वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १२/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एड्‌स आणि आशिया
  • बाल दुर्व्यवहार आणि रोगप्रतिबंधक संस्था
  • हात धुवा!
  • हेपाटायटिस-बीचे बळी
  • घरातील वायू प्रदूषण
  • स्वास्थ्यकारी जीवनशैलीस बढावा देणे
  • वैज्ञानिकांचा देवावर विश्‍वास
  • आशाहीन पिढी
  • विश्‍वयात्रा करणारे विषाणू
  • खाणे व दांत किडणे
  • आटत चाललेली गंगा
  • जगावरील दृष्टीक्षेप
    सावध राहा! माहितीपत्रक १३-१ (gbr13-1)
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९७
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—२०००
सावध राहा!—१९९७
g97 १२/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

एड्‌स आणि आशिया

काही पाश्‍चिमात्य राष्ट्रांत सिद्ध झालेल्या एड्‌स प्रकरणांत किंचित घसरण झाली असली तरी, आशियाच्या अनेकविध भागांत या साथीचा फैलाव झपाट्याने होत आहे. एशियावीकच्या अहवालानुसार, “१९९० दशकाच्या पूर्वार्धात” भारतातील या प्रकरणांची संख्या, “७१ पट वाढली.” १९९० साली, या प्रकरणांच्या बाबतीत जगामध्ये थायलंडचा क्रमांक ५७ वा होता, पण १९९० च्या मध्यात तो चक्क ५ व्या क्रमांकावर आला. कंबोडियाचा क्रमांक १७३ वा होता तो ५९ वर आला. आणि त्याच कालावधीत फिलिपाईन्सने १३१ टक्क्यांची वाढ अनुभवली. अनेक लोक जाणून आहेत, की या बहुविध राष्ट्रांतील झपाट्याने वाढणारा बाल-संभोग उद्योग याकरता काही अंशी दोषास्पद आहे, पण एशियावीकच्या म्हणण्यानुसार ज्या मूठभर राजकारण्यांच्या राष्ट्रांचे, “पर्यटकांच्या पैशांवरच बहुतांशी पोट भरत असते . . . ते” याविरुद्ध “कोणतीही प्रभावी पावले उचलण्यास कुचराई करतात.”

बाल दुर्व्यवहार आणि रोगप्रतिबंधक संस्था

जपानच्या मीये विद्यापीठातील संशोधकांच्या मते जेव्हा एखाद्या मुलाचे प्रदीर्घ शोषण होते, तेव्हा त्याची रोगप्रतिबंधक संस्था ढासळत जाऊन मूल रोगांस भेद्य बनते. मस्तिष्क रक्‍तस्रावामुळे किंवा शारीरिक दुर्व्यवहारामुळे होणाऱ्‍या इतर परिस्थितींमुळे दगावलेल्या ५० मुलांच्या शवांचे विद्यापीठाने परीक्षण केले; या मुलांचे आयुर्मान एक महिना ते ९ वर्षे असे होते. मायनीची डेली न्यूजच्या अहवालानुसार, “प्रतिरोधक संस्थेची कार्ये नियंत्रित करणाऱ्‍या” मुलांच्या थायमस ग्रंथीचे “आंकुचन होऊन ते सर्वसामान्य वजनाच्या निम्मे झाले होते.” जितका अधिक काळ शोषण, तितकेच अधिक या ग्रंथीचे आकुंचन होते. खरे तर वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, “सहा महिन्यांहून अधिक काळ शोषण झालेल्या मुलांच्या थायमस ग्रंथी, शोषण न झालेल्या मुलांच्या थायमस ग्रंथीच्या सोळाव्या भागाइतकीच झाली होती.” ज्या मुलांनी मानसिक छळ सोसला आहे किंवा पालकांनी त्यांच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे कुपोषण झाले आहे त्या मुलांमध्ये देखील संशोधकांना अशा प्रकारचे ग्रंथी आकुंचन दिसून आले आहे.

हात धुवा!

इटालियन वृत्तपत्र कोरीएरा डेल्ला सेरा यानुसार, “हात धुणे हा अनेकानेक रोग संक्रमणे टाळण्याचा सर्वांत प्रभावी, साधा आणि किफायतशीर मार्ग होय.” तथापि, “इटलीच्या प्रत्येक १० रहिवाश्‍यांपैकी ३ पेक्षा अधिक जण, शौचालय वापरल्यानंतर आपले हात धुवत नाहीत; त्यानंतर लगेचच भोजन करणार असले अगदी तेव्हासुद्धा.” या सर्वेक्षणाचे आणि इतर राष्ट्रांत केलेल्या अशाचप्रकारच्या बहुसंख्य सर्वेक्षणांचे परिणाम जवळजवळ सारखेच आहेत. “हातांतून अन्‍नपदार्थांत जंतू जाऊन परिणामस्वरूपी, दूषित करणारी एक साखळीच निर्माण होऊ शकते,” असे स्पष्टीकरण सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एन्रीको मॉलयॉनो देतात. ही साखळी कशी तोडली जाऊ शकते बरे? त्यासाठी कमीतकमी ३० सेकंद तरी (जिवाणू नाहीसे करण्यासाठी लागणारा कमीतकमी वेळ)—साबणाने आणि गरम अथवा कोमट पाण्याने तुमचे हात धुवा तसेच बोटांच्या नखांखाली देखील धुवा. याचा अर्थ १० ते १५ सेकंद त्यांस चोळणे. मग हात स्वच्छ धुवा आणि हाताच्या कोपऱ्‍यापासून तुमच्या बोटांपर्यंत ते कोरडे करा, असे तो लेख म्हणतो.

हेपाटायटिस-बीचे बळी

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, प्रती वर्षी हेपाटायटिस-बी यामुळे दहा लाखांपेक्षा अधिक लोक मृत्यूच्या खाईत लोटले जातात. बाल रोग चिकित्सक जगदीश चिन्‍नाप्पा यांच्या मते, यांपैकी जवळजवळ १,५०,००० मृत्यू भारतातच होत असतात. एका बहुराष्ट्रीय औषधी कंपनीने आयोजित केलेल्या परिषदेत त्यांनी खुलासा केला की भारतात, “३.५ ते ४ कोटी एचबीवी [हेपाटायटिस-बी-वायरस] वाहक असून त्यांचे प्रमाण विश्‍वभरातील एकूण वाहकांच्या १० टक्के आहे,” असा द टाईम्स ऑफ इंडियाचा अहवाल आहे. वृत्तपत्राने पुढे असेही म्हटले की, “जुन्या यकृत व्याधीच्या दोन प्रकरणांपैकी एक, आणि प्राथमिक यकृत कर्करोगाच्या दहा प्रकरणांपैकी आठ प्रकरणे हेपाटायटिस-बी याच्या संक्रमणामुळे होतात.”

घरातील वायू प्रदूषण

नवी दिल्ली, भारत येथे टाटा एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (टीईआरआय) अलीकडेच केलेला एक अभ्यास दाखवून देतो, की वायू प्रदूषण संबंधीत आजारांमुळे, दरवर्षी भारतातील २२ लाख लोक मृत्युमुखी पडतात. द इंडियन एक्सप्रेस अहवाल देते, की सदर अभ्यासानुसार घरातील प्रदूषण हे त्याचे प्रमुख कारण होय. कोळसा, सरपण आणि गौऱ्‍यांवर स्वयंपाक करणाऱ्‍या झोपडपट्टीतील स्त्रियांना याचा सर्वाधिक धोका आहे. बाहेरील प्रदूषणास आळा घालण्यासाठी पावले उचलली जात असली तरी तज्ज्ञांच्या मते आपल्याच घरातून कोट्यवधी लोकांना होणारा हा धोका कमी करण्याच्या दिशेने फारच कमी प्रयत्न केले गेले आहेत. टीईआरआय याचे संचालक आर. के. पचाऊरी यांनी असे म्हटले की, “एक गुप्त संकट प्रसंग हयात आहे ज्याच्यासाठी कोणताही तात्कालिक उपाय दिसत नाही.”

स्वास्थ्यकारी जीवनशैलीस बढावा देणे

आपल्या १९९७ जागतिक आरोग्य अहवालात, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) असा इशारा देते, की मानवजात एका वाढत्या ‘दुःखाच्या संकट प्रसंगाला’ तोंड देऊन आहे. दरवर्षी कर्करोग, हृदयरोग आणि इतर जुन्या आरोग्य समस्या २.४ कोटीपेक्षा अधिक लोकांचा बळी घेत असून, आणखीन इतर कोट्यवधी लोक या रोगांच्या टांगत्या तलवारीखाली वावरत आहेत. येत्या २५ वर्षांत, अनेक देशांतील कर्करोगाची प्रकरणे दुप्पट होतील अशी अपेक्षा व्यक्‍त केली जाते. हृदयरोग आणि मस्तिष्काघात, हे समृद्ध राष्ट्रांतील सर्वांत घातक रोग, गरीब राष्ट्रांत अधिक सर्रासपणे आढळतील. या शक्यता विचारात घेऊन डब्लूएचओ, एक जगव्याप्त “तीव्र स्वरूपी व अखंड” मोहीम राबवत आहे; तिचा हेतू, स्वास्थ्यकारी जीवनशैलीस बढावा देणे आणि त्याचवेळी प्राणघातक रोगांत परिणीत होणारे धोकेदायक घटक—निकस आहार, धूम्रपान, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव यांत कपात करणे, हा आहे.

वैज्ञानिकांचा देवावर विश्‍वास

सन १९१६ मध्ये, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जेम्स लेबा यांनी, ढोबळ मानाने निवडलेल्या १,००० वैज्ञानिकांना असा एक प्रश्‍न टाकला, की त्यांचा देवावर विश्‍वास होता की नव्हता. त्यांचे उत्तर? द न्यू यॉर्क टाईम्सचा अहवाल म्हणतो, की ज्यांनी प्रत्युत्तर दिले त्यांपैकी ४२ टक्के वैज्ञानिकांनी आपला देवावर विश्‍वास असल्याचे अभिव्यक्‍त केले. प्रबोधनाचे वारे सर्वत्र वाहू लागल्याने मात्र देवावरील विश्‍वास कमी होईल असे लेबा यांनी भाकीत केले होते. आज ८० वर्षे उलटून गेल्यानंतर, जॉर्जिया विद्यापीठातील एडवर्ड लॉर्सेन यांनी लेबाचेच विख्यात सर्वेक्षण पुन्हा एकदा केले. तेच प्रश्‍न आणि त्याच पद्धतींचा प्रयोग करून लॉर्सेन यांनी जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितशास्त्रज्ञांना विचारले, की मानवजातीसोबत क्रियाशीलपणे संचार करणाऱ्‍या देवावर त्यांचा विश्‍वास आहे किंवा नाही. यावर मिळालेल्या उत्तरांवरून असे सूचित होते, की आजही जवळजवळ तितकेच, म्हणजे सुमारे ४० टक्के शास्त्रज्ञ देवावर विश्‍वास असल्याचे अभिव्यक्‍त करतात. डॉ लॉर्सेन यांच्या मते, “लेबा यांनी एकतर मानवी मनाचा ठाव घेण्यात चूक केली असावी, किंवा मग सर्व मानवी गरजा तृप्त करण्यातील विज्ञानाच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधण्यात चूक केली असावी.”

आशाहीन पिढी

द ऑस्ट्रेलियन यात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आजच्या १५ ते २४ वयोगटातील युवकांच्या व पूर्वीच्या दोन पिढीतील युवकांच्या प्रवृत्तींची तुलना करणाऱ्‍या सर्वेक्षणांनी, मादक पदार्थांचा दुरुपयोग, गुन्ह्यांचे प्रमाण आणि आत्महत्या यांत वाढ झाल्याचे प्रकट केले आहे. युद्धकलाशास्त्र विश्‍लेषक व वैज्ञानिक लेखक रिचअर्ड इकर्झली यांनी, पुढील शब्दांत आजच्या अनेक युवकांचे विचार व्यक्‍त केले: “युवकांना असं वाटतं, की जीवन हे रोचक आणि मौजमजेचं असावं, त्यांनी स्वतः आत्मनिर्भर असावं, त्यांच्यापुढे पसंतीनुसार जीवनशैली निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, समाजाच्या समस्या सोडवण्यात सरकारं असमर्थ आहेत आणि सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणण्यात ते स्वतः देखील असमर्थ आहेत.” शानू नामक एका १५ वर्षांच्या मुलीने म्हटले: “लोकसंख्या सतत वाढत आहे आणि कमी नोकऱ्‍या, घरं आणि सर्वच गोष्टींचा अभाव असल्यामुळं आम्हाला स्पर्धा करत राहावी लागते.”

