“पाखंड्याची” न्यायचौकशी आणि शिक्षा
इटलीमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
त्या भयाण न्यायालयाच्या एका बाजूला न्यायाधीशांचं उंच, रूबाबदार आसन असे. आसनाच्या मध्यभागी अध्यक्षाच्या जागेवर गर्द रंगाच्या कापडाचं छत असून त्यावर एक उंच लाकडी क्रूस असे. अगदी समोर आरोपीचा पिंजरा असे.
भीषण कॅथलिक न्यायमंडळाच्या न्यायालयांचं वर्णन अशाचप्रकारे केलं जात होतं. या दुर्दैवी आरोपींवर “पाखंडी” असण्याचा भयंकर आळ असायचा; “पाखंडी” म्हणताच छळ आणि खांबावर जाळून शिक्षा देण्याचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. न्यायमंडळ (इन्क्वीरो, अर्थात “चौकशी करणं” या लॅटिन क्रियापदातून आलेला), पाखंडीपणाचा म्हणजेच कर्मठ रोमन कॅथलिक शिकवणींशी सुसंगत नसलेली मतं किंवा शिकवणींचा नायनाट करण्यासाठी स्थापित केलेलं चर्चचं एक विशिष्ट न्यायालय होतं.
कॅथलिक माहीतगारांनुसार, हे न्यायमंडळ टप्प्याटप्प्यांनी स्थापन करण्यात आलं. पोप तिसरा लुशियस यांनी ११८४ मध्ये वेरोनोच्या न्यायसभेत न्यायमंडळाची स्थापना केली आणि त्याच्या व्यवस्थेत आणि कार्यपद्धतीत इतर पोपनी सुधार केला—त्या भीषण व्यवस्थेचं वर्णन करण्यास हा शब्द उचित असेल का ही शंकाच आहे. तेराव्या शतकात, पोप नववा ग्रेगरी यांनी युरोपच्या विविध भागांत चौकशी न्यायालयं स्थापिली.
फर्डिनँड आणि इझाबेला या शासकांच्या विनंतीवरून पोप चौथा सिक्टस यांनी आज्ञापत्र देऊन १४७८ मध्ये कुप्रसिद्ध स्पॅनिश इन्क्विझिशनची स्थापना केली. मॅरानो अर्थात छळ चुकवण्यासाठी कॅथलिक धर्मामध्ये मतांतर केल्याचं ढोंग केलेले यहुदी; मोरिस्को अर्थात त्याच कारणासाठी कॅथलिक धर्म स्वीकारलेले इस्लामी अनुयायी; आणि स्पॅनिश पाखंडी यांचा विरोध करण्यासाठी ते स्थापलं होतं. आपल्या धर्मवेड्या आवेशामुळं स्पेनचा मुख्य चौकशीकर्ता टोमॉस द टोर्कीमाडा हा डोमिनिकन मठवासी न्यायमंडळातील उग्र प्रकारांचं प्रतीक बनला.
सन १५४२ मध्ये, पोप तिसरा पौल यांनी रोमन इन्क्विझिशन स्थापिलं ज्याचा सबंध कॅथलिक विश्वावर न्यायाधिकार होता. त्यांनी सहा कार्डिनल्सचं काँग्रीगेशन ऑफ द होली रोमन ॲण्ड युनिव्हर्सल इन्क्विझिशन या नावाचं केंद्रीय न्यायालय स्थापलं; हे धर्मोपदेशकांचं एक मंडळ असून ते “सबंध रोमला भीतीने ग्रासून टाकणारे दहशतीचे सरकार” बनलं. (डिट्स्योनॉऱ्यो इन्सीक्लोपेडिको इटॉल्यानो) कॅथलिक न्यायसभेचं जिथं वर्चस्व होतं त्या प्रदेशांमध्ये पाखंड्यांना शिक्षा देण्याविषयी दहशत होती.
चौकशी आणि ऑटो-डा-फे
पाखंडीपणाचा आरोप असलेल्यांकडून कबुली करवून घेण्याकरता चौकशी करणारे त्याचा छळ करत हे इतिहासानं सिद्ध केलंय. न्यायमंडळावरील दोष कमी करण्यासाठी कॅथलिक टीकाकारांनी लिहिलं आहे, की त्यावेळी मुलकी न्यायालयातही छळ सर्रासपणे केला जात होता. पण म्हणून, ख्रिस्ताचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणाऱ्या सेवकांच्या या कार्याला सबब मिळते का? ख्रिस्तानं आपल्या शत्रूंना दाखवलेली दया त्यांनी दाखवायला नको होती का? वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आपण एका साध्यासोप्या प्रश्नाचा विचार करू या: आपल्या शिकवणुकींशी सहमत नसलेल्यांचा ख्रिस्तानं छळ केला असता का? येशू म्हणाला: “तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीति करा; जे तुमचा द्वेष करितात त्यांचे बरे करा.”—लूक ६:२७.
