वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ५/८ पृ. २०-२१
  • आमच्या परिसरातला डॉल्फिन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या परिसरातला डॉल्फिन
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दुर्मिळ दृश्‍य का
  • तो डॉल्फिनच आहे का?
  • ठाऊक असलेली थोडीफार माहिती
  • त्याचे भविष्य आहे का?
  • व्हेल? डॉल्फिन? नाही, तो वॉल्फिन आहे!
    सावध राहा!—१९९४
  • एक विलक्षण अनुभव
    सावध राहा!—१९९६
  • निर्मितीकृत्ये देवाचा महिमा वर्णितात!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
सावध राहा!—१९९८
g98 ५/८ पृ. २०-२१

आमच्या परिसरातला डॉल्फिन

ऑस्ट्रेलियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

त्याला उष्णप्रदेशातले कोमट, उथळ पाणी आवडते—मग ते खारट असो की गोडे, गढूळ असो की नितळ. भारताच्या बंगालच्या उपसागरापासून मलेय द्वीपसमूह ते उत्तरी ऑस्ट्रेलियापर्यंत त्याचे क्षेत्र असते.

तरीही, फारच कमी लोकांनी—विशेषतः ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी, ज्यांच्या उत्तरीय किनाऱ्‍यावर या प्राण्यांचे जगातले सर्वात अधिक प्रमाण आहे—इरवाडी डॉल्फिन पाहिलेला नाही किंवा त्याचे नावही कधी ऐकलेले नाही. आश्‍चर्य वाटते का? होय आणि नाही.

एकोणिसाव्या शतकात, प्राणिशास्त्रज्ञ जॉन अँडरसन यांनी म्यानमार (भूतपूर्व बर्मा) येथील इरवाडी नदीत या निळसर करड्या रंगाच्या डॉल्फिनचे थवे पाहिले; त्यांचे डोके गोलाकार असून त्याला चोच नव्हती. त्यांनी त्यास इरवाडी डॉल्फिन असे नाव देऊन टाकले.

दुर्मिळ दृश्‍य का

इरवाडींची, उष्ण आणि दमट किनाऱ्‍याच्या, खाडीच्या आणि नदीच्या भागांमध्ये भरभराट होते. त्यांचे घर कच्छ वनश्री, जंगल, डासांनी भरलेल्या अथवा काही ठिकाणी तर मगरींचे वास्तव्य असलेल्या गढूळ पाण्यात असते—मानव अशा परिसरात फटकत नाहीत.

या भागांतील पाणी देखील सहसा काळसर असते आणि म्हणून फक्‍त डॉल्फिन श्‍वास घ्यायला वर येतात तेव्हाच ते नजरेस पडतात. तेव्हा सुद्धा ते पाण्याच्या जास्त बाहेर येत नाहीत. त्याच्या पाठीचा थोडासाच भाग दिसतो आणि त्यांचा पृष्ठपक्ष इतर डॉल्फिनच्या तुलनेने लहानच असतो.

पण, काही ठिकाणी इरवाडी डॉल्फिन सर्रास पाहायला मिळतात. म्यानमार येथील इरवाडी नदीवरचे त्याचप्रमाणे डॉल्फिनच्या आशियाई परिसरातल्या इतर नद्यांवरचे कोळी आणि नौका चालक या प्राण्यांना भक्ष्य शोधताना आणि नदीच्या उलट बाजूने उड्या मारत जाताना नेहमीच पाहतात; एवढेच नव्हे तर, पाणबागेतील पाण्याच्या कारंज्यांप्रमाणे किंवा मूर्तींप्रमाणे तोंडातून पाण्याचे फवारे उडवतानाही पाहतात.

ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्रामध्ये हे इरवाडी, पश्‍चिम किनाऱ्‍यापासून त्या खंडाच्या वरपर्यंत आणि खाली पूर्वेच्या किनाऱ्‍यापर्यंत सापडतात. सहसा त्यांचे ६ हून कमी पण कधीकधी तर १५ जणांचे थवे दिसतात. आपल्या आशियाई भाईबंदांप्रमाणे, ऑस्ट्रेलियातील हे प्राणी पाण्याच्या कारंज्यांसारखे फवारे मारतात असे मानले जात नाही.

तो डॉल्फिनच आहे का?

इरवाडी हे जमिनीजवळ असतात आणि नितळ पाण्यातील आपल्या खेळकर भाईबंदांच्या तुलनेने ते सावकाश पोहतात. तरीही, शास्त्रज्ञांना त्यांचा अभ्यास करण्यास जड गेले आहे. त्याचे एक कारण म्हणजे त्यांचा नको वाटणारा परिसर. तथापि, इंडोनेशियात जाकार्ता येथील जया आन्कोल ओशिनेरियममध्ये जिवंत इरवाडींचा अभ्यास करण्यात आला आहे.

इरवाडींविषयी इतकी कमी माहिती असल्यामुळे, अगदी अलीकडच्या काळापर्यंत देवमासा-डॉल्फिन यांच्या कुलात ते कुठे मोडतात याची शास्त्रज्ञांना निश्‍चित माहिती नव्हती. स्पष्टतः, डॉल्फिनशी त्यांचे बरेच साम्य आहे. तरीही, रंगाप्रमाणे (त्यांचा रंग फिकट ते गडद करडा असतो) नव्हे तर, आकाराप्रमाणे कोणीही त्यांना सहजपणे आर्क्टिक बेलुगा देवमासा किंवा पांढरा देवमासा समजू शकते. त्यांची असाधारण लवचीक मानही बेलुगासारखीच असते. मग ते आहेत तरी काय—बेलुगाची विषुववृत्तीय नक्कल की खरा डॉल्फिन?

त्यांच्या अनेक शारीरिक आणि जननिक वैशिष्ट्ये घेऊन कोणत्या गटाशी त्यांचे साम्य अधिक आहे ते पाहणे, हा झाला एक मार्ग. डॉल्फिनच्या गटाशीच हा पुरावा जास्त मिळतो असे दिसते.

ठाऊक असलेली थोडीफार माहिती

जन्माच्या वेळी इरवाडींची पिल्ले एक मीटरपेक्षा जरा कमी असून १२ किलोग्रॅम इतक्या वजनाची असतात. नरांची लांबी २.७५ मीटर तर माद्यांची लांबी त्यांच्यापेक्षा जरा कमी असते. त्यांची आयुर्मर्यादा २८ वर्षे इतकी असते.

मृत इरवाडींच्या पोटातून घेतलेल्या नमुन्यांवरून स्क्विड, कोळंबी, झिंगे आणि मासे—विशेषतः तळातले मासे हे त्यांचे भक्ष्य असल्याचे आढळले आहे. काही शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, आशियाई डॉल्फिनच्या तोंडाने फवारे उडवण्याच्या विलक्षण सवयीमुळे गढूळ पाण्यात आपले अन्‍न शोधायला त्यांना मदत होत असावी.

इतर डॉल्फिनप्रमाणे, इरवाडी विशिष्ट प्रकारचे आवाज काढतात. म्युझियम ऑफ ट्रॉपिकल क्वीन्सलंडच्या डॉ. पीटर आर्नल्डने सावध राहाला! सांगितले की, “जया आन्कोल ओशिनेरियम येथील संशोधनानुसार, इरवाडी डॉल्फिन इतर डॉल्फिनप्रमाणेच आपल्या आवाजाच्या प्रतिध्वनीकरवी भक्ष्य शोधत असावेत.”

त्याचे भविष्य आहे का?

जगामध्ये किती इरवाडी आहेत याची शास्त्रज्ञांना काही कल्पना नाही. परंतु, ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत ही चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. आग्नेय आशियातील काही भागांमध्ये, त्यांची संख्या कमी होत आहे आणि इतर भागांमध्ये तर ते नजरेसच पडत नाहीत.

बहुधा लाकडे वाहून नेण्याची क्रिया आणि त्यासोबतच नद्यांमध्ये होणारे प्रदूषण आणि गाळ हे त्यासाठी कारणीभूत ठरतात. ऑस्ट्रेलियात, इरवाडींच्या अधिकतर क्षेत्रात तुलनेने मानवांचे इतके वास्तव्य नाही. परंतु, पूर्व किनाऱ्‍याच्या जास्त आकर्षक भागांमध्ये, शहरीकरण आणि पर्यटनामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. काही इरवाडी मच्छीमारींच्या जाळ्यांमुळे तर काही किनाऱ्‍यांजवळ पोहणाऱ्‍यांच्या संरक्षणाकरता लावलेल्या शार्क माशांच्या जाळ्यांमुळे बुडून मरतात. इरवाडींच्या अन्‍नसाठ्याची प्रमाणापेक्षा अधिक मच्छीमारी केल्यानेही त्यांच्या संख्येवर परिणाम होतो.

परंतु, सर्वात मोठा संभवनीय धोका, नद्यांमध्ये आणि खाडींमध्ये मोठ्या प्रमाणात सोडल्या जाणाऱ्‍या दूषकांमुळे संभावू शकतो. सर्वात घातक दूषके, पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स (पीसीबी) यांसारखे कृत्रिम कार्बनी घटक आहेत जे वातावरणात तसेच राहतात. पीसीबींचा उपयोग इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्‌स, रंग, वंगण आणि लाकूड त्याचप्रमाणे धातूंसाठी वापरण्यात येणाऱ्‍या कोटिंगमध्ये व इतर उत्पादनांमध्ये केला जातो.

सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास, ऑस्ट्रेलियन निसर्ग संरक्षण एजेन्सी आपल्या द ॲक्शन प्लॅन फॉर ऑस्ट्रेलियन सिटेशियन्स या दस्तऐवजात म्हणते: “क्वीन्सलंड येथील [इरवाडी डॉल्फिनचे] बहुतांश क्षेत्र ग्रेट बॅरियर रीफ, मरीन पार्कच्या व्यवस्थापनाखाली येते; म्हणून क्वीन्सलंडच्या भागातील त्यांचे व्यवस्थापन करण्याची शक्यता चांगली आहे.”

उत्तम व्यवस्थापनाचे पुढील पाऊल म्हणून, ती एजेन्सी शिफारस करते की, हम्पबॅक व्हेल, सदर्न राईट व्हेल आणि बॉटल नोस्ड डॉल्फिन यांच्या जोडीला जनजागरूकता कार्यक्रमांमध्ये इरवाडींचा महत्त्वपूर्ण जात म्हणून समावेश केला जावा. यामध्ये इरवाडी डॉल्फिनचा—त्याचप्रमाणे आपलाही फायदा असेल.

[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]

फोटो: Courtesy Dr. Tony Preen

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा