जगावरील दृष्टिक्षेप
मुलांमधील अतिसारावर उपचार
काराकासचे द डेली जर्नल म्हणते: “मुलांमधील तीव्र अतिसाराचा, जवळजवळ कायमचा नायनाट करून टाकणारी एक लस व्हेनेझुएलन संशोधकांनी विकसित केली आहे. ही लस, . . . दर वर्षी, न्यूनविकसित राष्ट्रांतील पाच वर्षे वयोगटाखालील सुमारे ८,७३,००० मुलांचा बळी घेणाऱ्या रोटाव्हायरस अतिसारापासून संरक्षण करण्याकरता तयार करण्यात आली आहे.” संयुक्त संस्थानांत आजही, हा आजार दर वर्षी १,००,००० हून अधिक अर्भकांना आणि अद्याप शाळेत जाण्याचे वय नसलेल्या मुलांना रुग्णालयाची वाट दाखवत आहे. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन यात प्रकाशित झालेला अभ्यास असा अहवाल देतो, की या लसीचा उपयोग केल्याने सदर व्हायरसपासून लाभलेल्या संरक्षणाचे प्रमाण ८८ टक्के होते तर तीव्र स्वरूपाच्या अतिसारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांनी घटली. तथापि, याचा एक तोटा आहे. “या उपचाराची सर्वाधिक गरज असलेल्या न्यूनविकसित राष्ट्रांसाठी”—अशी राष्ट्रे “जेथे आरोग्य निगेवर दर वर्षी, दरडोई २० डॉलरहून कमी खर्च केला जातो—हा उपचार अतिशय महागडा असू शकतो,” असे द डेली जर्नल म्हणते. ही लस किफायतशीर दरांत उपलब्ध होईपर्यंत, अतिसारामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनवर मागील २० वर्षांपासून प्रभावीपणे वापरली जाणारी उपचारपद्धतच—गमावलेल्या द्रवपदार्थाची भरपाई करणे—चालू ठेवावी.
काम, ताण आणि हृदयविकाराचे झटके
फ्राँकफूर्टर रूंटशाऊ अहवाल देते, की कामावरील मानसिक ताण हे हृदय आणि रक्ताभिसरण संबंधित समस्यांचे दुसरे सर्वात प्रमुख धोकेदायक कारण असून धुम्रपान हे त्याचे पहिले सर्वात प्रमुख कारण होय. बर्लिन, जर्मनी येथील व्यावसायिक संरक्षण व आरोग्य निगा आणि कार्यस्थळावरील सुरक्षा दर्जा यांच्या फेडरल इंस्टिट्यूटने घेतलेल्या सर्वेक्षणाचा एक अहवाल अशाप्रकारे सारांश देतो: “ज्यांना निर्णय घेण्याचे मर्यादित स्वातंत्र्य असते व ज्यांच्या कामामध्ये फारच कमी विविधता असते अशा कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. शिवाय, आपले घर बांधणे किंवा आजारी नातेवाईकाची सुश्रूषा करणे, यांमुळे फावल्या वेळातही ते दबावाखाली असल्यास हृदयविकाराच्या झटक्याचा धोका जवळजवळ नऊ पट वाढतो.” एक तज्ज्ञ असे आर्जवितो, की कर्मचाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिक स्वातंत्र्य दिले जावे. “महिन्यातून केवळ एकदा डिपार्टमेंटच्या सर्व कामगारांसोबत चर्चा केल्याने बराच फरक पडू शकतो.”
