वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१ पृ. ४-६
  • तिसऱ्‍या सहस्रकाची सुरवात केव्हा होते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिसऱ्‍या सहस्रकाची सुरवात केव्हा होते?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • येशूचा जन्म केव्हा झाला होता?
  • सहस्रकाबद्दलच्या त्यांच्या आशांचा चुराडा होईल का?
  • लवकर की उशिरा?
    सावध राहा!—२०००
  • २०००—विशेष वर्ष?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • सन २००० किती महत्त्वाचे आहे?
    सावध राहा!—१९९८
  • नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?
    नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१ पृ. ४-६

तिसऱ्‍या सहस्रकाची सुरवात केव्हा होते?

तिसरे सहस्रक २००० साली नव्हे तर २००१ साली सुरू होणार आहे हा दावा तुम्ही ऐकला आहे का? काही प्रमाणात हा दावा बरोबर आहे. एके काळी लोक मानत असत व आता ज्याला सा.यु.पू. १ असे म्हटले जाते त्यावर्षी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता असे आपण धरून चाललो तर मग, डिसेंबर ३१, २००० (१९९९ नव्हे) हा दिन दुसऱ्‍या सहस्रकाचा शेवटला दिन ठरेल व जानेवारी १, २००१ तिसऱ्‍या सहस्रकाचा पहिला दिवस ठरेल.a परंतु, येशू ख्रिस्ताचा जन्म सा.यु.पू. १ मध्ये झाला नव्हता असेच आज बहुतेक सर्व विद्वान मानतात. असे आहे तर मग त्याचा जन्म केव्हा झाला होता?

येशूचा जन्म केव्हा झाला होता?

बायबल येशूच्या जन्माची निश्‍चित तारीख सांगत नाही. पण, “हेरोद राजाच्या काळात” तो जन्मला होता असे ते म्हणते. (मत्तय २:१) अनेक विद्वानांचा विश्‍वास आहे, की हेरोदाचा मृत्यू सा.यु.पू. ४ साली झाला आणि येशूचा जन्म त्याच्या आधी म्हणजे कदाचित सा.यु.पू. ५ किंवा ६ साली झाला होता. पहिल्या शतकातील यहुदी इतिहासकार फ्लेवियस जोसिफस याने हेरोदाच्या मृत्यूसंबंधी केलेल्या निवेदनाच्या धर्तीवर ते हा निष्कर्ष काढतात.b

जोसिफसनुसार, हेरोद राजाच्या मृत्यूआधी एक चंद्रग्रहण झाले होते. बायबल विद्वान सा.यु.पू. ४, मार्च ११ रोजी झालेल्या एका खंडग्रस्त चंद्रग्रहणाकडे आपले लक्ष वेधतात आणि हेरोदाचा मृत्यू त्याच वर्षी झाला असेल असे म्हणतात. पण, सा.यु.पू. १ सालच्या जानेवारी ८ रोजी पूर्ण चंद्रग्रहण आणि डिसेंबर २७ रोजी खंडग्रस्त चंद्रग्रहण होते. जोसिफस, सा.यु.पू. १ मधील या दोन्हीपैकी एकाचा किंवा सा.यु.पू. ४ मध्ये झालेल्या चंद्रग्रहणाचा उल्लेख करत होता हे कोणीही सांगू शकत नाही. यामुळे, हेरोदाच्या मृत्यूचे निश्‍चित वर्ष दर्शवण्यासाठी आपण जोसिफसच्या निवेदनांचा आधार घेऊ शकत नाही. आणि जरी आधार घेतलाच तरी, ज्यादा माहितीविना आपल्याला येशूचा जन्म केव्हा झाला होता हे ठरवता आले नसते.

येशूच्या जन्माच्या तारखेचा आपल्याजवळ असलेला सर्वात ठोस पुरावा बायबलमध्ये आहे. ईश्‍वरप्रेरित लेखक म्हणतो, की येशूचा मावसभाऊ बाप्तिस्मा करणारा योहान याने “तिबिर्य कैसर ह्‍याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी” संदेष्टा म्हणून आपले जीवनध्येय सुरू केले. (लूक ३:१, २) तिबिर्याला सा.यु. १४ सालच्या सप्टेंबर १५ रोजी सम्राट घोषित करण्यात आले होते, याची पुष्टी लौकिक इतिहास देतो; तेव्हा, त्याच्या राज्याचे १५ वे वर्ष सा.यु. २८ च्या शेवटापासून सा.यु. २९ च्या शेवटापर्यंतचा काळ असेल. याच सुमारास योहानाने आपली सेवा सुरू केली होती आणि सहा महिन्यांनंतर येशूने आपली सेवा सुरू केली होती. (लूक १:२४-३१) या आणि इतर आणखी पुराव्यावरून आपण म्हणू शकतो, की येशूची सेवा सा.यु. २९ च्या शरद ऋतूत सुरू झाली.c येशूने आपली सेवा सुरू केली तेव्हा तो “सुमारे तीस वर्षांचा होता,” असे बायबल म्हणते. (लूक ३:२३) सा.यु. २९ च्या शरद ऋतुत तो ३० वर्षांचा होता याचा अर्थ सा.यु.पू. २ च्या शरद ऋतुत त्याचा जन्म झाला असावा. आणि आता, (शून्य वर्ष नसल्यामुळे सा.यु.पू. २ पासून सा.यु. १ पर्यंत दोन वर्ष होतात ही गोष्ट लक्षात ठेवून) सा.यु.पू. २ पासून आपण पुढे दोन हजार वर्ष मोजत आलो तर आपल्याला समजेल, की १९९९ च्या शरद ऋतुत दुसरे सहस्रक समाप्त झाले आणि तिसरे सहस्रक सुरू झाले!

हे महत्त्वाचे आहे का? उदाहरणार्थ, तिसऱ्‍या सहस्रकाची सुरवात प्रकटीकरणाच्या पुस्तकात उल्लेखलेल्या येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या प्रारंभाला चिन्हित करते का? नाही. तिसरे सहस्रक आणि ख्रिस्ताची हजार वर्षीय राजवट यांचा एकमेकांशी संबंध आहे असे बायबलमध्ये कोठेही म्हटलेले नाही.

तारखांचा अंदाज लावण्याविरुद्ध येशूने आपल्या अनुयायांना ताकीद दिली होती. “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही,” असे त्याने आपल्या शिष्यांना सांगितले. (प्रेषितांची कृत्ये १:७) पूर्वी एकदा, येशूने हेही स्पष्ट केले होते, की देव या दुष्ट व्यवस्थीकरणावर न्यायदंड केव्हा बजावेल आणि ख्रिस्ताची हजार वर्षीय राजवट केव्हा सुरू होईल हे आपल्याला माहीत नाही; तो म्हणाला: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.”—मत्तय २४:३६.

ख्रिस्त त्याच्या मृत्यूच्या बरोबर २,००० वर्षांनंतर मानव म्हणून पुन्हा येईल अशी आपण अपेक्षा करणे तर्कसंगत आहे का? नाही, हे तर्कसंगत नाही. येशूला आपली जन्मतारीख निश्‍चितच माहीत असेल. आणि त्या तारखेपासून पुढे २,००० वर्षे मोजणेही त्याला नक्कीच कठीण नव्हते. पण त्याला आपल्या येण्याच्या दिवसाविषयी किंवा घटकेविषयी माहीत नव्हते. त्याच्या येण्याची तारीख अचूकपणे सांगणे इतके सोपे नसेल हे यावरून स्पष्ट आहे! “काळ व समय” पित्याच्या अधिकारात होते—समयतालिका केवळ त्यालाच माहीत होती.

शिवाय, येशूने आपल्या अनुयायांना एका विशिष्ट ठिकाणी येऊन त्याची वाट बघत बसण्याची आज्ञा दिली नाही. त्याने त्यांना एकत्र येऊन थांबून राहण्याऐवजी, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” पांगून सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्यास सांगितले. त्याने ही आज्ञा रद्द केलेली नाही.—प्रेषितांची कृत्ये १:८; मत्तय २८:१९, २०.

सहस्रकाबद्दलच्या त्यांच्या आशांचा चुराडा होईल का?

पण, काही धार्मिक मूलतत्त्ववाद्यांना २,००० वर्षाबद्दल खूप अपेक्षा आहेत. पुढील काही महिन्यात प्रकटीकरणाच्या पुस्तकातील काही भागांची अक्षरार्थ पूर्णता होणार आहे असा त्यांचा विश्‍वास आहे. त्या पूर्णतेत आपला प्रत्यक्षात भाग असेल असे त्यांना वाटते. जसे की, ते प्रकटीकरण ११:३, ७, ८ मधील भविष्यवाणी दाखवतात; तेथे, ‘आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले व ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते, अशा मोठ्या नगरात,’ दोन साक्षी संदेश देत असल्याचे म्हटले आहे. संदेश देऊन झाल्यावर या दोन साक्षीदारांना अथांग डोहातून वर येणारा एक हिंस्र श्‍वापद जिवे मारतो.

डिसेंबर २७, १९९८ च्या द न्यू यॉर्क टाईम्स मॅग्झीन मधील एका वृत्तानुसार, एका धार्मिक गटाच्या नेत्याने, “मी त्या दोन साक्षीदारांतील एक साक्षीदार आहे, व पृथ्वीवर येणाऱ्‍या नाशाविषयीची व प्रभूच्या परतण्याची घोषणा मी करावी असे देवाने आधीच ठरवले आहे—आणि मग सैतान माझी जेरुसलेमच्या रस्त्यांवर हत्या करील,” असे सांगितले. यामुळे इस्राएली अधिकाऱ्‍यांना चांगलीच धडकी बसली आहे. त्यांना भीती वाटते, की काही धर्मवेडे लोक ही भविष्यवाणी स्वतःच “पूर्ण” करण्याचा प्रयत्न करतील—कदाचित सशस्त्र संघर्षही चेतवतील! परंतु, आपले उद्देश सफल करायला देवाला मानवाच्या ‘साहाय्याची’ गरज नाही. बायबलमधील सर्व भविष्यवाण्या देवाच्या नियुक्‍त समयी व देवाच्या इच्छेनुसार पूर्ण होतील.

प्रकटीकरणाचे पुस्तक ‘चिन्हांत’ लिहिण्यात आले आहे. प्रकटीकरण १:१ नुसार, येशू (जगातल्या लोकांना नव्हे तर) “आपल्या दासांना” लवकरच घडणाऱ्‍या गोष्टी प्रकट करू इच्छित होता. ख्रिस्ताचे दास किंवा अनुयायी देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने प्रकटीकरणाचे पुस्तक समजू शकतात; आणि यहोवा केवळ अशांनाच आपला पवित्र आत्मा देतो जे त्याला संतुष्ट करतात. प्रकटीकरणाचे पुस्तक आपण शाब्दिक अर्थाने घेतले तर विश्‍वास न करणारे लोक सुद्धा ते वाचून समजतील. मग ते समजून घेण्याकरता ख्रिश्‍चनांना पवित्र आत्म्यासाठी देवाला प्रार्थना करायची काही गरज नाही.—मत्तय १३:१०-१५.

आपण बायबलच्या पुराव्यानुसार हे पाहिले की येशूच्या जन्मापासूनच्या तिसऱ्‍या सहस्रकाची सुरवात १९९९ च्या शरद ऋतुत झाली आहे आणि जानेवारी १, २००० किंवा जानेवारी १, २००१ या तारखांना कसलेही खास महत्त्व नाही. पण एक असे सहस्रक आहे जे ख्रिश्‍चनांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हे कोणते सहस्रक आहे? या प्रश्‍नाचे उत्तर या शृंखलेतील शेवटल्या लेखात दिले आहे.

[तळटीपा]

a पृष्ठ ५ वरील “२००० की २००१” शीर्षक असलेला चौकोन पाहा.

b या विद्वानांच्या कालगणनेनुसार, तिसरे सहस्रक १९९५ किंवा १९९६ ला उदयास आले असेल.

c सविस्तर माहितीकरता कृपया वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित करण्यात आलेले, शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी खंड १, पृष्ठे १०९४-५ पाहा.

[५ पानांवरील चौकट]

२००० की २००१?

येशूच्या जन्मापासूनच्या तिसऱ्‍या सहस्रकाचा उदय जानेवारी १, २००१ साली होईल असा काही जण का दावा करतात हे समजण्यासाठी पुढील उदाहरणाचा विचार करा. समजा तुम्ही २०० पानांचे पुस्तक वाचत आहात. तुम्ही १९९ पाने संपवून २०० पानाच्या सुरवातीपर्यंत येता, म्हणजे तुम्हाला आणखी एक पान वाचायचे आहे. तुम्ही जोपर्यंत २०० पानाच्या शेवटपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण पुस्तक वाचले असे म्हणू शकत नाही. तसेच, सर्वसामान्यपणे मानले जाते त्याप्रमाणे सध्याच्या सहस्रकाची ९९९ वर्षे, डिसेंबर ३१, १९९९ मध्ये पूर्ण होतील; म्हणजे, सहस्रकाच्या शेवटपर्यंत जायला आणखी एक वर्ष बाकी आहे. या गणनेनुसार, तिसरे सहस्रक जानेवारी १, २००१ साली सुरू होते. परंतु लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे, बरोबर त्याच दिवशी येशूचा जन्म होऊन २,००० वर्षे पूर्ण होतील असा याचा अर्थ होत नाही.

[६ पानांवरील चौकट]

इ.स.पू.-इ.स. कालगणनेची पद्धत कशी सुरू झाली

सा.यु. सहाव्या शतकाच्या सुरवातीला पोप जॉन पहिले यांनी, डायोनायसिस एक्सीगुयुस नावाच्या एका ख्रिस्ती संन्याशाला चर्चला ईस्टरसाठी एक अधिकृत तारीख ठरवता यावी म्हणून कालगणनेची एक पद्धत तयार करण्यास सांगितले.

डायोनायसिस या कामाला लागला. त्याने येशूचा मृत्यू होण्याच्या काळाआधी, म्हणजे तो ज्याला येशूच्या जन्माचे वर्ष समजत होता तेव्हापासून मोजायला सुरवात केली आणि मग तेथून पुढे त्याने प्रत्येक वर्षाला क्रमांक दिला. येशूच्या जन्मापासूच्या काळाला डायोनायसिसने “इ.स.” (इसवी सन—“आमच्या प्रभूच्या वर्षांत”) असे नाव दिले. प्रत्येक वर्षी फक्‍त ईस्टरचा दिवस ठरवता यावा म्हणून एक विश्‍वसनीय पद्धत तयार करण्याच्या प्रयत्नात डायोनायसिसने नकळत ख्रिस्ताच्या जन्मापासूनचे वर्ष मोजण्याची पद्धत सुरू केली.

डायोनायसिसने आपल्या गणितासाठी ज्या वर्षांचा आधार घेतला त्या वर्षी येशूचा जन्म झाला नाही यावर अनेक विद्वानांचे मतैक्य असले तरी, कालगणनेच्या त्याच्या पद्धतीमुळे आपण कालौघात घडलेल्या घटना शोधू शकतो. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध आपल्याला दिसेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा