य शासनाखाली लोक रोगग्रस्त होऊन मरणार नाहीत. देवाचे वचन आपल्याला अभिवचन देते: “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४.

जे पार्थिव परादीस लवकरच एक वास्तविकता बनणार आहे, त्यात पीडा व दुःख, शोक व मृत्यू या गोष्टी काढून टाकण्यात येतील. होय, मृत्यूसुद्धा! सर्वजण परादीसमध्ये अनंतकाळ जगतील! बायबल आपल्याला सांगते की देव “त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.

येशू ख्रिस्त, अर्थात “शांतीचा अधिपति” याच्या शासनाधीन, पृथ्वीवरील जीवन शेवटी खऱ्‍या अर्थाने सुरक्षित बनेल. देवाचे राज्य, या एकमेव शासनाच्या धार्मिक, प्रेमळ राज्यात जगव्याप्त सुरक्षितता असेल.—यशया ९:६, ७; प्रकटीकरण ७:९, १७.

[४ पानांवरील चित्रं]

“मानवी सुरक्षितता म्हणजे उद्याविषयी खात्री, . . . राजनैतिक व आर्थिक स्थितीच्या स्थैर्याविषयी [खात्री].” —आशियात राहणारी एक स्त्री

[५ पानांवरील चित्रं]

“हिंसा व गुन्हेगारी ही असुरक्षिततेची सर्वात मोठी कारणे आहेत.” —दक्षिण अमेरिकेतील एक रहिवासी

[६ पानांवरील चित्रं]

“मला . . . आक्रमणाच्या काळात सुरक्षित वाटले नाही. देश युद्धात सामील असल्यास लोकांना सुरक्षित वाटणे कसे शक्य आहे?” —मध्य पूर्वेतील प्राथमिक शाळेमधील एक विद्यार्थी

[७ पानांवरील चित्रं]

“जेव्हा मी रात्री रस्त्यांवर, बलात्कार होणार नाही या खात्रीने निर्धास्तपणे चालू शकेन, तेव्हा मला सुरक्षित वाटेल.” —आफ्रिकेतील एक शाळकरी बालिका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा