लघु पुस्तकांचे दिलखेचक विश्व
ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
असामान्य गोष्टी नेहमीच लक्षवेधक असतात—सर्वात उंच पर्वत, सर्वात खोल समुद्र, सर्वात उंच इमारत, सर्वात लांब भुयार—तर मग सर्वात लहान पुस्तकाबाबत काय? लघु पुस्तकेही दिलखेचक असतात! हरएक कल्पनीय विषयावर आणि कमीत कमी २० भाषांमध्ये लक्षावधी लघु पुस्तके छापली गेली आहेत. तुम्ही त्यांच्या विश्वातून कधी शोधप्रवास केला नसल्यास निदान आता त्या विश्वावर एक कटाक्ष टाका.
लघु पुस्तकाची व्याख्या आपण कशी करणार? लांबीला किंवा रुंदीला ७६ मिलीमीटरहून अधिक नसलेले एखादे पुस्तक, हा त्याचा स्वीकृत नमुना होय. काही चोखंदळ संग्राहक केवळ पुस्तकाच्या पानांची मोजमाप करणे पसंत करत असले तरीही वर दिलेल्या मोजमापात बांधणी देखील समाविष्ट असते. हे लघु खंड तयार करण्याचा मूळ उद्देश काय?
कलाकुसरीचे पैलू
काहीजण कदाचित अपेक्षा करतील त्याच्या अगदी विपरीत अनेक लघु पुस्तके बरीच सुवाच्य असतात. यामुळे लघु पंचांग, साहित्यिक लेख, कादंबऱ्या, नाटके, शब्दकोश आणि पवित्र लिखाणे ही सहजासहजी बाळगली जाऊ शकतात; शिवाय अल्प प्रयासांनिशी त्यांचा उपयोगही केला जाऊ शकतो. अनेक वर्षांपूर्वी, असे चिमुकले खंड बाळगण्यामागील मुख्य कारण हेच असले तरीही अलीकडच्या संग्राहकाला, लघु पुस्तकांच्या दुसऱ्या पैलूविषयी—ज्यांनी ही पुस्तके छापून त्यांची बांधणी केली त्यांच्या कुशलतेविषयी—अधिक अभिरुची आहे.
विशालक काचेचा उपयोग करून किंवा त्याशिवाय वाचण्यास सुलभ असेल अशा टाईपची रचना व निर्मिती करण्यात मुद्रकांना अनेक तांत्रिक समस्यांवर मात करावी लागली. त्यांच्या अधिकतर कलाकृतींमुळे अतिसुंदर पुस्तकांची निर्मिती झाली. छापील पानावर सर्व काही सुस्पष्ट दिसावे याची खात्री करण्यासाठी कागद व शाई उत्पादकांनी सामाईक प्रयत्नसुद्धा केले.
एखादे पुस्तक छापल्यानंतर त्याची बांधणी केली जाते; आणि लघु पुस्तकांची बांधणी तर कौशल्यपूर्ण असू शकते. सुशोभित कातडी, सोन्याचांदीचे तारकाम, कासवाचे कवच किंवा शोभिवंत काचवण यांच्या इवल्या इवल्या वेष्टन निर्मितीतून कसबी कारागिरांचे कौशल्य डोकावते. इतर वेष्टने रेशीम अथवा मखमलीची असतात; किंवा त्यांच्यावर भरतकाम अथवा मोती व टिकल्या किंवा चांदण्यांची सजावट केलेली असते; काही पुस्तके जतन करता यावीत म्हणून त्यांचे एक वेष्टन देखील असते.
चित्रांचा उपयोग करून छापील मजकूर सुशोभित करणाऱ्या कोरीव काम करणाऱ्यांनी, विश्वासही बसणार नाही इतकी तपशिलवार चित्रे निर्माण केली; अनेकदा तर ही चित्रे काढण्यासाठी पानाचा सात चौरस सेंटीमीटरहून कमी भाग ते वापरत! याचेच एक उदाहरण, १८९० दशकाच्या प्रारंभिक काळात छापलेल्या ३६८ पृष्ठांचे ब्राइसेस थम्ब इंग्लिश डिक्शनरी यातील डॉ. सॅम्युएल जॉनसन या इंग्रजी शब्दकोशकाराची तसबीर आहे; तर दुसरे उदाहरण, १९०९ साली एलन टेरी या इंग्रजी अभिनेत्रीला समर्पित केलेले शेक्सपिअरचे किंग रिचर्ड III याच्या पहिल्या पृष्ठावरील चित्र आहे.
पॅरिसमध्ये प्रकाशित झालेले बीब्लीयॉटेक पॉरटाटीव्ह ड्यू वायाझोअर, एक लघु ग्रंथालय असून आपल्या लष्करी मोहिमांदरम्यान नेपोलियन बोनापार्टने ते आपल्याजवळ बाळगले असल्याचे समजले जाते. याच्या फ्रेंच ग्रंथाचे ४९ खंड कातडी आवरण असलेल्या पेटीत ठेवलेले आहेत जे बंद केल्यावर एका लांब दुपत्रीग्रंथासारखे दिसते.
थम्ब (अंगठा) बायबल
थम्ब बायबल नेहमीच संपूर्ण बायबल असतात असे नाही. काही तर केवळ “नवा करार” असतात. इतर काही, बायबल कथांचा सारांश किंवा सुमारे ७,००० शब्दांत संकलित केलेला संपूर्ण इतिहास असतो; विशेषतः, मुलांच्या वाचनासाठी ते रचले गेले होते. त्यांची शीर्षके पुढीलप्रमाणे असतात: लघुरूपातील बायबल (इंग्रजी), पवित्र बायबलचा इतिहास (इंग्रजी) आणि मुलाचे बायबल (इंग्रजी).
थम्ब बायबलला हे नाव कसे पडले बरे? नावावरून स्पष्ट होते त्याप्रमाणे, अशा प्रकारचे बायबल मानवी अंगठ्याच्या वरच्या भागापेक्षा किंचित मोठे असते. तरीसुद्धा, थम्ब बायबलची तीन शतके (इंग्रजी) हे पुस्तक असे सूचित करते, की अमेरिकेचा एक विख्यात ठेंगू मनुष्य, चार्ल्स स्ट्रेटन जो जनरल टॉम थम्ब या नावाने अधिक प्रसिद्ध होता त्याने इंग्लंडला दिलेल्या भेटीनंतर ही संज्ञा रूढ झाली असावी. या प्रतिपादनास दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे १८४४ साली टॉम थम्बने इंग्लंडला भेट दिली आणि “थम्ब बायबल” या संज्ञेचा प्रथम प्रयोग १८४९ साली केला असल्याचे दिसते.
अनोखे शास्त्र खंड
या शतकाच्या सुरवातीला छापलेले द फिंगर (बोट) न्यू टेस्टामेंट, लहान बायबलच्या विश्वात पडलेली आणखीन एक असामान्य भर होय. त्याची रुंदी केवळ तीन सेंटीमीटर तर लांबी नऊ सेंटीमीटर—बोटाच्या लांबीइतकी आहे—यावरूनच त्याला हे नाव पडले. तथापि, ते सर्वसामान्यपणे लघु बायबलच्या गटात मोडले जात असले तरीही त्याची लांबी ७६ मिलीमीटरहून अधिक असल्यामुळे खरे पाहता ते एक लघु पुस्तक आहे असे म्हणता येणार नाही. या चिमुकल्या खंडात वापरलेले ४-पॉईंट टाईप प्रमाण अगदी सुस्पष्ट असून विशालक काचेच्या साहाय्याशिवाय अगदी सहजासहजी वाचले जाऊ शकते.
एका अनोख्या उदाहरणाचे शीर्षक सचित्रित बायबल (इंग्रजी) असून त्यातील कवितांचे शीर्षक स्वर्गाचा रेल्वेमार्ग (इंग्रजी) असे आहे. ब्रिटनच्या रेल्वेमार्गांच्या प्रारंभिक काळादरम्यान ५० हून अधिक वर्षांपर्यंत ते छापले जात होते. “तुम्हाला दुसऱ्या मार्गाकडे निर्देशित करण्यासाठी” अशा शीर्षकाच्या दोन पानी कवितेद्वारे लेखकाने रेल्वेमार्गातून लाभ उठविला. तो दुसरा मार्ग म्हणजे, “यहोवाचा पुत्र, येशू ख्रिस्त” होय. कवितेचा समारोप असा होतो: “देव म्हणतो, माझ्या पुत्रा तुझे मन माझ्याकडे वळव. त्वरा कर—नाहीतर, ट्रेन सुटेल.”
तसेच, १९०० सालातला माझा प्रभात सल्लागार (इंग्रजी) हा ग्रंथही अनोखाच आहे. त्यामध्ये दैनिक बायबल वचन असून प्रत्येक महिन्याच्या आधी ईश्वरी नामाचे एखादे रूप दिलेले आहे. उदाहरणार्थ, फेब्रुवारीसाठी दिलेले रूप आहे: “यहोवा-शालोम.” हे आणि आधी उल्लेखिलेले सचित्रित बायबल ही दोन्ही पुस्तके, शंभर वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये यहोवा, हे देवाचे नाव प्रचारात असल्याची वस्तुस्थिती प्रकट करतात.
लहानातले लहान?
शतकांच्या दरम्यान, लहानातल्या लहान पुस्तकाच्या अमर्याद मागण्या केल्या गेल्या आहेत. पहिली साधार मागणी १६७४ साली केली गेली होती जेव्हा सी. फॉन लाँग यांचे ब्लूम-हॉफया हे पुस्तक अति लहान टाईपमध्ये छापले गेले. लघु पुस्तके त्याचे वर्णन, “बोटाच्या नखाएवढे” असे करतात; या पुस्तकाचा हा विक्रम २०० हून अधिक वर्षांपर्यंत कोणीही तोडला नाही.
डान्टेची ला डीवीना कॉमेड्या ही विख्यात आवृत्ती २-पॉईंट टाईपमध्ये छापण्यात आली होती; त्या काळापर्यंत वापरण्यात आलेला हा सगळ्यात लहान टाईप समजला जात असून दुर्बीण वगैरे न वापरता त्याचे वाचन करणे क्वचितच शक्य होते. या पुस्तकाची निर्मिती १८७८ साली पाडवा, इटली या ठिकाणी झाली. तीस पाने छापण्याकरता तब्बल एक महिना लागला आणि छपाईच्या प्रत्येक नवीन फॉर्मसाठी एक नवीन टाईप वापरण्याची गरज होती. इतके असूनही, त्याच्या १,००० प्रती छापण्यात आल्या.
लघुकरण करणे पुढे चालूच राहिले. सन १९७८ मध्ये पेझली, स्कॉटलंडच्या ग्लेनिफर प्रेसचे थ्री ब्लाईंड माइस हे बालगीत, “जगातले सर्वात लहान पुस्तक” होते. सन १९८५ मध्ये याच मुद्रकांनी ओल्ड किंग कोल! या दुसऱ्या बालगीताच्या ८५ प्रती छापल्या तेव्हा पहिल्या बालगीताची मर्यादित आवृत्ती मागे पडली. प्रत्येक प्रत केवळ एक बाय एक मिलीमीटर इतकी आहे. त्याची पाने, सुईच्या साहाय्याने उलटली जाऊ शकतात!
“केवळ धुळीच्या कणाइतकी” या शब्दांत लूइस बॉन्डी यांनी अशा अति लहान पुस्तकांचे केलेले वर्णन शब्दातीत धीराचा व कसबीपणाचा पुरावा देऊन जातात. तथापि, ही चिमुकली पुस्तके मूळ लघु पुस्तक कल्पनेच्या पलीकडे जातात; कारण सुवाच्य आणि सहज वापरण्याजोगी पुस्तके निर्माण करणे हा त्यामागचा हेतू होता.
डोळे दिपवून टाकणाऱ्या या लघु खंडांचे उत्कृष्ट संग्रह आज संग्रहालयात पाहावयास मिळू शकतात; आणि इतर अनेक वैयक्तिकांच्या मालकीची आहेत. या पुस्तकांच्या दिलखेचक विश्वात तुम्ही यदाकदाचित प्रवेश केलाच तर ही चिमुकली पुस्तके जपून हाताळण्याचे भान राखा. ती निश्चितच एक दिलखेचक कलाकृती आहे!
[२३ पानांवरील चौकट/चित्र]
फोटोमेकॅनिकल लघुकरण
आजवर उपलब्ध असलेला लहानातला लहान “नवा करार” सन १८९५ मध्ये ग्लासगो, स्कॉटलंडच्या डेव्हिड ब्राइस यांनी निर्माण केला होता. तो १.९ बाय १.६ सेंटीमीटर इतका असून त्याची रुंदी केवळ ०.८ सेंटीमीटर इतकी आहे! याचे मुद्रण करणे कसे शक्य झाले बरे? “फोटोमेकॅनिकल लघुकरणाद्वारे ते अतिसुंदर व सुस्पष्टपणे छापले गेले आहे,” असे विवरण लूइस बॉन्डी लघु पुस्तके यात देतात. शंभर वर्षांपूर्वी जेव्हा छायाचित्रण अजूनही प्राथमिक काळात होते त्या वेळेची ही काही लहानसहान साध्यता नव्हती.
याच पद्धतीचा वापर करून डेव्हिड ब्राइस यांनी अशाप्रकारचे असंख्य संपूर्ण थम्ब बायबल छापले. ज्यांना ही सूक्ष्म छपाई वाचण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी प्रत्येक बायबलच्या आतल्या वेष्टनात एक छोटीशी विशालक काचही ठेवलेली आहे. चिकाटीने वाचन करणाऱ्यांना याच्या साहाय्याने वाचन करणे शक्य होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान, आधी नात्सींच्या आणि नंतर साम्यवाद्यांच्या हाती यहोवाच्या साक्षीदारांचा छळ झाला त्या काळादरम्यान त्यांनी छायाचित्रणाचा उपयोग करून लघुरूप प्रकाशने छापण्याच्या या पद्धतीचा उत्तम प्रयोग केला ही एक लक्षवेधक बाब आहे. या पद्धतीचा प्रयोग करून छापलेले एक बायबल अभ्यास सहायक, बाजूला दिलेल्या चित्रात पाहावयास मिळते. एका काडीपेटीत घालून नात्सी छळछावणीतील साक्षीदारांकडे ते चोरून पाठवले गेले होते.
एका काडीपेटीत घालून हे चोरून छळछावणीत पाठवले गेले होते
[२२ पानांवरील चित्र]
लहान असली तरीही लघु पुस्तके सुवाच्य असू शकतात
[२३ पानांवरील चित्र]
एका काडीपेटीत घालून हे चोरून छळछावणीत पाठवले गेले होते
[२४ पानांवरील चित्र]
लघु पुस्तकांचे ग्रंथालय