त्रूबदूर—प्रेमगीतांच्या गायकांपेक्षा अधिक काही
फ्रान्स मधील सावध राहा! नियत कालिकाच्या बातमीदाराकडून
त्रूबदूर आणि भटके शाहीर—हे शब्द कानांवर पडताच कशाची आठवण होते बरे? कदाचित उदात्त प्रेमाच्या अथवा उमद्या पुरुषांच्या गीतांची. तर मग तुमचा अंदाज चुकला नाही; पण, त्रूबदूर यापेक्षा अधिक काही होते. कानसो डामोर किंवा प्रेमगीत यांसाठी शक्यतो प्रसिद्धीच्या शिखरावर असल्यामुळे बहुतेक वेळा हाती तंतुवाद्य घेऊन एखाद्या दरबारी स्त्रीसाठी गीत गात असल्याचे त्यांना चित्रित केले गेले असले तरीही प्रेम ही त्यांची एकमेव अभिरुची नव्हती. त्यांच्या काळातील अनेक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक घडामोडींमध्ये देखील त्रूबदूर गोवलेले होते.
सध्या दक्षिण फ्रान्स म्हटलेल्या क्षेत्रांत, १२ व्या आणि १३ व्या शतकात या त्रूबदूरांची भरभराट झाली. ते कवी-संगीतकार असून सर्व प्रांतिक रोमान्स भाषांतील एका सर्वोत्कृष्ट भाषेत त्यांनी लिखाण केले. त्यास लँग्डॉकa म्हणत असत; ल्वार नदीच्या दक्षिणेकडील अदमासे अख्ख्या फ्रान्समध्ये, तसेच इटली आणि स्पेनच्या सरहद्दीवरील प्रांतांमध्ये ही एक सर्वसामान्य भाषा होती.
“त्रूबदूर” या शब्दाच्या उगमाविषयी बरेच मतभेद असून हा शब्द ट्रोबार या ऑक्सीटन क्रियापदापासून आला असे दिसते; त्याचा अर्थ, “रचणे, आविष्कारणे किंवा शोधणे” असा होतो. यास्तव त्रूबदूर, आपल्या सुरेख कडव्यात चपखल बसणारा उचित शब्द किंवा यमक शोधू शकत होते. त्यांच्या कविता संगीतबद्ध केल्या जात असल्यामुळे त्या गायिल्याही जाऊ शकत होत्या. जाँग्लर्स म्हटल्या जाणाऱ्या पेशेवाईक भटक्या शाहिरांसोबत नगरोनगरी प्रवास करून वीणा, सारंगी, बासरी, तंतुवाद्य किंवा सतार या वाद्यांच्या जोडीने त्रूबदूर आपली गीते गात असत. अमीर-उमरावांच्या दरबारांत तसेच बाजारपेठांत, क्रिडासत्रांत, जत्रेत, सणासुदीत किंवा उत्सवांत सांगीतिक प्रयोग हा बहुधा प्रत्येक औपचारिक मनोरंजनाचा एक भाग होता.
विविध पार्श्वभूमी
त्रूबदूर निरनिराळ्या पार्श्वभूमीतून आले होते. काहींचा जन्म सधन घराण्यात झाला; काही राजे होते; आणि इतर काही जण अधिक हीन कुळात जन्माला येऊन नंतर त्रूबदूरच्या हुद्द्याप्रत झेप घेणारे होते. काहींनी अफाट प्रतिष्ठा मिळवली. पुष्कळसे बरेच सुशिक्षित होते आणि त्यांनी दूरदूर प्रवास केला. सर्वांना स्त्रीदाक्षिण्य, विनयशीलता, काव्य आणि संगीताचे व्यापक प्रशिक्षण मिळत असे. एका माहितीसूत्राच्या म्हणण्यानुसार, एका उत्तम त्रूबदूरकडून अशी अपेक्षा केली जाई, की “त्याला सगळ्या ताज्या बातम्या तंतोतंत माहीत असाव्यात, विद्यापीठातील सर्व उल्लेखनीय शोधनिबंध त्याला तोंडपाठ असावेत, त्याला दरबारातील बित्तंबातमी असावी, . . . एखाद्या सरदाराच्या किंवा दरबारी स्त्रीच्या सांगण्यावरून त्याला तिथल्या तिथे काव्यरचना करता आली पाहिजे आणि यांशिवाय त्यावेळी दरबारात लोकप्रिय असलेल्या वाद्यांपैकी निदान दोन वाद्ये तरी त्याला वाजवता आली पाहिजेत.”
बाराव्या शतकातील व्यापार विकासामुळे फ्रान्सच्या दक्षिण प्रांतांना सोन्याचे दिवस आले. या संपदेच्या जोडीला विरंगुळा, विद्या तसेच कलाकुसरी व अत्युच्च राहणीमानाच्या सुसंस्कृत अभिरुची, या गोष्टी ओघानेच आल्या. लँग्डॉक आणि प्रव्हांसचे दरबारी सरदार आणि स्त्रिया त्रूबदूरांचे सर्वात निष्ठावान समर्थक होते. या कवीवर्गाला बरीच प्रतिष्ठा दिली जाई आणि खानदानी अभिरुची, फॅशन आणि शिष्टाचार यांवरही त्यांचा विलक्षण पगडा होता. युरोपच्या बॉलरूम डान्सचे जनकत्व यांच्याकडेच जाते. तथापि, द न्यू एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका म्हणते की, “दरबारी स्त्रियांभोवती सेवाभावाचे आणि दाक्षिण्याचे प्रसन्न, सुसंस्कृत वातावरण तयार करणे ही त्यांची उल्लेखनीय साध्यता होती.”
स्त्रियांचा वेगळ्या स्वरुपाचा आदर
एक पुरुष एखाद्या स्त्रीसाठी दार उघडतो, कोट घालण्यास तिची मदत करतो किंवा शतकांपासून पश्चिम युरोपमध्ये प्रचारात असलेल्या “लेडिझ फर्स्ट” या सदरात मोडणाऱ्या कोणत्याही सुसभ्य कृती करतो, तेव्हा खरे तर तो त्रूबदूरांनी सुरू केलेल्या रूढींचेच पालन करत असतो.
पुरुषाला पापात पाडण्यासाठी व परादीसमधून त्याची हकालपट्टी होण्यासाठी स्त्रीच सर्वस्वी जबाबदार आहे असे मानणाऱ्या चर्चच्या शिकवणुकींचा स्त्री जातीप्रती असलेल्या मध्ययुगीन प्रवृत्त्यांवर कमालीचा प्रभाव होता. तिच्याकडे भुरळ घालणारी, दियाबलाचे साधन, एक आवश्यक ब्याद या दृष्टिकोनातून पाहिले जात असे. पुष्कळदा विवाह ही जीवनाची एक हिणकस स्थिती असल्याचे मानले जाई. चर्चच्या नियमाने स्त्रीच्या मानहानीला आणि तिच्या वश करण्याला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी—पत्नीची मारझोड करणे, तिला सूटपत्र देणे यांना मान्यता दिली. जवळजवळ सगळ्याच बाबतींत स्त्रीला पुरुषापेक्षा कमी मानले जाई. पण, त्रूबदूरांच्या आगमनाने मात्र पुरुषांची विचारसरणी बदलू लागली.
नववा विल्यम, ड्यूक ऑफ अक्वाटेन हा ज्ञात असलेला सगळ्यात पहिला त्रूबदूर होता. प्रेमाविषयी त्रूबदूरांच्या अनोख्या संकल्पनेचे वर्णनात्मक घटक अंतर्भूत असलेली त्याची कविता ही पहिलीवहिलीच कविता होती; या प्रेमास पुढे उदात्त प्रेम असे नाव पडले. प्रॉव्हांसाल कवी स्वतःच त्यास व्हरेआमोर (खरे प्रेम) किंवा फिनामोर (उत्कृष्ट प्रेम) असे म्हणत असत. ही एक क्रांतीच होती, कारण स्त्री आता पुरुषाच्या अधीन कोणत्याही खालच्या दर्जावर राहिली नव्हती.
त्रूबदूरच्या काव्याने स्त्रियांवर मोठेपणाचा, सन्मानाचा आणि आदराचा भरभरून वर्षाव केला. ती उदात्त गुणांची व सद्गुणांची प्रतिमा बनली. काही गीतांमधून, दरबारी स्त्रीची प्रशंसा करणाऱ्या गायकाप्रती तिच्या भावनाशून्य प्रतिक्रियेवर शोक व्यक्त केला जाई. निदान तत्त्वावर आधारित तरी त्रूबदूरांचे प्रेम शुद्ध असावयास हवे होते. त्याचा मूळ उद्देश दरबारी स्त्रीला प्राप्त करणे नव्हे, तर तिच्यावरील प्रेमामुळे त्याला अंतःस्फूर्त झालेले नैतिक शुद्धीकरण गाठणे हे होते. आपणास तिच्या लायक बनविण्यासाठी या महत्त्वाकांक्षी कवीला नम्रता, आत्मसंयम, सहनशीलता, व्यक्तीनिष्ठा आणि तिच्यात असलेले इतर सर्व उदात्त गुण विकसित करण्यास भाग पाडले जाई. अशा तऱ्हेने, सगळ्यात संस्कारहीन पुरुषाचा देखील प्रेमामुळे कायापालट होऊ शकत होता.
त्रूबदूरांचा असा विश्वास होता की उदात्त प्रेम, सामाजिक व नैतिक शुद्धीकरणाचे उगमस्थान होते, तसेच सुसभ्य कृती व उदात्त कर्मांची मुळे प्रेमात रुजलेली होती. जसजशी ही कल्पना रुंदावली तसतशी ती एका संपूर्ण आचारसंहितेस पायाभूत ठरली आणि कालांतराने समाजाच्या सर्वसामान्य लोकांनी ती आत्मसात केली. बीभत्स आणि पशूतुल्य सरंजामी पद्धतीच्या विपरीत एका नवीन जीवनक्रमाला दिशा लाभली. आपल्या पुरुषांनी स्वार्थत्यागी, समजूतदार आणि दयाळू—सभ्य गृहस्थ असावे अशी अपेक्षा आता स्त्रिया करू लागल्या.
लवकरच, युरोपचा अधिकांश भाग त्रूबदूरांची कलाप्रणाली उचलून धरू लागला. स्पेन आणि पोर्तुगालने त्यांचे कलाविषय स्वीकारले. उत्तर फ्रान्समध्ये ट्रूवेर, जर्मनीमध्ये मिनस्येंगर, तर इटलीमध्ये ट्रूवाटोरी होते. त्रूबदूरांच्या उदात्त प्रेमाच्या विषयांनी व त्याबरोबरच उमद्या पुरुषांच्या आदर्शांनी रोमान्सb म्हटल्या जाणाऱ्या वाङ्मयीन शैलीस जन्म दिला. उदाहरणार्थ, उदात्त प्रेमाच्या आदर्शांचे व सेल्टिक ब्रीटानी दंतकथांचे संमिश्रण करून ट्रूवर क्रेट्यन डी ट्रोवांनी, राजा आर्थर आणि गोल मेजाभोवती बसणाऱ्या सरदारांच्या कथांमधील अशक्तांना औदार्य दाखवण्याचे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे सद्गुण आदर्शनीय मानले.
त्यांचा सामाजिक प्रभाव
अधिकांश त्रूबदूर गीतांनी उदात्त प्रेमाच्या सद्गुणांची स्तुतीसुमने उधळली, तर बाकीची त्रूबदूर गीते तत्कालिन सामाजिक व राजकीय विषयांना धरून होती. ला व्येय ए लेपे (सारंगी आणि तलवार) याचे फ्रेंच लेखक मार्टान ओरेल यांनी असे विवरण दिले की, ‘आपल्या समकालीन लोकांना विभक्त करणाऱ्या संघर्षांमध्ये त्रूबदूरांनी क्रियाशीलपणे भाग घेतला तसेच आपल्या सांगीतिक रचनांद्वारे त्यांनी या ना त्या पक्षाच्या यशासाठी मदतीचा हातही पुढे केला.’
मध्ययुगीन समाजातील त्रूबदूरांच्या अतुलनीय भूमिकेवर मतप्रदर्शन करताना रॉबर्ट सबाट्यर म्हणतात: “यापूर्वी कधीही कवींना एवढी अफाट प्रतिष्ठा दिली गेली नव्हती; कुणालाही इतके भाषास्वातंत्र्य लाभले नव्हते. त्यांनी स्तुतीसुमने उधळली व टीकेचा भडिमारही केला, ते लोकांच्या वतीने बोलणारे प्रवक्ते झाले, त्यांनी राजकीय धोरण प्रभावित केले तसेच नवनवीन कल्पनांचे ते माध्यम ठरले.”—ला पाएझी ड्यू म्वाएन आझ.
तत्कालिन प्रसारमाध्यम
छपाई मुद्रणांचा शोध लागला त्याच्या फार आधी त्रूबदूर आणि भटके शाहीर हे तत्कालिन प्रसारमाध्यम होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मध्ययुगीन भटके शाहीर आंतरराष्ट्रीय प्रवासी होते. सबंध युरोपच्या दरबारांमध्ये—सायप्रस ते स्कॉटलँड आणि पोर्तुगाल ते पूर्व युरोप, अर्थात जेथे कोठे ते गेले—त्यांनी माहिती गोळा केली, कथांचे, स्वरांचे आणि गीतांचे आदानप्रदान केले. जाँग्लर्सच्या तोंडी त्रूबदूर गीतांचा झपाट्याने प्रसार होत गेल्यामुळे या गीतांचे चित्तवेधक स्वरमेळ लोकांच्या ओठांवर घोळू लागले. परिणामी, या गीतांनी जनमतास प्रभावित करून लोकांना कुठल्या ना कुठल्या चळवळीसाठी जागृत केले.
त्रूबदूरांच्या अनेक काव्य प्रकारांपैकी एकाला सिर्व्हेन्त म्हणत, ज्याचा शब्दशः अर्थ “सेवकाचे गीत” असा होतो. यांपैकी काही गीतांनी राज्यकर्त्यांचा अन्याय चवाठ्यावर आणला. इतर गीतांनी शौर्य, स्वार्थत्याग, औदार्य आणि दयेच्या कृत्यांची वाहवा केली तर अमानुष क्रूरता, भेकडपणा, दांभिकता आणि स्वहित यांवर टीकेची झोड सोडली. प्रचंड उलाढालीच्या काळात, लँग्डोकच्या राजकीय आणि धार्मिक वातावरणाची प्रचिती होण्यासाठी १३ व्या शतकाच्या उत्तरार्धातील हे सिर्व्हेन्तेस इतिहासकारांसाठी जणू एक झरोकाच होते.
चर्चवर टीकेची झोड
धर्मयुद्धांच्या अपयशानंतर कॅथलिक चर्चच्या आध्यात्मिक आणि लौकिक अधिकाराविषयी अनेक लोकांच्या मनात आशंकेची भावना निर्माण झाली. पाळकवर्गाने ख्रिस्ताचे प्रतिनिधीत्त्व करण्याचा दावा केला खरा, परंतु त्यांची कार्ये ख्रिस्तासारखी मुळीच नव्हती. त्यांची दांभिकता, हव्यास आणि भ्रष्टाचार सर्वज्ञात झाला. धनसंपत्ती आणि राजकीय सत्तेसाठी सतत हपापलेले असल्यामुळे चर्चचे बिशप आणि पाळक, धनिकांच्या पुढे पुढे करू लागले. त्यांच्या हातून गरिबांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या आध्यात्मिक गरजांची हेळसांड होत असल्यामुळे तीव्र मतभेद खदखदणे अनिवार्यच होते.
लँग्डॉकमधील अनेक मध्यमवर्गीय तसेच अमीर-उमराव सुशिक्षित होते. इतिहासकार एच. आर. ट्रेवर-रोपर यांनी निरीक्षिले, की थोडेबहुत साक्षर असलेल्या सर्वसामान्य लोकांच्याही आता लक्षात येत होते, की १२ व्या शतकातील चर्च आणि “ते ज्याचे अनुकरण करण्याचा दावा करत होते ते प्राचीन काळातील चर्च, यांच्यात जमीन आसमानाचा फरक होता.” ते पुढे म्हणतात, की अनेक पुरुषमंडळी असा विचार करू लागली होती की, “कॉन्स्टंटाईनपूर्व काळात, जेव्हा चर्च एक राजधर्म नव्हता तेव्हाचे चर्च, . . . प्रेषितांचे चर्च, . . . छळ सोसलेले चर्च किती निराळे होते: पोप किंवा सरंजामी बिशप किंवा धनिकांच्या देणग्या किंवा मूर्तिपूजक तत्त्वे किंवा आपले धन वा सत्ता वाढविण्यासाठी रचलेल्या अभिनव नियमावली, यांच्यापैकी कशाचाही अंतर्भाव नसलेले ते चर्च होते!”
लँग्डॉक सहिष्णुतेचा प्रदेश होता. टूलूझच्या उमरावांनी आणि दक्षिणेकडील इतर राज्यकर्त्यांनी लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. वॉल्डेन्सन लोकांनीc लँग्डॉक भाषेत बायबलचे भाषांतर केले होते आणि संपूर्ण प्रदेशात जोडी-जोडीने ते त्याचा आवेशपूर्ण प्रचार करत होते. कॅथरी लोकही (अल्बीजेन्स देखील म्हटलेले) आपल्या तत्त्वांचा प्रसार करून उमरावी घराण्यातील अनेकांचे धर्मांतर करत होते.
त्रूबदूरांच्या अनेक सिर्व्हेन्तेसांनी कॅथलिक पाळकवर्गासंबंधी असणारी लोकांची निराशा, अनादर आणि चीड आरशाप्रमाणे हुबेहूब प्रतिबिंबित केली. गी ड कावायॉन नामक एक सिर्व्हेन्त, जगीक गोष्टींसाठी ‘आपले मूलभूत कार्य त्यागल्याबद्दल’ पाळकवर्गावर दोषारोप लावते. त्रूबदूरांच्या भावगीतांनी नरकाग्नी, क्रॉस, कबुलीजबाब आणि “पवित्र पाणी” यांचा उपहास केला. त्यांनी पापमुक्ती, आणि स्मरणवस्तू ठेवणे यांची देखील टर उडवली आणि अनैतिक पाळकांना आणि नीतिभ्रष्ट बिशपांना उपरोधिकपणे, “विश्वासघातकी, लबाडखोर आणि दांभिक,” असे म्हटले.
स्वातंत्र्याविरुद्ध चर्चचा लढा
तथापि, रोमन चर्चने स्वतःस हरएक साम्राज्य आणि राज्यावर सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले. युद्ध त्यांच्या सत्तेचे हत्यार बनले. पोप इनोसंट तिसरे यांनी, फ्रान्सच्या दक्षिण राज्यातील राजांवर विजय मिळवून त्यांना विवश करणाऱ्या तसेच हरएक विरोधी सूर चिरडून टाकणाऱ्या सैन्यास सबंध लँग्डॉकची धनसंपत्ती देण्याचे अभिवचन दिले होते. त्यानंतरचा काळ, फ्रेंच इतिहासातील छळ व खूनांचा सर्वात रक्तरंजित काळ होता. त्यास अल्बीजेन्शीयन धर्मयुद्ध असे नाव पडले (१२०९-२९).d
त्रूबदूर त्यास खोटे धर्मयुद्ध म्हणत असत. चर्चने विरोधकांना क्रूर वागणूक दिली आणि ख्रिस्तेत्तर समजल्या जाणाऱ्या मुस्लिम लोकांच्या हत्याकांडासाठी जी पापमुक्ती दिली होती तीच पापमुक्ती, फ्रेंच विरोधकांची हत्या करण्यासाठी पोपने दिली; या गोष्टींची तीव्र चीड त्रूबदूरांच्या गीतांतून अभिव्यक्त करण्यात आली. अल्बीजेन्शीयन धर्मयुद्धाच्या काळादरम्यान आणि त्यानंतर झालेल्या इंक्विझिशनच्या काळादरम्यान चर्चने आपल्या तिजोऱ्या भरून घेतल्या. कुटुंबे छिन्नविच्छिन्न झाली, त्यांचा देश आणि घरेदारे बळकावली गेली.
त्रूबदूरांवर कॅथरी-पाखंडी असल्याचा दोषारोप लावला गेल्यामुळे कमी शत्रूभाव असलेल्या देशांत त्यांनी पलायन केले. या धर्मयुद्धाने ऑक्सीटन समाजाचा, त्याच्या जीवनाचा आणि काव्याचा शेवट केला. इंक्विझिशने काढलेल्या कायद्याखाली, त्रूबदूर गीत गाणे किंवा ते गुणगुणने देखील अवैध्य मानले गेले. पण, त्यांचा वारसा मात्र पुढे सजीव राहिला. खरे तर, त्यांच्या पाळकद्रोही गीतांनीच धर्म सुधारणेसाठी एक पोषक मनोभूमी तयार केली. खरेच, त्रूबदूरांचे स्मरण, केवळ त्यांच्या प्रेम गीतांसाठीच नव्हे, तर इतर अनेक कारणांसाठी केले जाऊ शकते.
[तळटीपा]
a रोमी सैन्यांकडून वारशाने प्राप्त केलेल्या व रोमन म्हटल्या जाणाऱ्या लॅटिन भाषेचा वेळपावेतो फ्रान्समध्ये दोन प्रांतिक भाषांत विकास झाला होता: दक्षिण फ्रान्समध्ये लँग्डॉक (ऑक्सीटन किंवा प्रॉव्हांसाल देखील म्हटलेली) ही भाषा बोलली जात असे, तर उत्तर फ्रान्समध्ये लँग्डॉईल बोलली जात असे; (ही, प्रारंभिक फ्रेंचचेच एक रूप असून तिला कधीकधी जुनी फ्रेंच असेही म्हटले गेले आहे). हो या शब्दासाठी ते वापरत असलेल्या शब्दावरून या दोन भाषा एकमेकांपासून भिन्न असल्याचे ओळखले जात होते. दक्षिणेस तिला ऑक (लॅटिन हॉक यापासून); उत्तरेस ऑईल (लॅटिन हॉक इले यापासून) असे म्हणत; पुढे या भाषांना आधुनिक फ्रेंच वी हे नाव पडले.
b उत्तरेकडच्या किंवा दक्षिणेकडच्या प्रांतिक भाषेत लिहिलेल्या कोणत्याही साहित्य प्रकारास रोमन म्हणत असत. अनेकविध वीरकथा उदात्त प्रेमाच्या भावविश्वाशी संबंधित असल्यामुळे प्रेमकथा किंवा अद्भुत प्रेममय समजल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींकरता त्या मानक ठरल्या.
c वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित टेहळणी बुरूज, ऑगस्ट १, १९८१, (इंग्रजी) पृष्ठे १२-१५ पाहा.
d टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९५, पृष्ठे २७-३० पाहा.
[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]
मुद्रकाचे अलंकरण/by Carol Belanger Grafton/Dover Publications, Inc.
Bibliothèque Nationale, Paris
[१९ पानांवरील चित्र]
बाराव्या शतकातील हस्तलिखितातील लघू प्रतिकृती
[चित्राचे श्रेय]
Bibliothèque Nationale, Paris