स्तनपानामुळे आजारांत घट
पालक (इंग्रजी) नियतकालिक म्हणते: “२ ते ७ महिन्यांच्या १,७०० हून अधिक अर्भकांच्या एका अभ्यासानुसार, स्तनपान करणाऱ्या बाळाला कानाचे संसर्ग किंवा अतिसार होण्याची शक्यता कमी असते. स्तनपान करणाऱ्या बाळाच्या तुलनेत ज्या बाळाला केवळ वरचे दूध दिले जाते त्यास वर उल्लेखिल्यांपैकी एखादा आजार होण्याची शक्यता दुप्पट असल्याचे रोग नियंत्रण आणि निवारण केंद्रांतील संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.” बाळाला आईकडून संरक्षक प्रतिद्रव्ये मिळत असल्यामुळे मातेचे दूध संसर्गापासून संरक्षण करत असल्याचे फार पूर्वीपासून डॉक्टर मानत आले असले तरीही, याचे इतरही अनेक फायदे असल्याचे सदर अभ्यास दाखवतो. अभ्यासाचे लेखक, लॉरेन्स ग्रमर-स्ट्रॉन म्हणतात: “पहिल्या सहा महिन्यांत अर्भकाला जितके अधिक मातेचे दूध दिले जाते तितके अधिक ते उत्तम असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”
‘जगाचे सर्वात कार्यक्षम वाहन’
कोलंबो, श्रीलंकाचे दि आयलंड अहवाल देते, की तुम्ही एखाद्या शहरामध्ये आठ किलोमीटरहून कमी प्रवास करत असल्यास कारपेक्षा सायकलच अधिक जलद असू शकते. आंतरराष्ट्रीय पर्यावरण गट पृथ्वीमित्र, सायकलला “सर्वात कार्यक्षम वाहन” म्हणतो. हा गट दाखवून देतो, की अन्नापासून मिळालेल्या उर्जेमुळे—ज्याचे प्रमाण केवळ एक लिटर पेट्रोलइतके असते—हवा प्रदूषित न करता सायकलद्वारे २,४०० किलोमीटर इतके अंतर कापले जाऊ शकते; शिवाय, सायकलमुळे आरोग्यालाही अनेक लाभ होतात, असे सदर अहवाल म्हणतो.
सिझेरियन की नॉर्मल प्रसूती?
ब्राझीलमधील डॉक्टर आणि माता, नॉर्मल प्रसूतीपेक्षा बहुधा सिझेरियनच अधिक पसंत करतात. वेझा नियतकालिक अहवाल देते: डॉक्टरांना असे वाटते की, “आपण अनेक प्रसूती हाताळू शकू, क्लिनिकमध्ये बसून भरपूर पैसा कमवू शकू, शिवाय आपला शनिवार-रविवारही मजेत जाईल.” दुसरीकडे, मातांना, “वेदनांच्या भीतीने नॉर्मल प्रसूती नकोशी वाटते (तथापि, सिझेरियन प्रसूतीनंतर पूर्वस्थितीत येताना कितीतरी अधिक वेदना होतात), तसेच त्यांचा असाही विश्वास असतो, की शरीराचे सौंदर्य कायम टिकण्यासाठी ही पद्धत हातभार लावील (पण, हे खरे नाही).” सार्वजनिक रुग्णालयांमध्ये एकूण प्रसूतींपैकी एकतृतीयांश प्रसूती सिझेरियनमार्फत होतात आणि काही खाजगी रुग्णालयांमध्ये याचे प्रमाण ८० टक्क्यांइतके आहे. “बाळंतपण एक व्यापार बनला आहे” असे कॅम्पीनस विद्यापीठातील प्रसूतीशास्त्राचे प्रमुख डॉ. झ्वॅयून लूईस कारवाल्यू पिन्टो ई सील्वा म्हणतात. “लोक सहसा हे विसरतात, की नॉर्मल प्रसूतीच्या विषमतेत सिझेरियन खरे तर एक शस्त्रक्रियाच असते. यात जास्त रक्तस्राव होतो, बाळंतीण अधिक काळ बेशुद्ध राहते आणि संसर्गाची शक्यताही वाढते.” वेझा नियतकालिक म्हणते त्यानुसार, सदर डॉक्टरच्या मते, सिझेरियन केवळ तीन परिस्थितीत केले जावे: “मातेचा आणि बाळाचा जीव धोक्यात असल्यास, प्रसूतीच्या वेदनेची काहीच चिन्हे दिसत नसल्यास किंवा मग अचानक गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवल्यास.”