२०००—विशेष वर्ष?
वर्ष २०००, विशेष आहे का? हे तिसऱ्या सहस्रकाचे पहिले वर्ष आहे असे पाश्चात्य देशात राहणाऱ्या लोकांचे मत आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी जय्यत तयारी चालली आहे. नवीन सहस्रकाचा उदय होईपर्यंतचा प्रत्येक सेकंद मोजण्याकरता प्रचंड इलेक्ट्रॉनिक घड्याळे जागोजागी बसवण्यात आली आहेत. महा नववर्ष उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. छोट्यामोठ्या दुकानांमध्ये संपत चाललेल्या सहस्रकाची घोषवाक्ये असलेली टी-शट्र्स विकली जात आहेत.
लहानमोठे चर्चेस वर्षभर चालणाऱ्या उत्सवांमध्ये भाग घेतील. पुढील वर्षाच्या सुरवातीला पोप जॉन पॉल दुसरे, “रोमन कॅथलिक चर्चचा सहस्रकाचा महोत्सव,” असे ज्याला म्हटले जाते त्यासाठी रोमन कॅथलिकांचे नेतृत्त्व करण्यासाठी इस्राएलला जाणार आहेत असे म्हटले जाते. भाविकांपासून केवळ कुतूहलापोटी येणारे अडीच ते सहा कोटी पर्यटक पुढील वर्षी इस्राएलला भेट देण्याची योजना करत आहेत असा अंदाज लावला जातो.
इतके लोक इस्राएलला भेट देण्याची योजना का करत आहेत? व्हॅटिकन अधिकारी व पोपच्या वतीने बोलणारे रॉजर कार्डिनल एचगरे म्हणाले: “वर्ष २०००, ख्रिस्ताचा जन्मदिवस आणि या देशातील त्याचे जीवन साजरे करण्याचे वर्ष आहे. म्हणून पोपनी येथे येणे साहजिक आहे.” पण ख्रिस्ताशी वर्ष २००० चा काय संबंध आहे? २००० साली ख्रिस्ताचा जन्म होऊन बरोबर २००० वर्ष पूर्ण होतील असा सर्वसामान्यपणे विचार केला जातो. पण तसे खरेच आहे का? आपण पाहू या.
वर्ष २००० काही धार्मिक गटाच्या लोकांना जास्तच महत्त्वाचे वाटते. येशू जैतुनांच्या डोंगरावर आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे मग्गिदोच्या खोऱ्यात हर्मगिदोन युद्ध लढण्याकरता पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षांत पुन्हा येईल अशी त्यांना खात्री आहे. (प्रकटीकरण १६:१४-१६) या घटनांची वाट पाहणारे अनेक अमेरिकनवासी आपली घरे आणि आपली बहुतेक मालमत्ता विकून इस्राएलला राहायला जात आहेत. असे म्हटले जाते, की जे लोक आपली घरे सोडू शकत नाहीत अशा लोकांसाठी टीव्हीवरून येशूच्या पुनरागमनाचे रंगीत प्रक्षेपण केले जाईल असे वचन एका प्रमुख अमेरिकन सुवार्तिकाने दिले आहे!
पाश्चात्य देशांत तिसऱ्या सहस्रकात प्रवेश करण्याची जोरदार तयारी चालू आहे. पण, इतर देशांतील लोकांचे सगळे व्यवहार नेहमीप्रमाणे चालले आहेत. नासरेथकर येशू मशीहा होता असा या लोकांचा—जगातील बहुसंख्य लोकांचा विश्वास नाही. इ.स.पू.-इ.स. ही कालगणनेची पद्धतही ते मानतातच असे नाही.a उदाहरणार्थ, बहुतेक मुस्लिमांकडे त्यांचे स्वतःचे निराळे कॅलेंडर आहे; त्या कॅलेंडरनुसार येणारे पुढील वर्ष २००० नव्हे तर १४२० आहे. संदेष्टा मुहम्मद यांनी मक्क्याहून मदीनाला जेव्हा पळ काढला त्या वर्षापासून मुस्लिम लोक वर्षांची गणना करतात. एकूणच, संपूर्ण जगभरातील लोक सुमारे ४० विविध कॅलेंडर्सचा वापर करतात.
ख्रिश्चनांना, वर्ष २००० खास अर्थाचे आहे का? जानेवारी १, २००० खरोखरच एक विशेष दिन आहे का? पुढील लेखात या प्रश्नांची उत्तरे दिली जातील.
[तळटीपा]
a इ.स.पू.-इ.स. या कालगणनेच्या पद्धतीत, येशूच्या जन्माच्या आधी घडलेल्या घटनांना, “सा.यु.” (ख्रिस्तपूर्व) असे नाव दिले जाते तर नंतर घडलेल्या घटनांना “इ.स.” (ख्रिस्तोत्तर—“आमच्या प्रभूच्या वर्षांत”) असे नाव दिले जाते. परंतु काही विद्वान, “सा.यु.पू.” (सामान्य युग पूर्व) आणि “सा.यु.” (सामान्य युग) ही लौकिक नावे पसंत करतात.