विस्मयकारक कडुनिंब
नायजेरियातील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
“गावाचे औषधालय”—असे भारतातील लोक कडुनिंबाच्या झाडाला म्हणतात. या देशातील लोकांनी दाह, ज्वर आणि प्रादुर्भाव यांपासून आराम मिळविण्यासाठी शतकांपासून कडुनिंबावर आपल्या आशा टाकल्या आहे. रक्त शुद्ध होण्यात कडुनिंब आपली मदत करू शकतो असा समज असल्यामुळे अनेक हिंदू लोक कडुनिंबाची काही पाने सेवन करूनच वर्षाची सुरवात करतात. दात घासण्यासाठी लोक कडुनिंबाच्या काड्यांचा उपयोग करतात तर त्वचारोगांवर कडुनिंबाच्या पानांचा रस लावतात; शिवाय औषध म्हणून कडुनिंबाचा काढा देखील ते पितात.
अलीकडील काळात, कडुनिंबाच्या झाडासंबंधी शास्त्रज्ञांचे कुतूहल वाढत चालले आहे. तथापि, कडुनिंब—जगाचे प्रश्न सोडविणारे झाड (इंग्रजी) असे शीर्षक असलेला एक वैज्ञानिक अहवाल असा इशारेवजा संदेश देतो: “त्याच्या शक्यता सर्वस्वी अनंत वाटत असल्या तरी कडुनिंबाविषयी अद्याप काहीएक माहिती निश्चित नाही. ही वनस्पती व तिचे गुण यांविषयी सर्वाधिक जिज्ञासू असलेले शास्त्रज्ञ देखील कबूल करतात, की या क्षणी त्यांच्या अंदाजांना आधारभूत असणारे प्रमाण अजूनही अनिश्चितच आहेत.” तथापि, सदर अहवाल असेही नमूद करतो: “दोन दशकांच्या संशोधनाने इतक्या विषयांचे आशादायक परिणाम उघडकीस आणले आहे, की कडुनिंबाच्या या दुर्मिळ जाती, गरीब-श्रीमंत अशा दोन्ही राष्ट्रांना मोठ्या फायद्याच्या असू शकतात. सगळ्यात चौकस असलेले काही शास्त्रज्ञ देखील आता असे म्हणत आहेत की, ‘कडुनिंब एक अद्भुत वनस्पती म्हणण्यालायक आहे.’”
झाड या नात्याने त्याची भूमिका
उष्ण प्रदेशांत आढळणारे हे झाड मॅहॉगनी वृक्षाच्या जातीतील एक आहे. ते ३० मीटर उंच वाढते आणि त्याचा घेर २.५ मीटरहून अधिक होऊ शकतो. ते क्वचितच निष्पर्ण असल्यामुळे बाराही महिने त्याची सावली मिळते. झपाट्याने वाढणाऱ्या या झाडाला कमी संवर्धन लागते; शिवाय निकृष्ट मातीतही ते चांगले वाढते.
सावलीसाठी व दक्षिणेकडील सहारा वाळवंटाची वाढ रोखण्यासाठी, पश्चिम आफ्रिकेत या शतकाच्या सुरवातीला प्रथम त्याची लागवड करण्यात आली. फिजी, मॉरिशस, सौदी अरेबिया, मध्य व दक्षिण अमेरिका तसेच कॅरिबियन बेटे या ठिकाणी देखील अरण्याधिकाऱ्यांनी ही झाडे लावली आहेत. संयुक्त संस्थानात ॲरिझोना, कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडाच्या दक्षिण क्षेत्रांमध्येही प्रयोगात्मक प्लॉट्स आहेत.
उष्ण हवामानात बाराही महिने सावली देण्याखेरीज जळण म्हणूनही कडुनिंबाचा उपयोग केला जाऊ शकतो. याशिवाय, त्याचे वाळवी-प्रतिकात्मक लाकूड बांधकाम व सुतारकामात उपयुक्त ठरते. तर मग, केवळ त्याच्या उपयुक्ततांवर आधारित निष्कर्ष काढायचा झाल्यास कडुनिंब खरोखर अतिशय उपयोगी असल्याचे म्हणता येईल. पण त्याचे आणखीनही काही फायदे आहेत.
कीटकांचा कर्दनकाळ
कडुनिंबाची पाने उपद्रवी कीटकांना दूर ठेवतात हे भारतातील लोकांना पुरातन काळापासून माहीत असल्यामुळे ते लोक बिछान्यात, पुस्तकांत, डब्यांत, कपाटांत व कपड्यांमध्ये त्याची पाने ठेवतात. १९५९ साली, सुदानमधील एक महाभयंकर टोळधाड प्रत्यक्ष पाहिलेले एक जर्मन कीटकशास्त्रज्ञ व त्यांच्या विद्यार्थ्यांनी कडुनिंबाच्या झाडाचे संशोधन करण्यास स्वतःला झोकून दिले; याचे कारण, अगणित टोळांनी कडुनिंबाचे झाड सोडून इतर हरएक झाडाची पाने फस्त केली होती.
तेव्हापासून, शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे, की कडुनिंबाचे जटील रासायनिक भांडार २०० पेक्षा अधिक कीटक जातींवर तसेच विविध कीड, कृमी, बुरशी, सूक्ष्मजंतू आणि अनेकानेक विषाणूंवर प्रभावकारी आहे. एका प्रयोगात, संशोधकांनी जॅपनीस बीटल [एकप्रकारचे कीटक] ठेवलेल्या एका पात्रात सोयाबीनची पाने ठेवली. प्रत्येक पानाच्या अर्ध्या भागावर कडुनिंबाचा अर्क फवारला होता. बीटलने पानांचा अर्करहीत भाग फस्त करून टाकला, पण अर्क फवारलेल्या भागास त्यांनी तोंडही लावले नाही. खरे तर, उपासमार पत्करून शेवटी ते मरून गेले पण अर्क फवारलेल्या पानांच्या अतिलहान अंशास त्यांनी तोंड लावले नाही.
असे प्रयोग एक स्वस्त, बिनविषारी व सहज तयार करता येणारा विशिष्ट कृत्रिम जंतुनाशक पर्याय विकसित करण्याची शक्यता असल्याचे सूचित करतात. उदाहरणार्थ, निकाराग्वातील शेतकरी कडुनिंबाच्या बियांचे चूर्ण पाण्यात कालवतात—एक लिटर पाण्यात ८० ग्रॅम बिया. १२ तास बियांचे हे चूर्ण पाण्यात भिजत घालतात, मग गाळून त्याचे पाणी पिकांवर फवारतात.
मात्र कडुनिंबाची उत्पन्ने कीटकांना त्वरित बिमोड करतात असे नाही. कडुनिंबाची फवारणी एखाद्या कीटकाच्या जीवनक्रमात बदल घडवून आणते जेणेकरून सरतेशेवटी त्याची भूक मरते, पुढची पिढी जन्मालाच येऊ शकत नाही किंवा त्याचे स्थित्यंतरही होऊ शकत नाही. कडुनिंबाची उत्पन्ने कीटकांना हानिकारक असली तरी पक्षी, उष्ण रक्ताचे प्राणी किंवा मानव यांना ती अपायकारक नसतात.
“गावाचे औषधालय”
मग, यापासून मानवांना होणारे इतरही फायदे आहेत. त्याच्या बिया व पानांतील संयुगे प्रतिरोधक, जंतुनाशक व बुरशीनाशक म्हणून कार्य करतात. असे सुचविले जाते, की कडुनिंब दाहयुक्त सूज, अतिरक्तदाब व त्वचारोगांवर कदाचित बहूगुणी असू शकेल. कडुनिंबाच्या अर्कापासून तयार केलेली औषधे मधूमेह व मलेरिया प्रतिकारक असल्याचे म्हटले जाते. त्याच्या इतर संभाव्य फायद्यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट आहेत:
कीटक प्रतिसारक. सॅलनिन नावाचे कडुनिंबाचे एक द्रव्य उपद्रवी कीटकांचे जोरदार प्रतिसारण करते. कडुनिंबाच्या तेलापासून तयार केलेले माशी व डास प्रतिसारक तर बाजारात उपलब्ध आहेच.
दंत स्वच्छता. कोट्यवधी भारतीय, रोज सकाळी कडुनिंबाची एक काडी तोडतात, तिचे टोक चावून नरम करतात आणि मग दात व हिरड्या घासण्यासाठी तिचा उपयोग करतात. सालीतील संयुगे प्रबल प्रतिरोधक असल्यामुळे ते फायदेकारक असल्याचे संशोधनावरून दिसून आले आहे.
संततीप्रतिबंधक साधन. कडुनिंबाचे तेल प्रबळ वीर्यनाशक असून प्रयोगशाळेतील प्राण्यांच्या जनन प्रमाणात कपात करण्यासाठी प्रभावशाली ठरले आहे. माकडांवर केलेले प्रयोग सूचित करतात, की कडुनिंबाची संयुगे पुरुषांसाठी संततीनियमन औषध तयार करण्यासही कदाचित मदतगार ठरतील.
तर मग स्पष्टच आहे, की कडुनिंब हे काही हलके फुलके झाड नाही. कडुनिंबाची सगळीच माहिती अद्याप समजली नसली तरी त्यामुळे कीटकनियंत्रण सुधारणे, स्वास्थ्य सुधारणे, पुनर्वनरोपणास साहाय्य करणे आणि कदाचित अत्याधिक लोकसंख्येला खिळ बसवणे यासंबंधी कडुनिंबाकडून खूप आशा आहेत. म्हणूनच या विस्मयकारक कडुनिंबाला लोकांनी, “देवाने मानवजातीला दिलेले वरदान,” असे जे म्हटले त्यात आश्चर्य ते काय!
[२३ पानांवरील चित्र]
कडुनिंबाचे झाड व चौकटीत कडुनिंबाच्या पानाचे चित्र