बायबलचा दृष्टिकोन
आपल्या पापांसाठी सैतानाला जबाबदार धरावे का?
पहिल्या मानवी पापाचे खापर सैतानाच्या डोक्यावर फोडण्यात आले होते. हव्वेने म्हटले: “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून ते मी खाल्ले.” (उत्पत्ति ३:१३) त्या दिवसापासून “दियाबल व सैतान म्हटलेला तो जुनाट साप” मानवजातीवर एका पाठोपाठ एक हल्ले चढवत आहे; शिवाय, तो ‘लोकांची मने अंधळी करत आहे’ व ‘सर्व जगालाच ठकवित आहे.’ (प्रकटीकरण १२:९; २ करिंथकर ४:४) एकही व्यक्ती त्याचा दबाव चुकवू शकत नाही; पण याचा अर्थ आपण त्याच्या प्रभावाचा प्रतिकार करूच शकत नाही असा होतो का? आणि मग आपल्या हातून पाप घडते तेव्हा त्या प्रत्येक पापासाठी तोच जबाबदार असतो का?
बायबल स्पष्टीकरण देते त्यानुसार सैतानानेच हव्वेला भुरळ घातली हे अगदी खरे आहे. (१ तीमथ्य २:१४) त्याने तिची फसवणूक केली, असा विचार करायला लावून, की देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याने तिला देवासारखी बुद्धी व स्वतंत्रता प्राप्त होऊ शकते. (उत्पत्ति ३:४, ५) यावर विश्वास ठेवून तिने पाप केले. पण तरी देवाने तिलाच जबाबदार धरले व तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. का बरे? कारण सैतानाने जरी लबाडी केली होती तरीही शेवटपर्यंत तिला देवाची आज्ञा माहीत होती. आज्ञाभंग करण्यास तिला कोणीच भाग पाडलेले नव्हते; उलट, शेवटपर्यंत आपण काय करत आहोत याची तिला पुरेपूर जाणीव असल्यामुळे सैतानाच्या प्रभावाचा प्रतिकार करणे तिला शक्य होते.
सैतानाचा प्रतिकार करा
सैतानाचा प्रतिकार करणे मानवाला अशक्य नाही. इफिसकर ६:१२ मध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की, ‘आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आपल्याला झगडायचे आहे.’ स्पष्टतः, आपण सैतानाच्या प्रभावाविरुद्ध लढावे अशी अपेक्षा देव आपल्याकडून करतो. परंतु, एखाद्या मानवाला, अतिमानवी सैतानाचा व त्याच्या दुरात्म्यांचा सामना कसा करता येईल? आपल्याला अशी एक लढाई लढण्यास सांगितले जात आहे का जी जिंकणे मुळातच आपल्या शक्तीपलीकडे आहे? नाही, कारण आपल्याच बळावर सैतानाचा सामना करण्यास देव आपल्याला सांगत नाही. सैतानाच्या प्रलोभनांचा प्रतिकार करून यात विजयी होण्यासाठी यहोवा आपल्याला निरनिराळी साधने पुरवतो. सैतान कोण आहे, तो कशाप्रकारे कार्य करतो आणि आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो या प्रश्नांची उत्तरे बायबल आपल्याला देते.—योहान ८:४४; २ करिंथकर २:११; ११:१४.
“सैतानाला आडवा”—ते कसे?
सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी शास्त्रवचने दोन गोष्टी सुचवतात. आपल्याला असा सल्ला देण्यात आला आहे: “म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) देवाच्या अधीन होण्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. देवाचे अस्तित्व, त्याचा चांगुलपणा, त्याचे अलौकिक सामर्थ्य आणि अधिकार तसेच त्याचे उदात्त सिद्धान्त या सर्वांचा क्षणासाठी देखील विसर न पडू दिल्यास सैतानाचा विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. याशिवाय, सतत देवाला प्रार्थना करणेही अत्यावश्यक आहे.—इफिसकर ६:१८.
सैतानाने येशूची परीक्षा घेतली त्या प्रसंगाचा विचार करा. देवाच्या विविध आज्ञा आठवून त्या उद्धृत केल्याने सैतानाचा प्रतिकार करण्यात त्याला नक्कीच मदत झाली. भुरळ घालून येशूला पापात पाडण्यात सैतानाचा प्रयत्न फोल ठरला तेव्हा तो येशूला सोडून गेला. या सत्वपरीक्षेनंतर यहोवाने आपल्या देवदूतांमार्फत येशूला आणखीन बळकट केले. (मत्तय ४:१-११) आपल्या शिष्यांना उत्तेजन देताना येशू अगदी आत्मविश्वासाने त्यांना सांगू शकला, की ‘वाईटापासून सोडवले जाण्यासाठी’ त्यांनी देवाकडे विनंती करावी.—मत्तय ६:१३.
देव आपल्याला सोडवतो म्हणजे तो आपल्यावर संकटे येऊच देत नाही असे नाही. उलट तो आपल्याला खरेपणा, धार्मिकता, शांती आणि विश्वास यांसारखे ईश्वरी गुण सतत विकसित करत राहण्यास सांगतो. हे सर्व गुण जणू ‘शस्त्रसामग्रीचे’ काम करतात जेणेकरून आपल्याला ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता येईल.’ (इफिसकर ६:११, १३-१८) तर मग, देवाच्या साहाय्याने सैतानाची प्रलोभने हाणून पाडणे आपल्याला शक्य आहे.
दुसरी गोष्ट याकोब ४:७, ८ येथे सांगितलेले आहे, आणि ते म्हणजे, “सैतानाचा विरोध करा.” यात काही निश्चित कृती करणे अर्थात, त्याच्या हानिकारक प्रभावापासून पळ काढणे अंतर्भूत आहे. त्याच्या फसव्या प्रभावाला बळी पाडणारी कोणतीही परिस्थिती तसेच या जगात सर्वव्याप्त असणारी भौतिकवादी व अनैतिक विचारसरणी एखाद्याने कटाक्षाने टाळली पाहिजे. अशाप्रकारे सैतानाचा विरोध करणे व त्यासोबतच देवाला प्रसन्न करण्याकरता आपले जीवन त्याला समर्पित करणे या दोन्ही गोष्टी सैतानाचा सामना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. परंतु, सर्वच पातके सैतानाच्या प्रभावामुळे घडत असतात का?
स्वतःशी लढणे
बायबल लेखक याकोब खुलासा करतो: “तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” (याकोब १:१४, १५) मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण आपल्या अंगभूत दुर्बलतांवर व अपरिपूर्णतेवर पूर्णपणे मात करू शकत नाही. (रोमकर ५:१२) “सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही.”—उपदेशक ७:२०.
पण सगळीच पातके आपल्या हाताबाहेर आहेत असाही याचा अर्थ होत नाही. काही वेळा तर चुकीचे मार्ग पत्करल्याने आपण स्वतःच प्रलोभने ओढवून घेत असतो. यास्तव, आपल्या स्वतःच्या अपरिपूर्णतेमुळे किंवा मग सैतानाच्या प्रभावामुळे एखादी अयोग्य वासना आपल्या मनात आली तरीही तिला आपल्या मनात गोंजारत राहणे अथवा ती ताबडतोब मनातून झटकून टाकणे हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. उचितपणे प्रेषित पौलाने लिहिले: “कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकर ६:७.
दोष पदरी घेणे
अनेकदा मानवांना आपल्या दुर्बलता, कमतरता, चुका म्हणजेच आपली पातके कबूल करणे जड जाते. (स्तोत्र ३६:२) एक गोष्ट मात्र आपला पापांचा दोष पदरी घेण्यास आपली मदत करू शकते आणि ती म्हणजे आपण परिपूर्ण असावे अशी अपेक्षा देव आज आपल्याकडून करत नाही याची जाणीव राखणे. स्तोत्रकर्त्या दाविदाने म्हटले: “आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही.” (स्तोत्र १०३:१०) देव क्षमाशील असला तरीही सैतानाच्या मोहपाशांविरुद्ध व आपल्या स्वतःच्या पापी प्रवृत्तीविरुद्ध आपण शर्थीची लढत द्यावी व स्वतःस शिस्त लावावी अशी देवाला आपल्याकडून अपेक्षा आहे.—१ करिंथकर ९:२७.
एक गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे सैतान आपल्याला बहकवू शकतो व मानवाच्या पापमय स्थितीसाठी मोठ्या प्रमाणात तोच जबाबदार आहे हे देवाला पूर्णपणे माहीत असले तरीसुद्धा आपण आपल्या वैयक्तिक जबाबदारीतून मुक्त होत नाही. म्हणूनच रोमकर १४:१२ म्हणते: “तर मग आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.”
पण आपण ‘वाईटाचा वीट मानला’ व ‘बऱ्याला चिकटून राहिलो’ तर वाईटावर विजय मिळवू शकतो. (रोमकर १२:९, २१) पहिली स्त्री, हव्वा, ही हेच करण्यात कमी पडली आणि परिणामस्वरूपी आपल्या आज्ञाभंगासाठी तिला शिक्षा झाली; ती सैतानाचा प्रतिकार करण्याच्या व देवाला आज्ञाधारक राहण्याच्या स्थितीत नव्हती असे मुळीच म्हणता येणार नाही. (उत्पत्ति ३:१६) पण, तिला भुरळ घालण्यात सैतानाचा हात होता ही बाब देवाने दुर्लक्षित केली नाही. सैतानाला शापित ठरवून सरतेशेवटी त्याला सर्वनाशाची शिक्षा ठोठावण्यात आली. (उत्पत्ति ३:१४, १५; रोमकर १६:२०; इब्री लोकांस २:१४) लवकरच अशी एक वेळ येईल जेव्हा त्याच्या वाईट प्रभावाशी झुंजण्याची गरजच उरणार नाही.—प्रकटीकरण २०:१-३, १०.
[२२ पानांवरील चित्राचे श्रेय]
Erich Lessing/Art Resource, NY