कॅथरी लोक ते ख्रिस्ती हुतात्मे होते का?
“साऱ्यांनाच ठार मारा; त्याच्या लोकांना देव ओळखल्याशिवाय राहणार नाही.” सन १२०९ च्या उन्हाळ्यातील त्या दिवशी, दक्षिण फ्रान्समधील बिझायर्सच्या जनतेची कत्तल करण्यात आली. कॅथलिक धर्मयोद्ध्यांच्या अध्यक्षस्थानी पोपचा प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आलेला मठवासी, आरनॉल्ड आमाल्रिक याने अजिबात दयामाया दाखवली नाही. कॅथलिक लोक व पाखंडी यांमध्ये फरक कसा करावा हे त्याच्या लोकांनी त्याला विचारले असता, त्याने वर उद्धृत केलेले कुविख्यात उत्तर दिले असे वृत्त आहे. कॅथलिक इतिहासकार या उत्तराचे स्वरूप सौम्य करून असे मांडतात: “काळजी करू नका. पाखंड्यांतील फार कमी लोक धर्मांतरीत होतील असे मला वाटते.” त्याचे नेमके उत्तर काहीही असो, पण यामुळे कॅथलिक चर्चच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जवळजवळ ३,००,००० धर्मयोद्ध्यांच्या हातून घडली कमीतकमी २०,००० स्त्रीपुरुष व मुलांची कत्तल झाली.
हा नरसंहार घडवून आणण्यास काय कारणीभूत ठरले? दक्षिण-मध्य फ्रान्स येथील लँगडॉक प्रांतातील तथाकथित पाखंड्यांविरुद्ध पोप इनोसंट तिसरे यांनी पुकारलेल्या ॲल्बीजेन्सियन धर्मयुद्धाचा हा फक्त प्रारंभ होता. साधारण २० वर्षांनंतर ते संपुष्टात आले तोवर, अंदाजे दहा लाख लोक—कॅथरी, वॉल्डेन्स व अनेक कॅथलिकसुद्धा—मृत्युमुखी पडले होते.
मध्ययुगीन युरोपात तीव्र धार्मिक मतभेद
सा. यु. ११ व्या शतकात, उद्योगधंद्यात झालेल्या जलद वाढीमुळे मध्ययुगीन युरोपातील सामाजिक व आर्थिक प्रणालींत अमुलाग्र बदल घडून आले. कारागीर व व्यापारी यांच्याकरता जागेची सोय करण्यासाठी गावे निर्माण झाली यामुळे नवीन विचारांना वाव मिळाला. जेथे खासपणे उदारमतवादी व प्रगतीशील संस्कृती, युरोपात इतरत्र कोठेही नव्हती इतकी भरभराटीस आली, अशा लँगडॉकमध्ये तीव्र धार्मिक मतभेदाने मुळे धरली. लँगडॉकमधील टुलाऊस हे शहर युरोपातील सर्वाधिक समृद्ध महानगरांपैकी हे तिसरे होते. हे असे जग होते जेथे ट्रुबाडुअर्स उत्कर्ष पावले, ज्यांच्या काही गीतांत राजनैतिक व धार्मिक विषयांचा उल्लेख होता.
अकराव्या व बाराव्या शतकांतील धार्मिक परिस्थितीचे वर्णन करताना, रव्यू दीस्वॉर अ द फीलॉसोफी रेलेझ्यॉझ असे विधान करतो: “तत्पूर्वीच्या शतकाप्रमाणेच १२ व्या शतकातही पाळकवर्गाच्या नीतिमूल्यांवर, त्यांच्या ऐश्वर्यावर, त्यांच्या लाचखोरीवर तसेच त्यांच्या अनैतिकतेवर आक्षेप घेणे सुरूच राहिले, तथापि मुख्यतः त्यांची संपत्ती व सत्ता, प्रापंचिक अधिकाऱ्यांसोबत त्यांचे संगनमत व त्यांच्या हलकटपणावर टीका करण्यात येत होती.”
फिरते उपदेशक
विशेषतः दक्षिण फ्रान्स व उत्तर इटलीत विरोधक फिरत्या उपदेशकांच्या वाढत्या संख्येला, चर्चमध्ये माजलेला भ्रष्टाचार जबाबदार आहे हे पोप इनोसंट तिसरे यांनी सुद्धा ओळखले. यांतील बहुतेक, कॅथरी नाही तर वॉल्डेन्स लोक होते. “मुलांना भाकरीची गरज आहे जी देण्यास तुम्ही हयगय करता,” असे म्हणून लोकांना उपदेश न करण्याबद्दल त्यांनी पाळकांची खरडपट्टी काढली. तथापि, लोकांसाठी बायबल शिक्षणास चालना देण्याऐवजी इनोसंटने, “ईश्वरी शास्त्रवचन इतके गहन आहे की साधेभोळे व निरक्षरच काय तर जाणकार व विद्वानही ते समजण्याचा प्रयत्न करण्यास पूर्णपणे समर्थ नाहीत असा दावा केला.” पाळकवर्गाशिवाय बायबलचे वाचन इतर सर्वांकरता निषिद्ध होते व ते केवळ लॅटिन भाषेतच वाचण्याची परवानगी होती.
विरोधकांच्या उपदेश कार्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पोपने फ्रायर उपदेशक किंवा डॉमिनिकन यांच्या वर्गाच्या स्थापनेला स्वीकृती दिली. धनाढ्य कॅथलिक पाळकवर्गाच्या अगदी विपरित, या फ्रायरांना दक्षिण फ्रान्समधील ‘पाखंड्यांविरुद्ध’ कॅथलिक कर्मठवादाचा बचाव करण्यास नेमण्यात आलेले प्रवासी उपदेशक व्हावयाचे होते.
कॅथरी लोकांसोबत बोलणी करून त्यांना कॅथलिक समुदायात परत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोपने आपले प्रतिनिधी सुद्धा पाठवले. हे प्रयास निष्फळ ठरल्यामुळे व बहुधा एका पाखंड्याने केलेल्या त्याच्या प्रतिनिधीच्या हत्येमुळे इनोसंट तिसरे यांनी, १२०९ मध्ये ॲल्बीजेन्सीयन धर्मयुद्धाचा हुकूम दिला. ॲल्बी अशा गावांपैकी एक होते जेथे कॅथरी लोकांची संख्या विशेषतः अधिक होती, म्हणूनच चर्च इतिहासकार कॅथरी लोकांचा उल्लेख करताना तसेच वॉल्डेन्स लोकांसहित त्या भागातील सर्व “पाखंड्यांना” संबोधण्यासाठी ॲल्बीजेन्स लोक (फ्रेंच, ॲल्बीज्यॉइस) याच संज्ञेचा वापर करतात. (खालील चौकोन पाहा.)
कॅथरी लोक कोण होते?
“कॅथॉर” हा शब्द “कॅ·थ·रॉसʹ” या ग्रीक शब्दातून आलेला असून त्याचा अर्थ “शुद्ध” असा आहे. ११ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत कॅथॉरवाद विशेषतः उत्तर इटलीत असलेल्या लोम्बार्डी व लँगडॉकमध्ये पसरला. कॅथॉर लोकांचे विश्वास पौर्वात्य द्वैतवाद व ज्ञेयवादाचे मिश्रण होते जे बहुधा त्यांना परदेशी व्यापारी व मिशनऱ्यांकडून मिळाले होते. द एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलीजन, कॅथॉर द्वैतवादाची व्याख्या, “दोन तत्त्वांवरील विश्वास असे करते. पहिले म्हणजे, जे काही आत्मिक आहे त्यावर नियंत्रण करणारे चांगले व दुसरे मानवी शरीराला समाविष्ट करणाऱ्या भौतिक जगाबद्दल जबाबदार असलेले वाईट.” कॅथरी लोकांचा असा विश्वास होता की, सैतानाने भौतिक जग सृष्ट केले व ते निश्चितपणे नाशास पात्र ठरवण्यात आले होते. या वाईट, भौतिक जगापासून बचावणे ही त्यांची आशा होती.
कॅथरी लोकांचे दोन वर्ग होते, परिपूर्ण व विश्वासी. परिपूर्ण श्रेणीतील लोकांना कंसोलमेंटम म्हटलेल्या आध्यात्मिक बाप्तिस्म्याच्या विधीकरवी दीक्षा देण्यात येत असे. हा विधी एक वर्षाच्या परीक्षाकालानंतर हात ठेवून पार पाडण्यात येत होता. हा संस्कारविधी उमेदवारास सैतानाच्या आधिपत्यातून मुक्ती देईल, सर्व पातकांपासून शुद्ध करील व पवित्र आत्मा देईल असा समज होता. यामुळेच “परिपूर्ण” हे संबोधन अस्तित्वात आले, जे विश्वासी या श्रेणीतील लोकांच्या धर्मोपदेशकांची भूमिका पार पाडणाऱ्या श्रेष्ठ लोकांच्या सापेक्षतः लहान गटासाठी वापरण्यात येत असे. परिपूर्ण श्रेणीतील लोक, संयमन, पवित्रता व दारिद्र्याचे व्रत घेत. विवाहित असल्यास परिपूर्ण श्रेणीतील व्यक्तीस तिच्या किंवा त्याच्या विवाहसोबत्याचा त्याग करावा लागत असे कारण लैंगिक संभोग हे मूळ पाप होते असा कॅथरी लोकांचा विश्वास होता.
विश्वासी, हे अशा प्रकारचे व्यक्ती होते ज्यांनी वैराग्य न पत्करता कॅथॉर शिकवणुकी स्वीकारल्या. मेल्योरॉमेंटम नामक विधी अंतर्गत, विश्वासी वर्गातील व्यक्ती, परिपूर्ण यांच्या सन्मानार्थ गुडघे टेकून क्षमा व आशीर्वाद मिळावा अशी याचना करत असे. स्वतःस सामान्य जीवन व्यतीत करण्यास समर्थ करण्यासाठी, विश्वासी परिपूर्ण यांच्यासोबत कॉनवेनेन्सॉ किंवा करार करत, ज्याकरवी त्यांना मृत्युशय्येवर आत्मिक बाप्तिस्मा किंवा कंसोलमेंटम मिळण्याची सोय होत असे.
बायबलच्या प्रती असलेली मनोवृत्ती
कॅथरी लोक मोठ्या प्रमाणावर बायबलची वचने उद्धृत करत होते तरीसुद्धा ते त्यास प्रामुख्याने गोष्टी व बोधकथांचे पुस्तक या दृष्टीने पाहत होते. इब्री शास्त्रवचनांतील अधिकांश भाग सैतानाकडून आहे असे ते समजत होते. त्यांच्या द्वैतवादी तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी ग्रीक शास्त्रवचनांचे काही भाग उपयोगात आणले. उदाहरणार्थ, देह हा आत्म्याच्या अगदी विरुद्धतेत आहे हे दाखवणारी वचने त्यांनी वापरली. तसेच, त्यांच्या दृष्टीने भौतिक भाकर अगत्याची असून देखील अपकारक असल्यामुळे त्यांनी प्रभूच्या प्रार्थनेत, “आमची रोजची भाकर” याऐवजी “आमची अलौकिक भाकर”, (अर्थात “आत्मिक भाकर”) मिळावी यासाठी प्रार्थना केली.
अनेक कॅथॉर शिकवणुकी बायबलच्या प्रत्यक्षपणे विरोधात होत्या. उदाहरण द्यायचे झाल्यास, ते जीवाचे अमरत्व व पुनर्जन्मावर विश्वास ठेवत होते. (पडताळा उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४, २०.) त्यांच्या विश्वासांसाठी त्यांनी अप्रमाणित शास्त्रपाठांचा आधार देखील घेतला. तरीसुद्धा, कॅथरी लोकांनी जितक्या प्रमाणात शास्त्रवचनांचे भाग बोली भाषेत अनुवादित केले, त्याद्वारे त्यांनी काही अंशी, बायबल पुस्तकास मध्य युगात आणखी प्रचलित केले.
ख्रिस्ती नसलेले
परिपूर्ण श्रेणीतील लोक स्वतःस प्रेषितांचे रास्त उत्तराधिकारी समजत असल्यामुळे त्यांनी स्वतःस ख्रिस्ती संबोधले व त्यापुढे “खरे” किंवा “चांगले” जोडून ते यावर जोर दिला. परंतु वस्तुतः, अनेक कॅथॉर विश्वास ख्रिस्ती धर्माशी असंबद्ध होते. कॅथरी लोकांनी येशूला देवाचा पुत्र म्हणून ओळखले असले तरीही, तो मानवी शरीर धारण करून आल्याचे व मुक्ती देणाऱ्या त्याच्या यज्ञार्पणास त्यांनी नाकारले. बायबलने देह व जगाचा केलेल्या धिक्काराचा अयोग्य अर्थ लावून ते असे समजत होते की सर्वच भौतिक वस्तूंचा उगम वाईट आहे. याच कारणास्तव, येशूला केवळ आत्मिक देह असणे शक्य होते व तो पृथ्वीवर असताना त्याचा भौतिक देह केवळ भास होता असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रथम-शतकातील धर्मत्यागी लोकांप्रमाणे, कॅथरी लोक देखील ‘देहाने येणाऱ्या येशू ख्रिस्ताला कबूल न करणारे’ होते.—२ योहान ७.
एम. डी. लॅम्बर्ट यांनी आपल्या मध्ययुगीन पाखंड (इंग्रजी) या पुस्तकात लिहिले की कॅथॉरवादाने “ख्रिस्ती नीतिमत्त्वाच्या जागी आवश्यक वैराग्य आणले, . . . [ख्रिस्ताच्या मृत्यूत] तारण करण्याचे सामर्थ्य असल्याचे नाकारून त्याने मुक्तीस झिडकारले.” त्यांच्या विचारात “परिपूर्ण श्रेणीतील लोकांचा खरा निकटसंबंध पूर्वेकडील वैरागी गुरू, चीन किंवा भारतातील बौद्ध भिक्षुक व फकीर, ऑर्फिक रहस्यांचे विशेषज्ञ किंवा ज्ञेयवादाचे गुरू,” यांसोबत होता. कॅथॉर विश्वासानुसार तारण, येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणावर नव्हे तर कंसोलमेंटम किंवा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा यावर अवलंबून होते. अशा प्रकारे शुद्ध करण्यात आलेल्यांना भौतिक वस्तूंपासून मृत्यू सुटका मिळवून देईल.
अपवित्र धर्मयुद्ध
पाळकवर्गाच्या अवाजवी मागण्या व सर्वत्र होणाऱ्या अवनतीला कंटाळून गेलेले सामान्य लोक कॅथरी लोकांच्या जीवनशैलीने आकर्षिले गेले. परिपूर्ण श्रेणीतील लोक, कॅथलिक चर्च व त्याच्या परंपरागत अधिकारास प्रकटीकरण ३:९ व १७:५ मधील ‘सैतानाची सभा’ व ‘कलावंतिणींची आई’ समजत होते. दक्षिण फ्रान्समध्ये कॅथॉरवाद उत्कर्ष पावत व चर्चची जागा घेत होते. याला पोप इनसंट तृतीय यांचे प्रत्युत्तर म्हणजे तथाकथित ॲल्बीजेन्सियन धर्मयुद्धाची सुरवात व त्यास आर्थिक साहाय्य करणे ही होती; हे पहिलेच धर्मयुद्ध होते जे ख्रिस्ती धर्मजगतात ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्यांविरुद्ध पुकारण्यात आले होते.
पोप यांनी युरोपातील राजे, सरदार, ड्युक व नाइट यांना पत्र आणि प्रतिनिधी पाठवून जेरीस आणले. “खऱ्याखोट्या मार्गाने” का होइना पण जे कोणी पाखंडाला दडपून टाकण्यास झटतील त्या सर्वांना पापमोचन व लँगडॉकचे वैभव देऊ करण्याचे त्यांनी कबूल केले. त्यांचे आव्हान व्यर्थ गेले नाही. कॅथलिक धर्माधिकारी व मठवासियांच्या नेतृत्वाखाली उत्तरी फ्रान्स, फ्लँडर्स व जर्मनीतून धर्मयोद्ध्यांची एक मिश्रित सेना, ऱ्होन वॅलीतून दक्षिणेकडे निघाली.
बिझायर्सच्या नाशाने एका अशा विजयशाली युद्धाच्या आरंभास चिन्हांकित केले. ज्याने बेसुमार अग्निमय विध्वंस व रक्तरंजित कत्तलीने लँगडॉकला गिळंकृत केले. ॲल्बी, कॅरकासॉन्न, कॅस्ट्रेस, फॉइक्स, नार्बन, टर्म्स व टुलाउस सर्वच्या सर्व त्या रक्तपिपासू धर्मयोद्ध्यांकडून पराजित झाले. कासे, मीनर्व व लावॉर यासारख्या कॅथॉर बालेकिल्ल्यांत देखील परिपूर्ण श्रेणीतील शेकडो लोकांना वधस्तंभावर बांधून जाळण्यात आले. मठवासी-इतिहासकार पायर दे वो-द-सर्ने यांच्या मतानुसार धर्मयोद्धा या लोकांना जिवंत जाळताना मोठ्या आनंदात होते. सन १२२९ मध्ये २० वर्षे चाललेल्या संघर्ष व विध्वंसानंतर लँगडॉकवर फ्रान्सचे शासन आले. परंतु, कत्तल अजून संपलेली नव्हती.
इन्क्विझिशन प्राणघातक वार करते
सन १२३१ या वर्षी, नवव्या पोप ग्रेगरी यांनी सशस्त्र युद्धास आधार देण्यासाठी पोपच्या इन्क्विझिशनची स्थापना केली.a या इन्क्विझिशनची प्रणाली प्रथमत: दोषारोप व कारावास आणि नंतर, पद्धतशीर छळावर आधारित होती. तलवार ज्यास नाश करण्यात अपयशी ठरली त्यास उपटून टाकणे हे तिचे लक्ष्य होते. इन्क्विझिशनचे न्यायाधीश—जे बहुतेक डॉमिनिकन व फ्रांसिस्कन फ्रायर होते—केवळ पोपला जबाबदार होते. पाखंडासाठी अधिकृत शिक्षा जाळण्याद्वारे मृत्यू ही होती. धर्माधिकाऱ्यांची धर्मांधता व क्रूरता इतकी भयंकर होती की इतर स्थानांसहित ॲल्बी व टुलाउस येथे लोक बंड करून उठले. अविन्योने येथे, इन्क्विझिशन-न्यायालयाच्या सर्व सदस्यांची हत्या करण्यात आली.
सन १२४४ या वर्षी, परिपूर्ण श्रेणीतील अनेक लोकांचे शेवटचे आश्रयस्थान असलेले डोंगरावरील तटबंदी गाव माँट्सेग्योरचे शरणागत होणे, कॅथॉरवादासाठी जणू प्राणघातक वार ठरले. जवळजवळ २०० पुरुष व स्त्रिया एकाचवेळेस वधस्तंभावर मरण पावले. पुढील काही वर्षांत इन्क्विझिशनने उरलेल्या कॅथरी लोकांना शोधून काढले. लँगडॉक येथे १३३० या वर्षी शेवटचा कॅथॉर वधस्तंभावर जाळण्यात आला होता असे वृत्त आहे. मीडीवल हेरेसी पुस्तक म्हणते: “कॅथॉरवादाचे पतन म्हणजे इन्क्विझिशनची सर्वाधिक उल्लेखनीय उपलब्धी होती.”
कॅथरी लोक निश्चितच खरे ख्रिस्ती नव्हते. परंतु, केवळ कॅथलिक चर्चवर टीका केली म्हणून तथाकथित ख्रिस्ती लोकांनी त्यांचा असा क्रूर विनाश करावा हे न्याय्य होते का? त्यांचा छळ व कत्तल करणाऱ्या कॅथलिकांनी देव व ख्रिस्त यांचा अनादर केला व त्या लाखो विरोधकांची हत्या व छळ करून खऱ्या ख्रिस्ती धर्माचा घोर विपर्यास केला.
[२८ पानांवरील चौकट]
वॉल्डेन्स लोक
सा. यु. १२ व्या शतकाच्या शेवटास, पायर वॉल्डेस किंवा पीटर वॉल्डो नामक लायॉन्सच्या धनाड्य व्यापाऱ्याने, दक्षिण व दक्षिणपूर्व फ्रान्स येथे बोलल्या जाणाऱ्या प्रोवोन्सल भाषेच्या विविध स्थानीय बोली भाषांमध्ये बायबलच्या काही भागांच्या प्रथम भाषांतरास अर्थसाहाय्य केले. धर्मपरायण कॅथलिक असल्यामुळे त्याने आपला व्यवसाय त्यागला व शुभवर्तमानाच्या प्रचारासाठी स्वतःस वाहिले. भ्रष्ट पाळकवर्गाचा वीट येऊन इतर अनेक कॅथलिकांनीही त्यास अनुसरले व फिरते उपदेशक बनले.
लवकरच वॉल्डोला स्थानीय पाळकवर्गाकडून, विरोधाचा सामना करावा लागला. त्यांनी त्याच्या सार्वजनिक साक्षीकार्यावर निर्बंध आणण्यासाठी पोपचे मन वळवले होते. तेव्हा “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे”, हे त्याचे उत्तर होते असे वृत्त आहे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये ५:२९.) त्याच्या चिकाटीमुळे वॉल्डोला धर्मबाह्य करण्यात आले. वॉल्डेन्स लोक किंवा लायॉन्सची गरीब माणसे म्हणण्यात आलेले त्याचे अनुयायी, दोघे दोघे असे जोडीने, लोकांच्या घरी प्रचार करून त्याचे उदाहरण अनुसरण्यास आवेशाने झटले. याच्या परिणामस्वरूप, फ्रान्सच्या सबंध दक्षिण, पूर्व व उत्तरेच्या काही भागात तसेच उत्तर इटलीत त्यांच्या शिकवणुकी झपाट्याने पसरल्या.
मुख्यतः त्यांनी आरंभीच्या ख्रिस्ती धर्माचे विश्वास व रूढी यांकडे पुन्हा परतण्याचे समर्थन केले. इतर शिकवणुकींसह त्यांनी परगेटरी, मृतांसाठी प्रार्थना, मरियेची भक्ती, “संतांना” प्रार्थना, क्रुसाची आराधना, पापमोचन, अंतिम भोजसंस्कार व शिशुंचा बाप्तिस्मा यांचा निषेध केला.b
वॉल्डेन्स लोकांच्या शिकवणुकी व कॅथरी लोकांच्या गैर-ख्रिस्ती द्वैतवादी शिकवणुकी ज्यामध्येत पुष्कळदा गोंधळ केला जातो त्या एकमेकांच्या फार विरोधात होत्या. हा गोंधळ प्रामुख्याने कॅथलिक विवादींमुळे आहे ज्यांनी जाणूनबुजून वॉल्डेन्स प्रचार ॲल्बीजेन्स किंवा कॅथरी लोकांच्या शिकवणुकी सारखेच असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
[तळटीपा]
a मध्ययुगीन इन्क्विझिशनबद्दल अधिक तपशीलासाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क इंका., द्वारे प्रकाशित अवेक! एप्रिल २२, १९८६ च्या अंकात, पृष्ठे २०-३ वर “भयंकर इन्क्विझिशन” हा लेख पाहा.
b वॉल्डेन्स लोकांबद्दल अधिक माहितीसाठी, द वॉचटावर च्या ऑगस्ट १, १९८१, अंकातील पृष्ठे १२-१५ वरील “वॉल्डेन्स लोक—पाखंडी वा सत्यशोधक?” हा लेख पाहा.
[२९ पानांवरील चित्रं]
जेथे २०,००० पुरुष, स्त्रिया व मुलांची धर्मयोद्ध्यांनी कत्तल केली अशा बिझायर्स येथील सेंट मेरी मॅग्दालीन चर्चमध्ये सात हजार लोक मृत्युमुखी पडले