जगावरील दृष्टिक्षेप
नैतिक मूल्यांचे पुनरागमन?
चायना टुडे नियतकालिकाच्या अहवालानुसार, अलीकडेच चीनमध्ये घेतलेल्या एका सर्व्हेतून निदर्शनास आले की, “चीनमधील प्रौढ मंडळी विवाहबाह्य संभोगसुखाला आता मोठ्या प्रमाणात मान्यता देऊ लागली असली तरी अधिकांश किशोरवयीनांना अजूनही हे संबंध मान्य नाहीत.” हे अनुमान, सुमारे ८,००० लोकांच्या मतांच्या आधारावर काढण्यात आले. सर्व्हेत असे निष्पन्न झाले की, “विवाहबाह्य लैंगिक संबंध राखून इतरांचे वैवाहिक जीवन उद्धवस्त करणाऱ्यांना एकतर दंड तरी बसला पाहिजे किंवा शिक्षा तरी झाली पाहिजे असे दर पाचपैकी तीन किशोरवयीनांना वाटते, तर ३७ ते ४५ या वयोगटांतील ७० टक्के लोकांचे असे मत आहे की अशा प्रकरणांसाठी कोणत्याही स्वरूपाची शिक्षा केली जाऊ नये.”
प्रेमळ कृत्याची नोंद करणे
द टोरोन्टो स्टार वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, “लहान मुलं फार स्वार्थी असतात, निदान वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत; कारण चौथ्या वर्षांपासूनच ती इतरांविषयी सहानुभूती दाखवू लागतात.” मुलांच्या मनात इतरांविषयी कळकळ जागी करण्यास त्यांना घरच्या घरी काही चांगली कृत्ये करण्याचे प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, मुलांनी दररोज स्वतःहून केलेली कमीतकमी दोन चांगली कृत्ये कौटुंबिक सदस्ये चार्टवर नोंदवू शकतात. आपल्या मुलाने केलेले एखादे प्रेमळ कृत्य पालकांच्या लक्षात येताच ते चार्टवर याची नोंद करू शकतात. शाळेतील दांडगाई रोखण्याच्या प्रत्यत्नांतून बऱ्याच शाळांमध्ये अशा चाट्र्सचा उपयोग केला जातो. इतर मुलांनी केलेली काही चांगली, प्रेमळ कृत्ये मुलांच्या लक्षात येतात तेव्हा चार्टवर त्यांची नोंद करण्यास त्यांना सांगितले जाऊ शकते. “असे केल्याने दया काय आहे हे मुलांना समजते. इतरांविषयी कळकळ वाटण्यास आणि ती आपल्या कृत्यातून दाखवण्यासाठी मुलांना दयेची ओळख होणे फार महत्त्वपूर्ण आहे,” असे सदर अहवाल म्हणतो.
आजही कबूतर पोस्ट उपयुक्त
भारताच्या ओरिसा राज्यातील पोलीस खात्याकडे दळणवळणाचे अत्याधुनिक जाळे असूनसुद्धा आपले “पिजन विंग” बंद करण्याची त्यांची इच्छा नाही. दी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या अहवालानुसार, या पिजन विंगमध्ये ८०० कबुतरांचा थवा आहे. ओरिसा पोलिस खात्याचे महासंचालक श्री. बी. बी. पांडा यांच्या मते, गेल्या ५० वर्षांच्या काळात आलेल्या पूर आणि वादळांमध्ये या कबुतरांनी जणू जीवनवाहिन्यांचे काम बजावले आहे आणि आजही दळणवळणाचे सर्व मार्ग बंद पडतात तेव्हा कबुतरांना पर्याय नसतो. उदाहरणार्थ, १९८२ साली आलेल्या पुरात बान्की गाव उद्धवस्त झाले तेव्हा गावात आणि कटकच्या मुख्यालयात संचार करण्यास उरलेला एकमेव मार्ग म्हणजे कबूतर. ओरिसामध्ये कबूतर सेवेस प्रथम सुरवात झाली ती १९४६ साली; यात, होमर म्हटले जाणारे आणि ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने ८०० किलोमीटरचे अंतर कापणारे बेल्जियमचे कबूतर होते. पंधरा ते वीस वर्षांचे आयुर्मान असणारे हे कबूतर सध्या तीन केंद्रांमध्ये ३४ पोलिस अधिकाऱ्यांच्या निगराणीत आहेत. श्री. पांडा यांनी म्हटले: “सेल्युलर फोनच्या जमान्यात कबूतर सेवा फारच आदीम वाटेल, पण आजही त्यांच्यापासून राज्याला सर्वोत्तम सेवा लाभत आहे.”
मुले शिक्षणापासून वंचित
सन १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सामान्य सभेत विश्व पातळीवरील मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला; शिक्षणावर प्रत्येक व्यक्तीचा एक जन्मसिद्ध हक्क असे स्पष्टीकरण या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. प्रत्येकाला निदान मूलभूत शिक्षण तरी मिळावे म्हणून विश्व पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले असले तरी अजून हे ध्येय निम्मेसुद्धा गाठले गेलेले नाही. “मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारून चक्क अर्ध शतक उलटले आहे; पण, आजही १३ कोटी मुले मूलभूत, प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत,” असे ऑल्गेमायन सायट्यून मायन्ट्स हे जर्मन दैनिक म्हणते. “याचा अर्थ, जगातील एकूण मुलांपैकी २० टक्के मुलांना मूलभूत शिक्षण मिळालेले नाही.” जर्मनीच्या संयुक्त राष्ट्रे बाल निधीचे प्रमुख रायन्हार्ट श्लोगिन्टवाईट यांच्या मते, जगभरातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण द्यायचे झाल्यास सुमारे ७०० कोटी डॉलर इतका पैसा लागेल. ही रक्कम, दर वर्षी युरोपमध्ये आईस्क्रिमवर आणि संयुक्त राज्यांत सौंदर्यप्रसाधनांवर आणि जगभरात शस्त्रास्त्रांवर खर्च केल्या जाणाऱ्या रक्कमेच्या तुलनेत काहीच नाही.
आपत्तीग्रस्त आशिया
द साउथ चायना मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्रानुसार, “गेल्या वर्षी आलेल्या आपत्तींपैकी जगभरातील सगळ्यात भयंकर अशा १० आपत्ती आशियातच आल्या.” यात बांगलादेश आणि चीनमध्ये झालेले विध्वंसकारी पूर आणि शेजारच्या देशांत धुरकट वातावरण निर्माण करणाऱ्या अरण्यातील आगी देखील येतात. आशिया आणि पॅसिफिकसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रे आर्थिक आणि सामाजिक मंडळानुसार, “जगात सगळ्यात आपत्तीग्रस्त भाग कोणता असेल तर तो आशिया. आपत्तीचा धोका कमी करणे हा २१ व्या शकतात आशियापुढे असलेले एक मोठे आव्हान असण्याची शक्यता आहे.”
स्वतःला गुदगुल्या करणे अशक्य
दी इकोनॉमिस्ट अहवाल देते: “नेमक्या ठिकाणी केलेल्या गुदगुलीमुळे एखाद्या मोठ्या माणसाची देखील असह्य दशा होऊन जाते. पण, गुदगुल्यांना संवेदनशील असलेला मनुष्य निदान यात तरी संतुष्टी मानू शकतो, की तो स्वतःला गुदगुल्या करू शकत नाही.” असे का? अलीकडील संशोधनावरून समजते, की हे मानवी अनुमस्तिष्कामुळे अर्थात मेंदूचा तो भाग जो हालचाली घडवून आणण्यास सहयोग करतो त्यामुळे होते. संशोधकांचे असे मत आहे, की मनुष्याचे अनुमस्तिष्क, हालचाल घडवून आणण्यास केवळ सहयोगच करत नाही तर हालचालींच्या संवेदनात्मक परिणामांचा अंदाजही बांधतो. त्यामुळे, आपण स्वतःला गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनुमस्तिष्क संवेदनेचा अंदाज घेऊन संवेदना नष्ट करतो. पण, तेच कोणा दुसऱ्या व्यक्तीने गुदगुल्या केल्यास उत्तेजन आणि अनुमस्तिष्काचा अंदाज एकाच वेळी होत नाही; त्यामुळे संवेदना नष्ट होत नाही. द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रातील एका साधर्म्य लेखाच्या शेवटी म्हटले होते: “गुदगुल्या करण्याच्या कोणत्या संवेदना स्वतः केलेल्या असतात हे मेंदू सांगू शकतो; पण, बाहेरून येणाऱ्या संवेदनांकडे तातडीने लक्ष देता यावे म्हणून मनुष्याने स्वतःहून उत्तेजित केलेल्या संवेदनांना मेंदू जास्त महत्त्व देत नाही.”
मोर्स कोडचा उत्तराधिकारी
सन १८३२ मध्ये शोध लावलेल्या मोर्स कोडचा, “व्यापारधंद्याच्या भरभराटीत आणि इतिहास घडवण्यात मोलाचा वाटा राहिला आहे,” असे जगातील समुद्र प्रवासाचे नियमन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांचे रॉजर कॉन मान्य करतात. सन १९१२ मध्ये टायटॅनिकने एसओएस (तातडीचा बचाव) संदेश—तीन बिंदू, तीन जोडरेघा, तीन बिंदू—दिला तेव्हापासून संकटात सापडलेल्या जहाजांनी त्यास एक आंतरराष्ट्रीय मानक म्हणून उचलून धरले. पण, फेब्रुवारी १, १९९९ रोजी, आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी संघटनेने प्रस्तूत केलेली अभिनव उपग्रह पद्धत, जहाजाच्या उपग्रह टर्मिनलवरील “हॉट की” (अक्षरशः केव्हाही वापरता येणारी कळ) दाबताच आपोआप “जगभरातील सर्व बचाव समन्वय केंद्रांच्या नेटवर्कला” माहितीचे पॅकेज पाठवते. एका जहाजाच्या नऊ अंकाच्या संख्येसोबत पाठवलेल्या आणखीन माहितीमध्ये “समय, जहाजाची स्थिती आणि संकटाचा प्रकार—हा अस्पष्ट स्वरूपाचा असू शकतो किंवा मग अग्नी ते पुरापर्यंत आणि एका बाजूला कलणे यांपासून लुटमारीपर्यंत असलेल्या १२ प्रकारांपैकी कोणताही प्रकार असू शकतो,” असे स्टार म्हणते. ते पुढे असेही म्हणते: “जगाला इतिहासातली सगळ्यात चांगली बातमी देण्यासाठी मोर्सचा उपयोग केला गेला होता: उदाहरणार्थ, दोन्ही महायुद्धांचे शांती करार जाहीर करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला होता.”
आरोग्य समस्यांचा संबंध बुटांशी
“वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या म्हणण्यावरून सूचित होते, की सहा लोकांपैकी एकाला पायांसंबंधी गंभीर स्वरूपी समस्या आहेत; आणि या समस्या सहसा बुटांमुळे होतात,” असे द टोरोन्टो स्टार वृत्तपत्र म्हणते. गुडघे दुखणे, कमरेचे दुखणे आणि डोके दुखी या गोष्टी तुम्ही कोणत्या स्वरूपाचे बूट वापरता याकडे लक्ष देण्याचा जणू इशाराच देत असतील. लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, की “काही दिवसांनंतर बुटांना तुमच्या पायांची सवय होऊन जाते, पण पायांना बुटांची सवय होत नाही,” असे स्टार वृत्तपत्र म्हणते. “तेव्हा, पायांना बुटांची सवय होऊन जाईल असे समजून कोणतेही बूट विकत घेऊ नका. बूट खरेदी करतानाच ते घातल्याने जरा अवघडल्यासारखे वाटत असल्यास ते मुळीच विकत घेऊ नका.” बुटांची खरेदी करताना ती नेहमी दुपारच्या वेळी करावी; कारण “दिवसाच्या या वेळी पाय सहसा जरासे सुजतात,” आणि “बूट टाचेला नीट बसतात की नाही हे पाहण्याऐवजी पायाची बोटे जोडली जातात त्या सांध्याला बूट नीट बसतात की नाही ते पाहा.” संख्याशास्त्रीय अहवालावरून समजते, की पायांसंबंधित समस्या आणि पायांच्या विकृती या जास्तकरून स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. याचे कारण ९० टक्के स्त्रिया “एक तर फार लहान किंवा पायाला अतिशय घट्ट बसणारे बूट घालतात शिवाय, उंच टाचेच्या बुटांमुळे सहसा पायांच्या अनेक गंभीर विकृती होतात.” सदर वृत्तपत्र पुढे म्हणते: “हे देखील लक्षात ठेवले जावे, की दुखणे आधीच सुरू होत नाही; पायाला हानी पोहंचल्यानंतर दुखणे सुरू होते.”
चीनमध्ये बायबलचे प्रकाशन
शिनह्वा न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, “गेल्या दोन दशकात चीनने पवित्र बायबलच्या दोन कोटींहून अधिक प्रती प्रकाशित केल्या असून १९९० च्या दशकाच्या सुरवातीपासून देशातील सगळ्या विख्यात पुस्तकांच्या पंक्तीत बायबल जाऊन बसले [आहे].” समाज शास्त्राच्या चीनी अकादमीच्या वर्चस्वाखाली येणाऱ्या जागतिक धर्म संस्थेचे प्राध्यापक फेन जीनयूआन यांच्या मते चीनमधील ख्रिश्चनांना बायबलच्या दोन प्रती विकत घेण्याचा हक्क आहे. बायबलच्या वीसहून अधिक आवृत्त्यांचे प्रकाशन झाले असून “यात चीनी भाषांतर असलेल्या इंग्रजी आवृत्त्या, सोप्या, प्राचीन अक्षरांतील चीनी आवृत्त्या, अल्पसंख्याक जातीच्या भाषांमधील आवृत्त्या दोन्ही स्वरूपात अर्थात सोबत ठेवण्यासारख्या तसेच डेस्कवर ठेवण्यासारख्या स्वरूपात उपलब्ध आहेत.” याशिवाय, बायबलच्या कथांची असंख्य पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांची संख्या बायबलच्या प्रकाशनांच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. सदर लेखाच्या म्हणण्यानुसार, “१९९० च्या दशकापासून, देशातील सगळ्यात प्रभावशाली पुस्तकांच्या यादीत बायबल ३२ व्या क्रमांकावर आहे,” पण, “सर्वसामान्यपणे पाहिल्यास, पाश्चिमात्त्य देशांच्या तुलनेत धर्माचा चीनी लोकांवर फारसा पगडा नाही.”