विश्‍वयात्रा करणारे विषाणू

नव वैज्ञानिक (इंग्रजी) नियतकालिक असा अहवाल सादर करते, की विमानांतील मलप्रवाह टाक्यांमध्ये, विषाणूंना पूर्णपणे बिमोड करणारे रासायनिक पदार्थ असले तरीही काही विषाणूंवर या जंतुनाशकांचा काहीच परिणाम होत नाही. उत्तर कॅरोलीना विद्यापीठातील पर्यावरण शास्त्रज्ञ, मार्क सॉबसी यांच्या निदर्शनास आले, की संयुक्‍त संस्थानांत उतरणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय विमानांतील, त्यांनी चाचणी केलेल्या जवळजवळ निम्म्या मलप्रवाहातील विषाणू जिवंत अवस्थेत होते. संयुक्‍त संस्थानांत, बहुतेककरून सार्वजनिक मलप्रवाह स्थलांत विमानातील मलावर प्रक्रिया करून त्यास बाहेर वातावरणात टाकून दिले जाते. आणि मग यांपैकीच काही विषाणूंमुळे हेपाटायटिस ए आणि ई, मस्तिष्क दाह, पोलिओ या रोगांचा फैलाव होण्याचा धोका आहे. सॉबसी असेही म्हणतात: “विश्‍वभरातील विमानांमार्फत पसरू शकणाऱ्‍या रोगांचे प्रमाण अत्यंत चिंताजनक आहे.”

खाणे व दांत किडणे

अधूनमधून गोड पदार्थ तोंडात घालणे, यात कपात केल्याने दात किडण्याचे टाळण्यास मदत होते ही काही नवी समज नाही. तथापि, तुमचे कुटुंब हसतमुख कसे ठेवावे (इंग्रजी) या कुटुंब दंत मार्गदर्शिकेचे म्हणणे असे आहे, की आपण केव्हा आणि किती वेळा खातो याकडे लक्ष देणे ही विशेष महत्त्वाची बाब आहे. गोड पदार्थ किंवा रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्‌स तुमच्या दातांवरील प्लॅकच्या संपर्कात आल्याने आम्ल तयार होते. आणि मग हे आम्ल तुमच्या दंतवल्कावर सुमारे २० मिनिटे हल्ला करतात, असेही माहितीपत्रक म्हणते. या कालावधीतच दातांमध्ये खड्डे निर्माण होऊ लागतात. याशिवाय, “तुम्ही जितक्या वेळेस एखादा गोड किंवा पिष्ठमय पदार्थ खाता त्या प्रत्येक वेळी असे होण्याची शक्यता असते.” तर मग, तुम्ही काही खाणार असलात तर, “ते एकदाच खाणे बरे,” ज्यामुळे एकदाच तुमच्या दातांवर आम्ल तयार होईल. नाहीतर, अधिक वेळापर्यंत तो पदार्थ खात बसल्याने आम्लाचा प्रदीर्घ हल्ला होतो. दातांचे किडणे टाळण्यासाठी दंतवैद्य असा सल्ला देतात, की दिवसातून निदान दोन वेळा तरी तुम्ही ब्रशने आपले दात स्वच्छ केले पाहिजेत. तसेच, दंतदोऱ्‍याचा वापर करून दातांच्या मधोमध स्वच्छ करण्याचेही विसरू नका.

आटत चाललेली गंगा

कोट्यवधी हिंदू, भारतातील गंगा नदीला पवित्र मानतात. तिच्या मार्गावरील सर्व शेती कामासाठी ती एक जीवनदायिनी ठरली आहे. परंतु, अलीकडे मात्र तिच्या पात्रातील पाणी झपाट्याने आटत चालले आहे आणि त्यामुळे नदी आणि नदीचे पूर्वीचे काठ यांच्यामध्ये एक विस्तारित शुष्क भूमी निर्माण झाली आहे, असा अहवाल इंडिया टुडे दिते. अनावृष्टीमुळे तसेच कृषी उद्योगासाठी होणाऱ्‍या नदीच्या पाण्याच्या अमर्याद वापरामुळे प्रवाहातील हा कमालीचा अपकर्ष दिसून येतो. अहवाल दाखवून देतो, की आसपासच्या परिसरातील कृषिकर्मास धोका पोहंचवण्याव्यतिरिक्‍त पाण्याच्या तुटवड्यामुळे निर्माण होणारा गाळ कलकत्त्याचे बंदर, नौका चालविण्यास अयोग्य देखील करू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा