तरुण लोक विचारतात . . .
एखाद्या गोष्टीवर मी लक्ष कसं देऊ शकतो?
“कितीतरी वर्षं मी फुकट घालवली; मी यांत्रिकपणे सभांमध्ये जाऊन बसायचो पण त्यांपासून हवा तितका लाभ मी घेतला नाही. माझं मन इथं तिथं भटकायचं.”—मॅथ्यू.
तुम्ही वर्गात किंवा एखाद्या ख्रिस्ती मंडळीत बसलेले आहात आणि अचानक तुमचे मन इथे तिथे भटकू लागते; असे कधी तुमच्याबाबतीत झाले आहे का? असल्यास यात नवलाईचे असे काहीच नाही. आधीच्या एका लेखाने दाखवून दिले त्याप्रमाणे अनेक युवकांना एखाद्या गोष्टीवर अधिक समयापर्यंत लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.a पण थोडासा प्रयत्न केल्याने आणि आपल्या दृष्टिकोनातही थोडाफार बदल केल्याने तुम्ही तुमची एकाग्रता वाढवू शकता.
रस घ्या
एखाद्या प्रशिक्षित खेळाडूचा विचार करा. प्रेषित पौल म्हणतो: “स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो.” खेळाडूने एका क्षणासाठी देखील आपले लक्ष विचलित होऊ दिले तर त्याला हार खावी लागेल. जिंकण्यासाठी त्याने लक्ष एकाग्र करण्यास शिकले पाहिजे; दुसऱ्या शब्दांत प्रेक्षकांची आरडाओरड, आपले स्वतःचे दुखणेखुपणे व शिणवटा यांकडे दुर्लक्ष करून पराजयाचा कोणताही विचार झटकून टाकण्यास हवा. परंतु, कोणत्या गोष्टीमुळे खेळाडूंना असा असामान्य प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते बरे? प्रेषित पौलाच्या मते, “ते नाशवंत मुकूट मिळविण्यासाठी”—विजेत्यांना दिले जाणारे करंडक व पुरस्कार मिळविण्यासाठी ते हा प्रयत्न करतात.—१ करिंथकर ९:२५.
त्याचप्रकारे, लक्ष देण्यासाठी तुम्हालाही काही प्रेरणा मिळाली पाहिजे! व्हिल्यम एच. आर्मस्ट्राँग यांचे अभ्यास करणं कठीण काम आहे (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते: “एखाद्या गोष्टीत रस घेणं ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. दुसरा कोणी तुमच्या अभ्यासात रस घेऊन चालत नाही किंवा तुमची इच्छा नसताना तुमची रुची वाढवू शकत नाही.” तुमच्या सभोवतालचे जग जाणण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्ञान. तुम्ही जितके अधिक ज्ञानार्जन करता तितके अधिक तुम्ही शिकू शकता. नीतिसूत्रे १४:६ म्हणते की, “समंजसाला ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते.” तुम्हाला कदाचित शाळेत शिकलेल्या सगळ्याच गोष्टी आठवणार नाहीत; पण निदान चाणाक्षपण वाढविण्यास तरी शाळा तुम्हाला मदत करू शकते. (पडताळा नीतिसूत्रे १:४.) मनाला शिस्त लावल्याने व लक्ष केंद्रित करण्याची क्षमता विकसित केल्याने तुम्हाला आयुष्यभर लाभ होऊ शकतो.
बोर झालेले व बोर करणारे शिक्षक
पण काही किशोरवयीन मुलेमुली अशी तक्रार करतात, की त्यांच्या शिक्षकांनाच शिकवण्यात रस नसतो. जेसी नामक एक युवक म्हणतो: “शिक्षक आमच्यापुढे उभे राहून उगीच बोलायचं म्हणून काहीतरी बोलतात, गृहपाठ देतात आणि मग देतात आम्हाला सोडून. मला तरी असं वाटतं, की आजकालचे शिक्षक सुस्त झालेत. ते स्वतःच आपल्या विषयाला महत्त्व देत नाहीत तेव्हा साहजिकच आम्हालाही लक्ष द्यावंसं वाटत नाही.”
मग यावरून, लक्ष देणे म्हणजे फुकट वेळ घालवणे असा निष्कर्ष आपण काढावा का? मुळीच नाही. कधीकधी शिक्षक एका दुष्ट चक्रात सापडलेले असतात. कॉलन नावाचा एक किशोरवयीन खुलासा करतो: “शिक्षकांच्या शिकवण्याकडे कुणाचंही लक्ष नसतं त्यामुळे कुणालाही शिकण्याची इच्छा नाही असं शिक्षकांना वाटतं. म्हणून मग ते देखील तन मन लावून शिकवत नाहीत.”
पण या परिस्थितीत बदल करणे तुमच्या हातात आहे खरे. पण कसे? केवळ लक्ष दिल्याने. निरुत्साहित झालेल्या शिक्षकाला शंभरापैकी फक्त एक जरी शिकण्यात रस घेणारा विद्यार्थी सापडला तरी त्या एकट्यासाठी तो पुन्हा उत्साहाने शिकवू लागेल. हे मान्य, की काही शिक्षकांमध्ये मूळातच विद्यार्थ्यांचे लक्ष खिळवून ठेवण्याची क्षमता नसते. परंतु, आपले मन भलतीकडे भरकटू देण्याआधी स्वतःला विचारा: ‘हा शिक्षक वाकबगार आहे की नाही?’ असल्यास, त्याच्याकडून काहीतरी शिकून घेण्याचा निर्धार करा. लक्षपूर्वक ऐका—लक्ष एकाग्र करा! वर्गातील चर्चेत सक्रियपणे भाग घ्या. मुद्देसूद प्रश्न विचारा. हायस्कूलमध्ये कसे शिकावे (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते: “शिक्षक फळ्यावर लिहून काढतात किंवा ज्यांवर विशेष जोर देतात त्या आकृत्या, मुख्य शब्द, तक्ते, परिभाषा आणि मुख्य मुद्दे आपल्या वहीत उतरवून काढणे अनेक विद्यार्थ्यांना लाभदायक वाटते.”
“विशेष लक्ष” देणे
तथापि, ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणे हे वर्गात लक्ष देऊन ऐकण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाचे आहे. जेसी म्हणतो: “सभांसारख्या गोष्टींकडे तरुण लोक कधीकधी लक्ष देत नाहीत कारण सभा किती महत्त्वाच्या असतात याची त्यांना जाणीव नसते.” इब्री लोकांस पत्र २:१ मध्ये आपल्याला ‘ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावण्याची’ आज्ञा दिलेली आहे ‘जेणेकरून आपण त्यापासून वाहवत जाणार नाही.’ एखाद्या ख्रिस्ती सभेवरून परत आल्यावर सभेतल्या प्रत्येक भागातून निदान काही मुद्दे तरी तुम्हाला आठवतात का? की तो भाग कोणी हाताळला होता हे देखील तुम्हाला कधीकधी आठवेनासे होते?
सगळ्यात मुख्य मुद्दा कोणता, तर शिकत असलेल्या गोष्टीचे महत्त्व जाणणे. खरे तर, तुमचे संपूर्ण जीवनच त्यावर अवलंबून आहे! (योहान १७:३) विचार करण्याजोगा आणखीन एक मुद्दा: तुम्ही बायबलविषयी शिकता तेव्हा तुम्ही खुद्द देवासारखे विचार करण्यास शिकत असता! (यशया ५५:८, ९) आणि शिकलेल्या गोष्टी तुम्ही आचरणात आणता तेव्हा बायबलच्या शब्दात तुम्ही “नवा मनुष्य” धारण करता. (कलस्सैकर ३:९, १०) पण तेच जर तुम्ही लक्ष देण्यात मागे पडलात तर कदाचित तुम्ही जीवनात आवश्यक त्या सुधारणा करणार नाहीत; परिणामस्वरूप, आध्यात्मिकरित्या तुमची प्रगती होणार नाही. आपल्या प्रत्येकामध्ये मन भरकटू देण्याची प्रवृत्ती वसलेली असते याची यहोवाला जाणीव आहे. म्हणूनच तो अशी विनवणी करतो: “माझे लक्षपूर्वक ऐका. . . . कान द्या, मजकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल.”—यशया ५५:२, ३.
सभांपासून पुरेपूर लाभ कसा घ्याल
सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणे सुरवातीला कदाचित कठीण वाटेल. पण संशोधकांचे म्हणणे आहे, की आपण लक्ष एकाग्र करण्याचा जितका अधिक सराव करतो तितकेच ते आपल्याला अधिक जमते. सभांमध्ये बसल्या बसल्या मनाने इथे तिथे भरकटण्याच्या प्रवृत्तीवर, सुरवातीला उल्लेख केलेल्या मॅथ्यूने मात केली. तो म्हणतो: “मला असं जाणवलं की लक्ष लावण्यासाठी मला स्वतःला शिस्त लावावी लागते. काही समयानंतर आपल्याला याची सवय होऊन जाते आणि आपण अधिक समयांपर्यंत लक्ष देऊ शकतो.” ज्या एका मुख्य कारणामुळे आपल्यासाठी सभा आनंददायी होतात याचा खुलासा करताना मॅथ्यू म्हणतो: “मी सभांची तयारी करून जातो.” त्याचप्रमाणे शेरीस नामक एक युवती म्हणते: “मी तयारी करून सभांना जाते तेव्हा मी सभेत समाविष्ट असल्यासारखं मला वाटतं. भाषणे अधिकच लक्षवेधक आणि अर्थपूर्ण वाटतात.”
विचलित करणाऱ्या विचारांना दूर करणे देखील महत्त्वाचे आहे. हे खरे, की तुमच्या मनात अनंत चिंता घर करून असतील; जसे की येत्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा, ताण निर्माण करणारी लहानमोठी भांडणे, तुम्हाला करावा लागणारा काही खर्च. पण येशूने सल्ला दिला: “चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.” (मत्तय ६:२७, ३४) सभांमध्ये लक्ष एकाग्र केल्याने तुम्ही काही समस्यांतून मुक्त होणार नाहीत तर तुमच्या समस्यांचा अधिक चांगल्याप्रकारे सामना करण्यासाठी त्या आध्यात्मिकरित्या तुमच्यात नवीन जोम निर्माण करतील.—पडताळा २ करिंथकर ४:१६.
लक्षपूर्वक ऐकल्याने मन एकाग्र ठेवण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. मॅथ्यू म्हणतो: “वक्ता आपल्या भाषणात कोणकोणते विषय स्पष्ट करील आणि ते कसे हाताळील याचा अंदाज बांधण्याचा मी प्रयत्न करत असतो.” स्वतःस विचारा, ‘भाषणाचे मुख्य मुद्दे कोणते आहेत? जे काही शिकवले जाते त्याचा उपयोग मी कसा करू शकतो?’ आता वक्ता पुढे काय म्हणणार आहे याचा अंदाज बांधल्याने मन एकाग्र करण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. त्याचा युक्तिवाद समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो कशाप्रकारे बायबलमधून मुद्दे स्पष्ट करतो त्याची नोंद घ्या. वक्त्याच्या मुख्य मुद्द्यांचा विचार करून मनातल्या मनांत त्यांचा सारांश करा. संक्षिप्त, पण अर्थपूर्ण मुद्दे वहीत उतरवून घ्या. सभेतील एखाद्या भागात सहभाग घेण्याची संधी असल्यास सहभागी व्हा! त्यामुळे तुमचे मन लागेल आणि भलते सलते विचारही मनात येणार नाहीत.
एखाद्या वक्त्याच्या बोलण्यात जोष नसला किंवा भाषण देण्याची त्याची पद्धत अगदीच रटाळ असली, की लक्ष देणे आणखीनच कठीण जाते हे मान्य. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना प्रेषित पौलाच्या वक्तृत्व क्षमतेबद्दल कसे वाटले त्याची आठवण करा; ते म्हणाले: “त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे.” (२ करिंथकर १०:१०) परंतु पौलाने या टिकेस पुढील शब्दांत प्रत्युत्तर दिले: “जरी भाषण करण्यात [मी] अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही.” (२ करिंथकर ११:६) खरेच, त्याच्या श्रोत्यांनी त्याच्या वक्तृत्व क्षमतेपलीकडे पाहिले असते व तो नेमके काय बोलत आहे यावर लक्ष एकाग्र केले असते तर ‘देवाच्या अनेकानेक गहन गोष्टी’ ते शिकू शकले असते. (१ करिंथकर २:१०) याचप्रमाणे तुम्ही देखील लक्ष एकाग्र करून ऐकल्यास एखाद्या “अगदीच रटाळ” वक्त्याकडून देखील तुम्ही पुष्कळ काही शिकू शकता. कोण जाणे, कदाचित ते एखाद्या मुद्द्याचे किंवा शास्त्रवचनाचे अगदीच वेगळ्या पद्धतीने, तुम्हाला कधी वाटलेही नसेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण करतील.
लूक ८:१८ येथील येशूचे शब्द अगदी सुरेखपणे सदर बाबीचा समारोप करतात: “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा.” हे मान्य की मन भरकटू न देता लक्ष एकाग्र करण्याचे शिकण्यासाठी प्रयास आणि रियाज या दोन्ही गोष्टींची गरज असेल. पण कालांतराने याचे फायदे तुमच्या पदरी पडतील. लक्ष एकाग्र करण्यास शिकल्याने तुमचे मार्क्स वाढू शकतील आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमची आध्यात्मिक वाढ होऊ शकेल!
[तळटीपा]
a ऑगस्ट ८, १९९८ च्या सावध राहा! अंकातील, “तरुण लोक विचारतात . . . माझं लक्ष का लागत नाही?,” हा लेख पाहा.
[२१ पानांवरील चित्र]
ऐकत असलेल्या गोष्टींत रस घेणे हा लक्ष एकाग्र करण्याचा एक मुख्य मार्ग आहे