वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. २६-२७
  • अनावश्‍यक चिंतेपासून सांभाळा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनावश्‍यक चिंतेपासून सांभाळा!
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चिंता किंवा काळजी करण्याजोग्या गोष्टी
  • अनावश्‍यक चिंतेपासून दूर राहणे
  • आपली सर्व चिंता यहोवावर टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवावर आपल्या सर्व चिंता टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • चिंता
    सावध राहा!—२०१६
  • चिंता करत बसू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. २६-२७

अनावश्‍यक चिंतेपासून सांभाळा!

चिंतेपासून सांभाळण्याचे काय कारण? जीवनात काही गोष्टींबद्दल चिंता तर करावीच लागते, नाही का? हो, कबूल आहे. पण अनावश्‍यक चिंता केल्यामुळे आपल्या सबंध जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो. अनावश्‍यक चिंता करत राहिल्याने माणूस खिन्‍न होतो, निराश होतो, त्याच्यात काहीही करण्याचा उत्साह आणि ताकद राहात नाही. देवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या एका सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, ‘चिंतेने मनुष्याचे मन दबून जाते.’ (नीतिसूत्रे १२:२५)

संशोधनांवरून दिसून आले आहे, की काळजी करत बसल्यामुळे शरीरावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तणावावर नियंत्रण कसे ठेवावे (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते, “चिंतेचा एखाद्याच्या शरीरावर किती परिणाम होऊ शकतो याविषयी डॉक्टरांनाच विचारा. यामुळे तुमचे ब्लडप्रेशर वाढू (किंवा कमी होऊ) शकते; शरीरातील पांढऱ्‍या पेशींच्या प्रमाणात वाढ होऊ शकते; यकृतावर ॲड्रिनॅलिन नामक उद्दीपक रसाच्या क्रियेमुळे रक्‍तातील साखरेच्या प्रमाणावरही आकस्मिक परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे तुमच्या इलेक्ट्रोकार्डियोग्रॅममध्ये देखील तफावत होऊ शकते. डॉ. चार्ल्स मेयो म्हणतात: ‘अनावश्‍यक चिंतेचा रक्‍ताभिसरणावर, हृदयावर, ग्रंथींवर अर्थात संबंध मज्जासंस्थेवरच परिणाम होत असतो.’”—डॉ. पी. स्टेनक्रोन आणि डॉ. लाफिया यांच्याद्वारे, १९७०, पृ. १४.

परंतु, अनावश्‍यक चिंतेमुळे सगळ्यात मोठा धक्का पोहंचतो तो आपल्या आध्यात्मिक स्थितीला. म्हणूनच बायबलमध्ये चिंतेच्या दुष्परिणामांविषयी बरेच काही सांगितले गेले आहे. हिब्रू भाषेत चिंता किंवा काळजी या अर्थाचे बरेच शब्द आहेत. यांपैकी एका शब्दाचा (त्सारार) शब्दशः अर्थ, कोंडलेल्या स्थितीत असणे असा होतो; आणि म्हणूनच वेगवेगळ्या संदर्भांत या शब्दाचे भाषांतर ‘बांधणे,’ ‘घट्ट बांधणे’ आणि ‘जागा न पुरणे’ असे करण्यात आले आहे. (निर्गम १२:३४; नीतिसूत्रे २६:८; यशया ४९:१९) पण याच शब्दाचा लाक्षणिक अर्थ ‘चिंतेत पडणे,’ ‘संकटात पडणे’ असा होतो. (उत्पत्ति ३२:७; १ शमुवेल २८:१५) दुसरा एक शब्द आहे दाआघ; त्याचे भाषांतर ‘चिंता करत बसणे,’ ‘घाबरून जाणे’ असे करण्यात आले आहे. (१ शमुवेल ९:५; यशया ५७:११) ग्रीक भाषेतल्या मेरिम्ना या नामाचे भाषांतर “चिंता” असे केले आहे, तर मेरिम्नाओ या त्याच्या क्रियापदाचा अर्थ ‘चिंता करणे’ असा होतो.—मत्तय १३:२२; लूक १२:२२.

आजच्या या जगात काही समस्या टाळता येत नाहीत; पण येशू ख्रिस्ताने दाखवून दिले, की जर या समस्यांबद्दल आपण चिंता करत बसलो तर ‘देवाच्या वचनाकडे’ पूर्णपणे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. जसे काट्याकुसळ्यांत एखादे बी पूर्ण वाढू शकत नाही, फळ देऊ शकत नाही, तसेच चिंतेमुळे एखाद्याची आध्यात्मिक वाढ खुंटते, त्याची सेवा निष्फळ ठरते आणि यामुळे त्याच्याकडून देवाची स्तुती होऊ शकत नाही. (मत्तय १३:२२; मार्क ४:१८, १९; लूक ८:७, ११, १४) ‘शेवटच्या काळाविषयी’ भाकीत करताना येशूने असा इशारा दिला होता, की देवाचा पुत्र आपल्या वैभवात येईल तेव्हा जे लोक आध्यात्मिक गोष्टींना बाजूला सारून या चिंतांनाच आपल्या जीवनात महत्त्व देतात, अशांचा तो स्वीकार करणार नाही आणि अशारितीने त्यांचे कायमचे नुकसान होईल.—लूक २१:३४-३६.

चिंता किंवा काळजी करण्याजोग्या गोष्टी

तर मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची चिंता केल्यामुळे आपला फायदा होतो? दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा पहिले आपण यहोवा देवाला जे पसंत आहे ते करण्याविषयी चिंतीत असले पाहिजे; देव आपल्या श्रद्धाळू लोकांना जे आशीर्वाद देईल ते मिळवण्यासाठी असे करणे आवश्‍यक आहे. तसेच, कोणाच्या हातून एखादे गंभीर स्वरूपाचे पाप घडले तर त्यालाही स्तोत्रकर्त्यासारखेच अस्वस्थ झाले पाहिजे; गंभीर पाप केल्यावर स्तोत्रकर्ता म्हणाला: “माझ्या पापामुळे मी खिन्‍न [“चिंतीत”] आहे.” (स्तोत्र ३८:१८) पाप केल्यावर कोणी अशाप्रकारे अस्वस्थ होतो, तेव्हा आपोआपच तो आपला दोष पदरी घेऊन पश्‍चात्ताप करतो, आपला अयोग्य मार्ग सोडून देतो आणि यामुळे त्याला सर्वसमर्थ देवासोबत तुटलेले आपले नाते पुन्हा जोडता येते. याशिवाय, जे विश्‍वासात आपले बहीणभाऊ आहेत अशांच्या आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक स्थितीबद्दल सर्व ख्रिश्‍चनांना मनापासून काळजी वाटली पाहिजे. (१ करिंथकर १२:२५-२७) हीच काळजी प्रेषित योहानाने गायसला लिहिलेल्या पत्रातून व्यक्‍त होते: “प्रिय बंधो, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिति व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करितो.” (३ योहान २) प्रेषित पौलाने तर आपल्याला ‘सर्व मंडळ्यांविषयी चिंता’ असल्याचे सांगितले. (२ करिंथकर ११:२८) आणि चिंता वाटण्याचे कारण म्हणजे त्या सर्वांनी अगदी शेवटपर्यंत देवाच्या पुत्राला विश्‍वासू राहावे असे त्याला मनापासून वाटत होते.

बायबलमध्ये ‘प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करण्याचा’ उल्लेख आहे; प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करणे म्हणजे देवाच्या पुत्राच्या नेतृत्त्वाखाली आज पृथ्वीवर चाललेल्या कार्याला बढावा देणाऱ्‍या सर्व गोष्टींबद्दल उत्सुकता बाळगणे. आणि असे करणे विवाहित ख्रिश्‍चनांपेक्षा अविवाहित ख्रिश्‍चनांना अधिक सोपे जाते; कारण विवाहसोबत्याच्या आणि मुलाबाळांच्या जबाबदारीतून मुक्‍त असल्यामुळे ते ‘जगाच्या गोष्टींना’ जास्त महत्त्व न देता, ‘प्रभूच्या गोष्टींवर’ अधिक लक्ष लावू शकतात.—१ करिंथकर ७:३२-३५.

पण ख्रिस्ती पतिपत्नी मात्र ‘जगाच्या गोष्टींविषयीची चिंता’ करतील असे पौलाने लिहिले; म्हणजेच अविवाहित ख्रिश्‍चनांच्या वाट्याला सहसा येत नाहीत अशा चिंता त्यांच्या वाट्याला येतात आणि यांमुळे प्रभूच्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. वैयक्‍तिक गरजा, घरादारासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टी, तसेच जीवनावश्‍यक गोष्टी अर्थात, अन्‍न, वस्त्र, निवारा यांचेच उदाहरण घेऊ. अविवाहित व्यक्‍तीसाठी जे अगदी पुरेसे असेल त्यावर एखाद्या कुटुंबाचे मात्र अजिबातच भागणार नाही. शिवाय, पतिपत्नी यांच्यातले नाते अतिशय जवळचे असते. आणि त्यामुळे कुटुंबासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टीने हितकारक असणाऱ्‍या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करत असताना आपला विवाहसोबती आनंदी राहावा याची त्या दोघांनाही काळजी किंवा चिंता वाटणे साहजिकच आहे. आजारपण, अनपेक्षित दुर्घटना, आर्थिक समस्या, किंवा कुटुंबात एखाद्याला असणारे अपंगत्व यांसारख्या इतर गोष्टींचा त्यांना सामना करावा लागत नसला तरी ज्यांना मुलेबाळे आहेत अशांना ‘जगाच्या गोष्टींसाठी’ किंवा ‘जगाच्या गोष्टींविषयीची चिंता’ करण्यासाठी, दुसऱ्‍या शब्दांत ज्या गोष्टी आध्यात्मिक स्वरूपाच्या नसतात पण आपल्या जीवनाशी त्यांचा संबंध असतो अशा गोष्टींसाठी त्यांना कितीतरी जास्त वेळ द्यावा लागतो; एखाद्या अविवाहित ख्रिश्‍चनाला कदाचित हे सर्व उपद्व्‌याप करावे लागत नसतील.

असे करणे चुकीचे नसले तरी कुठल्याही व्यक्‍तीने, ज्यांना मुलेबाळे आहेत अगदी अशांनीसुद्धा संसाराच्या चिंतांना आवश्‍यक असते, तितकेच महत्त्व द्यावे. लाजरच्या बहिणीला म्हणजे मार्थाला येशूने हिच गोष्ट स्पष्ट केली. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यासाठी म्हणजे येशूसाठी काय करू अन्‌ काय नको असे तिला झाले होते; साहजिकच, येशू ज्या काही गोष्टी सांगत होता त्या ऐकण्यासाठी वेळ काढणे शक्य आहे याची जाणीवच तिला झाली नाही. पण मरीयेने मात्र “चांगला वाटा”—देवाच्या पुत्राकडून मिळणारे आध्यात्मिक अन्‍न—निवडले.—लूक १०:३८-४२.

अनावश्‍यक चिंतेपासून दूर राहणे

आपण अनावश्‍यक चिंतेपासून दूर कसे राहू शकतो बरे? आपली उपासना करणाऱ्‍यांवर यहोवा प्रेम करतो, त्यांची चिंता करतो या गोष्टीवर आपला पूर्ण भरवसा असल्यास अनावश्‍यक चिंतेच्या आहारी जाण्याचे आपण टाळू. यिर्मया संदेष्ट्याने म्हटले: “जो पुरुष परमेश्‍वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्‍वर आहे तो धन्य! . . . त्याला चिंता पडणार नाही, तो फळे देण्याचे सोडणार नाही.” (यिर्मया १७:७, ८) येशूने डोंगरावर जो उपदेश दिला, त्यातही त्याने हाच मुद्दा मांडला. चिंतेच्या विषयावर बोलताना त्याने शेवटी म्हटले, “उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:२५-३४) एखाद्या ख्रिश्‍चनाला एकाच दिवशी इतक्या समस्यांचा सामना करावा लागतो की त्यात दुसऱ्‍या दिवसाच्या समस्यांची म्हणजे उद्या काय होईल याची देखील भर घालण्याची आवश्‍यकता नाही; आणि कधीकधी तर आपण ज्या गोष्टीची इतकी चिंता करत बसतो ती गोष्ट कदाचित घडणारही नाही.

छळसंकटाच्या काळात एखाद्या ख्रिश्‍चनाला उलट तपासणीसाठी अधिकाऱ्‍यांसमोर उभे केले जाते अगदी तेव्हा देखील, त्याचा देवावर भरवसा असला तर तो निश्‍चिंत राहू शकतो. बायबलमध्ये यहोवा आपल्या श्रद्धाळू लोकांना आश्‍वासन देतो, की त्यांच्यावर छळसंकटे येतात तेव्हा तो आपल्या आत्म्याद्वारे त्यांचा सांभाळ करील आणि चांगली साक्ष देण्यास त्यांना मदत करील.—मत्तय १०:१८-२०; लूक १२:११, १२.

तर मग जेव्हाकेव्हा चिंताक्रांत करणाऱ्‍या, अस्वस्थ करणाऱ्‍या किंवा गोंधळून टाकणाऱ्‍या गोष्टींचा आपल्यावर भडिमार होतो तेव्हा आपण प्रार्थनेमार्फत आपल्या स्वर्गीय पित्याकडे मदत मागितली पाहिजे. अशाप्रकारे आपण ‘यहोवावर आपली सर्व चिंता टाकू’ शकतो आणि काळजी वाहणारा देव जरूर आपली प्रार्थना ऐकेल याची खात्री बाळगू शकतो. (१ पेत्र ५:७) प्रेषित पौल म्हणतो: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना . . . करून आपली मागणी देवाला कळवा.” असे केल्यास आपल्याला देवाने दिलेली शांती मिळेल आणि हीच शांती आपल्या अंतःकरणाचे आणि विचारांचे रक्षण करील. (फिलिप्पैकर ४:६, ७) आणि मग आपण खरोखरच अस्वस्थपणापासून, उद्याच्या चिंतेपासून, भीतीपासून मुक्‍त होऊ आणि चिंतेमुळे उद्‌भवणाऱ्‍या विकर्षणांपासून आणि चक्रावून टाकणाऱ्‍या गोष्टींमुळे आपली मानसिक घालमेल होणार नाही. तर मग पवित्र शास्त्रांमध्ये दिलेल्या सुज्ञ सल्ल्याचे पालन करून आपण अनावश्‍यक चिंतांपासून दूर राहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा