तरुण लोक विचारतात . . .
माझ्या मैत्रिणीचे दडपण मी कसे टाळू शकते?
“माझी मैत्रीण जणू माझ्यावर मालकी गाजवायची. माझं काही एक चालवू द्यायची नाही.”—हॉली.
एक सुज्ञ नीतिसूत्र असे म्हणते: ‘एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो.’ (नीतिसूत्रे १८:२४) तुमची आणि तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची मते, विनोदबुद्धी किंवा आवडीनिवडी एकसारख्याच असल्या की मग सतत एकत्र राहावेसे वाटणे अगदीच स्वाभाविक आहे. कॅरोलाइन नामक एक युवती म्हणते: “ख्रिस्ती मंडळीतील काहींसोबत माझी दाट मैत्री आहे; याचे कारण आम्ही काही गोष्टी एकत्र मिळून करतो.” एक यहोवाची साक्षीदार या नात्याने कॅरोलाइनने सुवार्तिक कार्यात ६० तास खर्च करण्याच्या उद्देशाने एक विशिष्ट महिना राखून ठेवला. या कार्यात तिला पाठबळ देण्यासाठी तिच्या मित्रमैत्रिणींनी आपापल्या वेळापत्रकात बदल केला!
पण, जवळीक राखण्याचे काही फायदे असले तरीही कधीकधी त्याची अतिशयोक्ती होऊ शकते. सुरवातीला उल्लेखिलेल्या हॉलीला आपली मैत्रीण आपल्यावर दडपण आणत असल्यासारखे वाटते. आणि तिला एकटीलाच असे वाटते असे नाही. हॉली म्हणते: “इतर मुलांवर देखील असंच दडपण आल्याचं दिसतं. एखादं भांडण होईपर्यंत ते अगदी गळ्यात गळा घालून वावरत असतात. आणि मग आठवडे आठवडे ते एकमेकांशी बोलत नाहीत.”
आपल्यावर सतत त्यांचे दडपण असल्यासारखे वाटते आणि आपल्याला थोडीशी मोकळीक हवी आहे हे एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगणे वाटते तितके सोपे नसते; हीच तर खरी समस्या आहे. तुम्ही तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या भावना दुखवाल असे भय तुम्हाला वाटू शकते. शिवाय, तुमच्यातला नातेसंबंध बिघडण्याचीही भीती कदाचित तुमच्या मनात असेल. तथापि, मैत्रीमध्ये एक माफक अंतर राखल्याने संबंध बिघडण्याऐवजी लाभ होण्याचीच अधिक शक्यता असते.
उदाहरणार्थ: ऑस्ट्रेलियातील, सिडनी येथील सार्वजनिक उद्यानात एका मोठ्या वृक्षाभोवती एक साखळीचे कुंपण घालणे आवश्यक झाले. का बरे? बागेत जाणाऱ्यांच्या भल्या मोठ्या पलटणीमुळे जमीन घट्ट होऊन मुळांची कोंडी होऊ लागली होती. वृक्षाचे संरक्षण केले नसते तर ते मरून गेले असते. हीच गोष्ट मैत्रीच्या बाबतीत घडू शकते. वाजवीपेक्षा जास्त जवळीक, मैत्रीची कोंडी करू शकते. शलमोन राजाने लिहिले: “शेजाऱ्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाही तर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.”—नीतिसूत्रे २५:१७.
खाजगी वेळेची आणि एकान्ताची गरज
शलमोनाने असे का म्हटले? त्याचे एक कारण म्हणजे, आपल्या सर्वांनाच खाजगी वेळेची आणि एकान्ताची गरज असते. येशू ख्रिस्ताला देखील याची गरज होती. आपल्या शिष्यांसोबत त्याचा अगदी निकटचा संबंध असला तरीही वेळोवेळी ‘प्रार्थना करावयास तो एकान्ती’ जात असे. (मत्तय १४:२३; मार्क १:३५) त्याचप्रमाणे देवभीरू इसहाकाने देखील एकान्तात वेळ घालवला. (उत्पत्ति २४:६३) गृहपाठ, रोजचे कामधाम आणि बायबलचा तुमचा वैयक्तिक अभ्यास, या सर्वांसाठी तुम्हाला देखील खाजगी वेळेची नितान्त गरज आहे. आणि मग, तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमच्या या गरजांकडे डोळेझाक करून समजदारी दाखवली नाही की मग अगदी सहजासहजी राग भडकू शकतो.
तर मग, तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी काही वेळ हवा असतो तेव्हा तुमच्या मित्राला अथवा मैत्रिणीला हे सांगण्यास कचरू नका. ख्रिस्ती प्रेम “स्वार्थ पाहत नाही;” यामुळे एखादा मित्र किंवा मैत्रीण बहुधा समजूतदार असण्याचाच प्रयत्न करील. (१ करिंथकर १३:४, ५; नीतिसूत्रे १७:१७) एक युवती असे लिहिते: “माझ्या वार्षिक परीक्षेच्या वेळी माझ्या मैत्रिणींनी मला खूप पाठबळ दिलं आणि समजूतदारपणा दाखवला. मला अभ्यास करायचा होता तेव्हा, ते निघून गेले तर बरं होईल असं त्यांना सांगायला मला जड जात नव्हतं. माझ्या मित्रमैत्रिणींसोबत स्पष्ट आणि खरं खरं बोलणं मला सोपं जातं; आपल्या सर्वांनाच जबाबदाऱ्या असतात हे त्यांना माहीत आहे.”
अर्थात, सुवर्ण नियम अशीही अपेक्षा करतो की हीच विचारशीलता तुम्ही इतरांना देखील दाखवली पाहिजे. (मत्तय ७:१२) तमारा नामक एक तरुणी लिहिते: “माझ्यावरील अनेक जबाबदाऱ्यांनी मला निश्चितच याची जाणीव करून दिली आहे, की माझ्या मैत्रिणीलाही तिच्या स्वतःसाठी वेळ हवाय.” आणि तमाराला घरात काही कामं उरकायची असतात तेव्हा ती कामं घाईघाईनं उरकण्याचा किंवा ती नंतर करण्याचा दबाव तिच्या मैत्रिणी तिच्यावर आणत नाहीत. उलटपक्षी, तमारा म्हणते: “माझं काम उरकण्यात ते बहुधा मला हातभार लावतात म्हणजे नंतर आम्ही एकत्र मिळून इतर काही कामं करू शकू.” असे निःस्वार्थ मित्रमैत्रिणी किती मूल्यवान ठेवा आहेत—आणि अशा प्रकारे एकमेकांच्या संगतीत घालवलेल्या वेळेचा केवढा सदुपयोग होतो!
‘अंतःकरणे विशाल करा’
मैत्रीमध्ये काही अंतर राखणे शहाणपणाचे का असते याचे आणखीनही एक कारण आहे. आपण आपला संपूर्ण वेळ आणि भावना केवळ एकाच मैत्रीत गुंतवतो तेव्हा इतर महत्त्वाचे नातेसंबंध—जसे की आईवडिलांसोबत, भावंडांसोबत आणि इतर ख्रिश्चनांसोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधांची आपण बहुधा हेळसांड करत असतो. याशिवाय, आपण आपल्या भावनिक व आध्यात्मिक वृद्धीलाही मोठ्या प्रमाणात पायबंद बसवत असतो. बायबल म्हणते: “लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते. माणूस माणसाची बुद्धी तीक्ष्ण करतो.” (नीतिसूत्रे २७:१७; मराठी कॉमन लँग्वेज बायबल) साहजिकच, केवळ एका व्यक्तीशी सहवास राखल्याने—आणि विशेषतः ती व्यक्ती एक समवयस्क असते तेव्हा तुमची बुद्धी फारच कमी प्रमाणात “तीक्ष्ण” होऊ शकते.
यास्तव, मित्रमैत्रिणींचा कंपू बनविणे, मित्रमैत्रिणी निवडण्यात संकुचित अथवा निवडक असणे या गोष्टींना बायबल प्रोत्साहन देत नाही. ते आपल्याला, आपली ‘अंतःकरणे विशाल करण्याचा’ आर्जव करते. (२ करिंथकर ६:१३) मानसिक अवस्था आणि भावना (इंग्रजी) हे पुस्तक असे म्हणते की, “कोणा एका व्यक्तीशी तुमचा एक खास प्रकारचा स्नेहबंध असला तरीही इतर मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे.”
हा सल्ला कृतीत आणणे नेहमीच सोपे नसते. माइकल नामक एक ख्रिस्ती युवक म्हणतो: “मी आणि ट्रॉय, कुठलीच गोष्ट एकमेकांना सोडून करत नसू; अगदी मंडळीत आणि इतर सामाजिक प्रसंगी देखील. आम्हाला जणू कोणीच वेगळे करू शकत नव्हते. मग दुसरा एक तरुण साक्षीदार मंडळीत आला. पूर्ण-वेळेचे सुवार्तिक म्हणून मला आणि या तरुणाला एकत्र सेवा करायची होती; त्यामुळे साहजिकच आम्ही एकत्र वेळ घालवू लागलो.” पण याचा परिणाम? माइकल म्हणतो: “ट्रॉयनं माझ्याशी बोलणंच सोडून दिलं. आणि गैरसमजुती दूर करण्याचे प्रयत्न करून शेवटी मीही त्याच्याशी बोलणं सोडून दिलं. वर्षभर हे असंच चालू राहिलं.” तो त्यांच्या मैत्रीचे वर्णन, “मत्सराने ग्रासलेली” असे करतो.
तथापि, एका हितकर नातेसंबंधात मित्रमैत्रिणी एकमेकांवर मालकी गाजवत नाहीत. तर मग, आपला मित्रपरिवार वाढविण्याचे तुमचे प्रयत्न तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला पाहवत नसतील तर तुम्ही दोघांनी याविषयी मनमोकळी चर्चा केली पाहिजे. कदाचित, तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला केवळ इतकेच आश्वासन हवे असेल, की त्याची किंवा तिची मैत्री तुम्हाला अद्यापही पूर्वीइतकीच प्राणप्रिय आहे. तुम्ही पूर्वीसारखेच एकत्र मिळून गोष्टी कराल ही बाब त्याला किंवा तिला स्पष्ट करा.
या नवीन कल्पनेशी जुळवून घेण्यास तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला थोडा वेळ लागेल हे मान्य आहे. सोळा वर्षांच्या झॅनेटाचेच उदाहरण घ्या ना; तिची जिवलग मैत्रीण इतरांसोबत जास्त वेळ घालवू लागली तेव्हा मत्सरी भावना तिच्या मनात डोकावू लागली. पण झॅनेटा म्हणते की, “प्रार्थना आणि व्यक्तिगत बायबल अभ्यासामुळेच” तिला या भावनांवर मात करता आली. अशाप्रकारे आपल्या मैत्रिणीसोबत निकटचा नातेसंबंध राखणे तिला शक्य झाले. माइकलचा मित्र ट्रॉय याने देखील आपल्या सुरवातीच्या मत्सरी भावनेवर मात केली आणि ते दोघे पुन्हा एकदा चांगले मित्र बनले. कदाचित, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण देखील असेच करील. खरेच, सरतेशेवटी मित्रपरिवार वाढविणे सर्वांनाच फायदेकारक ठरते. सतरा वर्षांची डेबी म्हणते, की तिच्या मैत्रिणी नवनवीन मैत्रिणी जोडतात तेव्हा “त्या बहुधा माझ्याही मैत्रिणी बनतात.”
तथापि, तुमचा मित्र किंवा मैत्रीण कुठल्याही परिस्थितीत तुमच्या नातेसंबंधातील हा बदल स्वीकारण्यास तयार नसेल तर काय केले जावे बरे? अशावेळी आपापला स्वतंत्र मार्ग निवडण्याखेरीज कदाचित तुमच्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नसेल. तथापि, तुमच्या मैत्रीवर पाणी फिरले आहे या निष्कर्षापर्यंत पोहंचण्याआधी या विषयावर आपल्या पालकांचे मत का जाणून घेऊ नये बरे? शेवटी, देवभिरू पालकच तर आपले सगळ्यात जिवलग दोस्त असतात. आणि त्यांच्यापाशी काही व्यावहारिक सूचना असतील ज्यामुळे अंतर राखण्याच्या तुमच्या गरजेचा समझोता न करता तुमची मैत्री वाचवायला ते मदत करतील.
योग्य मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवा
सावधगिरीचा एक इशारा: मित्रपरिवार वाढविण्याचा अर्थ, मित्रमैत्रिणींची निवड करण्याच्या बाबतीत अविचारी असणे असा होत नाही. मैत्रीवरील एक पुस्तक म्हणते: “ज्या लोकांच्या सहवासात तुम्ही अधिक वेळ घालवता त्या लोकांसारखेच बनणे अगदी स्वाभाविक आहे. कधीकधी तर तुमच्या नकळत असे घडू शकते. कदाचित, तुम्हाला कसे वाटते याचा काहीएक विचार न करता तुमचे आचारविचार अगदी तुमच्या समवयस्कांसारखे होऊ लागतात. अशाप्रकारे, तुमच्या समवयस्क गटाचे तुमच्यावर नियंत्रण असू शकते.” हजारो वर्षांपूर्वी बायबलने हाच मुद्दा ठळकपणे मांडला जेव्हा ते म्हणाले: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.
तुम्ही शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी असता तेव्हा यहोवाची सेवा करण्यात काही एक रस नसलेल्या लोकांच्या सहवासात कदाचित तुम्हाला वेळ घालवावा लागेल. परंतु, जिवलग सोबती निवडण्याआधी बायबलचा सल्ला लक्षात घ्या जे म्हणते: “कुसंगतीने नीति बिघडते.”—१ करिंथकर १५:३३.
लक्षात असू द्या, कोणत्याही मानवी मैत्रीपेक्षा आपला सृष्टीकर्ता, यहोवा देव याच्यासोबत असलेली एखाद्याची मैत्री अधिक मोलाची असते. सुरवातीला उल्लेखिलेल्या डेबीला अनेक चांगले मित्रमैत्रिणी आहेत. तरीही ती असा सल्ला देते की, “यहोवाला पहिले स्थान मिळते याची मात्र खात्री करा.” प्राचीन काळच्या विश्वासू अब्राहामाने देखील हेच केले आणि यहोवाने खासपणे त्याला “माझा मित्र” असे म्हटले. (यशया ४१:८) शिवाय, याचाही विचार करा: यहोवावर प्रेम करणाऱ्या मित्रांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा यहोवाला मुळीच मत्सर वाटत नाही; उलट, तसे करण्याचे तो उत्तेजन देतो. किती हा सच्चा मित्र!
[२६ पानांवरील चित्र]
प्रत्येकाला खाजगी वेळेची गरज असते याची खरे मित्रमैत्रिणी जाणीव राखतात