न्यायमंडळ आरोपीला न्याय देण्याची हमी देत नव्हतं. व्यवहारात, चौकशी करणाऱ्याला संपूर्ण अधिकार होता. “शंका, आरोप किंवा केवळ अफवा कानावर पडली तरीही चौकशी करणारा एखाद्या व्यक्तीला त्याच्यासमोर उभा करत असे.” (इन्सीक्लोपेडीया काटोलीका) इटालो मिरॉय, हा कायदे-इतिहासकार या वास्तविकतेस पुष्टी देतो की, रोमन लोकांनी स्थापलेली प्राचीन दोषारोप व्यवस्था सोडून कॅथलिक धर्मोपदेशकांनीच न्याय देण्यासाठी न्यायमंडळ व्यवस्था निर्माण केली आणि ती अंमलात आणली. रोमन कायद्यानुसार आरोप ठेवणाऱ्याला तो आरोप सिद्ध करावा लागत होता. कोणतीही शंका असल्यास, एखाद्या निर्दोष व्यक्तीला शिक्षा देण्याचा धोका पत्करण्याऐवजी त्याला दोषमुक्त करणं योग्य मानलं जात असे. शंका असल्यामुळं दोषी असल्याचं गृहीत धरलं जातं ही कल्पना बाळगून कॅथलिक धर्मोपदेशकांनी हे कायदेशीर तत्त्व बदललं आणि म्हणून आरोपीलाच आपला निर्दोषपणा सिद्ध करावा लागत होता. साक्षीदारांची (माहिती देणाऱ्यांची) नावे गुप्त ठेवली जात असत, आणि आरोपीचा कोणी वकील असल्यास त्यानं जर का तथाकथित पाखंड्याची बाजू साफ मांडली तर बदनामी होण्याचा आणि आपले पद गमावण्याचा त्याला धोका होता. इन्सीक्लोपेडीया काटोलीका हे मान्य करतं की परिणामस्वरूप, “आरोपी पूर्णतः असहाय होते. अशा परिस्थितीत वकील आरोपींना फक्त दोष पदरी घेण्याचा सल्ला देऊ शकत होते!”
ही चौकशी ऑटो-डा-फेने समाप्त होत असे; ही एक पोर्तुगीज अभिव्यक्ती असून तिचा “विश्वासाचं कृत्य” असा अर्थ होतो. ते होतं तरी काय? त्याकाळच्या कलाकृतीवरून प्रत्ययास येतं, की पाखंडी असल्याचा आरोप असलेल्या दुर्दैवी व्यक्ती एका भीषण प्रकाराला बळी पडत असत. दोषारोप वाचून दाखवल्यावर, “दोषी आणि पश्चात्तापी पाखंड्यांनी जाहीररीत्या केलेल्या प्रायश्चित्ताचं कृत्य” असं ऑटो-डा-फेचं वर्णन डिट्स्योनॉरियो इक्लेसिआस्टीकोमध्ये करण्यात आलं आहे.
पाखंड्यांना दोषी ठरवणं आणि त्यांना शिक्षा ठोठावणं लांबणीवर टाकलं जायचं जेणेकरून पुष्कळांना जमा करून वर्षातून दोनदा किंवा त्याहूनही अधिक वेळा एकच भीषण दृश्य होत असे. बघ्यांच्या समोरून पाखंड्यांची भली मोठी मिरवणूक काढली जात; तिथं जमा झालेले बघे भयभीत होत आणि त्यांना दुसऱ्यांचा अत्याचार पाहण्यात एक विकृत प्रकारचं आकर्षणही वाटत असे. आरोपींना, एका मोठ्या चौकाच्या मध्यभागी उभारलेल्या परांचीवर चढवलं जात आणि मग त्यांच्या शिक्षा सुनावण्यात येत. जे आपली चूक कबूल करायचे अर्थात पाखंडी शिकवणुकींचा त्याग करायचे ते बहिष्कृत लोकांना देण्यात येणाऱ्या दंडापासून वाचत आणि त्याउलट त्यांना विविध शिक्षा, जन्मठेपेचीही शिक्षा देण्यात येत असे. जे आपली चूक कबूल करत नव्हते पण शेवटल्या क्षणी पाळकाजवळ पश्चात्ताप व्यक्त करायचे त्यांना मुलकी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून गळा दाबून, फाशी देऊन अथवा शिरच्छेद करून ठार मारलं जाई आणि मग जाळण्यात येई. अपश्चात्तापी लोकांना जिवंत जाळण्यात येई. हा न्यायदंड काही काळानंतर दुसऱ्या एका जाहीर दृश्यानंतर पार पाडला जात असे.
रोमन इन्क्विझिशनचे सर्व व्यवहार कमालीच्या गुप्ततेत ठेवले जात. आजही, विद्वानांना जुन्या अहवालांची तपासणी करण्याची अनुमती नाही. तथापि, अथक संशोधनानंतर पुष्कळ रोमन न्यायालयांची चौकशी कागदपत्रं हाती लागली आहेत. ही कागदपत्रं काय प्रकट करतात?
एका धर्मोपदेशकाची चौकशी
सोळाव्या शतकाच्या सुरवातीला फ्लोरेन्स इथं जन्म झालेल्या पायत्रो कारनेसेक्कीनं पोप सातवा क्लेमेंट यांच्या न्यायसभेत धर्मोपदेशकाच्या कारकीर्दीत जलद प्रगती केली आणि मग त्यानं त्याला आपला व्यक्तिगत सचिव म्हणून नेमलं. तथापि, पोपचा मृत्यू घडल्यानंतर कारनेसेक्की यांच्या कारकीर्दीत आकस्मिकपणे खंड पडला. नंतर, श्रेष्ठ पद असलेल्या लोकांशी आणि पाळकांशी त्याची ओळख झाली ज्यांनी त्याच्याप्रमाणेच प्रॉटेस्टंट धर्मसुधारणेनं शिकवलेल्या अनेक शिकवणुकी स्वीकारल्या. परिणामस्वरूप, तीन वेळा त्याची चौकशी घेण्यात आली. मृत्यूदंड ठोठावून त्याचा शिरच्छेद करून त्याचं शरीर जाळण्यात आलं.
कारनेसेक्कीचं कैदेतील जीवन, क्षणाक्षणाला मृत्यूचा अनुभव घेत असल्यासारखं होतं असं टीकाकारांनी वर्णन केलं आहे. त्याच्या प्रतिकाराची खच्ची करण्यासाठी त्याचा छळ करण्यात आला आणि उपासमार करण्यात आली. सप्टेंबर २१, १५६७ साली त्याचा ऑटो-डा-फेचा गंभीर प्रसंग, रोममधील जवळजवळ सर्व कार्डिनल्सच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला. परांचीवर उभं असताना कारनेसेक्कीला त्याची शिक्षा लोकांसमोर सुनावण्यात आली. विधीपूर्वक मंत्रोच्चार आणि पाखंड्याची ‘शिक्षा कमी करण्यासाठी व मृत्यूदंड दिला जाऊ नये किंवा क्रूर छळ केला जाऊ नये’ म्हणून त्याला ज्या मुलकी न्यायालयाच्या सदस्यांच्या हाती सोपवले जायचे त्यांच्याकडे याचना करून हा विधी समाप्त करण्यात आला. हा अत्यंत दांभिकपणा नव्हता का? चौकशी करणाऱ्यांना पाखंड्यांचा नायनाट करायचा होता, पण तरीही मुलकी अधिकाऱ्यांना जणू दया दाखवण्याची विनंती करण्याचं ढोंग करून ते स्वतः अंग चोरून दुसऱ्यांवर रक्तदोष ढकलत होते. कारनेसेक्कीची शिक्षा सुनावल्यावर त्याला सॅनबेनिटो—पश्चात्तापी व्यक्तीसाठी लाल फुलींनी रंगवलेलं पिवळ्या किंवा अपश्चात्तापी व्यक्तीसाठी ज्वाला आणि सैतानाचं चित्र असलेल्या काळ्या गोणपाटाचा अंगरखा चढवण्यात आला. दहा दिवसांनंतर त्याला शिक्षा देण्यात आली.
या माजी पोपच्या सचिवावर पाखंडी असल्याचा आरोप का होता? गेल्या शतकाच्या शेवटी, त्याच्या चौकशीचा मिळालेला अहवाल दाखवतो की, त्यानं ज्या शिकवणुकींवर वाद केला त्याला अनुलक्षून त्याच्यावर ३४ आरोप होते. त्यामध्ये, परगेटरी, पाळक आणि नन्सचे ब्रह्मचर्य, द्रव्यांतरीभवन, दृढीकरण, पापाची कबुली, विशिष्ट खाद्यपदार्थ वर्ज्य करणे, अनुज्ञा, “संतांना” प्रार्थना करणं यावरील शिकवणुकी सामील होत्या. आठवा आरोप सर्वात रोचक आहे. (पृष्ठ २७ वरील पेटी पाहा.) “पवित्र शास्त्रवचनांमध्ये असलेलं देवाचं वचन” केवळ यावरच विश्वास ठेवला पाहिजे असं मान्य करणाऱ्यांना मृत्यूदंड देऊन न्यायमंडळानं साफ प्रकट केलं की, कॅथलिक चर्च, पवित्र बायबल हे एकमेव ईश्वरप्रेरित पुस्तक असल्याचं मानत नव्हतं. यास्तव, चर्चमधील अनेक शिकवणुकी शास्त्रवचनांवर आधारित नसून चर्चच्या परंपरेवर आधारित आहेत यात काही नवल नाही.
तरुण विद्यार्थ्याला शिक्षा
सन १५३१ मध्ये नेपल्स इथं जन्मलेल्या पोमपॉन्यो ऑलज्येरीची संक्षिप्त आणि स्पर्शून जाणारी जीवनकथा प्रसिद्ध नसली, तरीही अनेक विद्वानांच्या अविरत ऐतिहासिक संशोधनांमुळे ती अज्ञात इतिहासातून उदयास आली आहे. पॅडुआ विद्यापीठात अभ्यास करत असताना, युरोपच्या विविध भागांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी परिचय झाल्यामुळं पाखंडी म्हटल्या जाणाऱ्या लोकांच्या आणि प्रॉटेस्टंट धर्मसुधारणेच्या शिकवणुकींच्या तो संपर्कात आला. शास्त्रवचनांबद्दल त्याची रुची अधिकच वाढली.
बायबलशिवाय इतर कोणतंही पुस्तक ईश्वरप्रेरित नाही असा विश्वास तो बाळगू लागला आणि म्हणून पापाची कबुली, दृढीकरण, परगेटरी, द्रव्यांतरीभवन, आणि “संतांसाठी” प्रार्थना करणं त्याचप्रमाणे पोप हा ख्रिस्ताचा प्रतिनिधी आहे अशा अनेक कॅथलिक शिकवणुकी त्यानं त्यागल्या.
पॅडुआ इथं ऑलज्येरीला अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. त्यानं आपली चौकशी करणाऱ्यांना म्हटलं: “मी स्वेच्छेनं तुरुंगात जाईन, इतकंच काय तर देवाची इच्छा असल्यास मी मरण देखील पत्करीन. आपल्या वैभवानं देव प्रत्येकाला आणखीनच प्रबोधित करील. मी हर तऱ्हेचा छळ सहन करीन कारण पीडितांना संपूर्णतः सांत्वन देणारा ख्रिस्त हाच माझं प्रबोधन आणि खरा प्रकाश आहे आणि तो अज्ञान दूर करण्यास समर्थ आहे.” त्यानंतर, रोमन इन्क्विझिशननं त्याला परदेशातून आणून मृत्यूदंड जाहीर केला.
ऑलज्येरी मरण पावला तेव्हा तो २५ वर्षांचा होता. ज्या दिवशी त्याला रोममध्ये मारण्यात आलं, त्यावेळी त्यानं पापाची कबुली देण्यास आणि द्राक्षारस व भाकरी घेण्यास साफ नकार दिला. त्याला ठार मारण्याची पद्धत एरवीपेक्षा अधिकच क्रूर होती. खांबाखालची लाकडं पेटवून त्याला जाळण्यात आलं नाही. त्याउलट, ज्वलनशील पदार्थांनी—तेल, डांबर आणि राळ यांनी—भरलेला एक मोठाच्या मोठा कटाह सर्वांच्या देखत परांचीवर ठेवण्यात आला. बांधलेल्या अवस्थेत या तरुणाला त्यात उतरवण्यात आलं आणि मग आग लावण्यात आली. त्याला हळूहळू जिवंत जाळण्यात आलं.
भयंकर दोषाचं आणखी एक कारण
न्यायमंडळानं मृत्यूदंड दिलेल्या कारनेसेक्की, ऑलज्येरी आणि इतरांना शास्त्रवचनांचं अर्धवट ज्ञान होतं. या व्यवस्थीकरणाच्या ‘अंतसमयामध्ये’ अजूनही “ज्ञानवृद्धि” व्हावयाची होती. तरीही, देवाच्या वचनातून प्राप्त केलेल्या जेमतेम ‘खऱ्या ज्ञानासाठीही’ त्यांची मरण्याची तयारी होती.—दानीएल १२:४.
प्रॉटेस्टंटांनी त्याचप्रमाणे त्यांच्या काही धर्मसुधारकांनीही, विद्रोहींना खांबावर जाळून त्यांचा नायनाट केला अथवा कॅथलिकांना मुलकी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवून ठार मारलं. उदाहरणार्थ, कॅल्विन, पाखंड्यांचा शिरच्छेद करायचा, तरीही मायकल सर्वेटसला त्यानं त्रैक्य-विरोधी पाखंडी म्हणून जिवंत जाळलं.
पाखंड्यांचा छळ आणि त्यांना शिक्षा देणं हे कॅथलिक त्याचप्रमाणे प्रॉटेस्टंट या दोन्हीही पंथात सर्रासपणे चालत असलं, तरीही त्यांच्या या कार्यांसाठी कोणतीही सबब देता येत नाही. पण, कत्तलींसाठी शास्त्रवचनीय कारण असल्याचा दावा केल्यामुळं, शिवाय स्वतः देवानं या कार्यवाही पार पाडण्याची आज्ञा दिल्यागत कार्य केल्यामुळं धर्मोपदेशकांवर अधिकच गंभीर जबाबदारी येते. यामुळं देवाचं नाव कलंकित होत नाही का? प्रसिद्ध कॅथलिक “चर्च पाळक,” ऑगस्टीन यांनी “धार्मिक” सक्तीच्या, अर्थात, पाखंडीपणाचा विरोध करण्यासाठी बळजबरीच्या तत्त्वाचं सर्वप्रथम समर्थन केलं. त्या चालीरीतीला बायबलचा आधार देण्यासाठी त्यांनी, “लोकांना आग्रह करून घेऊन ये” या लूक १४:१६-२४ मधील दाखल्यातले येशूचे शब्द दाखवले. स्पष्टतः, ऑगस्टीन यांनी विपर्यास केलेलं हे वचन क्रूर सक्तीला नव्हे तर उदार आदरातिथ्याला सूचित करत होतं.
परंतु, उल्लेखनीय गोष्ट अशी की, न्यायमंडळ कार्यशील असताना धार्मिक सहिष्णुतेच्या समर्थकांनी गहू आणि निदणांच्या दाखल्याकडं बोट दाखवून पाखंड्यांच्या छळाचा विरोध केला. (मत्तय १३:२४-३०, ३६-४३) त्यांपैकी, रोट्टरडॅम येथील डेसीडेऱ्यूस इरॅस्मस नामक व्यक्ती होता ज्याच्या मते शेतीच्या धन्यानं अर्थात देवानं पाखंडी म्हणजेच निदणही वाढू देण्यास सांगितलं होतं. तर दुसऱ्या बाजूला, मार्टिन ल्यूथरनं विद्रोही शेतकऱ्यांविरुद्ध हिंसा चेतवून परिणामी सुमारे १,००,००० जणांची हत्या घडवली.
तथाकथित पाखंड्यांचा छळ ज्यांनी चेतवला त्या ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मांची गंभीर जबाबदारी ओळखून, आपण काय करण्यास उद्युक्त व्हावं? निश्चितच, देवाच्या वचनातील खऱ्या ज्ञानाचा शोध आपण घेण्यास हवा. येशूनं म्हटलं की, खऱ्या ख्रिश्चनाचं ओळखचिन्ह म्हणजे देव आणि शेजाऱ्यावरचं प्रेम असेल—स्पष्टतः हे प्रेम हिंसेला अनुमती देणारं नसणार.—मत्तय २२:३७-४०; योहान १३:३४, ३५; १७:३.
[२७ पानांवरील चौकट]
कारनेसेक्कीला ज्यांवरून दोषी ठरवलं ते काही आरोप
८. “पवित्र शास्त्रवचनांमध्ये सांगितलेल्या देवाच्या वचनाशिवाय इतर कशावरही विश्वास ठेवू नये असे [तुझे ठाम मत आहे.]”
१२. “[तुझा असा विश्वास होता] की, कबुली देण्याचा संस्कार डे यूर डिविनो [ईश्वरी नियमानुसार] नाही, ख्रिस्ताने त्याची स्थापना केली नाही अथवा शास्त्रवचनांमध्ये त्यास पुरावा नाही किंवा देवाजवळ कबुली देण्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या कबुलीची गरज नाही.”
१५. “तू परगेटरीच्या शिकवणुकीवर शंका व्यक्त केलीस.”
१६. “मृतांसाठी ज्यात प्रार्थना आहेत ते मॅकबीझचे पुस्तक कल्पित असल्याचे तू मानले आहेस.”
[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]
The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck