वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १०/८ पृ. १४-१८
  • नूतन, अनोखे व भरभराटीने वाढणारे ब्राझीलिया

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नूतन, अनोखे व भरभराटीने वाढणारे ब्राझीलिया
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लांबलेली प्रस्तावना
  • स्पर्धा आणि प्लॅन
  • धुळीतून उदयास आलेले “विमान”
  • कॅनव्हसमधून काँक्रीटमध्ये रूपांतर
  • पहिले व एकमेव
  • विहंगमावलोकन
  • तुमचा रस्ता चुकूच शकत नाही
  • विकासजन्य समस्या
  • “हार्ट ऑफ ब्राझील?”
  • ‘विविधतेने नटलेल्या देशाचा’ नाट्यमय इतिहास
    सावध राहा!—२०००
सावध राहा!—१९९८
g98 १०/८ पृ. १४-१८

नूतन, अनोखे व भरभराटीने वाढणारे ब्राझीलिया

ब्राझीलमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

जगात कोणते असे ठिकाण आहे जेथे तुमच्या देशाच्या राजधानी शहराचे मूळ प्लॅन्स आखणाऱ्‍या डिझायनरशी तुम्ही चक्क फोनवर बोलू शकता; तुमच्या राजधानीच्या पहिल्या शासकीय इमारतींची डिझाईन करून त्यांच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्‍या आर्किटेक्टला तुम्ही सपशेल भेटू शकता किंवा मग, राजधानीतून फेरफटका मारताना चाळीशी ओलांडलेली कुठलीही व्यक्‍ती दिसली की तिचा जन्म येथे झालाच नसेल हे तुम्हाला पक्के ठाऊक असते? ब्राझीलिया, अर्थात ब्राझीलच्या राजधानीमध्ये. चला या नूतन, अनोख्या शहराचे आपण जरा जवळून अवलोकन करू या.a

लांबलेली प्रस्तावना

साउ पाउलु ते ब्राझीलिया हा विमानप्रवास दीडएक तासाचा आहे. तर आरामदायी बसेसने हाच प्रवास सुमारे १२ तासांत होतो. मी आपला बसनेच प्रवास करण्याचे ठरवले. त्यामुळे या शहराच्या इतिहासाविषयी बरेचकाही वाचण्यास मला भरपूर वेळ मिळाला.

आठराव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे पोर्तुगीज शासनाविरुद्ध पहिले संघटित बंड पुकारले गेले तेव्हापासूनच ब्राझीलमध्ये एक नूतन राजधानी उभारण्याच्या योजना ऐकिवात होत्या. सन १८२२ मध्ये अर्थात ब्राझीलच्या स्वातंत्र्यप्राप्ती काळानंतर लगेचच मुत्सद्दी शोझे बॉनीफॉस्यू जी अन्ड्राड ई सील्वा यांनी या भावी राजधानीचे नामकरण ब्राझीलिया केले जावे असे सुचवले; १७ व्या शतकातील नकाशाकारांनी संबंध देशासाठीच या नावाचा उपयोग केला होता.

सन १८९१ मध्ये देशाच्या नवीन घटनेने असे विहीत केले, की सेंट्रल हायलँड प्लेनवर सॅव्हाना प्रदेशाचा ५,४०० चौरस किलोमीटर भाग आरक्षित केला जावा. समुद्रतटापासून सुमारे १,००० किलोमीटर दूर असलेल्या या ठिकाणी नूतन राजधानी उभारली जाणार होती. राजकीय नेत्यांनी असे म्हणून या योजनेचे समर्थन केले, की या राजधानीला रीउ दे झानेइरूमधून हलवून मध्यस्थानी आणल्याने देशाच्या अफाट आंतरिक भागाचा तुफान वेगाने विकास होईल. पण, तब्बल ५० वर्षे उलटून गेली तरीही हलवाहलवीचे काहीएक चिन्ह दिसत नव्हते. शेवटी, १९५५ साली ब्राझीलियाची लांबलेली प्रस्तावना एकदाची समाप्त होऊन मोठ्या धुमधडाक्यात एका नव्या अध्यायाची सुरवात होणार होती.

स्पर्धा आणि प्लॅन

त्याच वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार ज्सूस्चेलिनो कुबिट्‌स्चेक यांनी वचन दिले, की राष्ट्राध्यक्ष म्हणून ते निवडून आले तर आपली ५ वर्षांची कारकीर्द संपुष्टात येण्याआधी सदर राजधानी वास्तवात उतरलेली असेल. एप्रिल १९५६ साली कुबिट्‌स्चेक निवडून आले.

याच्या काही महिन्यांपूर्वीच सरकारने एक स्पर्धा जाहीर केली: ब्राझीलमधील आर्किटेक्ट्‌स, इंजिनिअर्स व शहर प्लॅनर्सना सदर राजधानीसाठी प्लॅन आखण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. काही महिन्यांतच २६ उमेदवारांनी आदर्श राजधानीचे आपापले प्लॅन्स पाठवले. मार्च १९५७ रोजी एका अंतरराष्ट्रीय निवड समितीने विजेत्याची घोषणा केली; तो विजेता होता शहरी प्लॅनर लूस्यू कॉस्टा.

कॉस्टा यांनी पाठविलला प्लॅन इतर स्पर्धकांपेक्षा वेगळा होता; त्याच्या प्लॅन्समध्ये काही कच्च्या रेखाटनांचा व मजकूर खरडलेल्या काही पानांचा समाविष्ट होता; सबंध शहराचा हा मसुदा त्याने एका मनीला लिफाफ्यात बंदिस्त केला होता! आपल्या या त्रोटक रूपरेषेबद्दल त्यांने ज्यूरीकडे पुढील शब्दांत दिलगिरी व्यक्‍त केली: “तो [प्लॅन] तुमच्या पसंतीस उतरला नाही तर त्याची विल्हेवाट लावणे सोपे जाईल; शिवाय, मी माझा स्वतःचा आणि दुसऱ्‍यांचाही वेळ वाया घालवलेला नसेल.” ज्यूरीला मात्र त्याचा प्लॅन आवडला आणि तो “स्पष्ट, रोखठोक व मूळात साधा” असल्याची घोषणा ज्यूरीने केली. त्याच्या प्लॅनमध्ये विशेष असे काय सुचवले होते व त्याचे रूपांतर एका काँक्रीट शहरात कसे काय झाले बरे?

धुळीतून उदयास आलेले “विमान”

वरील प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खुद्द मयूसेयू व्हीव्ह्यू डा मेमोऱ्‍या कानडांगा (कानडांगो स्मृतीचे जिवंत संग्रहालय) यास भेट देणे. राजधानीतील पहिल्यावहिल्या हॉस्पिटल इमारतीत हे संग्रहालय असल्यामुळे ही इमारत जणू ब्राझीलियाचे जन्मस्थानच. ४० वर्षांपूर्वी ब्राझीलियाच्या पहिल्या बाळांचा येथेच जन्म झाला. आज मात्र एके काळचे हे हॉस्पिटल ब्राझीलियाच्या जन्माची व बाल्यावस्थेची कथा सांगत उभे आहे. संग्रहालयातील एक प्रदर्शन म्हणते त्याप्रमाणे ही, ‘धूळ, कॅनव्हस आणि काँक्रीटची’ कथा आहे.

संग्रहालयाची कर्मचारी लाउरेटी माशाडू, “धूळ” कालखंड म्हणून ओळखला जाणारा बांधकामाचा पहिला टप्पा मला फिरवून दाखवले. मग १९५७ साली घेतलेल्या एका चित्रासमोर येऊन ती थांबते; सॅव्हाना प्रदेशातून मार्ग काढणाऱ्‍या व एका दुर्गम भागाच्या मध्यभागी येऊन मिळणाऱ्‍या दोन कच्च्या रस्त्यांचे ते चित्र होते. ती म्हणते: “हे चित्र शहराच्या निर्मितीतील सगळ्यात पहिल्या टप्प्याचे आहे.” मग कॉस्टाची रेखाटने पाहिल्यानंतर आपल्याला समजते, की या शहरी प्लॅनरने दोन रस्त्यांपैकी एका रस्त्याला असे काही वळण दिले आहे, की कानडांगूसb म्हटल्या जाणाऱ्‍या श्रमिकांनी पुढे सॅव्हाना प्रदेशात हा कमानसदृश्‍य रस्ता निर्माण केला तेव्हा या धुळीतून एका विमानाकाराचा उदय झाला.

ब्राझीलियाचा हा अनोखा आकार—एक विमान ज्याच्या कॉकपीटचा (वैमानिकाची बसण्याची जागा) रोख पूर्वेकडे असून उत्तरेकडे व दक्षिणेकडे फैलावलेले त्याचे कमानीसारखे पंख—आजही जशाचा तसा आहे. कॉकपीटमध्ये सरकारच्या तीन शाखांच्या इमारती आहेत, विमानाच्या मुख्य भागात व्यापारी विभाग आहे तर त्याच्या पंखांच्या भागात निवासी क्षेत्र आहे.

कॅनव्हसमधून काँक्रीटमध्ये रूपांतर

बांधकामस्थळी पोहंचण्याकरता संबंध ब्राझीलमधील कामगारांनी आपले होते नव्हते ते कशाप्रकारे विकून टाकले याची कथा संग्रहालयातील “कॅनव्हस” आणि “काँक्रीट” विभाग सांगतात. ऑगस्ट १९५७ मध्ये येथे पोहंचलेला एक कामगार आठवून सांगतो: ‘माझ्या वडिलांनी एक ट्रक विकत घेतला, त्यात आमच्या सबंध परिवाराला—२० पेक्षा अधिक लोकांना—कोंबलं आणि तिथं पोहंचण्यासाठी आम्ही चक्क १९ दिवस ट्रकमधून प्रवास केला.’ इतर लोकांनी बसने किंवा बैलगाड्यांनी किंवा मग लिफ्ट मागून प्रवास केला. एकूण ६०,००० कामगारांनी बांधकामस्थळी हजेरी लावली.

कॅनव्हसच्या तंबूंमध्ये राहणाऱ्‍या या बांधकाम दलाची नितान्त गरज होती कारण एप्रिल २१, १९६० रोजी शहराचा उद्‌घाटन समारंभ होणार होता. याचा अर्थ, इंजिनिअर्स, टेक्निशियन्स व बांधकाम कर्मचाऱ्‍यांना अवघ्या १,००० दिवसांत राजधानी शहर उभे करायचे होते; खरेच एक भव्यदिव्य कामगिरी! पण, उद्‌घाटनाचा दिवस उजाडण्याआधीच कामगारांनी राजधानी शहर उभे केले होते. होय, जगातील सगळ्यात नूतन राजधानीचा उदय सॅव्हाना प्रदेशाच्या धुळीतून झाला होता.

पहिले व एकमेव

ब्राझीलमधील संयुक्‍त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेत (युनेस्को) आजही या शहराची व त्याच्या बिल्डर्सची हिरहिरीने स्तुती केली जाते. युनेस्कोच्या सांस्कृतिक विभागाचे राजदूत सहायक डॉ. ब्रीआनी ई. बिका मला सांगतात की, “कॉस्टाच्या प्लॅनव्यतिरिक्‍त अशा एकाही शहर-प्लॅनचे उदाहरण देता येणार नाही ज्याचा अंमल इतक्या तंतोतंतपणे करण्यात आला आहे. यामुळेच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये ब्राझीलिया हे २० व्या शतकात निर्माण झालेले जगातील पहिले आणि एकमेव शहर आहे.”c

ब्राझीलियाच केवळ एक शहर आहे ज्याचे बांधकाम अद्यापही चालू आहे. यामुळेच, डॉ. बिका म्हणतात की एक आव्हान उभे ठाकते. “शहरच बदलत चालले असताना शहराचा मूळ प्लॅन जतन करणे कसे शक्य आहे?” आर्किटेक्ट लूस्यू कॉस्टा जिवंत होते तेव्हा म्हणजे त्यांनी आयुष्याची नव्वदी गाठली होती अगदी तेव्हा देखील ते हे आव्हान पेलत होते. त्यांनी तयार केलेले रेखांकन बिघडू नये म्हणून नवनवीन बांधकामांवर त्यांची कडी नजर होती. उदाहरणार्थ, जेव्हा कॉस्टाला समजले की ब्राझीलियात शहरी लोहमार्ग बांधण्याच्या योजना केल्या जात आहेत तेव्हा ट्रेन्ससाठी भुयारीमार्ग बांधला जावा असा आग्रह त्यांनी केला.

विहंगमावलोकन

आता शहर फिरून पाहण्याची वेळ झाली आहे. पहिल्यांदा या शहराला भेट देणाऱ्‍या व्यक्‍तीचा देखील क्वचितच मार्ग चुकेल. तेथे दोन महामार्ग असून ते ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात तेथे शहराचे बसस्थानक आहे. एक महामार्ग पश्‍चिमेपासून पूर्वेला धावणारा (“विमानाच्या” मागच्या टोकापासून कॉकपीटपर्यंत) असून तेथे हॉटेल्स, नाट्यगृह, बँका आणि दुकानांच्या सुविधा उपलब्ध आहेत. दुसरा महामार्ग उत्तरेपासून दक्षिणेला धावणारा (पंखाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत) असून तो तुम्हाला निवासी भागात घेऊन जातो.

ब्राझीलिया नेमके कसे दिसते हे पाहायचे असेल तर सर्वात उत्तम स्थान म्हणजे टेलिव्हिजन टावर; हे ७३० फूट उंच असलेले टावर विमानाच्या मुख्य भागात व पंखांच्या मागेच आहे. त्यातील लिफ्टची फुकट राईड तुम्हाला २५० फूट वर घेऊन जाते व तेथून प्लानू पीलॉटू म्हटलेल्या शहराच्या केंद्रस्थानाचे विहंगमावलोकन करता येते. मैलोगणती पसरलेल्या विस्तीर्ण, मोकळ्या लॉन्सकडे तुमची नजर जाते तेव्हा जणू आकाश त्यांना भिडत आहे असे वाटते आणि ब्राझीलियाचा हा अफाटपणा पाहून तुम्ही अवाक होऊन जाल. खरे तर, लँडस्केप डिझायनर रोबर्टो बूर्ली मार्क्स यांनी ब्राझीलिया शहरात इतक्या ठिकाणी बगीच्यांकरता आणि हिरवळींकरता जागा सोडली आहे, की राजधानी शहराच्या प्रत्येक माणसामागे असणारा हिरवा परिसर इतर कोणत्याही शहरापेक्षा नक्कीच जास्त आहे.

शहराच्या पूर्वेकडे एक विस्तीर्ण गवताळ पट्टा असून त्याच्या दोन्ही बाजूंना रस्त्याची जणू एक झालरच आहे. याच रस्त्यावर १७ एकसारख्या इमारती आहेत. बॉक्सचा आकार असलेल्या या इमारतींत निरनिराळे सरकारी विभाग आहेत. गवताळ पट्टीच्या शेवटास ब्राझीलियाचे दर्शक चिन्ह आहे: दोन एकसारखे घुमट; यातील एक सरळ तर एक उलट असून ज्यात नॅशनल काँग्रेस, ब्राझीलचे संसदगृह वसलेले आहे त्या २८ मजल्यांच्या इमारतीच्या पायथ्याशीच हे दोन घुमट आहेत.

नॅशनल काँग्रेस वास्तुरचनेचा आकार पाहून तुम्हाला कदाचित न्यूयॉर्कमधील संयुक्‍त संस्थानांच्या मुख्यालयांची आठवण होईल आणि ते साहजिक आहे. यूएनच्या इमारतींचे प्लॅन्स आखण्यात ज्या एका आर्किटेक्टचा हात होता त्याच ओस्करा नीमाइअरने नॅशनल काँग्रेसच्या तसेच ब्राझीलियाच्या जवळजवळ सर्वच मुख्य इमारतींच्या डिझाईन्स तयार केल्या. त्यांच्या डिझाईनचा एक सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे विदेशी मंत्रालय (पालास्यू ईटामाराटी) आणि न्याय मंत्रालय (पालास्यू जा ज्हूस्टीसा) असून हे नॅशनल काँग्रेसच्या दोन एकसारख्या इमारतींपाशी उभे आहे.

तुमचा रस्ता चुकूच शकत नाही

तथापि, ब्राझीलिया निव्वळ एक वास्तुकलेचे उद्यान नाही तर ते हजारो हजारो लोकांना सुबक निवासस्थाने देखील पुरवते. आम्ही शहराच्या निवासी भागातून जातो तेव्हा ब्राझीलियात राहणारा पाऊलू नामक वकील म्हणतो: “ब्राझीलियात येऊन स्थिरस्थावर झालेल्या अनेक लोकांची इतर शहरांतील अव्यवस्थितपणापासून सुटका झाल्यामुळे इथला सुव्यवस्थितपणा अगदी हवाहवासा वाटतो.”

ब्राझीलियाचे निवासी, फ्लॅट्‌समध्ये राहतात. एखाद्या आवाराच्या चारही बाजूंनी थाटलेल्या अशा फ्लॅट्‌सच्या इमारतींचा मिळून एक सुपरब्लॉक तयार होतो. शहराच्या उत्तर व दक्षिण भागांत अशा सुपरब्लॉक्सची तर नुसती रांगच लागलेली आहे. घरपत्ते तर अगदी सहजासहजी शोधून काढता येतात. उदाहरणार्थ, “N-102-L” हा घरपत्ता शहराच्या उत्तर भागातील सुपरब्लॉक १०२, निवासी इमारत L मध्ये सापडेल. आणि तुम्ही या भागांच्या टोकांपर्यंत प्रवास करत जाता तसे हे ब्लॉक क्रमांक (१०२-११६) वाढत जातात हे आठवणीत ठेवले तर तुम्ही मुळीच चुकू शकत नाही.

या सुव्यवस्थेबरोबरच सोईस्करपणाही असावा म्हणून निवासी इमारती सहा मजल्यांपेक्षा जास्त नसतात. कॉस्टा नामक ब्राझीलियन गृहस्थ म्हणतो की, यामुळे आवारात हाकेच्या अंतरावर खेळणाऱ्‍या आपल्या मुलाला आई सहज खिडकीतून हाक मारू शकते: “मॉन्वेल वेन का!” (मान्वेल, जरा इकडे येतोस का!)

विकासजन्य समस्या

शहराची बांधणी तयार केलेल्या प्लॅननुसारच झालेली असली आणि ही ब्राझीलियाची विशेषता असली तरीही शहराच्या नीलप्रतीत ब्राझीलियाची सांधेजोड करणाऱ्‍या कामगारांसाठी काहीच सोय करण्यात आली नव्हती. राजधानीच्या उद्‌घाटनानंतर हे कामगार आपला बोरीबिस्तरा गुंडाळून आपापल्या वाटेने परत जातील असे गृहीत धरण्यात आले होते. परंतु हॉस्पिटल्स, शाळा किंवा पोटापाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी परतण्याची बाब या कामगारांना काही रुचली नाही. म्हणून मग त्यांनी ब्राझीलियातच राहणे अधिक पसंत केले. पण ब्राझीलियात कोठे?

त्यांनी स्वतः बांधलेले महागडे फ्लॅट्‌स त्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते; यास्तव, त्यांनी ब्राझीलियाच्या हरित पट्ट्याभोवती वस्ती केली. काही काळातच, ब्राझीलियापेक्षा मोठमोठाली अनेक शहरे डोके वर काढू लागली. आजमितीला केवळ ४,००,००० लोक या योजनाबद्ध शहरात राहतात तर असंख्य फ्लॅट्‌स चक्क धूळ खात पडले आहेत; परंतु, या योजनाबद्ध शहराभोवती असलेल्या अस्ताव्यस्थ नगरांमध्ये तब्बल २० लाख रहिवासी राहात आहेत. समता राखणे हा शहराच्या प्लॅनमागील मूळ हेतू असूनही मिळकतीमधील फरकांमुळे लोकसंख्येचे दोन भिन्‍न शहरांत विभाजन झाले आहे.

आकस्मिक लोकसंख्या वाढ व सामाजिक विषमता यांमुळे कोणत्याही शहरात सामान्यपणे आढळणारे गुन्हे व इतर सामाजिक तथा आर्थिक समस्यांना खतपाणी मिळत आहे. शंकाच नाही, की ब्राझीलची नूतन राजधानी विकासजन्य समस्यांची शिकार बनली आहे. स्पष्टतः, उत्तम रस्त्यांचे जाळे व नाविन्यपूर्ण वास्तुकला लोकांची मने व वागणूक बदलण्यास पुरेशा नाहीत.

“हार्ट ऑफ ब्राझील?”

ब्राझीलियाच्या महामार्गावरील जाहिरातींचे फलक, येणाऱ्‍या प्रवाशांना याची आठवण करून देतात की ते आता लवकरच ‘हार्ट ऑफ ब्राझीलमध्ये,’ म्हणजे साक्षात ब्राझीलच्या हृदयात प्रवेश करणार आहेत. काही अंशी हे घोषवाक्य खरे आहे: भौगोलिकदृष्ट्या ते देशाच्या केंद्रस्थानी वसलेले नसले तरीही देशातील सर्व प्रमुख शहरांपासून ब्राझीलिया समान अंतरावर वसलेले आहे. मग त्या घोषवाक्याचा याहीपेक्षा गहन अर्थ असावा का? ब्राझीलिया अगदी हृदयापासून अस्सल ब्राझीलियन आहे का? यावरील लोकांची मते भिन्‍न आहेत. या प्रश्‍नांच्या उत्तरांसाठी तुम्हाला या अनोख्या शहरालाच भेट द्यावी लागेल. तथापि, ब्राझीलियाबद्दल आपले मत बनविण्यात घाई करू नका. शहराला स्वतःविषयी सांगण्यास वेळ द्या कारण एका स्त्री रहिवासीने म्हटले त्याप्रमाणे, “ब्राझील्या सेडूस ग्राडूआलमेन्टे” (ब्राझीलिया नगरी हळूहळू मोहात पाडते.)

[तळटीपा]

a हा लेख लिहिला गेला त्याच्या काही समयानंतर म्हणजे जून १९९८ मध्ये वयाच्या ९६ व्या वर्षी या राजधानी शहराचे डिझायनर लूस्यू कॉस्टा यांचे निधन झाले.

b हा मूळ अंगोलन शब्दापासून आलेला शब्द असून (पूर्वी आफ्रिकी लोक पोर्तुगीजांसाठी या शब्दाचा उपयोग करत असत) पुढे हेच ब्राझीलियाच्या बांधकाम कर्मचाऱ्‍यांचे प्रेमळ नाव पडले.

c युनेस्कोने संकलित केलेल्या या यादीत “अनोखे नैसर्गिक महत्त्व किंवा सांस्कृतिक महत्त्व” असलेल्या जगभरातील ५५२ स्थळांचा उल्लेख आहे.

[१५ पानांवरील चित्र]

‘धूळ, कॅनव्हस आणि काँक्रीटची’ कथा

[चित्राचे श्रेय]

Arquivo Público do Distrito Federal

[१५ पानांवरील चित्र]

‘कानडांगूसची’ मिरवणूक

[चित्राचे श्रेय]

Arquivo Público do Distrito Federal

[१६, १७पानांवरील चित्र]

ब्राझीलियाचे विहंगम दृश्‍य

१. मंत्रालये

२. काँग्रेस कार्यालय

३. सर्वोच्च न्यायालय

४. प्लाझा ऑफ द थ्री पावर्स

५. कार्यकारी दफ्तरे

[चित्राचे श्रेय]

Secretaria de Turismo, Brasília

[१८ पानांवरील चित्र]

सबंध जगात सर्वाधिक हिरवा परिसर असणारी राजधानी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा