आमच्या वाचकांचे मनोगत
मुलांचे घराबाहेर पडणे “मुले घराबाहेर पडतात तेव्हा,” (फेब्रुवारी १, १९९८) या लेखमालेनं माझं दुःख खूप हलकं केलं. तीन वर्षांपूर्वी आमच्या चार मुलांपैकी तीन मुलं घराबाहेर पडली. एक ना एक दिवस ही पाखरे घरटं सोडून जातील या आशेनंच मी त्यांना वाढवलं असलं तरीही तिघंच्या तिघं एकाच वेळी घरटं सोडून जातील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आम्हा आईवडिलांच्या भावनांचा विचार केल्याबद्दल मी वॉच टावर संस्थेची खरोखर आभारी आहे.
एम. एस., जपान
सध्या मी आणि माझी पत्नी घरापासून अतिशय दूर असलेल्या ठिकाणी खास पायनियर किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास पूर्ण-वेळेचे सुवार्तिक म्हणून सेवा करत आहोत. आईवडिलांपासून अतिशय दूर असलो तरीही आपण मनापासून त्यांच्यावर प्रेम करतो आणि ते आपल्यासाठी प्रिय आहेत हे कसं दाखवून द्यायचं यावर तुम्ही दिलेला सल्ला खरोखरच उपयोगी पडतो.
एम. एम. एस., ब्राझील
मी ११ वर्षांची मुलगी आहे. घरचं काम खरं तर एक जबाबदार व्यक्ती बनण्यास साह्य करतं हे मी कधीच मान्य केलं नव्हतं. पण या लेखांनी मात्र माझ्या विचारसरणीत बदल करण्यास मला मदत केली. आम्हा तरुणांची दखल घेतल्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
डी. यु., युगोस्लाव्हिया
पालकांचा विरोध अलीकडेच मला फेब्रुवारी १, १९९८ चा अंक मिळाला आणि त्यातला “तरुण लोक विचारतात . . . माझ्या विवाहास माझ्या पालकांचा विरोध असल्यास काय?” हा लेख मी वाचला. माझ्या मुलीच्या लग्नाला माझा विरोध असल्यामुळे आपणच कुठंतरी चुकत आहोत अशी खंत मला वाटायची. पण, मला ज्या गोष्टी सतावत होत्या अर्थात तिचं वय, तिच्या होणाऱ्या पतीचा स्वभाव, सत्यात नसलेल्या व्यक्तीशी लग्न करून पस्तावा होण्याची संभावना, एड्स होण्याचा धोका आणि संस्कृतींतील तफावत—नेमक्या याच गोष्टी लेखात दिल्या होत्या. हा लेख माझ्या मुलीच्या हृदयाला स्पर्श करेल अशी माझी प्रार्थना आहे.
एन. बी., अमेरिका
हा लेख अतिशय सुंदर प्रकारे लिहिलेला होता. या अतिशय नाजूक विषयावर तुम्ही अगदी योग्य माहिती पुरवली. लेखात निरनिराळ्या गोष्टींचा उल्लेख असल्यामुळे या विषयांवर अगदी खुले मन ठेवण्यास वाचकाला मदत होते.
एस. सी., अमेरिका
आठ वर्षांपासून मी एक पूर्ण-वेळेचा सुवार्तिक आहे. माझे आईवडीलही ख्रिश्चन आहेत; माझ्या लग्नाला त्यांचा विरोध होता आणि म्हणूनच अशी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल फार फार आभारी.
टी. सी. एफ., टान्झानिया
ख्रिस्ती वैविध्य “बायबलचा दृष्टिकोन: ख्रिस्ती ऐक्य वैविध्यास अनुमती देते का?” (मार्च ८, १९९८) या लेखासाठी मी तुमची मनस्वी आभारी आहे. जितकी अधिक मला यहोवाची ओळख होते तितकेच अधिक आपण त्याच्या संघटनेचा एक भाग आहोत या जाणीवेनं मला आनंद होतो कारण त्याच्या या संघटनेत आपण व्यक्तिमत्त्वांतील अफाट वैविध्याचा आनंद घेऊ शकतो.
आय. पी., स्लोवेनिया
मी १५ वर्षांचा आहे आणि सावध राहा! मासिकाचा एकही अंक मी सोडत नाही. हा लेख मला विशेष आवडला. त्यातल्या एका भागात परादीसची आणि ते नेमके कसे असेल याची चर्चा करण्यात आली आहे. परिपूर्ण मानव कसे असतील तसेच आपले स्वरूप आणि विचार यांबाबतीतही आपण एकसारखेच असू का असा एक प्रश्न मला नेहमीच पडायचा. आता मला समजलं आहे, की मानव आणि प्राणी या दोन्हींमध्ये मोठी विविधता असणार आहे.
जे. सी., अमेरिका