वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ७/८ पृ. ८-११
  • उत्तरासाठी खाली नव्हे, वर पाहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तरासाठी खाली नव्हे, वर पाहणे
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्राण्यांची जनुके की सदोष जनुके?
  • आपल्याला मरावेसे का वाटत नाही
  • सर्वकाळ जगण्यासाठी निर्मिलेले
  • प्रीतीवर आधारलेले नवे जग
  • सार्वकालिक जीवन शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुम्ही सर्वकाळ पृथ्वीवर राहू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • सार्वकालिक जीवनाचा एकमेव मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “पहा! मी सर्व नवे करतो”
    “पहा! मी सर्व नवे करतो”
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ७/८ पृ. ८-११

उत्तरासाठी खाली नव्हे, वर पाहणे

क्रमविकासाच्या शिकवणुकीनुसार, काही परिवर्तनांमुळे कालांतराने आपण श्रेष्ठ रूपातले प्राणी बनवले गेलो. तर दुसऱ्‍या बाजूला पाहता बायबल म्हणते की, सुरवातीला आपण परिपूर्ण, देवाच्या प्रतिरूपाचे होतो पण थोड्या काळानंतर अपरिपूर्णता आली आणि मानवजातीचा अवनतीकडे दीर्घ प्रवास सुरू झाला.

आपले मूळ पालक, आदाम आणि हव्वा यांनी नैतिक स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला आणि देवाविरुद्ध जाणूनबुजून अवज्ञा करून आपले विवेक डागाळले आणि स्वतःला या उतरत्या कळेवर आणले. एखाद्याने तारेच्या कुंपणावरून गाडी चालवून न्यावी, त्याप्रकारे त्यांनी जाणूनबुजून देवाचा नियम ओलांडला आणि खोल दरीत जाऊन कोसळले जेथे आज आपण आजार, वार्धक्य आणि मृत्यू भोगत आहोत; शिवाय जातीय भेदभाव, धार्मिक द्वेषभाव आणि भयंकर युद्धे हे काही वेगळे सांगायला नको.—उत्पत्ति २:१७; ३:६, ७.

प्राण्यांची जनुके की सदोष जनुके?

अर्थात, पाप केल्यावर आदाम आणि हव्वेच्या परिपूर्ण शरीरांना काय झाले याचे वैज्ञानिक भाषेत बायबल स्पष्टीकरण देत नाही. बायबल काही विज्ञानाचे पुस्तक नाही; जसे, एका मोटारगाडीच्या मालकाचे मार्गदर्शक पुस्तक स्वयंचल आभियांत्रिकीचे पाठ्यपुस्तक नसते तसे. परंतु, त्या मालकाच्या मार्गदर्शक पुस्तकाप्रमाणे बायबल अचूक आहे; ती मिथ्यकथा नव्हे.

आदाम आणि हव्वेने देवाच्या नियमाचा संरक्षक बांध ज्यावेळी ओलांडला त्यावेळी त्यांनी आपल्या शरीराचे नुकसान केले. त्यानंतर, मृत्यूकडची हळू घसरण सुरू झाली. आनुवंशिकतेद्वारे, त्यांच्या मुलांच्या अर्थात, मानवी कुटुंबाच्या पदरी अपरिपूर्णता पडली. म्हणून, तेही मरतात.—ईयोब १४:४; स्तोत्र ५१:५; रोमकर ५:१२.

दुःखाची गोष्ट म्हणजे, आपल्याला आनुवंशिकतेने जे मिळाले त्यामध्ये पाप करण्याची प्रवृत्ती सुद्धा समाविष्ट आहे; ही प्रवृत्ती स्वार्थ आणि अनैतिकतेच्या रूपात मान वर काढते. योग्य स्थानात लैंगिक संबंध निश्‍चितच उचित आहेत. देवाने पहिल्या मानवी दांपत्याला आज्ञापिले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका.” (उत्पत्ति १:२८) आणि स्नेही निर्माणकर्ता या नात्याने ही आज्ञा पूर्ण करणे पती आणि पत्नीसाठी एक सुखद अनुभव होईल असे त्याने केले. (नीतिसूत्रे ५:१८) परंतु मानवी अपरिपूर्णतेमुळे लैंगिकतेचा दुरुपयोग होऊ लागला. किंबहुना, अपरिपूर्णता आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर, आपल्या सर्वांना माहीत आहे त्याप्रमाणे अगदी मन आणि शरीराच्या कार्यावरही प्रभाव पाडते.

परंतु, अपरिपूर्णतेने आपली नैतिक बुद्धी नाहीशी केलेली नाही. आपली मनापासून इच्छा असल्यास, आपण ‘स्टेरिंग व्हीलवर’ नियंत्रण करून पापाच्या मार्गावर जाण्याच्या प्रवृत्तीला लढा देऊन जीवनातील खाचखळगे टाळू शकतो. अर्थात, कोणत्याही अपरिपूर्ण मानवाला पापावर पूर्णतः विजय मिळवता येत नाही; आणि देव दयाळुपणाने ही गोष्ट लक्षात बाळगतो.—स्तोत्र १०३:१४; रोमकर ७:२१-२३.

आपल्याला मरावेसे का वाटत नाही

क्रमविकासाकडे ज्याचे समाधानकारक उत्तर नाही असे आणखी एक कोडे बायबल सोडवते: मृत्यू नैसर्गिक आणि अनिवार्य भासत असला, तरी मानवांना मृत्यू स्वीकारण्याची स्वभावतः इच्छा नाही ते का.

बायबल प्रकट करते त्यानुसार, मृत्यू हा पापामुळे, देवाची अवज्ञा केल्यामुळे संभवला. आपले मूळ पालक जर का आज्ञाधारक राहिले असते, तर ते आपल्या मुलाबाळांसह सदा सर्वकाळ जगले असते. खरे तर, अनंतकाळ जगण्याच्या इच्छेसहच देवाने मानवी मनाची रचना केली होती. न्यू इंटरनॅशनल व्हर्शन नुसार उपदेशक ३:११ म्हणते, “त्याने मनुष्यांच्या हृदयांत अनंतकाळाची कल्पना बसवली आहे.” म्हणून, त्यांच्यावर मृत्यू ओढवला तेव्हा मानवांमध्ये एक आंतरिक संघर्ष सुरू झाला, सतत भासणारी विषमता जाणवू लागली.

या आंतरिक संघर्षाचा मेळ बसवण्यासाठी आणि जगत राहण्याच्या नैसर्गिक इच्छेचे समाधान करण्यासाठी मानवांनी, अगदी आत्म्याच्या अमरत्वाच्या शिकवणुकीपासून ते पुनर्जन्माच्या विश्‍वासापर्यंतचे हर तऱ्‍हेचे विश्‍वास बनवले. शास्त्रज्ञ, म्हातारे होण्याचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांनाही मरण चुकवायचे आहे किंवा लांबणीवर टाकायचे आहे. नास्तिक क्रमविकासवादी, सार्वकालिक जीवनाची इच्छा ही क्रमविकासाची युक्‍ती किंवा फसवणूक आहे असे समजून तिच्याकडे कानाडोळा करतात, कारण मानव केवळ श्रेष्ठ प्राणी आहेत या त्यांच्या दृष्टिकोनाशी त्याचा मेळ बसत नाही. दुसऱ्‍या बाजूला पाहता, मृत्यू हा शत्रू आहे या बायबलच्या विधानाचा मेळ, जगण्याची आपली नैसर्गिक इच्छा आहे याच्याशी बसतो.—१ करिंथकर १५:२६.

तर मग, आपल्याला सर्वकाळ जगण्याच्या हेतूने बनवले होते याचा आपल्या शरीरांकडून काही थांगदोरा मिळतो का? त्याचे उत्तर आहे, होय! मानवी मेंदूच आपल्याला चक्रावून टाकणारा पुरावा देतो की आपण आता जगतो त्याहीपेक्षा अधिक काळ जगण्यासाठी आपल्याला बनवले होते.

सर्वकाळ जगण्यासाठी निर्मिलेले

मेंदूचे वजन जवळजवळ १.४ किलोग्रॅम आहे, आणि त्यात १० अब्ज ते १०० अब्ज तंत्रिका एकक असतात; यातील कोणतेही दोन पूर्णपणे सारखे नसतात असे म्हटले जाते. प्रत्येक तंत्रिका एकक २,००,००० इतर तंत्रिका एककांशी संचार करू शकते; मेंदूतल्या विविध मंडलांची किंवा मार्गांची ही संख्या केवढी अचाट आहे! एवढेच नव्हे तर, “प्रत्येक तंत्रिका एकक जणू जटिल संगणकच” आहे असे सायंटिफिक अमेरिकन म्हणते.

मेंदूत कित्येक रासायनिक प्रतिक्रिया होतात आणि त्यांचा तंत्रिका एककांच्या कार्यावर प्रभाव पडत असतो. शिवाय, सर्वात शक्‍तिशाली संगणकापेक्षाही मेंदूची जटिलता अधिक असते. टोनी बुझॅन आणि टेरन्स डिक्सन म्हणतात की, “प्रत्येक मस्तिष्कात एक विलक्षण शक्‍तीकेंद्र, संहत, कार्यक्षम अवयव असतो; त्याच्याविषयी जितके अधिक ज्ञान घ्यावे तितकेच त्याची क्षमता अपरिमित असल्याचे जाणवते.” पुढे प्राध्यापक प्योटर आनोकिन यांना उद्धृत करत ते म्हणतात: “अद्याप कोणताही मनुष्य आपल्या मेंदूच्या क्षमतेचा संपूर्ण उपयोग करू शकलेला नाही. म्हणूनच मानवी मेंदूची मर्यादित क्षमता आहे असे कोणतेच नकारात्मक अंदाज आम्ही स्वीकारत नाही. त्याची क्षमता अमर्याद आहे.”

चक्रावून टाकणाऱ्‍या या वास्तविकता क्रमविकासाच्या सिद्धान्ताच्या तोंडात मारतात. क्रमविकास, गुहेत राहणाऱ्‍या आदिमानवांकरता म्हणा किंवा आजच्या उच्च शिक्षित लोकांकरता म्हणा, दहा लाख किंवा एक अब्ज आयुष्यांपर्यंत कार्य करण्याची क्षमता असलेले अवयव का बरे “निर्माण” करील? खरोखर, सार्वकालिक जीवनातच तथ्य आहे! परंतु आपल्या शरीराविषयी काय?

रिपेअर ॲण्ड रिन्युवल—जर्नी थ्रू द माईंड ॲण्ड बॉडी हे पुस्तक म्हणते: “नुकसान पोचलेली हाडे, ऊतक आणि अवयव स्वतःची दुरुस्ती ज्या तऱ्‍हेने करतात ती किमया नव्हे तर आणखी काय? अंमल थांबून आपण त्याचा विचार केला, तर त्वचा, केस आणि नखे—त्याचप्रमाणे शरीराचे इतर भाग—यांचे कळत नकळत होणारे नविनीकरण अत्यंत आश्‍चर्यकारक असल्याचे आपल्या लक्षात येईल: २४ तास, अगदी दर आठवडी आपल्या आयुष्यात कित्येक वेळा, जीवरासायनिक भाषेत म्हणायचे तर, आपली अक्षरशः पुनर्निर्मिती होत असते.”

देवाच्या नियुक्‍त समयी, आपोआप पुनर्निर्मितीची ही चमत्कारिक प्रक्रिया हमेशा हमेशासाठी चालू ठेवणे त्याला मुळीच कठीण जाणार नाही. मग, ‘मृत्यूला [एकदाचे] नाहीसे केले जाईल.’ (१ करिंथकर १५:२६) पण खरोखर आनंदी असण्यासाठी फक्‍त सार्वकालिक जीवन नव्हे, तर आणखी काही हवे आहे. आपल्याला शांती हवी—देवासोबत आणि आपल्या सहमानवांसोबत शांती. ही शांती, लोकांमध्ये आपापसांत खरे प्रेम असले, तरच शक्य होईल.

प्रीतीवर आधारलेले नवे जग

“देव प्रीति आहे,” असे १ योहान ४:८ म्हणते. प्रीती—विशेषतः यहोवा देवाची प्रीती इतकी शक्‍तिशाली आहे की, आपण सर्वकाळ का जगू शकतो या आशेमागचे ते मूलभूत कारण आहे. योहान ३:१६ म्हणते, “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”

सार्वकालिक जीवन? केवढी भव्य प्रत्याशा! पण आपल्याला वारशात पाप मिळाले असल्याने, आपल्याला जगण्याचा अधिकार नाही. बायबल म्हणते, “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त प्रेमापोटी आपल्यासाठी मरण पावला ही धन्यताच म्हणावी. प्रेषित योहानाने येशूविषयी लिहिले: “ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला.” (१ योहान ३:१६) होय, “पुष्कळांच्या खंडणीसाठी” त्याने आपले परिपूर्ण मानवी जीवन अर्पिले जेणेकरून त्याच्यावर विश्‍वास ठेवण्याद्वारे आपण आपल्या पापांची क्षमा साधून सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकू. (मत्तय २०:२८) बायबल स्पष्टीकरण देते: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्‍यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे.”—१ योहान ४:९.

तर मग, देवाने आणि त्याच्या पुत्राने आपल्यासाठी प्रदर्शित केलेल्या प्रीतीला आपण कसा प्रतिसाद द्यावा? बायबल पुढे म्हणते: “प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.” (१ योहान ४:११) आपण प्रीती करायला शिकलेच पाहिजे, कारण त्याच गुणावर देवाचे नवीन जग आधारलेले असेल. यहोवा देवाने आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये ज्याप्रमाणे जोर दिला आहे त्याप्रमाणे अनेकांनी आज प्रीतीचे महत्त्व जाणून घेतले आहे.

लव्ह ॲण्ड इट्‌स प्लेस इन नेचर हे पुस्तक म्हणते की, प्रीतीविना “मुले मरण पावण्याची संभावना असते.” तथापि, म्हातारे झाल्यावरही प्रीतीची ती गरज काही संपत नाही. एका सुप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञांनी असे म्हटले की, “सूर्य जसा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे तशी [प्रीती] सर्व मानवी गरजांच्या केंद्रस्थानी आहे . . . ज्या मुलावर प्रीती केली जात नाही ते जीवरासायनिक, शरीरक्रियात्मक आणि मानसिकदृष्ट्या प्रीती मिळालेल्या मुलापेक्षा फारच वेगळे असते. किंबहुना, प्रीती न केलेल्या मुलाची वाढही प्रीती केलेल्या मुलापेक्षा फारच वेगळी होते.”

पृथ्वीवरील सर्वांमध्ये खरी प्रीती नांदेल, तेव्हाची परिस्थिती कशी असेल हे तुम्हाला माहीत आहे का? भिन्‍न राष्ट्राचा, भिन्‍न जातीचा किंवा भिन्‍न वर्णाचा असल्यामुळे कोणासोबतही भेदभाव केला जाणार नाही! देवाचा नियुक्‍त राजा, येशू ख्रिस्त याच्या शासनाधीन, सबंध पृथ्वीवर शांती आणि प्रीती नांदेल; त्यावेळी बायबलमधील या प्रेरित स्तोत्राची पूर्णता होईल:

“हे देवा, राजाला आपले न्यायानुशासन . . . दे. तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्‌यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणाऱ्‍यांस चिरडून टाको. त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावो; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांति असो. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो. कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्र्‌यांचे जीव तो तारील.”—स्तोत्र ७२:१, ४, ७, ८, १२, १३.

बायबलमधील आणखी एका स्तोत्रात वचन दिल्याप्रमाणे, देवाच्या नवीन जगात दुष्टाला राहायला अनुमती दिली जाणार नाही: “दुष्कर्म करणाऱ्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्‍वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधिशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही; पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:९-११.

तेव्हा, सर्व आज्ञाधारक मानवांच्या, त्याचप्रमाणे मृतातून पुनरुत्थानाद्वारे कबरांमधून उठवलेल्यांच्याही मनांची व शरीरांची रोगमुक्‍ती केली जाईल. सरतेशेवटी, जिवंत असलेले सर्वजण परिपूर्णतेने देवाचे प्रतिरूप प्रतिबिंबित करतील. सरळ मार्गावर राहण्याचा हा मोठा संघर्ष एकदाचा समाप्त होईल. आपली जगण्याची उत्कट इच्छा आणि मृत्यूची सद्य कटू वास्तविकता यांच्यातील विसंगतताही नाहीशी होईल! होय, आपल्या प्रेमळ देवाचे हे एक खात्रीलायक अभिवचन आहे: “ह्‍यापुढे मरण नाही.”—प्रकटीकरण २१:४; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

म्हणून, तुम्ही सरळ मार्गावर राहण्याच्या संघर्षात कधीच माघार घेऊ नका. या ईश्‍वरी सल्ल्याकडे लक्ष द्या: “विश्‍वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर.” देवाच्या नवीन जगातील त्या जीवनाला बायबल “खरे जीवन” म्हणते.—१ तीमथ्य ६:१२, १९.

बायबलमध्ये प्रकट केलेले सत्य तुम्हाला समजावे असे होवो: “परमेश्‍वर [“यहोवा,” NW] हाच देव आहे. . . . त्यानेच आम्हाला उत्पन्‍न केले.” ते सत्य समजून घेणे हे यहोवाच्या प्रीती आणि नीतिमत्त्वतेच्या नवीन जगातील जीवनाकरता पात्र होण्याच्या दिशेने घ्यावयाचे एक महत्त्वाचे पाऊल आहे.—स्तोत्र १००:३; २ पेत्र ३:१३.

[११ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाच्या नवीन जगातील जीवनाला बायबल “खरे जीवन” म्हणते.—१ तीमथ्य ६:१९

[९ पानांवरील चित्र]

मानवांनी देवाच्या नियमांचे कुंपण ओलांडले आणि त्याचे भयंकर परिणाम घडले

[१० पानांवरील चित्र]

देवाच्या सत्तेखाली मानवजात, शांतीच्या नवीन जगाचा आनंद लुटेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा