वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वात लांब झुलता पूल
  • हॉस्पिटलमधून पसरणारा संसर्ग
  • नकली औषधे
  • विजेची बचत करा
  • दुर्व्यवहारापासून पळ काढणारी मुले
  • विसरभोळे
  • तान्हुल्यांना स्पर्श हवा असतो
  • वेश्‍याव्यवसायाचे बळी
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
  • सुज्ञपणे औषधांचा वापर करा
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

सर्वात लांब झुलता पूल

आवाजी बेटाला कोबे शहराशी जोडणाऱ्‍या आणि एप्रिल १ ला सुरू झालेल्या जपानच्या आकाशी कायक्यो नावाच्या पूलाने लागलीच सर्वात लांब झुलता पूल म्हणून रेकॉर्ड बुक्समध्ये आपले नाव नोंदवले. टाईम मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, “त्याच्या बांधकामासाठी दहा वर्षे लागली आणि ३०८ अरब रुपये इतका पैसा त्याच्यासाठी ओतला गेला. पूलाचा मधला भाग, म्हणजे दोन टावरच्या मध्ये असलेले अंतर १,९९१ मीटर इतके आहे. एक टावर ९० मजल्यांच्या इमारतीहून उंच असून प्रत्येक टावरमध्ये २० कंपन-नियंत्रण यंत्रणा आहेत; वाऱ्‍यामुळे हे टावर्स हेलकावे खाऊ लागले की त्यात असलेली लंबके त्यांना मागे खेचतात.” पूलाची रचना अशाप्रकारे केली आहे, की रिश्‍टर स्केलवर ८.० इतके उंच-उंच भूकंपावर देखील मात करू शकते. या पूलाला एखाद्या दोरीप्रमाणे ताणल्यास, त्याच्या स्टिलच्या केबल्स सबंध पृथ्वीला चक्क सात वेळा प्रदक्षिणा घालू शकतील.

हॉस्पिटलमधून पसरणारा संसर्ग

ला फीगारॉ या प्रेंच वृत्तपत्राने म्हटले: “रुग्णाची तपासणी केल्यानंतर किंवा त्याचे ऑपरेशन केल्यानंतर हॉस्पिटलमधून पसणारा संसर्ग एक मोठी आरोग्य समस्या बनली आहे.” केवळ फ्रांसमध्येच दर वर्षी ८,००,००० लोकांना संसर्ग होतो आणि अंदाजे १०,००० लोकांचा मृत्यू होतो. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास दूषित होण्याचा धोका टळू शकतो; उदाहरणार्थ, नवीन रुग्ण येण्याआधी प्रत्येक वेळेस जंतुनाशके वापरून खोली साफ करणे, निर्जंतुकीकरणाच्या पद्धती काय आहेत त्या जाणून घेणे, रुग्णावर उपचार करण्याआधी हात स्वच्छ धुणे. असे दिसून येते यांपैकी अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. पॅरिसच्या एका हॉस्पिटलमध्ये घेतलेल्या एका अभ्यासावरून दिसून आले, की हॉस्पिटलमधील केवळ ७२ टक्के कर्मचाऱ्‍यांनी रुग्णाला हात लावल्यानंतर न विसरता हात धुतले होते. यांपैकी ६० टक्के लोक घाईगडबडीत कसेही आपले हात धूतात. फ्रेंच वृत्तपत्राने शेवटी म्हटले की यावरून “आपल्याला अजून पुष्कळ प्रगती करायची आहे असे वाटते.”

नकली औषधे

“आज जगभरात विकली जाणारी ८ टक्के औषधे नकली आहेत” असे ला फीगारॉ मॅग्झीन म्हणते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ब्राझीलमधील नकली औषधांची टक्केवारी ३० टक्के असल्याचा अंदाज बांधला जातो तर नायजेरियामध्ये ६० टक्के धक्केदायक आकडेवारी असल्याचे समजले जाते. असे सांगण्यात येते, की बनावट औषधांच्या धंद्यात ३०० अरब डॉलरची उलाढाल केली जाते आणि यात गुन्हेगार संघटनांचा सगळ्यात मोठा हात आहे. हा धंदा मोडीत काढण्यासाठी औषधे तयार करणाऱ्‍या कंपन्या खटपट करत असतानाही अद्याप पोलिस आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना या समस्येवर कोणताच उपाय सापडलेला नाही. ही नकली औषधे जास्तीत जास्त रुग्णाच्या समाधानासाठी दिली जाणारी औषधे म्हणून वापरली जाऊ शकतात किंवा मग ती सर्वस्वी प्राणघातक असू शकतात. ला फीगारॉ मॅग्झीनच्या शब्दांत, ‘नकली औषधे म्हणजे रुग्णांच्या जीवांशी खेळण्याचा एक प्रकार आहे.’

विजेची बचत करा

आपोटेकीन यूमशायु या बातमीपत्रात दिलेल्या अहवालानुसार, “जर्मनीमध्ये घराघरांत आणि दफ्तरांत ११ टक्के वीज अशा उपकरणांवर खर्च होते जी उपकरणे खरे तर पूर्णपणे बंद केलेली नसतात.” अंदाजांनुसार जर्मनीमध्ये पूर्णपणे बंद न केलेले टीव्ही, स्टीरिओ, कॉम्प्युटर आणि अशाच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर दर वर्षी सुमारे २०.५ अरब किलोवॉट-आवर्स वीज खर्च होते. इतकी वीज तर त्या देशातल्या सर्वात मोठ्या बर्लिन शहरात सबंध वर्षभरही खर्च होत नाही. आपण वापरत नाही ती उपकरणे अर्धवट चालू ठेवण्याऐवजी ती पूर्णपणे बंद केल्याने विजेसोबतच तुमच्या पैशांची देखील बचत होईल.

दुर्व्यवहारापासून पळ काढणारी मुले

“रस्त्यावर फिरणाऱ्‍या मुलांपैकी ९० टक्के मुले भरल्या कुटुंबातून आलेली असतात. या मुलांपैकी सुमारे ९० टक्के मुलांना त्यांच्या आईवडिलांकडून मारहाण होत असल्यामुळे ती घरातून पळून जातात, गुन्हेगारी, मादक द्रव्यांचा दुरुपयोग आणि लैंगिक शोषण यांच्या कचाट्यात येऊन पडतात,” असे रिजनल सेंटर फॉर अटेनशन टू मिस्ट्रिटेड चिल्ड्रनचे (क्रॅमी) वरीष्ठ अधिकारी एन्झा माट्टार म्हणतात. ब्राझीलच्या ऑ एस्टाडॉ डा साऊ पाऊलू वृत्तपत्रात माट्टारने आरोग्य अधिकाऱ्‍यांना आणि शिक्षकांना सल्ला दिला आहे, की त्यांनी मुलांमधील दुर्व्यवहाराच्या लक्षणांसंबंधी जागृत असले पाहिजे; उदाहरणार्थ, “त्यांच्या वागण्याबोलण्यात अचानक झालेला फरक, फटकून राहणे आणि शरीरावर मारल्याच्या काही खुणा इत्यादी.” अशी लक्षणे दिसताच, पाऊल उचलणे अत्यावश्‍यक आहे कारण क्रॅमीकडे येणाऱ्‍या अशा केसेसपैकी केवळ ५ टक्के मुले स्वतःहून मदत मागतात. आणि दुर्व्यवहार करणारे आईवडिलही सहसा ही मदत घेऊ इच्छित नाहीत. का? क्रॅमीचे अध्यक्ष, झाऊन रोबर्टू स्कॉनपारीन म्हणतात: “आपल्या मुलांवर हिंसकपणे हल्ला करणाऱ्‍या पालकांनी आपल्या लहानपणी हेच अनुभवलेले असते; आता ते निव्वळ तो अनुभव जिवंत करत असतात कारण त्यांना ठामपणे असे वाटत असते, की असे करून ते खरे तर आपल्या मुलांना वळण लावतात.”

विसरभोळे

ला रिपब्लिका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार इटलीत १,६०० प्रौढांवर केलेल्या एक सर्व्हेतून असे दिसून आले, की ७७ टक्के लोकांना विसरण्याची समस्या आहे. मागील वर्षात १,६०० पैकी एक तृतीअंशाहून अधिक लोक कित्येक वेळा एखादा खास दिवस विसरले होते. यांशिवाय ४२ टक्के लोक नेहमीच विसरून जायचे की आपण आपली कार कोठे पार्क केली आहे; ३० टक्क्यांहून लोक आपल्या घराच्या किल्ल्या, २५ टक्क्यांहून अधिक लोक आपले पाकीट विसरले होते; तर १.२ टक्के लोकांना चक्क स्वतःचे नाव, आडनाव देखील आठवेनासे झाले. पण त्याचवेळी २८ टक्के इटालियन लोक म्हणतात, की शाळेत तोंडपाठ केलेली एखादी तरी कविता त्यांना अजूनही आठवते. तुम्ही तुमची स्मरणशक्‍ती कशी सुधारू शकता? एक मानसशास्त्रज्ञ असा सल्ला देतो, की एखादी गोष्ट आठवणीत ठेवायची असल्यास त्याचा संबंध मनातल्या मनात दुसऱ्‍या एखाद्या गोष्टीशी जोडावा, किंवा डायरीत लिहून त्या पुन्हा पडताळून पाहाव्यात तसेच टेलिफोनचे नंबर, गाण्याच्या चाली किंवा गाड्यांचे नंबर पाठ करून आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करा.

तान्हुल्यांना स्पर्श हवा असतो

टोरोंटो स्टार वृत्तपत्रात दिलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या मुलांना लहानपणापासून मायेने जवळ घेऊन कुरवाळले जात नाही किंवा प्रेमाने थापटले जात नाही त्यांच्या शरीरात मानसिक ताणामुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या हॉर्मोन्सचे प्रमाण खूप जास्त असते. संशोधकांच्या मते, बाल्यावस्थेत आईपासून ताटातूट झाल्यास किंवा बालकांची हेळसांड केल्यास त्याच्या “शिकण्यावर आणि स्मरणशक्‍तीवर गंभीर स्वरूपाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.” हारवर्ड मेडिकल स्कूलचे वैज्ञानिक मेरी कार्लसन असेही म्हणाल्या, की ज्या पालकांनी ‘कामाच्या दिवशी आपल्या लहानग्यांना हलक्या दर्जाच्या पाळणाघरांमध्ये सोडले होते अशा मुलांमधील तणावाचे हॉर्मोन्स प्रमाणाबाहेर गेले होते पण शनिवार-रविवारच्या दिवशी मुले आपापल्या घरीच असतात तेव्हा मात्र असे होत नसे.’ मुलांना कोमल स्पर्श करणे, त्यांना खूप खूप प्रेम देणे किती महत्त्वाचे आहे हेच सदर संशोधनावरून सिद्ध होते.

वेश्‍याव्यवसायाचे बळी

एका युक्रेनियन वृत्तपत्रातील जाहिरात: “मुली पाहिजेत: अविवाहित आणि सुंदर असाव्यात. तरुण आणि उंच. आम्ही तुम्हाला मॉडेल्स, सेक्रेटरीस, डान्सर्स, नृत्यदिग्दर्शक, जिम्नॅस्टिक या कामांसाठी आमंत्रित करीत आहोत.” द न्यूयॉर्क टाईम्स अहवाल देते की शरीराचा व्यापार करणारे लोक भोळ्याभाबड्या मुलींना कोवळ्या वयात वेश्‍याव्यवसायात अडकवण्याच्या इराद्याने अशाच प्रकारच्या जाहिराती देत असतात. दर वर्षी, हजारो युक्रेनियन आणि रशियन स्त्रिया आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या आशेने परदेशी जातात. पण अशा अनोळखी जागी आल्यानंतर त्यांचे गुन्हेगार ‘बॉस’ त्यांचा पासपोर्ट जप्त करतात आणि त्यांना वेश्‍याव्यवसायात ढकलतात. नकार दिल्यास मारझोड, बलात्कार आणि निर्घृण हत्या. या बंधनातून सुटका करून घेतलेल्या स्त्रियांना युक्रेनियन मानसशास्त्रवेत्ते लीयूडमीला बिरयूक म्हणतात: “बायांनो, नुसताच झगमगाट आणि भविष्याची सुंदर स्वप्नं पाहून भाळू नका, ही स्वप्नं खरी नसतात.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा