वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. १८-१९
  • पायांच्या दुखण्यांवर इलाज

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पायांच्या दुखण्यांवर इलाज
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माप, फॅशन आणि पाय
  • बूट खरेदी करताना लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. १८-१९

पायांच्या दुखण्यांवर इलाज

“पायांचं दुखणं मला असह्‍य झालंय!” असे कोणी म्हणते तेव्हा कदाचित तुम्हाला अतिशयोक्‍ती वाटेल, पण संयुक्‍त संस्थानांत पायांची दुखणी इतकी गंभीर झाली आहेत की अक्षरशः हजारो विशेषज्ञांचा त्यांमुळे व्यवसाय चालतो.

चौदा वर्षांदरम्यान, केलेल्या पायांच्या २,००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा अभ्यास केल्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन (विरुपांग शल्यचिकित्सक) डॉ. मायकल कफलिन यांना एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. ते म्हणतात, “कदाचित तुमचा विश्‍वासही बसणार नाही, पण मी केलेल्या या शस्त्रक्रियांपैकी जवळजवळ सगळ्या स्त्रियांवरच होत्या.” पायांची दुखणी विशेषतः स्त्रियांमध्ये का आढळतात?

माप, फॅशन आणि पाय

तीनशे छप्पन स्त्रियांवर घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आले की दर १० जणींपैकी ९ जणी आपल्या पायाच्या मापापेक्षा, चक्क एका मापाहूनही लहान असलेले बूट घालीत होत्या! स्त्रियांच्या बुटांची बनावटसुद्धा या समस्येसाठी कारणीभूत ठरत असावी. ऑर्थोपेडिक सर्जन फ्रँसेस्का थॉमसन सांगतात, “बूट तयार करणारे कारागीर आता पूर्वीसारखे, अरुंद टाच आणि पुढचा भाग पसरट असलेले स्प्लिट लास्ट (साचे) वापरत नाहीत.a

म्हणून बूट घालून पाहताना, पुष्कळ बायकांना बुटाचा पुढचा भाग पायात नीट बसतो तर टाच सैल असते, आणि टाच नीट बसली तर पुढचा भाग पायात फारच घट्ट बसतो. इतर जणी टाच नीट बसते पण पुढचा भाग घट्ट आहे असे बूट निवडतात कारण टाच सैल असली तर चालताना प्रत्येक वेळेस पाऊल उचलले की बूट पायातून निसटतो.

बुटाचा पुढचा भाग अरुंद असल्यास, त्यात पाय कसाबसा बसवणे आधीच कठीण असते. त्यातल्या त्यात डिझायनर्स बुटाची टाच आणखी काही सेंटीमीटर उंच करतात. उंच टाचेचे बूट फॅशनेबल समजले जात असले तरीसुद्धा, त्यामुळे पायाच्या अंगठ्यावर सगळा जोर येतो आणि आधीच आखूड असलेल्या बुटाच्या पुढच्या भागात पाय आणखीन पुढे ढकलला जातो. पोडियाट्रिस्ट, डॉ. डेव्हिड गॅरेट यांचे असे म्हणणे आहे की, “उंच टाचेचे बूट, तुमच्या पायाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असूच शकत नाहीत.” काही तर असेही म्हणतात की उंच टाचेच्या बुटांमुळे हळूहळू तुमचे पाय, घोटे, पोटऱ्‍या, गुडघे आणि पाठीलाही इजा होण्याची शक्यता असते. शिवाय त्यांमुळे पायाच्या स्नायूंच्या आणि अस्थिबंधनांची लांबी देखील कमी होऊ शकते; धावकांना तर फार गंभीर इजा होण्याचा संभव असतो.

स्त्रियांचे पाय या होणाऱ्‍या त्रासाला सहजासहजी जुळवून घेत नाहीत. उलट, व्यक्‍ती प्रौढ झाल्यानंतरही तिच्या पायाचा पुढचा भाग हळूहळू पसरतच जातो. पण टाचेचे वेगळे आहे. डॉ. थॉमसन सांगतात त्याप्रमाणे, “टाचेत एकच हाड असते आणि ते १४ वर्षांच्या वयात जेवढे असते तेवढेच ८४ वर्षांच्या वयातही राहते.” यामुळे टाचेतही नीट बसेल आणि पायाच्या पुढच्या भागातही नीट बसेल असा बूट बायकांना सहजासहजी सापडत नाही.

बूट खरेदी करताना लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी

बुटांच्या मापांमुळे आणि फॅशन्समुळे स्त्रियांच्या पायांना नुकसानच होत असल्यामुळे, पायांची दुखणी टाळण्यासाठी काय करता येण्यासारखे आहे? उपाय हा की बूट विकत घेतानाच काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. काही तज्ज्ञ पुढील सल्ले देतात:

● बूट घेण्यासाठी शक्यतो संध्याकाळी निघावे, कारण या वेळेस तुमच्या पायांचा आकार किंचित वाढलेला असतो.

● एकच नव्हे—दोन्ही बूट घालून पाहावेत.

● बूट टाचेत नीट बसतो की नाही, शिवाय पुढच्या भागाची लांबी, रुंदी आणि उंची पुरेशी आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

● कधीकधी दुकानांत असणाऱ्‍या जाडजूड कार्पेटमुळे पायात नीट न बसणारा बूटसुद्धा तात्पुरता नीट बसला आहे असे भासते, याची आठवण ठेवा.

● पेटंट लेदर किंवा सिंथेटिक मटेरियलपासून बनलेले बूट घेण्याचे टाळावे. मऊ चामडे किंवा स्वेड यांसारखे मटेरियल वापरून तयार केलेले बूट चालताना त्यांवर येणाऱ्‍या दबावामुळे फाटत नाहीत.

● उंच टाचेचे बूट घेतल्यास, बुटांच्या आतील भागात आणखीन पॅडिंग देण्यासाठी चामड्याचे पॅड वापरावे. उंच टाचेचे बूट दिवसभर न घालता, आलटून पालटून थोडा वेळ कमी उंचीच्या टाचेचे बूट घालावेत.

या सल्ल्यांव्यतिरिक्‍त, बूट विकत घेतानाच पायात नीट बसले पाहिजेत हे लक्षात ठेवा. वापरल्यावर बूट आपोआप नीट बसतात अशी सहसा लोकांची समजूत असते पण ती खरी नाही. डॉ. कफलिन बजावून सांगतात की, “घेताना घट्ट बसणारे बूट थोडे वापरल्यावर नीट बसतील अशी तुम्हाला खात्री पटवून देण्याचा दुकानदाराने कितीही प्रयत्न केला तरी कधीही फसू नका. होणारे नुकसान तुमच्याच पायाचे होईल.”

पण सहसा टाच नीट बसली तर पुढचा बोटांकडील भाग फारच घट्ट बसतो आणि पुढचा भाग सुदैवाने नीट बसला तर मग टाच सैल असते; अशावेळेस कोणते बूट निवडावेत? पोडियाट्रिस्ट, डॉ. अन्‍नू गोयल यांच्या सल्ल्यानुसार, असे बूट विकत घ्या की जे नीट बसत नसले तरी काहीतरी तडजोड करता येईल. त्यांच्या मते, “दोन मार्ग आहेत. एकतर, पुढचा भाग पायात नीट बसतो असे बूट घ्या आणि सैल टाचेवर उपाय म्हणून पॅड्‌स वापरा. . . . किंवा, टाचेत नीट बसणारा बूट घेऊन पुढचा घट्ट बसणारा भाग थोडा रुंद करवून घ्या. पण सहसा, चामड्याचे बूट असतील तरच हे करता येईल.”

बऱ्‍याच बायका दररोज १५ किलोमीटर चालतात असा अंदाज असल्यामुळे आपण पायात काय घालतो याकडे त्यांनी कदापि दुर्लक्ष करू नये. अमेरिकन हेल्थ नियतकालिक सांगते त्यानुसार, “पायांची थोडी काळजी घेतल्यास—विशेषतः पायात नीट बसणारे बूट घातल्यास—पायांच्या बऱ्‍याचशा समस्या तुम्ही हमखास टाळू शकता.”

[तळटीप]

a “लास्ट” म्हणजे बुटाला आकार देण्यासाठी वापरण्यात येणारा पावलाच्या आकाराचा एक साचा.

[१८ पानांवरील चौकट]

सहसा आढळणाऱ्‍या पायांच्या चार समस्या

बन्यन्स. बन्यन म्हणजे पायाच्या आंगठ्याच्या बुडाशी असणारा फोड. आनुवंशिक नसल्यास, बन्यन्स हे घट्ट बसणाऱ्‍या किंवा उंच टाचेच्या बुटांमुळे होतात. शेकण्याने किंवा बर्फ लावल्याने दुखणे तात्पुरते कमी होते, पण कायमचे काढून टाकायचे असेल, तर शस्त्रक्रियाच करावी लागते.

वाकडी बोटे (हॅमरटोज). पायाच्या पुढील भागावर ज्यांत खूपच जोर पडतो अशा बुटांमुळे सहसा बोटे खाली वाकतात. हा विकार काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.

कुरूप. फारच आखूड बूट घातल्यास, घर्षणाने आणि जोर पडल्यामुळे कधीकधी पायांच्या बोटांवर टोपीच्या आकाराची फोडे येतात. घरगुती उपाय करून तात्पुरता आराम पडतो, पण ज्या बोटांवर घर्षण होते त्यांना पूर्णपणे बरे करण्यासाठी सहसा शस्त्रक्रिया करावी लागते.

घट्टे. वारंवार घर्षण होत असल्यास त्या भागाच्या संरक्षणासाठी तेथील त्वचा मृत होऊन टणक होते. गरम पाण्यात एप्सम सॉल्ट घालून त्या पाण्याने पाय शेकल्यास घट्टे थोडे मऊ होतात. पण कापण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे त्वचेत जंतूंचा प्रवेश होऊ शकतो.

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

The Complete Encyclopedia of Illustration/जे. जी. हेक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा