बायबलचा दृष्टिकोन
सन २००० किती महत्त्वाचे आहे?
पाश्चिमात्य देश तसेच इतर अनेक देश सन २००० ला अमाप धार्मिक महत्त्व जोडतात; पण अधिकांश लोक या वर्षाला कोणतेही धार्मिक महत्त्व जोडत नाहीत. उदाहरणार्थ ज्यू, मुस्लिम आणि हिंदू या सर्वांच्या, पाश्चिमात्य दिनदर्शिकांशी न जुळणाऱ्या अशा आपल्या स्वतःच्या धार्मिक दिनदर्शिका आहेत. धार्मिक आणि पारंपरिक तारखांसाठी चिनी लोक चान्द्र दिनदर्शिका अनुसरतात. त्यामुळे आज अब्जावधी लोक, कदाचित जगाच्या लोकसंख्येचा बहुसंख्य भाग सन २००० काहीतरी खास आहे असे मानत नाहीत.a
तरीसुद्धा, पुढच्या सहस्रकात पाऊल ठेवण्याच्या, ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार अगदी जवळ येऊन ठेपलेल्या घटनेची, बरेच लोक विशेषतः पाश्चात्त्य देशांतील बरेचसे लोक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. काहींसाठी ही निव्वळ आतुरताच राहिलेली नाही. तर त्यांच्या दृष्टीने सन २००० हे एका नव्या युगाची सुरवात, अर्थात इतिहासाला कलाटणी देणारे वर्ष ठरेल. बायबलवर विश्वास असल्याचा दावा करणारे अनेकजण भविष्यवाण्यांच्या पूर्णतेचा संबंध सन २००० शी जोडतात. काहीजण काही तरी महान दैवी प्रकटन होईल अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर इतरांच्या मनात एखाद्या प्रलयाची—सर्वनाशाची भीती बसली आहे. बायबलनुसार या अपेक्षा साधार आहेत का?
यहोवा, काळाचा नियंता
बायबलमध्ये देवाचे वर्णन “पुराणपुरुष” असे केले आहे. (दानीएल ७:९) ग्रहांच्या परिभ्रमणापासून ते उप-अणवीय कणांच्या हालचालीपर्यंत त्याच्या अनेकानेक सृष्टीकार्यांतून हे स्पष्ट होते, की तो वेळेचे अगदी चोख नियंत्रण करतो. त्याचे आपले स्वतःचे वेळापत्रक असून तो अचूकपणे त्यास जडून राहतो. बायबल म्हणते: “त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या [माणसांच्या] वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत.” (प्रेषितांची कृत्ये १७:२६) वेळेच्या बाबतीत यहोवा अगदी अचूक आहे.
म्हणूनच, कालगणनेकडे बायबल विशेष लक्ष पुरवते. बायबलमध्ये एक अखंड अहवाल असून त्यामुळे मानवी इतिहासाच्या सुरवातीकडे नेणारी एक पद्धतशीर गणना करणे शक्य होते. अशा या गणनेतून, देवाने आदामाची निर्मिती केली ते वर्ष सा.यु.पू. ४०२६ असल्याचे दिसून येते. सुमारे २,००० वर्षांनंतर अब्राहामाचा जन्म झाला होता. आणि येशूचा जन्म झाला तोपर्यंत आणखीन २,००० वर्षे उलटून गेली होती.
बायबलच्या कालगणनेचा अभ्यास करणाऱ्या काही लोकांनी भवितव्यातील विशिष्ट तारखांकडे लक्ष वेधणारी स्वैर समीकरणे सूत्ररूपात मांडली आहेत. उदाहरणार्थ प्रत्येकी आदाम, अब्राहाम आणि येशू यांमध्ये असणाऱ्या २,००० वर्षांच्या कालखंडाच्या आधारावर येशूच्या जन्मापासून उलटलेल्या या २,००० वर्षांच्या शेवटासही काहीतरी विलक्षण घटना घडेल असे भविष्य काहीजण वर्तवितात. बायबलच्या कालगणनेच्या आधारावर ठरवलेल्या अनेक काल-सूत्रांपैकी हे केवळ एक उदाहरण आहे.
हे मान्य, की बायबल अशा एका काळाविषयी बोलते जेव्हा यहोवा देव मानवी घडामोडींमध्ये हस्तक्षेप करून दुष्टाईचा नायनाट करील, तसेच एका नव्या जगाची सुरवात करील. बायबलची भविष्यवाणी ‘शेवटच्या काळाविषयी,’ ‘युगाच्या समाप्तीविषयी’ ‘शेवटच्या दिवसांविषयी’ व ‘देवाच्या दिवसाविषयी’ बोलते. (दानीएल ८:१७; मत्तय २४:३; २ तीमथ्य ३:१ [NW]; २ पेत्र ३:११) तथापि, बायबलमध्ये भाकीत केलेला ‘शेवटला काळ’ कोणत्याही प्रकारे सन २००० शी संबंधित नाही. ग्रेगोरियन दिनदर्शिकेच्या गणनेनुसार दुसऱ्या सहस्रकाच्या अंताला खास महत्त्व देणारे काहीएक शास्त्रवचनांत आढळत नाही.
“ह्या गोष्टी केव्हा होतील?”
येशूच्या प्रेषितांनी देवाच्या वेळापत्रकासंबंधी सखोल आस्था दाखवली जेव्हा त्यांनी येशूला विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा.” (मत्तय २४:३) भविष्यासंबंधी आज अनेकांच्या मनात अशाच प्रकारचे कुतूहल आहे. अशा महत्त्वपूर्ण बायबल भविष्यवादांसंबंधी आणि ते केव्हा पूर्ण होतील यासंबंधी सखोल आस्था असणे स्वाभाविक आहे. तथापि, या विषयावरील यहोवाच्या दृष्टिकोनाचा स्वीकार करून त्याचा आदर करणे सगळ्यात सुज्ञतेचे आहे.
आपल्या पुत्रामार्फत यहोवाने आपले उद्देश प्रकट केले आहेत व सदर विषयावर सुस्पष्ट उत्तरही दिले आहे. येशूचे स्वर्गारोहण झाले त्याच्या केवळ काही समयापूर्वी त्याच्या शिष्यांनी पुन्हा एकदा देवाच्या भविष्यवादांची पूर्णता केव्हा होईल याची विचारणा त्याला केली. येशूने उत्तर दिले: “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.” (तिरपे वळण आमचे.) (प्रेषितांची कृत्ये १:७) यापूर्वी एके प्रसंगी येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.”—मत्तय २४:३६.
यावरून स्पष्ट होते की, ‘काळ व समय जाणण्याचा,’ विशेषतः बायबल भविष्यवादांच्या भावी पूर्णतेच्या बाबतीत जाणून घेण्याचा अधिकार मानवांना नाही. अशा प्रकारची माहिती आपल्याला प्रकट न करणे यहोवाला योग्य वाटते. (मत्तय २४:२२-२४) देवाच्या इच्छेविरुद्ध, ‘त्या दिवसाचा अथवा त्या घटकेचा’ आपल्याच मनाने उकल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण त्याच्या उद्देशांवर काही परिणाम पाडू शकतो का? स्पष्टच आहे, की असे करणे कधीच शक्य होणार नाही. (गणना २३:१९; रोमकर ११:३३, ३४) बायबल म्हणते: “त्याच्या [यहोवाच्या] मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.” (स्तोत्र ३३:११) तो सर्वसमर्थ देव असल्यामुळे त्याला नेहमीच यश मिळते.—यशया ५५:८-११.
‘काळ व समयाचे ज्ञान स्वतःच्या अधिकारात ठेवण्याचे’ सामर्थ्य देवाला असतानाही अनेकांना अंदाज बांधायला आवडते. काहीजण तर विनाशाचे स्वनियुक्त भविष्यवक्ते देखील बनतात. याच कारणास्तव प्रेषित पौलाने, तारखांविषयी तर्क बांधणाऱ्या लोकांचे ऐकण्याच्या धोक्यासंबंधी थेस्सलनीकाकरांना विशिष्ट सूचना दिली. त्याने लिहिले: “आम्ही तुम्हास अशी विनंती करितो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने, किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; कोणत्याहि प्रकारे कोणाकडून फसू नका.”—२ थेस्सलनीकाकर २:१-३.
यहोवाच्या साक्षीदारांचा ठाम विश्वास आहे, की भविष्यासंबंधी देवाचे भविष्यवाद त्याने पूर्वनियुक्त केलेल्या समयीच नव्हे तर त्याने नियुक्त केलेल्या नेमक्या दिवशीच व नेमक्या घटकेलाच खात्रीने पूर्ण होतील. (हबक्कूक २:३; २ पेत्र ३:९, १०) आणि या सर्व घटना नजीकच्या भविष्यात पूर्ण होतील असा आपला विश्वास आहे. (२ तीमथ्य ३:१-५) तथापि, आज झपाट्याने वाढत चाललेल्या सिद्धान्तांवर आपण तर्क बांधत नाही किंवा त्यांस पुष्टीही देत नाही.b निश्चितच, सन २००० चा किंवा सन २००१ चा किंवा मानवाने रचलेला दुसऱ्या कोणत्याही काळाच्या उंबरठ्याचा यहोवाच्या वेळापत्रकाशी कुठलाही संबंध नाही.
[तळटीपा]
a शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, तथाकथित तिसऱ्या सहस्रकाची सुरवात जानेवारी १, २००१ या दिवशी होते. पहिल्या सहस्रकाची सुरवात शून्य वर्षाने नव्हे, तर वर्ष १ ने झाली होती. तथापि, सर्वसामान्य लोक ‘तिसऱ्या सहस्रकाचा’ वर्ष २००० शी संबंध लावतात. या लेखाचा रोख, सन २००० संबंधी जनसामान्यांच्या अपेक्षांवर केंद्रित आहे.
b सप्टेंबर १, १९९७ च्या टेहळणी बुरूज अंकाने पृष्ठे २१-२ वर असे म्हटले: “यहोवाचा दिवस केव्हा येईल हे जाणून घेण्याची यहोवाच्या साक्षीदारांना आधीपासून उत्कंठा होती. या उत्सुकतेमुळे त्यांनी काहीवेळा हा दिवस केव्हा येईल यासंबंधाने अंदाज बांधण्याचे प्रयत्न केले. पण असे केल्यामुळे, येशूच्या सुरवातीच्या शिष्यांप्रमाणेच ते देखील, ‘तो समय केव्हा येईल हे आपल्याला ठाऊक नाही,’ या आपल्या धन्याच्या बजावणीकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले आहेत. (मार्क १३:३२, ३३) थट्टेखोरांनी विश्वासू ख्रिश्चनांच्या अकालिक अपेक्षांबद्दल त्यांची टर उडवली आहे. (२ पेत्र ३:३, ४) तरीसुद्धा, यहोवाचा दिवस त्याच्या वेळापत्रकानुसार, अवश्य येईल यास पेत्र दुजोरा देतो.”