टेलिव्हिझन किती घातक आहे?
डिसेंबर १८, १९९७ रोजी, वृत्तपत्रातील ठळक मथळ्यांत सांगितल्यानुसार एक टीव्ही कार्टून, जपानमधील टोकियो शहरातील असंख्य लोकांच्या जिवावर बेतला. शेकडोंना रुग्णालयांत न्यावे लागले. द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने अशी बातमी दिली: “काही मुलांनी रक्ताच्या उलट्या केल्या तर इतरांना झटके आले किंवा ते बेशुद्ध झाले. डॉक्टर आणि मनोवैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, या धक्कादायक घटनेवरून पुन्हा एकदा हेच सिद्ध होते, की अलीकडच्या काही टीव्ही प्रयोगांबाबतीत लहान मुले किती संवेदनशील असू शकतात.”
न्यूयॉर्कच्या डेली न्यूझ वृत्तपत्राने म्हटले: “काल टीव्हीवरील एका अक्राळविक्राळ राक्षसाने आपले रक्ताळलेले डोळे एकाएकी मोठे केले तेव्हा देशभर शेकडो बालकांना झटके आले आणि सबंध जपानमध्ये भयाचे सावट पसरले.
“जवळजवळ ६०० बालकांना व काही प्रौढांना, . . . टीव्हीवरील कार्टून पाहिल्यानंतर मंगळवारी रात्री रुग्णालयातील तातडीच्या विभागात धाडले गेले.” काहींना श्वासोच्छ्वासाच्या समस्यांसाठी अतिदक्षता विभागांत दाखल करण्यात आले.
एका आठ वर्षीय मुलीच्या आईने, यूकीको ईवासाकीने असे स्पष्टीकरण दिले: “माझ्या मुलीला बेशुद्ध झाल्याचं पाहून तर मला धस्स झालं. तिच्या पाठीवर जोर-जोरात थोपटल्यानंतर कुठं तिचा श्वासोच्छ्वास पुन्हा सुरू झाला.”
यापूर्वी “कितीतरी वेळा” वापरलेले कार्टून तंत्र इतक्या घातक व हिंसक प्रतिक्रियेस जबाबदार कसे काय ठरू शकते याचे स्पष्टीकरण खुद्द टीव्ही प्रोग्रॅमचे निर्मातेही देऊ शकत नाहीत.
टीव्ही पाहण्याच्या धोकेदायक परिणामांची जाणीव असल्यामुळे काही पालकांनी टीव्ही पाहण्यावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवले आहे किंवा मग आपल्या घरातून टीव्हीच काढून टाकला आहे. ॲलन, टेक्सास, अमेरिका येथील एक पिता असे म्हणतो, की घरात टीव्ही होता तेव्हा त्याची मुले “अतिशय चुळबुळी, चिडखोर, अजिबात सहकार्य न करणारी आणि सतत वैतागलेली” असायची; पुढे तो असे स्पष्टीकरण देतो: “आज मात्र माझी पाचही मुलं—जी ६ ते १७ वर्षं वयोगटांतील आहेत—अभ्यासात नंबर एकवर आहेत! टीव्ही दूर केल्यामुळे त्यांनी खेळ, वाचन, कला, कॉम्प्युटर इत्यादींसहित विविध छंद जोपासले आहेत.
“दोन वर्षांपूर्वी विशेष लक्षात राहणारी एक घटना घडली. नऊ वर्षांचा माझा मुलगा आपल्या मित्राकडे पार्टीला गेला होता; खरं तर, पार्टी झाल्यानंतर तो रात्री तिथंच झोपणार होता; पण मग त्यानं मला फोन करून सांगितलं, की त्याला लवकरात लवकर घरी यायचं आहे . . . मी त्याला आणायला गेलो आणि त्याला काय त्रास झाला याविषयी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘ती पार्टी इतकी बोरिंग होती, काय सांगू! टीव्ही पाहण्याशिवाय त्यांना दुसरं काहीच सुचत नाही!’”