वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १२/८ पृ. २६-२७
  • “आठवणीत राहिलेला शनिवार साक्षीदारांना मनस्वी आभार”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आठवणीत राहिलेला शनिवार साक्षीदारांना मनस्वी आभार”
  • सावध राहा!—१९९७
सावध राहा!—१९९७
g97 १२/८ पृ. २६-२७

“आठवणीत राहिलेला शनिवार साक्षीदारांना मनस्वी आभार”

नॉर्वेतील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

टेलेमॉर्कसावीसा या नॉर्वेजियन दैनिकाचे स्तंभलेखक, एविन ब्लिकस्टॉ यांच्या लेखाचे शीर्षक वरीलप्रमाणे होते. सुरवातीला, विशेषकरून शनिवारच्या दिवशी सकाळी—अनावश्‍यक टपाल, विक्रींच्या उद्देशाने केलेले अनावश्‍यक टेलिफोन कॉल्स आणि घरी भेटी द्यायला येणाऱ्‍यांविषयी ते नापसंती व्यक्‍त करत असत. त्यांनी पुढे असे लिहिले:

“अचानक ते येतात. दारात उभे राहतात. कोण? तर यहोवाचे साक्षीदार. आणि तेही चक्क शनिवारच्या दिवशी सकाळी. आपलं सावध राहा! नियतकालिक, क्र. १७, सप्टेंबर ८, १९९६ हे घेऊन. [“अमेरिकन इंडियन्स—यांच्यासाठी कोणते भवितव्य?”] मला ते नियतकालिक वाचायला आवडेल का, असं त्यांनी मला विचारलं; त्यात दिलेली एक विशिष्ट माहिती मला आवडेल असा त्यांचा विश्‍वास होता. . . . मला यात काही रस नाही, असं मी म्हणण्याआधीच त्यांच्यापैकी एकानं पुढं म्हटलं: ‘त्यात अमेरिकन इंडियन्सबद्दल देखील एक लेख आहे. आम्हाला ठाऊक आहे, की या विषयावर तुम्ही बरंच लिखाण केलंय.’

“आता मात्र मी कात्रीत सापडलो. कारण एखाद्यानं आपली थोडीशी जरी तारीफ केली, की आपली सगळी ठाम मतं वगैरे तेवढ्यापुरती तरी गायब होऊन जातात. असो. सावध राहा! घेऊन मी ब्रेकफास्ट टेबलवर बसलो. जिज्ञासा अधिकाधिक वाढत चालली. यहोवाचे साक्षीदार आणि अमेरिकन इंडियन्सचे भवितव्य, हा संयोग काहीसा असामान्य वाटतो. चष्मा लावून मी वाचू लागलो. उगाच आपला वेळ जातोय ही भावना मनात होतीच.

“किती वेळ मी वाचत बसलो होतो कोण जाणे. पण खरं सांगतो, अमेरिकन इंडियन्सच्या स्थितीविषयी साक्षीदारांनी तयार केलेला हा लेख उत्तमच नव्हे—तर सर्वोत्तम होता. मी तर म्हणतो, नॉर्वेजियन शाळा-शिक्षकांनी आपला पूर्वग्रह पोटात घालावा, आणि वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी याच्या प्रती मागवाव्यात! त्यांनी संदर्भांचा ज्याप्रकारे वापर केलाय तो खरंच शिकण्यालायक आहे, बोध करण्याची पद्धतही अगदी सुस्पष्ट. शिवाय, ज्या बाबींमध्ये इंडियन्स आणि साक्षीदारांचे दृष्टिकोन विभिन्‍न आहेत त्या बाबी देखील अगदी प्रामाणिकपणे सादर केल्या आहेत. फसवणुकीचा कुठे लवलेशही नाही. कॅसिनोंची स्थापना हा अनेक इंडियन आरक्षित प्रांतांपुढे असणारा एक मोठा यक्षप्रश्‍न आहे. यांद्वारे अत्यावश्‍यक रोजगाराची सोय होत असली तरीसुद्धा, नैतिकदृष्ट्या काही दुष्परिणाम देखील आहेत. सदर नियतकालिकात हा प्रश्‍न एवढ्या वाकबगारपणे हाताळला आहे, की आपल्या चालू शतकात इंडियन असण्यात नेमकं काय संमिलित आहे याची वाचकाला जाणीव होऊ लागते.”

लेखाच्या समारोपास ब्लिकस्टॉ यांनी म्हटले: “इंडियन्सचा लेख मला इतका आवडला की सावध राहा! नियतकालिकाचा उर्वरित भागही मी वाचून काढला. आणि त्याचं सार्थक झालं, कारण याच अंकात, व्हेल्समधील ऱ्‍होनडाच्या खाणकाम खोऱ्‍यात बंद होत चाललेले चॅपल्स व चर्चेस यांवरील एक हृदयस्पर्शी लेखही मला वाचायला मिळाला. . . .

“माझी मती भ्रष्ट झाली की काय? पक्का नास्तिक असणारा मी, डोळू मिटून साक्षीदारांशी सहमत झालो? . . . आज नको बुवा. पूर्वग्रहाची पाळंमुळं उपटून टाकण्याच्या महत्त्वाची आपल्याला वारंवार आठवण करून दिली जाणे आवश्‍यक आहे. पुढच्या वेळी लबाडीसाठी साक्षीदारांना दोषी ठरविल्याचं माझ्या कानी आल्यास, निदान मला तरी पक्कं माहीत असेल, की इंडियन्ससंबंधी त्यांनी लबाडी केली नव्हती.”

मूळच्या अमेरिकन्सवरील सावध राहा! अंकाच्या खास मागणीमुळे, वॉच टावर संस्थेच्या न्यूयॉर्क मुद्रणालयांत याच्या ३७,००० अतिरिक्‍त प्रती छापण्यात आल्या. आपल्या क्षेत्रात विशेष कार्य करण्यासाठी ॲरिझोनामधील एका मंडळीने याच्या १०,००० प्रती मागवल्या.

यहोवाच्या साक्षीदारांचे विश्‍वास एका पूर्वग्रहरहीत दृष्टिकोनातून जाणून घेण्याची तुमची इच्छा असल्यास कृपया, निःसंकोचपणे पृष्ठ ५ वर दिलेल्या जवळच्या पत्त्याचा उपयोग करून या नियतकालिकाच्या प्रकाशकांना लिहा किंवा तुमच्या येथील स्थानिक राज्य सभागृहास भेट द्या. कोणतेही बंधन नाही, खर्च नाही. अगदी चोख उत्तरे.

[२७ पानांवरील चित्राचे श्रेय]

इंडियन चेहरा: D. F. Barry Photograph, Thomas M. Heski Collection; इंडियन नर्तक: Men: A Pictorial Archive from Nineteenth-Century Sources/Dover Publications, Inc.; तंबू: Leslie’s; आयताकृती रचना: Decorative Art; गोलाकार रचना: Authentic Indian Designs

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा