कल्पनाही न करवणाऱ्या छळाची अस्त्रे
“बेड्या,” “छळ” व “मृत्यूदंड,” हे शब्द तुमचा थरकाप उडवतात का? युरोपमधील (१३ व्या आणि १९ व्या शतकांच्या दरम्यान) ख्रिस्ती धर्मातील न्यायमंडळाच्या आणि चेटकिणींच्या खटल्यांतील हजारो बळींसाठी हे एक विदारक सत्य होते. चित्रात दाखविलेली त्या काळची अस्त्रे, जर्मनीच्या ऱ्हाईन नदीवरील रूडेसहाइम वस्तूसंग्रहालयातील आहेत. ही अस्त्रे, बळींनी सोसलेल्या दुःखाची एक अंधूक झलक देऊन जातात.
उलटतपासणीसाठी अणकुचीदार काटे असलेली न्यायमंडळ खुर्ची यावर बिचाऱ्या बळीला वस्त्रहीन अवस्थेत बसविले जायचे तेव्हा त्याला असह्य वेदना व्हायच्या. गुडघ्याचे स्क्रू यांद्वारे बळीच्या हातांचे, पायांचे किंवा सांध्यांचे चिथडे व्हायचे अथवा ते निकामी केले जायचे. शरीराच्या चिंध्याचिंध्या करण्यासाठी मांजराचे पंजे याचा उपयोग केला जायचा; शरीराचा एकही भाग सोडला जात नव्हता. काटेरी गळपट्टी यामुळे बळीची मान, खांदे आणि जबडा हे सर्व सडायचे आणि मग त्वरित रक्ताची विषबाधा होऊन मृत्यू ओढवायचा.
पाखंड्यांची चौकशी करण्यासाठी रोमन कॅथलिक चर्चने नियुक्त केलेल्या लोकांनी विरोधकांसाठी—बहुधा धिक्कारलेले आणि ज्यांच्यावर छळाचे तंत्र वापरून जबरीने “कबुलीजबाब” उकलण्यात आला होता अशा सर्वसामान्य लोकांसाठी या आणि अशा इतर अस्त्रांचा उपयोग केला. खरे तर, वॉल्डनसेसचा समावेश असणाऱ्या पोपच्या न्यायमंडळाच्या काळादरम्यान छळास्त्रांवर पवित्र पाणीही शिंपडले जायचे.
या न्यायमंडळासाठी ख्रिस्ती धर्मजगत मोठ्या प्रमाणात दोषी आहे. इतिहासकार वॉल्टर निग स्पष्टीकरण देतात: “न्यायमंडळाच्या काळादरम्यान ख्रिस्ती धर्मजगताने केलेल्या पातकांची ते उघडउघड आणि पूर्ण कबुली देत नाही व धर्मासंबंधित हिंसाचाराच्या हरएक प्रकाराचा मनापासून आणि बिनशर्तपणे त्याग करीत नाही, तोपर्यंत ते पुढे कोणतेही आशीर्वाद अनुभवणार नाही.”
[३१ पानांवरील चित्र]
न्यायमंडळ खुर्ची
गुडघ्याचे स्क्रू
काटेरी गळपट्टी
मांजराचे पंजे
[चित्राचे श्रेय]
सर्व चित्रे: Mittelalterliches Foltermuseum Rüdesheim/Rhein